Sunday, 20 August 2017

माहेर

तुम्ही नुसता माहेरी जायचं विषय काढा. वसंत ऋतूत झाडांना जशी कोवळी टवटवीत पालवी फुटते ना, तशी समस्त नवरे मंडळींचा चेहऱ्यावर कसा आनंद बहरून येतो. काही काळ का होईना, त्यांना हवे तसं  मोकळं हिरवं रान मिळणार असतं. रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा.  पण पुरुषाचं नशिब मोठं बलवत्तर, इथेही तो आपली बाजी मारून नेतो. कारण स्त्री या गोष्टीचा कधीच विचार करीत नसते. तिने आपल्या पतीला परमेश्वर मानलेले असते. पण सासरी गेल्यावर तिला माहेरपण कळलेलं असतं. स्त्रीला तिचं माहेर म्हणजे भूतलावरचं नंदनवंन वाटतं असतं. सासरी एक वेळेस मोरपीस गालावर खरचटल्यासारखे वाटेल पण माहेरचा वारा तिच्या मुलायम मनात इतका गारवा निर्माण करतो की, तेंव्हा तिला स्वर्गीय आभास निर्माण होत असतो. परमेश्वराने सारी कल्पकता वापरून स्त्रीसाठी सुंदर माहेर निर्माण केलेलं असावं. ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही कोडं पडलं असेल कि मी सृष्टी निर्माण केली खरी परंतु माहेर या ठिकाणी जरा जास्तच अमृत सांडलं कि काय माझ्याकडून. बघू या तर कसला गोंधळ चालू आहे तेथे. तिचं माहेरचं आनंदाचं वर्णन ब्रम्हदेवालाही करणं अश्यक्य झालं असेल कदाचित म्हणून समतोल राखण्यासाठी त्याने लंका तर बनविली नसेल ना !! आणि कधी आपण या लंकेतून प्रयाण करतो आणि कधी माहेराला पोहचू असं तिला जीव की प्राण झालेलं असतं. "रुणझुणत्या पांखरा, जा रे माझ्या माहेरा" जगदीश खेबुडकरांच्या या गाण्याच्या ओळी आयष्यभर तिला सोबत करतात. सासरी कितीही सुख असले तरी ताईच्या मनात माहेरच्या आठवणीतला एक हळवा कोपरा असतो. वर्ष नि वर्षे ती त्या कोपऱ्याला आपल्या मनाच्या पदराखाली जपत असते. त्याच्यावर थोडा जरी ऊन वाऱ्याचं सावट आलं तरी तिच्या जीवाची घुसमट होते. माहेर म्हणजे जेथे आपले आई वडील भाऊ बहीण, काका काकू, आजोबा आजी, मैत्रिणी असतात. ज्यांच्या सहवासात ती लहानाची मोठी झालेली असते. ब्रह्मांडात निसर्ग जसा मोकळा असतो तसं मुलीला माहेर म्हणजे हरणाच्या चंचल पदन्यास करत मुक्तपणे बागडण्यासाठी जणू क्रीडांगण असतं. विवाहानंतर पहिल्यांदा ती जेंव्हा माहेरी जाते त्यावेळी  तिच्या ओलावलेल्या पापण्यातलं माहेरपण काय वर्णावं. आपल्या आईला आपण कधी भेटू आणि ती मला कुशीत घेईल असं तिला एकदाचं झालेलं असतं.

                                  माझं माहेर सावली, उभी दारात माऊली
                                  तिच्या काळजात बाई माया ममतेचा झरा
                                  मला माहेरी पाठवा, मला माऊली भेटवा
                                  माझ्या आईच्या पंखात मला मिळू दे उबारा


नुकतंच लग्न होवून सासर हून आलेली पोरसवदा मुलगी आईच्या मांडीवर जाऊन बसते तेंव्हा काही क्षणा साठी का असेना ती आपलं लग्न झालेलं आहे असं विसरलेली असते. अशीच ती एकदा आली आणि बाबांच्या पायावरच बसली. कितीही केलं तरी मुलगीच ना ती. पायावर बसल्यामुळे  गुढघ्याचे टिशू फाटले जावून त्यांना दवाखान्यात ट्रीटमेंट घ्यावी लागली होती.

पण मी आज तुम्हाला ताईच्या तिच्या माहेरचं माहेरपण सांगणार आहे. माहेर म्हटलं म्हणजे प्रशांत महासागरासारखा विस्तीर्ण किनारा, किंवा घराच्या पाठीमागील पडवीत प्राजक्ताच्या झाडाखाली फुले वेचणारी ताई, असं रम्य तिच्या माहेरी  काही नाही , ना तेथे पोष्ट ऑफिस, ना रेशनिंग ऑफिसची सोय. शिक्षणाची सोय जेमतेम सातवी पर्यंत. एसटी साठी दोन किलोमीटर तर रेल्वेसाठी पाच किलोमीटर पायपीट करावी लागते. हे जरी सर्व काही तेथे नसलं तरी तेथे बैल गाडीच्या चाकोरीबद्ध रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार शेतमळ्यांची गर्दी तेथे आहे. शेतकरी मोटे वरुन शेतातील कांद्यांच्या वाफ्यांना पाणी भरतांना दिसत आहे. कापसाची टवटवीत रुंद पानांची वयात न आलेली पोरसवदा मुलीसारखी हिरव्यागार झाडांची शेती बहरलेली आहेत. चवळी, तूर,मूग उडीद कुळीथ यांची छोटी छोटी झुपकेदार हिरवी झाडे ज्वारीच्या पिकात ज्वारीच्या झाडांना लहान बालकांप्रमाणे बिलगून उभी असतात. कपाशीच्या बोन्डवर कीड लागू नये म्हणून शेतकरी पाठीला पंप बांधून फवारणी करत असतो. दूर नजर जाईपर्यंत जिथे ढगाळ क्षितिज टेकते तेथपर्यंत हे विहंगमय दृश्य नजरेस पडते. त्याच्या पलीकडे लहान लहान टेकड्यांची चराऊ कुरणे आहेत. श्रावण महिन्यात ही गवताची कुरणे हिरवीगार होतात. पानाफुलांनी बहरतात. गुराखी गोठ्यातल्या गाई गुरांना उजाडल्या उजाडल्या चरण्यासाठी या कुरणात  घेऊन येतो. दिवस भरातून पावसाच्या श्रावण सरी पडतच असतात. गुराखी घोंगडी डोक्यावरून पांघरून भर पावसात राखण करत असतो. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे। क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे.  ही बालकवींची कविता अश्या पद्धतीने तिथे वावरते. असं तिचं माहेर चाळीसगांव तालुक्यातील धामणगांव, बाजारपेठ मेहुणबारे पासून तीन किलोमीटर अंतरावर झाडीत वसलेले आहे.                  

त्या लहान लहान हिरव्यागार टेकड्यामधून एका छोट्याश्या भराडी नदीचा उगम होऊन ती नागमोडी वळणाने टेकड्यांना वळसा घालून धामणगांवच्या वेशीला आळशी मुलीप्रमाणे अंग घासून ती पुढे पांझरा नदीला मिळते. नदीच्या काठी मोठ मोठी वड, पिंपळ आणि चिंचेची झाडे आहेत. एका दोन ठिकाणी पाण्याचे डोह साचलेले असून विस्तीर्ण वडाच्या मुळ्या या डोहात उतरल्या आहेत. या डोहाकडे पाहील्या नंतर बालकवींची औदुंबर या कवितेची आठवण होते. डोहाच्या पुढे दहा मीटर अंतरावर एक छोटी उपनदी येऊन मिळते अन तेथे त्रिवेणी संगम तयार झालेला आहे आणि याच ठिकाणी महादेवाचे छोटे जीर्ण मंदिर आहे. पावसाळ्यात नदीला बऱ्याच वेळा पूर येतांना बघितलेला आहे, परंतु हे महादेवाचे मंदिर कधी पाण्यात बुडलेले आठवत नाही. या छोट्या आणि लांबीने कमी असलेल्या नदीकाठी पाचशे लोकसंख्या वस्तीचे ताईचं माहेर धामणगांव नांवाचे गांव वसले आहे. चराऊ कुरणांच्या टेकड्यांच्या पलीकडे धमाणगांव पासून दहा किलोमीटर अंतरावर राजमाने रेल्वे स्टेशन आहे. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदरपासून ते आज तागायत चाळीसगांव धुळे या एकेरी लोहमार्गावरील हे रेल्वे स्टेशन ज्या स्थितीत होते त्याच स्थितीत अजून जसच्या तसंच आहे आणि त्याच्यात काही एक बदल झालेला नाही, हे एक नवलच आहे. याच रेल्वे स्टेशनवर ताईला घेण्यासाठी मी काकांबरोबर बऱ्याच वेळा बैलगाडी घेऊन गेलो आहे. जेंव्हा सहा डबे असलेली आगगाडी काळंशार कोळशाचं इंजिन प्रचंड धुळीचा लोट सोडीत झुक झुक करत स्टेशन सोडीत निघून जात असे तेंव्हा शेवटच्या डब्यातल्या गार्ड हिरवा झेंडा का दाखवतो याचं सिक्रेट काकांना विचारल्यावर त्यांनाही सांगता येईना. मी ताई आणि काका आगगाडी पाठमोरी दिसेनाहीसी होईपर्यंत कौतुकाने बघत असू.

राजमाने रेल्वे स्टेशनवर ताईला घेवून येण्यासाठी बैलगाडी नेहमी हजर असायची. ताईची साड्या आणि कपडे भरलेली पत्र्याची टरंग पेटी आणि काही सामान बैलगाडीत ठेवून सर्वजण व्यवस्थित बसल्या नंतर नाना काका बैलगाडी जुंपत असे. बैलांना व्यवस्थित जोतं बांधल्यानंतर बैलगाडीच्या चाकांच्या मधल्या आर ला काका वंगण देत असे.  हे वंगण एका बांबूच्या नळीमध्ये भरून गाडीवानच्या आसनाच्या खाली बांधलेली असे. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा बहुतेक ही म्हण त्याच्यावरूनच प्रचलित झालेली असावी असं मला मोठं झाल्यावर कळलं. बैलगाडी  सर्पाप्रमाणे नागमोडी वळणे घेत, रोड च्या दोहो बाजूने उंच साबरीतून वाट काढत काका कधी शीळ घालत तर कधी बैलांच्या पाठीवर थाप मारत ललकारी भरत असत. अरुंद वाटेच्या बाजूने झुकलेली गर्द झाडी बघत ताई अगदी बावरून जाई. शेतातली भुईमुगाची झाडं, कापसाची हिरवीगार पिके बघून ताई अगदी हरखून जाई. ताईची जणू ती पिके ओळखीची वाटायची. ती सारखी त्यांच्याकडे एक टक लावून बघत असे आणि माहेरची गाणी पुटपुटत असे. साबरी झाडांचा रस्ता संपल्यानंतर मारुतीचं मंदिर असलेलं परंतु एकही घर हयात नसलेलं, गुढ निर्माण करणारा भला मोठा मातीचा ढिगारा असलेलं देवगावं लागायचं. ताई मला त्या गांवची जुनी गोष्ट सांगायची. बैलगाडी थांबवून ताई त्या छत नसलेल्या देवळाच्या पायऱ्या चढून मारुतीचं दर्शन घेत असे. थोड्याच वेळात नदी ओलांडून बैल गाडी पुढे गेल्यानंतर कौलारू मराठी शाळेचं दर्शन व्हायचं. त्या शाळेच्या बाजूलाच कोपऱ्यावर मोठा गोल आकाराचा दगड असलेला चुना तयार करणारा घाणा दिसायचा. गावांत कोणाला घर बांधायचे असेल तर तो त्या घाण्याला दोन बैलं जुंपून चुना तयार करत असत. त्या जागेला चुन्याचा घाणा असं नांव प्रती रुपाला आलेलं होतं. गांवची साक्ष देणारा तो देवदूतच होता.  कितीतरी दिवसापासून एकाच ठिकाणी गोल गोल फिरणारा, चुना तयार करणारा घाणा पक्का माझ्या मनात दडून बसला होता. त्यामुळे शाळेत मला पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतः भोवतीही फिरते हे समजायला मला वेळ लागला नाही.  तो घाणा दिसेनाहीसा होईपर्यंत ताई त्याच्याकडे तर कधी कौलारू मराठी शाळेकडे बैलगाडीतून वाकून वाकून बघत राहायची. गावांत बैलगाडी शिरता क्षणी बातमी पसरायची. विमल आली. सर्वांचा गराडा ताई भोवती पडायचा. तिचं खूप कौतुक होत असे. आजोबा आजी तिचं आस्थेने चौकशी करत, तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवीत.

गावांत अजून तिची आठवण करणारी माणसे हयात आहेत. माझी ओळख पण तिच्यातच सामावलेली आहे. हा विमलचा लहान भाऊ आहेस ना. आज हे सारं पन्नास वर्षानंतर आठवल्यानंतर मन हळवं होतं. मनातली मोरपिसे हळू हळू उलगडू लागतात.

शिक्षकांनी त्याला तास संपेपर्यंत बाकावर उभे राहण्याची शिक्षा केली आणि विचारलं. "आपले काय आई वडील दोघेही गांवाला गेलेत म्हणून उशीर केला". "गुरुजी मला आई वडील दोघेही नाहीत असं त्या मुलाने सांगताच शिक्षकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेत. "देव किती निष्ठुर आहे असे सांगत, मातृपितृ सुख हिरावलेल्या मुलाबद्दल शिक्षकांच्या मनात करुणा उत्पन्न झाली. पण गुरुजी माझा देवावर विश्वास आहे. गुरुजी म्हणाले तू फार चांगला मुलगा आहेस. त्या मुलाने लगेच उत्तर दिले, नाही गुरुजी, माझा दादा फार चांगला आहे. हे लहान भावाचे मोठ्या भावाबद्दलचे ममत्व भरलेले उद्गार आहेत वहिनीच्या बांगडया या पुस्तकातले.

मलाही लहान, छोटा भाऊ असता तर कदाचित तोही मला असाच म्हणाला असता का, "माझा दादा खूप चांगला आहे". मी पण त्याची आई झाले असते. त्याला शिकवलं असतं, पाठीवर दप्तर घेऊन त्याला शाळेत सोडायला गेलो असतो. तो रुसून बसला असता तर त्याला भरवलं असतं. त्याचा हट्ट पूर्ण केला असता. त्याच्या बरोबर पावसात भिजलो असतो. कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडल्या असत्या. त्याने माझे अजिबात ऐकले नसते आणि मी त्याला खूप खूप समजावण्याचा प्रयत्न केला असता तरी तो मला जुमानला नसता. पण नशिबाचे लेणं कसं असतं बघा. इथे मी झालो लहान आणि मोठी झाली माझी बहिण. दोघांच्या वयातलं अंतर नऊ वर्षाचं. मला आठवतं, मी ही असाच माझ्या मोठी ताईच्या छायेत वाढलो. तिने माझं संगोपान केलं होतं.  लहानपणी तिने माझा सांभाळ केला. माझे वडील दुसऱ्यांच्या शेतावर काम करायचे. आई रोजंदारीवर मजूर बायकांच्या मेळ्यात शेतावर कामाला जायची आणि दिवसभर ताई मला सांभाळायची. माझ्यासाठी तीने शाळाही सोडली. तिचं शिक्षण जेमतेम पाचवी पर्यंत झालं.  माझं खाणं पिणं, रडणं, हट्ट, अंघोळ, कपडेलत्ते, इत्यादी. शाळेत जाईपर्यंत मला चांगलंच कळायला लागलं होतं परंतु तोपर्यंत ताईचं लग्न होवून ती सासरी गेली होती. ती सासरी गेल्यावर मी रडलो कि नाही हे मला अजिबात आठवत नाही. मला आठवतंय ती जेंव्हा जेंव्हा माहेरी यायची तेंव्हा मला खूप आनंद व्हायचा. गल्लीतील सर्व तिच्या मैत्रिणी गोळा व्हायच्या. मोठी प्रौढ बाया माणसं तिची आस्थेने चौकशी करायचे, कधी आलीस गं विमल. चांगली आहेस ना. आता आली आहेस तर रहा आमच्या जवळ माहेरी आनंदाने. दोन महिने तरी जावू नकोस सासरी आता. मला तीन काका, आजोबा आजी, आत्या होत्या. माझे काका ताईचे खूप लाड करायचे. ती माहेराला यायची तेंव्हा ती खूप हसमुख आणि आनंदात असायची. अक्षय तृतीयेला माहेरी आल्यावर माझे वडील तिला झाडाला चार पदरी झोका बांधून देत असत. आमच्या वडिलांना आम्ही आप्पा म्हणत असू. झोक्यावर दोन दोन पदरावर ताई आणि तिची मैत्रीण एकमेकांच्या कमरेजवळ दोरखंडाला अंगठा अडकवून तासंतास झोका खेळत माहेरची गाणी म्हणत असत.

नेहमीच येतो पावसाळा असे म्हणत वर्ष निघून जातं. आणि उन्हाळा संपता संपत नाही. मे महिन्यात अंगाची लाही लाही होते. शेतात झाडांना आंबे आलेले असतात. माझे तिन्ही काका आण्णा, तात्या, नाना आणि माझे बाबा म्हणजे आप्पा आम्ही सर्व जण आंबे उतरवण्यासाठी शेतात ठरलेल्या दिवशी जात असू.  आंब्याच्या झाडावर चढून आंबे उतरविण्याची पद्धत फारच अफलातून असते. कमी वजन असलेली चपळ मुले फांद्या अन फांद्यांवर चढतात एकेक कैरी उतरविली जाते. बारीक फांद्या आणि शेंड्यावरच्या कैऱ्या मोठी माणसे लांब बांबूच्या टोकाशी जाळीदार झोळी आणि मध्यभागी  धारदार पाते जोडलेल्या साधनाने एकेक कैरी काढली जाते. शेवटी हिस्से पाडून कैऱ्यांचे वाटप केले जात असे. खूप मजा यायची. काळ कधी कोणासाठी थांबत नसतो. ऋतुचक्राच्या आसाभोवती फिरणाऱ्या सृष्टीने शिशिर ऋतूची कात ओघळून पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल दिसू लागते. नाही नाही म्हणता शेतकऱ्यांनी आपली शेते पेहरणीसाठी सज्ज ठेवलेली असतात. वटपौर्णिमेला वडाची पूजा करण्यासाठी  बायका साज शृंगार करून सकाळी नऊ च्या सुमारास पूजेचं ताट घेऊन घराच्या बाहेर पडतात. त्या दिवशी ताई नववारी पातळ नेसून, नाकात नथ, हातात हिरवा चुडा भरून नाव नवरी सारखी दिसायची.  एव्हाना पहिल्या पावसाला सुरुवात झालेली असते. वाटपर्णिमेच्या शृंगारानंतर तो वसा धरती स्वतःकडे ठेवून घेते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्व सृष्टीत चैतन्य भरल्यासारखे वाटते. शेतात कमरेपर्यंत पिके मोठी होऊन लहान मुलांसारखी डोलतात. श्रावण महिन्यात मंगळा गौरीला पण ताई माहेराला येत असे. गावातली घरे मातीचीच असल्यामुळे श्रावण महिन्याच्या पावसाच्या झडीत मातीची घरे गळत. तरी सुद्धा घरातच वरच्या वेलींना दोर बांधून झोके खेळले जात असत. अखेर तो एक दिवस उजडायचा, सासरी जातांना ताईच्या मनाचे सर्व बांध तुटायचे. तिला खूप रडू येत असे. कारण पोरसवदा वयातच तिचं लग्न झालेलं, म्हणून माहेरच्या आई, बाबा, काका, काकू,आजी, आजोबा, मैत्रिणी, शेजारी पाजारींची आठवणी तिला त्रस्त करीत असत. गांवच्या मध्यभागी असलेले पिंपळाच्या झाडाचं छत्र असलेलं मारुतीचे प्रशस्त देऊळ, गावाच्या बाहेर असलेली कौलारू मराठी शाळा, नदीच्या काठी असंख्य परंब्यांनी झुंबणारं अती भव्य वडाचं झाड, त्रिवेणी संगमावर असलेलं ते छोटंसं महादेवाचं मंदिर, भुईमुगाचं उगवलेली हिरवंगार शेतं या साऱ्या आठवणी, जेंव्हा लहान काका बैलगाडीतून ताईला राजमाने रेल्वे स्टेशनवर सोडायला जायचे त्यावेळेस तिच्या पाणावलेल्या डोळ्यातून स्पष्ट दिसत असे. पण त्यावेळेस ताई का रडते हे मला कळत नसे. बाल वयातला हा विरह न कळणं हे परमेश्वरानेच लहान मुलांना अज्ञान सुखात ठेवलेलं असतं.

ताई सासरी गेल्यानंतर घर सुनं सुनं लागत असे. दिवाळी पंधरा दिवसावर आली की मी ताईला घेण्यासाठी जाऊ लागलो. कारण मी आता बराच मोठा झालो होतो. जस जसा मी मोठा होत गेलो. तसतसा मी ताईकडे सुट्टीमध्ये जाऊन राहत असे.माझं पदवी शिक्षण होईपर्यंत मी ताईच्या गांवाला जाऊन राहत असे. आता सर्व काही बदललेलं आहे. मी मुंबईत स्थयिक झालो. मधून मधून गांवाला येत असतो. मराठी शाळा अजून तशीच आहे. कौलं मात्र फुटलेल्या अवस्थेत आहेत. बऱ्याच दशकापासून जीर्ण अवस्थेत असलेली पडकी देवालाये असतात ना तशी. शाळेच्या कोपऱ्या वरचा चुन्याचा घाणा, त्याच ते गोल रिंगणाचं नामोनिशाण नाहीसं झालेलं आहे. आहे फक्त चुन्याचा घाण्याचा गोल मोठा दगड साक्ष देण्यासाठी एका बाजूला पडून आहे.

आज परत मी गावाकडे जाण्यासाठी निघालो आहे. आता एस.टी. ची सोय झाली आहे. चाळीसगांव ते धामणगांव कॉलेज एसटीत मी बसलो आहे. बस जेंव्हा धामणगांववरून वापस येईल त्यावेळेस विद्यार्थ्यांची गर्दी भरली जाईल याची मला कल्पना आली आहे. आता जातांना तुरळक पॅसेंजर बसले आहेत. एक बाबा माझ्याकडे काही संशयित नजरेने बघत आहे. तरी त्यांनी मला विचारलंच. तू विमलचा भाऊ का. मी हो म्हणताच त्या बाबांनी सर्व चौकशी करून ताई बद्दल विचारलं. मी त्यांना सांगितलं , आता माझी ताई नाही आहे या जगात. गांवाला ज्या घरात माझ्या वडिलोपार्जित अनेक पिढ्या नांदल्या ते घर आमच्या आई वडिलांच्या हिस्स्यावर आलेलं, तिथेच आम्ही सर्व भावंडं लहानाचे मोठे झालोत. त्याच जागेवर आईचं बाबांचं नवीन घर बांधलं, परंतु एक उणीव अजून जाणवते. आता झोका तेथे बांधला जात नाही. शेतातली आंब्याची झाडेही नाहीशी झाली आहेत. नदीचा आकार ही थोडा बदललेला आहे. डोहाच्या ठिकाणी छोटंसं धरण  बांधलं गेलं आहे. वडाच्या पारंब्या सुद्धा लुप्त झाल्या आहेत. देवगावं वरच मारुती मंदिर, त्रिवेणी संगमावरच महादेवाचं मंदिर अजून मात्र चांगल्या अवस्थेत आहेत.