Wednesday 19 July 2017

श्रद्धांजली

रात्रीचा एक वाजलाय. डोळ्यात झोपेचं नामोनिशाण नाही. मध्य रात्रीपासून मी असाच  भिंतीवरील टांगलेल्या फ्रेम सारखा खिडकीच्या चौकटीत उभा आहे. अमावस्या नसतांना देखील बाहेर कमालीचा काळोख पसरलाय.   पाऊस मध्यरात्रीच्या आधीपासून कोसळतोय. एरवी शांतता भंग करणारी घड्याळातली टिक टिक पावसाच्या आवाजात विलीन झाली होती. सोसायटीतली आणि रस्त्याच्या कडील झाडे निपचीत सुन्न अवस्थेत उभी आहेत. न जाणे पक्षांनी आपल्या पिलांसह कुठे निवारा घेतला असेंन. वातावरणातील गूढ अधिक गडद होत चाललंय. चोर पावलाने येवून त्याने त्या काळोखाला प्रचंड झोडपून काढलय. कालचक्राने संपूर्णच पावसाळा इथे ओतलाय की काय. आणि तो नेहमी हीच वेळ का निवडतोय. हे रहस्य काळजाला स्पर्श करते आहे. एक अनामिक हूर हूर जाणवतेय.  बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे यांच्या कवितेतल्या ओळी तीच अस्वस्थता जागृत करतात. कोठुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला । काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला ।। घरात सुद्धा अंधार वावरतोय. टेबलावरच्या पुस्तकातली  पाने वाऱ्याने फडफड करून पावसाशी केविलवाणी स्पर्धा करताय. खिडकी बंद करून घ्यावी म्हणून हात सरसावताच, एक करुण आर्त किंकाळी लांबून ऐकू यावी असा भास झाला. साखरेने जर उसातून बाहेर न येण्याचा कडू निर्णय घेतला तर या सृष्टीतल्या चरा चरातला गोडवा निघून जाईल. पण असं होणे शक्यच नाही कारण तो निसर्गाचा अमृततुल्य असा अप्रतिम आविष्कार असतो. पण असाच एक आविष्कार निसर्गाने काही क्षणापर्यंत थांबवला आणि भयानक उद्रेक उफाळून वर आला. ज्या डोंगराच्या कुशीत अनेक पिढ्या नांदल्या, ते माळीण गांव उध्वस्त होवून 30 जुलै 2017 तीन वर्षे होत आलीत. प्रत्येकाला मिळालेलं जीवन हे विश्वातलं सुंदर स्वप्न असतं. ते स्वप्न बघत झोपी गेलेलं गांव सकाळी जागे झालंच नाही. मुसळधार वृष्टी होवून डोंगर  दरड कोसळली आणि जवळ जवळ संपूर्ण गावच क्षणार्धात गायब होवून काळाच्या उदरात गडप झालं. हुंदके द्यायला सुद्धा त्याने फुरसत दिली नाही. नेहमी प्रमाणे माळीण गांवच्या प्रवाशांना घेण्यासाठी सकाळी एसटी आली खरी पण, एसटी चालकाला गावंच सापडेना. या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात श्रीयुत भरत कांडके लिखित  "एक होतं माळीण"  एका दर्जेदार, अश्रूला मोकळी वाट करून देणाऱ्या नाटकाने आकार घेतला. हा केवळ योगायोग नव्हता, तर त्यांनी वाहिलेली ती ही एक श्रद्धांजलीच होती.


बुब्रा नदीच्या काठावर

पाच वाड्यांचं गांव

हिरव्या हिरव्या राशी

डोंगराच्या पायथ्याशी

निसर्गाच्या कुशीतलं जसं

मांडीवर झोपलेलं बाळ

जगापासून अलिप्त

माळीण त्या गावांच नावं

गाई म्हशी शेळ्या मेंढ्या

दूध दुभते भात शेती

अनेक पिढ्याचं समाधानीं गांव

एके दिवशी

अचानक झाली अति वृष्टी

डोंगराच्या कडा पाणावल्या

सामील झाल्या जलधारा

कोसळली डोंगर दरी

भुईसपाट सारं गांव

मूक आक्रोश वाहून गेला

सांगायला ही नाही कोणी

उरली चिखल माती

हिरवे हिरवे गार गालीचे

कागदावरची नांव

बुब्रा नदीच्या काठावर

होतं माळीण एक गांव

Tuesday 4 July 2017

झेप - 3

ही गोष्ट साधारण इ.स. 1918 सालची आहे. सनदी नोकरीसाठी तीन आय.सी.एस. सेक्रेटरी त्या तरुण उमेदवार मुलाची मुलाखत घेत होते. त्या मुलाला मुलाखती साठी येण्यास थोडा उशीर झाला होता आणि त्याची मुलाखत होण्यापूर्वीच जागा भरल्या गेल्या होत्या. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून ते अधिकारी त्या तरुण मुलास प्रश्न विचारीत होते. मुलाखत संपवतांना एका अधिकाऱ्याने विचारले, "तरुण गृहस्था, जर आम्ही तुझी निवड केली नाही, तर तुला काय वाटेल" ?

त्या तरुणाने ताडकन उत्तर दिले, "माझा देश खूप मोठा आहे. आणि मी ही तरूण आहे. कुणी सांगावे कदाचित मला याहूनही अधिक चांगले काम मिळेल." त्या तरुणांच्या उत्तराने निवड समितीवर चांगलीच छाप पडली. काय आश्चर्य, त्याच्यासाठी एक जागा निर्माण करून त्याची नेमणूक करण्यात आली. हा मुलगा डेप्युटी कलेक्टर झाला. पुढे बारा वर्षांनी डेप्युटी कलेक्टर असतांना म्हणजे 1929 साली त्यांनी या ब्रिटिश सरकारच्या नोकरीचा राजीनामा दिला व स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला.

स्वातंत्र्य चळवळीत असतांना त्यांना बऱ्याच वेळा जेलमध्ये सुद्धा जावे लागले. त्या तरुणांच्या मनात नवचैतन्य, आशा, जिद्द, आकांशा नवप्रेरणाची गुढी होती. म्हणूनच ही कहाणी इथेच पूर्णविराम घेत नाही.

वयाच्या 81 व्या वर्षी म्हणजे 24 मार्च 1977 रोजी ती व्यक्ती भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाली. 100 रुपया वरच्या सर्व मोठया नोटा बंद करण्याचा धाडसी निर्णय या व्यक्तीनेच घेतला होता. ती व्यक्ती म्हणजे माननीय मोरारजी देसाई. या तडफदार व्यक्तिमत्वाला सलाम.

2005 वृत्तपत्र कात्रणातून

सुंदर लेणं

असं कधीतरी वाचलेलं आठवतं, गाईंच्या खुरातून उधळलेल्या धुळीनं त्याचं सर्वांग धूसर झालं त्यामुळे त्याला पांडुरंग नांव लाभलं. हे नांव महाराष्ट्रात मराठी संस्कृतीत घराघरात आणि चराचरात मिसळून गेलं. कधी हे नांव कीर्तनातून, कधी अभंगातून कधी चित्र शिल्पातून तर कधी लोककथेतून आवर्त होतांना दिसतं. संत नामदेव महाराज आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर,  तेव्हा होते पंढरपूर. असाच एकदा शिल्पकाराला पडला होता प्रश्न. जसा ज्याला भासला तसा तो विठ्ठल

ओबड धोबड पाषाणात

सुंदर लेणं लपलेलं

वाट बघतं

प्रतिभावंत कलाकाराचं

छिनी हातोडयला पडला प्रश्न

काना मात्रा उकार वेलांटीचं

रूप सोवळं साकारलं

अठ्ठावीस युगेच्या विठ्ठलाचं