Wednesday 27 September 2017

ऋण जया व्याज नाही

रात्रीचा दीड वाजलाय. लाईट बंद करून अंथरुणावर पडलो. डोळ्यात झोपेचं नामो निशाण नाही. झोप येईना म्हणून परत उठलो आणि खिडकी उघडली, मुसळधार पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज होता, तोही दिशाभूल करणारा ठरला. हवेत गारवा जरूर होता. परंतु मन बेचैन होतं. काहीतरी हरवलेलं शोधत होतं. वी.स. खांडेकरांचं सुखाचा शोध हे अर्ध राहिलेलं पुस्तक परत वाचायला घेतलं. खरं सांगायचं म्हणजे बायकोमुळेच मला वाचनाची गोडी लागली होती आणि ती मात्र दिवसभर काम करून बिचारी झोपी गेली होती. पुस्तक वाचता वाचता पेज नंबर 28 पानावर येवून पोहचलो. आणि एका वाक्यावर थांबलो. "काही केल्या मन पूर्वीसारखे स्थिर होईना, परंतु त्याचा तरी काय अपराध होता." हो खरं आहे. अचानक मन कोळशाचं इंजिन उलटया दिशेने धावतं तसं धावायला लागलं. उलटं धावतांना जरा जास्तच धूर सोडत होतं असं चित्र डोळ्यासमोर तरंगत होतं. धुळ्याच्या एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेजचा तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा पहिलाच दिवस होता. कॉलेजला जाण्यासाठी पॅन्ट शर्ट असा फुल ड्रेस माझ्याकडे नव्हता. सफेद विजार आणि पांढरा शर्ट घालून मी कॉलेजला गेलो. काही मुलं माझ्याकडे संशयित नजरेने बघत होती परंतु ते माझ्या लक्षात आले नाही. प्री डिग्री कॉमर्स ला प्रवेश घ्यायचा अजून बाकी होतं. माझ्याकडे पैसे पण नव्हते. आई शेतावर मजुरी करायची, बारा आणे दिवसाला रोजंदारी होती. कॉलेजच्या शोकेसेस मधल्या नोटिसा वाचून मधल्या सुटीचा वेळ घालवला खरा, परंतु प्रवेश घेण्यासंबंधी अनिश्चितता होती. नोटिसच्या खाली "प्राचार्य सही" या शब्दावर नजर खिळली. आपण प्राचार्य यांनाच अर्ज लिहून मोफत प्रवेश घेता येईल का असा विचार मनात चालून आला. मला कोणी मित्र ही नव्हते. अर्ज कसा लिहायचा तेही समजेना. शोकेसेस मधल्या नोटिसांचा मजकूर, मायना कशा पद्धतीने लिहिल्या आहेत ते ध्यानात आलं, आणि लगेचच एका कोऱ्या कागदावर अर्ज लिहून मोकळा केला. घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या फारच कमकुवत असल्यामुळे मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाची प्रवेश फी भरण्यास असमर्थ आहे, तेंव्हा मला एक रुपयात प्रवेश देण्यात यावा असं मी अर्जात आर्जव केली. माझा अर्ज वाचून प्रिन्सिपॉल साहेबांनी एक टक नजरेने मला नखशिखान्त न्याहाळले आणि शाईच्या पेनने एक रुपयावर सर्कल करून तीन रुपयात प्रवेश घेण्याची सवलत दिली. मला खूप आनंद झाला. प्रिन्सिपॉल साहेबांच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि प्री डिग्री कॉमर्सला रीतसर प्रवेश घेतला. वार्षिक परीक्षेची फी भरण्यासाठी पुअर बॉईज फंडातून 20 रुपयांची मदत देखील मिळाली. अश्या पद्धतीने माझ्या आयुष्याच्या प्रवासात संकटकालीन खिडकीतून खूप सहाय्य मिळालं. एस एस व्ही.पी.एस. कॉलेजच्या मागच्या बाजूला वीटाभट्टी नावांची वस्ती अजून आहे, तेथे आईने गबा परबत पाटील यांची ओळख काढून त्यांचीच खोली दहा रुपये महिना भाडयाने मिळवून दिली. कॉलेज मधील सर्व मुलं मुली इस्टमन कलर कपडे घालून येत असत. कोणी माझ्याकडे बघू नये म्हणून मी शेवटच्या बेंचवर बसत असे आणि सर्वांच्या उशिरा बाहेर पडत असे. दिवसामागून दिवस जात होते. पोळ्याला मी धमाणगांवी घरी आलो. माझे काका मराठी शिक्षक होते. त्यांचं नांव पंढरीनाथ. आम्ही सर्वजण त्यांना तात्या म्हणून हाक मारायचो. ते पण पोळ्यासाठी गांवी आले होते. मला त्यांनी कॉलेजच्या प्रवेशासंबंधी विचारपूस केली. ह्याच ड्रेसवर तू कॉलेजला जातोस का असं त्यांनी मला विचारलं. त्यांना काय वाटलं माहीत नाही. त्यांनी घरातल्या शेवटच्या अंधारकिर्द कोठडीतून जुना टरंग (पेटी) काढून आणली. त्यांचा लग्नाचा सूट त्याच्यात होता. त्यांचं लग्न झाल्यापासून त्यांनी जपून ठेवला होता. त्यांनी त्यांच्यातली सफेद रंगाची पॅन्ट काढून माझ्या हातात सुपूर्द केली. जणू काय ती याच क्षणाची वाट बघत होती. मला प्रचंड आनंद झाला. काकांनी दिलेली पॅन्ट घेऊन मी पळतच घरी आलो. पॅन्ट घालून बघितल्यावर समजलं ती सर्वांगाने मोठी म्हणजे सैल होत होती. धुळ्याला वीटभट्टी वस्तीच्या नाल्यापलीकडे एक मुसलमान वस्ती आहे. तेथे एक गरीब मुसलमान टेलरिंगचं काम करीत असे. माझ्या मापाची बनविण्यासाठी मी त्याच्याकडे ही पॅन्ट घेवून गेलो. त्याने, बिचाऱ्याने रात्रीतून ही पॅन्ट उसवून माझ्या मापाची बनवून दिली. मजुरी 20 रुपये झाली होती. परंतु त्याने माझ्याकडून त्यावेळेस पैसे मागितले नाहीत आणि सांगितले की तुझ्याकडे येतील तेंव्हा दे. त्याच्यानंतर मी त्याला बऱ्याच वेळा भेटलो देखील परंतु मी त्याला पैसे दिले नाहीत. काकांनी दिलेली पॅन्ट मी सलग दोन वर्षे वापरली. हळू हळू आयुष्य आकार घेत होतं. माझं ग्रॅज्युएशन झाल्या नंतर मला त्याच एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेज मध्ये क्लार्क नोकरीची संधी चालून आली, परंतु मी पुणे येथे जाणे पसंत केले. मी सुरुवातीला पुणे आणि नंतर मुंबई येथे स्थिर स्थावर झालो. चांगल्या एम.एन.सी. कंपनीत नोकरी मिळाली. पस्तीस वर्षे नोकरी करून वयाच्या साठाव्या वर्षी रिटायर झालो. हवेश्या वाटणाऱ्या वाटेवरून वाटचाल मला करता आली नसेल हे मान्य, परंतु आयुष्यात आलेलं प्रत्येक वळण आपलंसं करून घेतलं तर जगणं सोपं होतं हे कळलं. परंतु तेथे कर माझे जुळती या माझ्या किशोर वयातल्या त्या अनमोल स्मृती मला अजून अस्वस्थ करतात. रात्रीच्या प्रहरी भिंतीवरच्या कॅलेंडरची पाने जेंव्हा फडफडू लागतात, तेंव्हा ती पाने माझ्याशी हितगुज करतात. मला आठवण करून देतात. त्या टेलरचं ते वीस रुपयाचं अनमोल ओझं अजून मी माझ्या माझ्या मनाच्या तिजोरीत सांभाळून ठेवलं आहे. मी जर त्याला ते वीस रुपये वापस करण्याचा प्रयत्न केला तर तो एक माझा अपराधच ठरेल. मी त्याचा अपमान करतो आहे असा अर्थ होईल. कॅलेंडर वरून खिडकीच्या बाहेरील काळ्याकुट्ट अंधाराकडे जेंव्हा मी बघतो तेंव्हा, प्रिन्सिपॉल साहेब अजून माझ्या अर्जावर शाईच्या पेनने सर्कल करत आहेत आणि विचारताहेत अजून किती दिवस तुम्ही सवलत मागणार आहात. एस.एस.व्ही.पी.एस. कॉलेजच्या पाठीमागील बाजूस विटाभट्टी वस्तीत मिळालेल्या रूमच्या मालकाने सुरुवातीचा पहिला महीना सोडून चार वर्षात माझ्याकडून कधीही भाडं मागितलं नाही. ते ऋण उराशी बाळगून आयुष्यभर वाटचाल करीत राहिलो. अकौंटंन्सी या विषयाची प्रायव्हेट टीचेरने कधीही ट्यूशन फी मागितली नाही. उलट त्यांच्या चार्टर्ड अकाउंट्स फर्म मध्ये पन्नास रुपये महिना पगार देवून मला हिशेब तपासणीचे काम मिळाले. हे सर्व अनमोल ऋण माझ्या आयुष्यातले महत्वाचे अविभाज्य घटक आहेत आणि ते मी माझ्या स्मृतीत अजून जपून ठेवले आहेत. तेच तर माझ्या आयुष्यातले अनमोल रत्न आहेत.
S.S.V.P.S Arts, Commerce & Scienc College Dhule

Thursday 14 September 2017

शाळा माझी कौलारू

फार फार वर्षापूर्वी माझी शाळा अशी कहाणीची सुरुवात करायला नक्कीच आवडलं असतं. परंतु साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी ज्या मराठी प्राथमिक शाळेत मी शिकलो ती शाळा धामणगांव , तालुका चाळीसगांव. जिल्हा जळगांव. या गांवच्या भूमीत माझा जन्म झाला. त्या वेळी म्हणजे माझ्या लहानपणी  गावांत रेशन दुकान काय तर साधं पोष्ट ऑफिस सुद्धा नव्हतं. बाजारहाट साठी सुद्धा शेजारच्या मेहूणबारे या मोठ्या गावांत जावं लागत असे. शाळेत मुलांची संख्या नगण्यच होती. शाळेचे हेड गुरुजी गावांत गल्ली गल्लीत फिरून चालू वर्षी किती नवीन मुलं दाखल होणार याची नोंद ठेवत असत. एकदा हेड गुरुजी आमच्या घरावरून जात असतांना माझ्या आईने त्यांना अडविले आणि विनंती केली की, माझ्या मुलाला सातवं वरीस लागलंय, त्याला बी शाळेत टाकायचं. गुरुजींनी आईला माझं पूर्ण नांव विचारलं. घरात आणि गल्ली बोळातले मला बापू या नांवाने  हाक मारायचे, आईने माझं नांव बापू सांगीतलं. पण गुरुजींनी ते मान्य केलं नाही कारण ते माझं टोपण नांव होतं. आईने माझं खरं नांव ठेवलंच नव्हतं. आईला प्रश्न पडला, की माझं नांव काय ठेवायचं. आईने त्यांना विनंती केली की, तुमचं जे नांव आहे ना गुरुजी तेच लिवा की. हेड शिक्षकांचं नांव आनंदराव होतं. आणि अश्या पद्धतीने माझ्या नावाचं नामकरण झालं. तेंव्हापासून ते आजतागायत कागदोपत्री, ७/१२ वर सुद्धा माझं नांव आनंदराव झालं. शाळेत हातावर छडी मारून किंवा दोन्ही हातांनी कान धरून उठ बस करण्याची शिक्षा मिळायची, म्हणून मी शाळेत जाणे टाळायचो. मला चांगलच आठवतं, लहानपणी माझी आई मला तिच्या कडेवर बसवून शाळेत सोडायला यायची. कारण तिला वाटायचं मी खूप शिकून मोठं व्हावं. आपल्या पोरानेही गांवातील लोकांसारखं मास्तर व्हावं, शहरात जावून नोकरी करावी आणि झालंही तिच्या मनासारखं. आईमुळे मला शाळेची जाण्याची गोडी लागली. ज्या शाळेत मी लहानाचा मोठा झालो, वाढलो, खेळलो, शिकलो आणि ज्या शाळेने माझ्या बाल मनावर संस्कार केलेत, मला जाणता केलं, आणि दुनियेची दारं उघडी करून दिलीत, आज मी त्या माझ्या शाळेचं वर्णन करतांना माझे हाथ थरथरले, डोळे पाणावलेत.


 

चुन्यात बांधलेल्या त्याच, आता जीर्ण दगडी भिंती

तेच तारेचे कंपाउंड, खिळे निखळून पडलेले

खिडक्या अर्धवट सताड उघड्या, जसी बंदिस्त धर्मशाळा

होते वाळूंचं अंगण, शोधिती डोळे चौफेर

इंद्रधनूची शाळा, होती लालबुंद कौलांची

आता नाही रूप साजणे, बिन आधाराने घरंगळलेली

डोळ्याच्या कडा पाणावल्या, पावसात भिजून गेल्या

शाळेच्या आठवणींनी,  हृदयाला पीळ पडला

Thursday 7 September 2017

रोज नव्हे, कधी तरी

("रोज नव्हे, कधी तरी" काही विचार पुष्पे वृत्तपत्र कात्रणे, साधकाची चिंतनिका व निवडक लेखकांच्या पुस्तकातून वेचलेली आहेत)

खरं तर माझ्यापेक्षाही जास्त हळवा तू होतास. हळवेपणा ही कमजोरी नसते तर ती तुमची ताकद असते आणि नाते घट्ट बनवते हे मी त्यादिवशी अनुभवले.

लोकसत्ता ०४.०७.२०१८                         मानसी होळेहुन्नूर

            ***********************

या अवाढव्य जगात रोज काहींना काही नवीन घटना घडत असतात, नवीन शोध लागत असतात, तसेच नवनवीन पुस्तके देखील लिहिली जात असतात. जेवढी पुस्तके लिहिली जातात त्याच्या निम्मे विकली जातात किंवा नाही, जेवढी विकली जातात त्याच्या निम्मे वाचली जातात किंवा नाही आणि जेवढी वाचली जातात त्याच्या निम्मे पुस्तकांचा अर्थ समजला जातो किंवा नाही अशी खंत शांता ज.शेळके त्यांच्या मधुसंचय या पुस्तकात व्यक्त करतात. तरी सुद्धा नवीन साहित्य रोज जन्माला येतच असते,  
 

                    ***********************
 
श्रध्दा माणसास सत्यनिष्ठ्य व नीतिमान बनवते. श्रद्धेला कधीही मोडतोड वा तडजोड मंजूर नसते

                  ***********************

थोरो एकदा म्हणाला, जगातील उत्तम पुस्तकं वाचा, अगदी प्रथम वाचा, नाही तर तुम्हाला ती वाचायची संधीच मिळणार नाही.
                     
**********************
 

पूर्वग्रह करून घेणे हा मोठा दोष आहे, पूर्वग्रहामुळे सत्य समोर येत नाही.

.........साधकाची चिंतनिका

                         *******************
गुलाब फुलतो, सुगंध दरवळतो, आपले सौंदर्य व मधुर सुवास याची त्याला मुळीच जाणीव नसते. निसर्गाने जसे बनवलें, तसें बनून राहणें एवढेंच फुलास माहीत, आपणही तसं जीवन जगू शकणार नाही का.

.........साधकाची चिंतनिका

 *************

 
                             *************

                             *************
 

                             *************
सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावर चाललेला रंगविलास, आणि भव्य सौंदर्याची ती झगझगीत पेठ पाहून, पाहणाऱ्याचे डोळे दिपून जातात.....................वि.वा. शिरवाडकर


                             *************

                             *************
 

                             *************

                             *************

                             *************

                             *************

                             *************

                             *************
लक्ष्मी

आज  तुम्ही  सुबत्तेत  आहात.  लक्ष्मी  घरी  नांदते  आहे.  तिने  भरभरून  दिले.

जे  मिळाले  ते तुम्ही  टिकवा. लक्ष्मी  म्हणजे  फक्त  सोनेनाणे,  दागिने  नाही  तर

घराची  वास्तू,  घरातले  अन्न  धान्य,  कपडा लत्ता,  ज्ञानसंपत्ती,  मुलेबाळे, घरी

येणारा  अतिथी,  घरच्या  परंपरा,  रीतिरिवाज,  दारातील  गुरे-ढोरे, शेती, घरची

माणसं, घरात सर्वांसाठी कष्ट करणारी गृहिणी ही सगळी लक्ष्मीचीच रूपे आहेत.

या कुठल्याही  रूपातील लक्ष्मीची कधीही अव्हेलना करू नका. धान्याचा केरात

पडलेला  एखादा दाणा  ही उचलावा, कारण धान्य म्हणते, "तू मला काढ केरातून

मी  तुला काढतो  ऋणातून"  लक्षात ठेवा, कष्टाने लक्ष्मी घरी येते, पण सन्मानाने

वागवले तरच ती टिकते.


वृत्तपत्र कात्रण 2003

 *************

आपल्या घरात जशी एक कचऱ्याची टोपली असते

तशी अपल्या मनातही एक कचऱ्याची टोपली ठेवणे

आवश्यक आहे. तुम्ही हा प्रयोग जरूर करून पहा. 

जस जसे तुमचे वय वाढत जाईल तसतसी या 

टोपलीची तुमची गरजही वाढत जाईल. मनात साचत 

जाणारी केवढीतरी रद्दी तुम्हाला या टोपलीत टाकून

देता येईल. आणि त्या प्रमाणात तुमचे मन खूप स्वच्छ, 

निर्मळ राहील.


मधुसंचय................शांता ज.शेळके

 *************


 *************


 

 *************


                                                 *************

 *************


 *************


 *************


 *************


 *************


 *************

                        

 *************




 *************

                     


 *************


 *************


 *************

       

 *************

 *************



                     

 *************

तुम्ही ईतिहास वाचला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल, मानवी इतिहासात एवढा गतिशील कालखंड कधीच आला नव्हता जसा तो आज डोळ्यासमोर आहे. प्रगतीची दालने समोर उपलब्ध असतांना या जगात प्रत्येकाला यशस्वी होण्याची संधी आहे.


 *************

प्रवाहाच्या दिशेने सारेच पोहतात. कारण तसे पोहणे सोपे असते. त्यासाठी वेगळे श्रम करावे लागत नाहीत. खरा कस लागतो तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यात.


 *************






आयुष्यात आलेलं प्रत्येक वळण हे आपलंसं करून घ्यावे. आयुष्यातले निम्मे प्रश्न सुटतात.

 *************




फिट इंडिया


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या आपल्या आकाशवाणीवरील ४३व्या अभिभाषणात फिट इंडियाचं आव्हाहन केलं आणि थोडं दचकल्या सारखं झालं. कॉलिफाईड तरुण कशी बशी नोकरी पदरात पाडून घेतो हे खरे परंतु आपल्याकडे खेड्या पाड्यात जो जेमतेम दहावी ते बारावी शिकलेला तरुण वर्ग आहे ती संख्या फार मोठी आहे आणि जे सहा ते आठ वर्षांपासून घरी बसून आहेत. तो तरुण वर्ग नोकरी साठी वण वण भटकतो आहे. हा तरुण वर्ग पोलीस आणि नेव्ही भरतीची अगदी चातकासारखी वाट बघत असतो. निराशेने ग्रासलेला या तरुणांकडून कधी कधी आंदोलनाची भाषा सुद्धा ऐकावयास मिळते. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यात तर त्यांचं फिट इंडियाचं काही अंशी स्वप्न नक्की साकार होईल.

 *************

जल




पावसाळ्यात नद्या नाले ओसंडून वाहतात. दरवर्षी शेतातील पिकं, गांवच्या गावे गुरं ढोरसहींत वाहून देशाचं नुकसान होत असतं. खरे तर पृथ्वीवर तीन चतुर्थाउंश पाण्याचं साम्राज्य असून सुद्धा उन्हाळ्यात माणसाला पाण्यासाठी वण वण भटकावे लागते, आणि दर वर्षी हजारो नवीन विहिरी खोदल्या जातात, हे एक आश्चर्यच आहे. दुष्काळाच्या नांवाने खडे फोडणाऱ्या मानवाला पाण्याचं नीट व्यवस्थापन अजून पर्यंत करता आलेलं नाही.

        *************


XXX कॅमेरामनच्या सौजन्याने
वाढती बाजारू संस्कृती तर स्रियांच्या सर्व प्रकारच्या शोषणाचा विडाच घेऊन आली आहे. या संस्कृतीत तिचं नुसतं बाई असणं म्हणजे शोषकांना पुरेसं आहे.


                                              ***********


विधात्याने माणसाला एक अद्भुत गोष्ट बहाल केली आहे. ती म्हणजे त्याचं मन. मन हे एक प्रभावी शस्र आहे. ते धारदार आहे आणि त्याची धार बोथट होऊ नये - ते गंजू नये म्हणून त्याच्या मालकाला फार काळजी घ्यायला पाहिजे.........बाळ सामंत यांच्या ।।ग्रंथायन।। या पुस्तकातून.
  

                                              ***********

आपल्या समोर कायद्याचे उल्लंघन होत असेल तर योग्य ठिकाणी त्याची तक्रार करणे, हे लोकशाहीत सर्व प्रकारचे हक्क राजी खुशीने उपभोगणाऱ्या नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. 

                                              

                                             ***********

आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संबंधित व्यक्तीला पद्म पुरस्काराने गौरविण्यात येते. परंतु एक्सप्रेस हायवे बनवितांना गम बूट घालून भर उन्हात डांबर शिंपडणाऱ्या कामगाराला कधीही गौरविण्यात येत नाही. टोल मात्र सरकारी खात्यात जमा होतो.

                                              ***********


पाऊस धारा, फुलणारे एखादे फुल, कोचावर शेजारी रांगणारे एखादे मूल, प्रेमळ नात्यांचे न तुटणारे कच्चे रेशीम धागे, वाचनीय आणि आवडती पुस्तके, पहिल्याच वेळेला सासरी गेलेल्या पोरसवदा मुलीला लागलेली माहेरची ओढ, आईच्या शेजारी उभे राहून तिने फिरविलेला मायेचा हात. मित्राबरोबर पौर्णिमेच्या रात्री मारलेल्या मनसोक्त गप्पा. सुनसान भयाण शांततेच्या वातावरणात ऐकलेली पुसटशी आर्त किंकाळी, छत्री उघडू न देण्याची पावसाने न दिलेली उसंत. स्टेशनवर पोहचण्या आधीच मीस झालेली ट्रेन अशा छोटया छोटया क्षणातून आपलं आयुष्य बनत जातं. अनेकदा हे क्षण न सांगता येतात आणि खूप धावपळीचे आयुष्य घालवितांना आपल्याला ते दिसतच नाही.

                                              ***********

फॅशन शो, जाहिराती आणि कथानकाची गरज इत्यादी प्रकारातून आणि कारणासाठी दिवंसें दिवस स्रियांचे शरीराचे ओंगळ प्रदर्शन घडविण्याची स्पर्धा मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आणि कमी तोकडे कपडे घालणे हे श्रीमंतीचे व पुरोगामीपणाचे द्योतक ही समजले जावू लागले आहे. आर्थिक झगमगाट कितीही असला, सुखसोयी कितीही वाढल्या तरी समाजाची ही स्थिती घृणास्पद आहे.

                                                

                                              ***********

स्वभावातील आक्रमकपणा बऱ्याचवेळा आपल्याला रागाचं मूळ कारण शोधूच देत नाही. म्हणून आक्रमक होण्याऐवजी स्वतःच्या रागावर सुद्धा प्रेम करायला शिकले पाहिजे.

                                              ***********


माणसाला तू कोण असं विचारलं तर तो आपलं नांव सांगेल, तेवढ्यानं भागलं नाही तर आपलं शिक्षण सांगेल, व्यवसाय सांगेल, वाडवडिलांची कीर्ती सांगेल व ..........आपला धर्म सांगेल. पण हे सारं "तू कोण" या प्रश्नाचं उत्तर नव्हेच.


                                              ***********


सर्व सामर्थ्यशाली मानलेल्या ईश्वरापुढे झुकणे आपण समजू शकतो. पण क्षुद्र पदार्थांना शुभाशुभ मानून स्वतःकडे दुबळेपणा घेणे व क्षुद्र पदार्थांची आपल्यावर सत्ता गाजवू देणे हा आपल्या माणूसपणाचा अपमान आहे.

                                              ***********

टीका जरूर करावी पण ती योग्य जागी अन योग्य शब्दात. जसं भांड्याला भांडं लागावं अन मधूर नाद निर्माण व्हावा. पर्यावरणाचा समतोल राखला जावा.


                                              ***********

पुरुषाला त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या घालविण्यासाठी  कुठलेही व्हॅसलीन बाजारात मिळत नाही. परंतु स्त्रीला राग आला तर ती अधिकच सुंदर दिसते. निसर्ग कोणाला कशी नजाकता बहाल करेल याचं गुपित ब्रम्हदेवाला सुद्धा माहीत नसेल कदाचित.

                                              ***********

भावना प्रबळ झाल्यावर आधी विवेक नष्ट होतो, मग प्रमाद घडतो. म्हणून विवेक सांडू नये.

                                              

                                              ***********

लोकशाहीचा धागा उलगडून बघितला तर सत्ताधाऱ्यांच्या चुका दाखविणे हे विरोधी पक्षाचे धोरण असुच शकत नाही, पण आज काल विरोधी पक्ष फक्त एवढेच करतो.

                                              ***********


सूर्य नारायणाचे दर्शन प्रभात आणि संध्या समयालाच घायचे असते. कारण आपले तेज त्यांनी त्यावेळेस आवरलेले असते.

                                              ***********


सध्या तरी मराठी आणि हिंदी सिरियल्स मध्ये स्वार्थी आईप्रमाणे स्वार्थी बायकोचे नमुने जास्त पाहयाला मिळतात. एवढा दुष्टपणा त्यांच्या माथी मारून सुद्धा घरो घरी बायका आपले कामधंदे सोडून सर्रास सिरियल्सचे गुणगान गातांना दिसतात.


                                              ***********


माझा आजचा दिवस मला जगायचा आहे. कारण संध्याकाळ नंतर तो अस्ताला जाणार आहे, कधी न वापस येण्यासाठी.

                                              ***********


शेताच्या बांधावर भरपूर गवत वाढलेले असतांना देखील म्हैस बांधावर कधीही शिस्तीने चरत नाही. ती उभ्या पिकात तोंड घालणारच. पण हाच बेशिस्तपणाचा गुणधर्म मनुष्यप्राण्यात कमी जास्त नव्हे तर भयंकर प्रमाणात आढळतो आणि आपल्या किती तरी पिढ्यांसाठी तो सोय करून ठेवतो. घोटाळ्यांची यादी एक वेळा नजरेखालून घातली तरी आपल्याला समजण्यास पुरेसे आहे.

                                              ***********


भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना कुणीतरी विचारले, "तुमच्या आयुष्यात कोणत्या ग्रंथानी तुमच्या जीवनावर विलक्षण परिणाम केला" त्यावर ते म्हणाले, "मी वाचन केले ते योगायोगाने, एका मित्राच्या घरी गेलो असता मला त्याच्या टेबलावर एक पुस्तक पडलेले दिसले. ते होते थोरोचे, 'थिअरी ऑफ डिस्ओबीडियन्स.' या पुस्तकाच्या वाचनाने माझ्या आयुष्याची जणू दिशाच बदलून टाकली..................बाळ सामंत यांच्या ग्रंथायन या पुस्तकातून.

                                              ***********


तुम्ही सहलीला नेहमी जातात. एकदा पुस्तकांच्या जगातली सहल काढा. वाचाल तर वाचाल ही क्षितिजाला व्यापणारी अरुंद पायवाट तिथे तुम्हाला गवसेल.

                                              ***********


थोरो एकदा म्हणाला, "जगातील उत्तम पुस्तकं वाचा, अगदी प्रथम वाचा, नाही तर तुम्हाला ती वाचायची संधीच मिळणार नाही."........ग्रंथायन पुस्तकातून

                                              ***********


राज्यात सडक्या सुपारीची तस्करी.......लोकसत्ता 03.12.2017

चांगले विचार फार काळ टिकत नाहीत, तेंव्हा ते तीव्र असतांनाच मनुष्याने कार्य उरकून घ्यावे. हा अमूल्य विचार महर्षी धों.के.कर्वे यांनी दिला होता. या विचारामागे काहीतरी विधायक कामाची मांडणी होती. पण या विधायक विचारला आपण फार लांब सोडून आलेलो आहोत. कोणताही न्यूज पेपर उघुडून बघितला तर त्यात आपल्याला सडक्या, अपरिपक्व, भुक्कड उद्योगांच्याच गोष्टी वाचावयास मिळतात. राज्यात निकृष्ट दर्जाची सडक्या सुपारीची तस्करी मार्गे आयात केली जाते, ही आजची बातमी वाचून अवाक व्हायला होत नाही तर अश्या बातम्यांची आपल्याला सवयच झालेली आहे. दुःख असे की एका बाजूला एक्स्पोर्ट कॉलिटीचे आंबे आपल्याला  खायला मिळत नाहीत आणि तेच आपण पन्नास हजार टन निर्यात करतो आणि दुसऱ्या बाजूला आपले व्यापारी निकृष्ट दर्जाची सडक्या सुपारीची तस्करी मार्गे आयात करतात याच्यापेक्षा आपले दुर्भाग्य कोणते. राजकारणातही असे अपरिपक्व आणि भुक्कड उद्योग सर्रासपणे चालू आहेत. कोणाला स्टेशनांची नांवे बदलण्यात रस आहे तर कोणाला दुकानांच्या पाट्या बदलण्यात. कोणी गोहत्यावर सरकारला कडक कायदे बनवायला सांगतो तर कोणी अहिष्णुतेची पुंगी वाजवून आपल्याला मिळालेला सन्मान सरकारला वापस करण्यात धन्यता मानत असतात. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असतांना काही अपरिपक्व नेते आपला तोंडाळ उपक्रम राबवण्याचा निंदनीय पराक्रम करीत आहेत. काहींचं नांव स्वाभिमान परंतु त्यांच्या हाती कथलाचा वाळा देखील नाही. विरोधक विधायक विरोध न करता उटसूट नोटबंदीवर बोटे ठेवून ती कधी कापली जातील याचं सुद्धा त्यांना भान नाही. देश हितासाठी पक्षाला राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेल परंतु सरकारने आणि विरोधकांनी चांगल्या गोष्टींचा पाठपुरावा करणे सोडू नये हा स्तुत्य विचार इतिहास जमा झाला आहे. कारण जनहीत सोडून स्वहिताचंच बाशिंग त्यांनी बांधलं आहे.


                                              ***********


समस्या वेळच्या वेळी लक्षात येणे हे सभ्यता जिवंत असण्याचे लक्षण आहे. समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी मेथॉडॉलॉजी सापडावी लागते.भारतीय लोकांना मेथॉडॉलॉजी शोधायची, निर्माण करायची सवय नाही. मेथॉडॉलॉजी निर्माण करण्याचे बौद्धिक कष्ट त्यांना सोसत नाही. म्हणून कोणतीही समस्या उभी राहिली तर टीव्ही चॅनेलवर कारणं शोधण्याऐवजी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात.

                                              ***********


पूर्वीच्या लिहिलेल्या काही म्हणी काळाच्या ओघात कालबाह्य होत चालल्या असल्या तरी,  "कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात" ही म्हण कोणी आणि कधी लिहिली हे सांगणे मुश्किल आहे  पण ज्याने कोणी ही म्हण जन्माला घातली ते पराकोटीचं सत्य साबीत झालं आहे. रामायण महाभारतात देव देवता, ऋषीमुनी भक्तीवर प्रसन्न होवून वरदान देत असत आणि क्रोधीत होवून शाप दिला जात असे. परंतु आजच्या कली युगात शापवाणी देवून कोणाचं काही बिघडत नाही, न्याय मिळण्यासाठी कोर्टाची पायरी चढावीच लागते. म्हणूनच  "कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात" ही म्हण शाप देण्याऱ्यांच्या पदरात काहीच पडू देत नाही हे मात्र खरे, परंतु दुर्दैव असे की आजच्या मॉडर्न युगात शाप वाणीची जागा  शिव्यांनी घेतली आणि शिव्या देणे हे आजकाल प्रतिष्ठेतेचंही समजलं जातं.

                                              ***********


महाविद्यालयातील पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थी सुशिक्षित व सज्ञान होतोच असे नाही, तर त्यास सामाजिक, राजकीय, प्रतिभा, सुजनशिलता, कल्पकता याचे जाणीवपूर्वक सुयोग्य पद्धतीने विचारांचे आचरण होते. नंतर येथूनच सुवर्णरत्ने निर्माण होतात.

                                              ***********


आयुष्य इतकं संघर्षमय आहे की, प्रतिकूल क्षण अटळ असतात. त्यांना तोंड देण्याची मानसिक तयारी हवी. कधी कधी आपण हताश , निराश होतो. यातून आपण निसटणार की नाही, अशी शंका मनात येत राहते. पण अशावेळी केंव्हातरी चांगलं वाचलेलं असतं, कुठल्यातरी मोठया माणसाचे विचार जपलेले असतात. ते आठवतात व ते मनाशी घट्ट धरून ठेवावयाचे असतात.

........सकाळ 08.05.2005

                                              ***********


या जगात चांगलं आणि मनासारखं जगणं कुणी भेट म्हणून देत नाही !  ते आपणच स्वतःला घडवत मिळवावं लागतं.

अश्या प्रयत्नांची सुरुवात कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही क्षणी करता येते ! अगदी या क्षणापासून !!!

लोकसत्ता

                                            ***********


आधुनिक काळात जितकी बदमाश, लुटारू आणि खोटी माणसं आहेत तितकी अधिक देवभक्त आहेत. त्यांनाच मंदिरे बांधावीशी वाटतात. आपल्या पापातून मुक्ती मिळविण्याचा त्यांचा एक खास मार्ग म्हणजे मंदिर बांधणे. खूप लूट झाली तेंव्हा थोडासा दानधर्म करा म्हणून दान करणे. म्हणजे मनाला स्वच्छ, पवित्र वाटतं आणि पुन्हा लूट करायला मोकळेच. असं सत्र प्राचीन काळापासून आजतागायत चालूच आहे, फक्त लुटीची रीत बदलली आहे.

नागनाथ कोत्तापल्ले यांच्या "उद्याच्या सुंदर दिवसासाठी" या पुस्तकातून जाने.2000

                                              ***********


माणसाच्या जीवनातले सर्व श्वास संपल्यानंतर मृत्यू एक सत्य आहे. जन्म आणि मरण........ यामधला अवकाश म्हणजे जीवन. ......एकदाच मिळतं ते ! ........म्हणून भरभरून जगायचं असतं....... समाधानानं.

                                              ***********


जंगलात वारा नसतांनाही हिरवे उंच गवत अचानक सळ सळ हलायला लागले तर तेथे हिंस्र जनावर चवताळून लपून बसले आहे असे आपण डिस्कवरी चॅनेलवर रोज पाहतो.

परंतु माणसाच्या मनात अशी अमानवी हालचाल सुरु झाली तर तलम वस्रे लगेच फाटली जातात. अश्या अमानवी हालचालीचा वेध घेणारं तंत्रज्ञान अजून तरी विकसित झालेलं नाही.

                                              ***********


पूर्वी गाण्यातून, जीवनावश्यक तत्वज्ञान मांडलं जायचं. अतिशय सुंदर काव्य, अर्थवाही शब्द, कर्णमधुर संगीत आणि अतिशय रम्य सादरीकरण ही पुर्वीच्या गाजलेल्या गाण्यांची वैशिष्टे होती. आता मात्र त्याच्या विरुद्ध परिस्थिती आहे. तरुण पिढीला सर्व निरर्थक वाटू लागलं आहे. त्यामुळे निरर्थक गाणी तरुण पिढीच्या ओठावर रुळू लागली आहेत. शाश्वत असं काही निर्माण होत नाही आणि त्याची खंत कुणालाही वाटत नाहीये. त्याचच प्रतिबिंब आज चौफेर उफाळलेल्या गाण्यातून दिसते आहे.

                                              ***********


माणसाचा आणि ईश्वराचा संबंध नीट तपासून पाहिला तर ईश्वराने माणसाला निर्माण करण्याऐवजी, माणसानेच वेळोवेळी निरनिराळ्या ईश्वराला जन्म दिला आहे असे आढळून येईल.

आचार्य स.ज. भागवत (संकलक शरद गोगटे यांच्या वेचक विचार या पुस्तकातून)

                                              ***********


संताप येणे ही नैसर्गिक देणगी आहे. पण संतापाचा अतिरेक असू नये, नाही तर कधी कधी तुरुंगाची हवा खावी लागते.

                                              ***********


उर दाटून आल्यानंतर डोळे अश्रूंना वाट मोकळे करून देतात, न जाणे एवढे पाणी साठविण्यासाठी जागा डोळ्याच्या कोणत्या भागात असते हे एक मानवी निसर्गाचं कोडंच आहे.

                                              ***********


या जगाच्या संपूर्ण इतिहासात फक्त एकच गोष्ट अशी आहे की जी भराभर पैसे खर्चून सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. ती गोष्ट म्हणजे तुम्हाला बघून कुत्र्याने आनंदाने हलवलेली शेपटी !

जॉन विलिंग्ज........(शांता ज. शेळके यांच्या मधुसंचय या पुस्तकातून)

                                              ***********


लहान मूल जेंव्हा अगदी गाढ झोपी जाते तेंव्हा खरी विश्रांती कोणाला मिळते ठाऊक आहे ? मुलाला नव्हे, मुलाच्या आईला !

............. शांता ज. शेळके यांच्या मधुसंचय या पुस्तकातून


                                              ***********

                                   
वरुण राजा सकाळपासून शांत झाला होता. दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा म्हणी प्रमाणेच या सणाला आनंदाचं उधाण आलं होतं आणि भरभरून सोनं वाटलं गेलं, सण मोठया उत्साहात साजरा झाला. आकाश निरभ्र झालं होतं. पाच दिवसांनी आलेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यातलं दुधाचं सर्वांनीच प्राशन केलं. 2017 ची दिवाळीही तोंडावर आली. शेतात ज्वारी बाजरीची कणसं टंच भरून ऐन बहारात आली होती. कारण ही तसच होतं. या वर्षाचा पावसाळा समाधानकारक झाला होता, शेतं ही हिरवीगार दिसू लागली होती. विहिरी, तलाव पाण्याने तुडुंब भरून आलीत. रोडच्या पलीकडील घरासमोरील डबके सुद्धा तलावासारखं बऱ्याच दिवस तुडुंब भरलेलं दिसलं. रात्री खिडकी उघडून डोकावून पाहिलं. राहून राहून एकच खंत मनाला बोचत होती. डराव डराव करणाऱ्या बेडूक राज्यांचे आवाज या वर्षी ऐकायला मिळालेच नाहीत. त्यांच्या विना डबकी सुनी सुनी झालीत. ते या वर्षी का रागावलेत, त्यांचं आगमन का झालं नाही. त्याने का पलायन केलं हे मात्र तो सर्वांना कोड्यात सोडून गेला.

                                              ***********


तीच घरटी, झोपडया त्या, तीच माती तांबडी
तीच कौलारे उतरती, तीच वळणे वाकडी
लिंब बोराट्या पुढे काय चाफे केवडे
वाट मज ती आवडे

........ग.दि. माडगूळकर ( संकलक शरद गोगटे यांच्या वेचक विचार या पुस्तकातून)

                                              ***********


पाकशास्त्रातील अनेक लज्जतदार पदार्थ ही मानवी चुकांचीच निर्मिती आहे.

                                              ***********


माणसाला विचारक्षमता, भावनाशीलता, कल्पनाक्षमता, अशा अनेक क्षमता जस्या त्याला लाभल्या आहेत तसेच अविचार, अवास्तव कल्पना, संकुचीत भावना, दुराग्रह असे अनेकानेक सापळेही त्यानंच निर्माण केले आहेत.

                                              ***********


मराठी भाषा ही खरच समृद्ध व संपन्न, मधुर व ज्ञानमयी आहे. वाचन, लेखन, श्रवण व संभाषण ही तिची चार कौशल्य आहेत.


                                              ***********


खऱ्या खोट्याचा पेच लहान मुलांना नेहमीच पचायला कठीण जातो. सावधान, लहान मुलांसमोर नेहमी सत्यच बोला नाही तर ते "खोटच" हे  "खरं" समजून बसतील.

                                              ***********


त्यांच्या पिढीच्या दृष्टीने गांधीजी कितीही पूज्य असले, तरी गांधीवादातला हृदयपरिवर्तनाचा सिद्धांत अत्यंत ठिसूळ आशा पायावर उभारलेला आहे. एका गालावर थप्पड मारणाऱ्या मुर्खाच्या पुढे दुसरा गाल पुढे केला तर तोही लाल होण्याचा संभव या जगात अधिक. मारणाऱ्याला पश्चाताप होऊन तो आपला हात मागे घेईल व घडलेल्या आगळिकीबद्दल क्षमा मागेल ही शक्यता त्यामानाने अतिशय कमी ! इतक्या लवकर पश्चाताप होण्याइतके त्याचे मन सुसंस्कृत असते तर पहिली थप्पड लगावणाच्या वेळीच त्याने अधिक विचार केला असता !

वि.स. खांडेकर यांच्या सुखाचा शोध या पुस्तकाच्या .... प्रस्तावनातून... 31.07.1946

                                              ***********


चूका करणे ही काळाची गरज आहे, त्याशिवाय नवनिर्मिती होणे अशक्यच !

                                              ***********


परमेश्वर सर्वत्र सृष्टीच्या चराचरात, कणाकणात भरलेला आहे. म्हणजे तो मूर्तीतही आहे. म्हणूनच मूर्तीची पूजा करावी.

                                              ***********


पोळीची कणिक किती सैल किंवा किती घट्ट मळायची याचा अंदाज मुलीला तिच्या आईच्या शेजारी उभी राहिल्याशिवाय येत नाही.

                                              ***********


शब्दांचं कवच हे अगदी मुलायम असतं, ते जिभेने सहज सोलता येते. पण कधी कधी जीभ त्याच्यानेच सोलली जावून अलवार होते. म्हणून शब्दांच्या आज्ञेतच आपण राहिलेलं बरं !  एकदा का शब्दांचा स्पर्श होवून अर्थ कळायला लागला मग तुम्हाला कुठलंही व्यासपीठ शोधण्याची आवश्यकता नाही.

                                              ***********


पूर्वी गडकिल्ल्यांच्या तटबंदीला छोटया छोटया खिडक्या असायच्या, पण त्यांचा उपयोग शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी असायचा. आजच्या युगात अश्या तेल ओतीव खिडक्या कालबाह्य झाल्या असल्या तरी, आजकाल राजकीय पक्षांच्या खिडक्यातून मात्र गरम तेल एकमेकांच्या अंगावर ओतण्याचं काम बिनबोभाट चालू आहे.

                                              ***********


कांदा आणि लसूण हे तुम्ही कितीही स्वच्छ पाण्यात धुवा किंवा आठवड्याभर फ्रीज मध्ये ठेवा, ते अडेल तट्टू स्वभावाचे आपले गुणधर्म सोडतात का कधी !  पण हे दोन्ही पदार्थ असतील तरच जेवणाला खमंग चव येते ! मग गुलाबांना काटे असतात म्हणून पिरपिर करीत बसण्यापेक्षा, काट्यांना गुलाब असतो म्हणून मजा मारावी हे उत्तमच की !

                                              ***********


गर्वाला ऐस पैस हात पाय पसरायची वाईट खोड असते. सैतानाशी त्याची जवळीक वाढली की त्याच्या ऱ्हासाला सुरुवात होते__________लोकसत्ता

                                              ***********


तुम्हाला फुलपाखरू व्हावयाचं असेल तर, तुम्ही अळीसारखं जगणं सोडून दिलं पाहिजे.

                                              ***********


स्वाभिमान, गर्व, ताठरता हे एकाच रेषेवरचे बिंदु आहेत. लवचिकता, नम्रता साठी कोणत्याही रेषेला स्पर्श करण्याची गरज नाही.

                                              ***********


पुरुषातल्या दुष्टपणाचे आणि मूर्खपणाचे असंख्य नमुनें नाटककार आणि कादंबरीकार अनेक शतके रंगवीत आले आहेत. पण स्त्री पुरुषाची समता सर्वस्वी मान्य झाल्यावरही पुरुषांप्रमाणे बायकांतही अनेक बरे वाईट नमुने असतात, ही गोष्ट मात्र आमच्या शिकलेल्या स्रिया अजून सुखा सुखी कबूल करायला तयार होत नाही.

वि.स. खांडेकर यांच्या सुखाचा शोध या पुस्तकाच्या...प्रस्तावनातून ...  31.07.1946

                                              ***********


मानवी जीवन ही धावती, वाहती, वेगवती अशी महानदी आहे. तिच्या प्रवाहित्वातच तिचे शुचित्व आहे. ज्ञानाची क्षितिजे सहस्र पटीने विस्तारली. जीवनाची मूल्ये आमूलाग्र बदलली. जुन्या ध्येयांच्या मूर्ती अडगळीत जाऊन पडल्या, तरी अजून आपला समाज प्राचीन आदर्शांच्या ठराविक चाकोरीतून आंधळेपणाने जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहे.

वि.स. खांडेकर यांच्या सुखाचा शोध या पुस्तकाच्या .... प्रस्तावनातून ...  31.07.1946

                                              ***********


संबंध प्रस्थापित करण्यासाठी कित्येक वर्षाचा अवधी पुरेसा होत नाही. "संबंध तोडून टाकायला एक क्षण पुरेसा आहे हे समजण्यासाठी" आयुष्यभर विचार करावा लागणे म्हणजे सुंदर आयुष्य वाया घालविले.

                                              ***********


खुल्या हवेतल्या खेळातला आनंद ज्यांनी ज्यांनी लुटला आहे, ती मुलं कॉम्प्युटर आणि व्हिडियो गेम्स खेळाला बळी पडत नाहीत. "हाच पुढे व्यक्तिमत्वाचा पाया बनतो".

                                              ***********


घरात ज्ञान, संस्कार, प्रेम, जिव्हाळा, अगत्य, सुसंवाद व मांगल्य या गुण संपदेचा मनोज्ञ अविष्कार असावा. घर नांवाच्या दगड मातीच्या रचनेमध्ये कुटुंबाच्या भाव भावना निगडीत झालेल्या असाव्यात. घरात जे वैभव येईल ते पवित्र असावे.

घराची निसर्गाशी जवळीक असावी. नव्या आणि जुन्यांची ती सांगड असावी. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे मंदिर असावे.

                                              ***********


मनाला कितीही धावू द्या, जिभेला मात्र आवर घाला.

                                              ***********


इतरांशी आपल्याला काही घेणे देणे नाही, इतरांचा विचार कराल तर फसाल. अशी विचारधारा जेंव्हा बळावते तेंव्हा समाजात विषमता त्रिव्र होवू लागली असे समजावे.

                                              ***********


साध्या फुलपाखराच्या पंखाचे वजन तरी किती. पण त्यानें मनांत आणून आपले पंख फडफडवले तर एखाद्या सम्राटाचे साम्राज्य हादरवू शकतो. पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या कांग्रेसी सरकारच्या नाका तोंडात पाणी जाइपर्यंत अण्णा हजारेंनी त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

                                              ***********


टी आर पी

हिंदी फिल्म मध्ये व्हिलनचा रोल बहुतेक करून पुरुष आपलं कसब पणाला लावून कसाब चांगलाच रंगवतात. प्रेक्षक आपला हळवेपणा बाजूला ठेवून त्याला दिलेली कठोर शिक्षेची अमलबाजावणी व्हावयाच्या अगोदरच त्याने आपले थिएटर मधले आसन सोडलेले असते. पण टीव्ही सिरिअल मध्ये हा विभाग स्रियांनी चांगलाच कॅपच्यर्ड केलेला आहे. नाके मुरडणे, डोळे तिरपे तारपे करून ओठाचा फुटक्या कवडी सारखा आकार करण्यात मी नाही त्यातली, कडी लावं आतली हे उपजतच नॉलेज त्यांच्यात असल्यामुळे दिग्दर्शकाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही हे इथपर्यंत सर्व ठीक आहे. परंतु भयानक कट कारस्थान करणे, अन्नात विष कालवणे, ज्यूस भरलेल्या ग्लासात काचेची पावडर टाकणे पर्यंत भयानक अघोरी प्रकार स्त्री पात्राच्या माध्यमातून दाखवून ही माध्यमे कोणता समाज घडवीत आहेत. भारतीय स्त्री खरोखर दुष्ट आहे काय असा प्रश्न नवीन पिढी देखील विचारणार नाही कारण जे दाखविले जाते तीच खरी संस्कृती आहे असा समज रुजलेला असेल. आपला टी आर पी वाढविण्यासाठी आपण कोणत्या संस्कृतीचे पाळेमुळे रुजविण्यात हातभार लावतो आहेत ? आपल्या संस्कृतीच्या पात्राला यांनी बरीच छिद्रे पाडून ठेवली असल्यामुळे कोणत्याही पाणिनीने नवीन जन्म घेतला तरी नवीन पिढीला त्याची ओळख पटणार नाही.

                                              ***********


राग आणि द्वेष हा आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही. पण आपला तीव्र राग पाच मिनिटे टिकला तर आपली दोन तासाची काम करण्याची शक्ती कमी होते व त्याची नकारात्मक रासायनिक प्रतिक्रिया आपल्या शरीरातील सर्व स्नायूंवर बहात्तर तासांपर्यंत टिकते.

                                              ***********


वी.स.खांडेकर आपल्या "वायूलहरी" या पुस्तकात लिहिता लिहिता सहज मिश्किल बोलून जातात, पण ते पराकोटीचं सत्य असतं.....

बायकांना दागिन्यांची हौस उपजतच असते. आणि तिच्यात अस्वाभाविक असे काय आहे ? नक्षत्रे रजनीच्या केसातच शोभतात, दिवसाला त्याचा काय उपयोग ?  पण त्यांचे नटणे मुरडणे थोडे अधिक होऊ द्या, झालाच समजा लोकांचा गजहब सुरु !!

                                              ***********


सुंदर दिसण्यासाठी नुसता आत्मविश्वास, नुसतेच मॅनर्स आणि गोड हसणं असलं तरी ते पुरेसे होत नाही. व्यक्तिमत्व कणाहीन असेल, तर वाटेल ते उपाय योजले तरी चेहरा सुंदर दिसत नाही.

                                              ***********


माझ्या कपाटातल्या पुस्तकात निळ्या-तांबड्या पेन्सिलीने केलेल्या अशा खुणा फार नाहीत. पण ज्या आहेत, त्यांचे सौंदर्य कधीही कोमेजत नाही, त्याची गोडी कधीही कमी होत नाही. अशा खुणा केलेल्या सर्व वाक्ये एकत्रित केली, तर पाच पन्नास पानांचे पुस्तक सुद्धा होणार नाही. पण त्या छोटया पुस्तकात साऱ्या विश्वाचे दर्शन कुणालाही निश्चितपणे होईल !

.........वि.स. खांडेकर यांच्या "पहिले पान" या पुस्तकातून

                                              ***********


बालपण

बैल गाडीवर बसून बैलांना मारलेली ललकारी, पेहरणीच्या वेळी चिखलात फसणारे पाय, शेतात उभ्या पिकात कोळपणी करण्यासाठी केलेला बाल हट्ट अन त्यावेळेस काकांनी माझे बांधून ठेवलेले हाथ-पाय, पक्षांनी उभ्या कणसातले दाणे खावू नयेत म्हणून गोफणीतून भिरकावलेला दगड, चांदण्या रात्रीत बैल गाडीतून काकांबरोबर केलेला प्रवास, तुडुंब भरलेल्या विहिरीत मारलेली जंप, चिंचेच्या झाडाखाली बसून दुपारची घेतलेली न्याहरी, श्रावण महिन्यात पाऊसाची झडीत शेताच्या बांधावरनं बैलांसाठी कापलेलं हिरवं गवत, कोणी बघत नाही हे हेरून शेजारच्या शेतातून उपटलेले भुईमुगाचे झाड या साऱ्या जगण्यातून माझ्या बालपणाची पुसटशी झालर मला ऑफिस मध्ये अस्वस्थ करते.


                                              ***********


हाताची बोटे

जेंव्हा लहान बाळ तुरु तुरु चालत येवून आपल्या बाबांच्या मांडीवर चढून खिशात हात घालतं अन दुसऱ्या हाताने डोळ्यावरील चष्मा ओरबाडून घेते. इथेच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या गोंडस म्हणीचा जन्म होतो. मग "हाताने" काय घोडं मारलं. आपण खूप चांगलं काम केले असेल तर दृष्ट लागू नये म्हणून आई दोन्ही हातांनी आपल्या डोक्याला स्पर्श करुन स्वतःच्या डोक्यावर दोन्ही हातांची बोटे कड कट्ट मोडून आपल्याला संरक्षक कवच निर्माण करून देते. याच्या नेमके उलट जर स्त्रीला कुणी दुखवलं तर ती स्त्री हाताची पाचही बोटे कड कड करत मोडून त्या व्यक्तीला शाप ही द्यायला मागे पुढे पाहत नाही. म्हणूनच काहींच नशीब कसं फळफळतं बघा, कवडीचं कष्ट न करता फायदाच फायदा आणि राजेशाही जीवन उपभोगायला मिळत असेल तर त्याला चारो उंगली घी मे असं ही संबोधलं जातं. पण सर्वात वाईट प्रसंग ओढवला तो शाहिस्तेखानवर, शिवाजी महाराजांनी त्या दुष्टाची चारही बोटे तलवारीने छाटून टाकली होती. घरातली एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली भावंडांची स्वभाव वैशिष्ट्ये ही एक सारखी नसतात. कोणी ऑफिसर होतो तर दुसरा डॉक्टर, तिसरा कदाचित गुन्हेगार प्रवृत्तीचा निपजतो. त्यावेळेस सहज उद्गार तोंडातून बाहेर पडतात की हाताची पाचही बोटे सारखी नसतात. परंतु ह्याच हाताच्या बोटांचे ठसे गुन्हेगाराला फाशीच्या तखत्यापर्यंत देखील पोहचवू शकतात. हाताची बोटे आपल्या कर्तृत्वात कुठेही कसर  बाकी ठेवत नाहीत. हीच हाताची बोटे एकत्र आली तर एका सुंदर रांगोळीला ते जन्माला घालतात याच्यापेक्षा सुंदर काय असेल.

                                              ***********


गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या - गणेशला भावपूर्ण निरोप

उसळणाऱ्या उंच लाटा मध्ये स्पर्धा सुरू होती. समुद्राने संपूर्ण वाळू आपल्या पोटात सामावून घेतली होती. किनाऱ्यावरची माडांची उंच उंच झाडं वाकून वाकून हे सारं आश्चर्य बघून आपापसात कुजबुजत होती. गणेशाच्या पदस्पर्शासाठी लाटाही आतुर झाल्या होत्या.

                                              ***********


पाऊस मुंबईचा (29 ऑगस्ट 2017)

कवीची प्रतिभा वसंत ऋतूत फुलते तशी ती पावसाळ्यातही बहरून येते. परंतु 29 ऑगस्टचा पाऊस मुंबईत असा काही कोसळला त्यात कवींची प्रतिभेची शब्दे निष्प्रभ झालीत. पाऊस आणि तोही मुसळधार हे एकच विशेषण लावून त्याचं वर्णन नाही  करता येणार. रात्रीच काळ्याकुट्ट ढगांनी दाटी केली होती. त्याने मुंबईचं जीवन अस्ताव्यस्त करून टाकलं.  तो असा काही चराचरात बरसला, अनेक परिसर जलमय झालेत. सिमेंटच्या  जंगलातली वृक्षे उन्मळून पडलीत. रेल्वेच्या प्लॅटफार्मवरून धरणासारखं पाणी ओसंडून वाहू लागलं. आयुष्यात पहिल्यांदाच लालबागचा राजांचा मंडप ओस पडला. पण निसर्ग जेवढा क्रूर आहे तेवढा तो निर्दय सुद्धा नाही. शिशिरच्या पानगळी नंतर वसंत ऋतूची कोमल पालवी ला तो जन्माला घालतोचनां. आज सकाळची सलामी दिल्यानंतर पाऊस नम्र झाला. लालबागचा राजाच्या मंडपाकडे पाऊले पुन्हा वळू लागलीत.

                                              ***********


सर्व ऋतूंचे सार या भाद्रपद महिन्यात येते.

वसंताचे पुष्पवैभव, जेष्ठांचे फलवैभव, श्रावणातला हिरवेपणा, अश्विनातली वातावरणाची खुलावट आणि धनलक्ष्मीच्या मंगलमय पाऊलांची चाहूल, हेमंतातल्या गार वाऱ्यांच्या झुळुका, शिशिरातली थंडीची लहर, सारे काही माफक प्रमाणात या महिन्यात अनुभवायला मिळते.

...........दुर्गा भागवत ( संकलक शरद गोगटे यांच्या वेचक विचार या पुस्तकातून)

                                              ***********


"मानव निर्मिती" हा देवाच्या कल्पकतेचा उत्कृष्ट नमुना आहे. जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी स्वतःजवळ ठेवून देवाने या मधल्या काळाचा उपयोग आपल्या मर्जीप्रमाणे करण्याचं स्वातंत्र्य माणसाला दिलं आहे. म्हणूनच स्वतः आयुष्य घडविण्याची जबाबदारी ही ज्याची त्याची आहे.

                                              ***********


निरंतर फिरणाऱ्या ऋतुचक्रात दिवस आहे तशी रात्र ही आहे. वसंत, शिशिर, ग्रीष्म आणि पावसाळा या पैकी कोणत्याही ऋतूची अवस्था कायम नाही. बदल हा निश्चित आहे. तसंच आरंभ आणि अंत या दोन बिंदूंमध्ये आपलं जीवन विखरलेलं आहे. श्वास किती घ्यायचे हे ही निश्चित ठरलेले आहे. जन्म आणि मरण यामधला अवकाश म्हणजे जीवन. आणि तेही एकदाच मिळतं. म्हणून तर भर भरून जगायचं आहे. आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी.

                                              ***********


बोबडे बोल हे परमेश्वराने लहान बालकांना दिलेली एक ईश्वरीय देणगी आहे. ज्याला हे बोबडे बोल ऐकण्याचं भाग्य मिळालं, जे बाल्य त्याच्या अंगावर खेळलं, कुदलं, रुळलं तो पिता भाग्यवानच. नाही तर आपल्या आयुष्यात कितीही कोरडे माठ पाण्याने भरा, त्यातून झिरपलेल्या ओलाव्यावर तृण उगवत नाही.

                                              ***********


 शांता ज. शेळके आपल्या "मधुसंचय" या पुस्तकात म्हणतात.

आपल्या जीवनात येतांना प्रेम अगदी हळू, पावले देखील न वाजवता येते. जातांना मात्र ते दांडगाईने, दरवाजा धाडकन आवाज करत निघून जाते !

                                              ***********


पतंगाचे रंगी बेरंगी कागद

सरकारने कितीही दारूबंदीचा कायदा केला तरी मद्य विक्रेत्यांची संख्या कमी होतांना दिसत नाही. वृक्ष तोडी बद्दल कडक कानून असून सुद्धा लाकडाच्या वखारीत आज लाकडं ठेवायला जागा नाही. निवडणुकीत जनतेने नाकारलेले उमेदवार सरळ राज्यसभेत मागच्या दरवाज्याने खुर्चीवर विराजमान होतात. शेवटी पतंगाचे रंगी बेरंगी कागद व्यावसायिक दृष्ट्या कितीही तकलादू असले तरी मांज्याच्या सहाय्याने ते आकाशात उडतातच.

                                              ***********


एका तापट आणि रागाने लालबुंद झालेल्या स्त्रीच वर्णन आणि तिला कसे मानाचे स्थान वि.स.खांडेकर देतात हे त्यांच्या शब्दात वाचायलाच हवं.

अपल्याला मिरच्या विकत घ्यायच्या नाहींत, असे मनाला पावलोपावली बाजावीत मी त्या पाटीकडे पाहत होतो. त्या पाटीतल्या हिरव्यागार मिरच्यांतून एक लालचुटुक मिरची हळूच डोकावून पाहत होती. तरुणीच्या गहिऱ्या कटाक्षाप्रमाणे वाटली ती मला !  मी तिच्याकडे पाहतच राहिलो. क्षणार्धात मी माझे भान विसरलो ! पावशेर मिरच्या माझ्या पिशवीत जाऊन पडल्या ! भाजीवाली ती लाल मिरची काढून घेत होती. पण मी आग्रहाने ती ठेवून घेतली. रागाने नखशिखांत लाल होणारी ही एकुलती एक  स्त्री आहे, या भावनेने मी तिच्याकडे पाहत राहिलो.

......................."पहिले पान" या त्यांच्या पुस्तकातून

                                              ***********


"आमच्या आईसाहेब तुमच्या इतक्या सुंदर असत्या तर आम्हालाही तुमच्यासारखे रूप प्राप्त झाले असते." शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुस्वरूप सुनेचे शब्दात केलेले वर्णन वाचून कोणत्याही कविला कविता करण्याचा मोह होवू शकेल.

                                              ***********


वि.स.खांडेकर आपल्या "पहिले पान या पुस्तकात लिहितात, 

"लग्न होईपर्यंत मनुष्य स्वतःसाठी जगत असतो, पण लग्न होताच तो स्वतःप्रमाणेच दुसऱ्यासाठीही जगू लागतो. पती पत्नी एकमेकांचा हात धरून एका नव्या अद्भुत जगात प्रवेश करीत असतात. या जगात एकाच्या दुःखावर दुसरा आपले सुख शिजवू शकत नाही. संसार हा दोन नद्यांचा संगम आहे, जिथे पृथ्वी आणि आकाश यांचे मिलन होते, असे ते क्षितिज आहे."

"पण धुळीने भरलेल्या, धुराने कोंदटलेल्या  आणि यंत्रांनी गजबजलेल्या अलीकडच्या शहरातल्या माणसांना ते पटणे कठीण आहे. ज्या बिचाऱ्यांनी बापजन्मात जिथे एक नदी सुद्धा डोळे भरून पाहिलेली नसते, तिथे संगमाच्या भव्य दृश्याची कल्पना त्यांना कुठून येणार."

                                              ***********


शेताच्या बांधावर गवताची लागवड करतांना शेतकऱ्याला आपण कधी पाहिलं नसलं तरी शेताच्या बांधावर बैलांसाठी भरभरून गवत उगवंतच.

उभ्या पिकात दाणे खाणाऱ्या पक्षांना घालवून देण्यासाठी गोफणीतून तिरासारखा भिरकावलेला दगडाने कधी पक्षी जखमी झालेला आपण पाहीला नसेल, तरी शेतकऱ्याला धान्याचं पीक कमी अवतरलं असं तो कधीच म्हणत नाही.

परंतु माणसाने कितीही डांबर रस्त्यावर ओतलं तरी रस्त्याच्या कडे कडेने गवत उगवल्या शिवाय राहत नाही, इथेही निसर्ग कमी पडत नाही.

                                              ***********


भ्रमर कोणतेही लाकूड पोखरू शकतो. इतकी शक्ती त्याच्यात आहे. पण जेंव्हा तो कमळ पाकळ्यात बंदी होतो ना तेंव्हा त्याला नाजूक पाकळ्या भेदता येत नाहीत.! एक वेळ तो प्राण गमवील, पण त्या कमळ पाकळ्या चिरून मुक्त होणे काही त्याला साधत नाही. कठीणातली कठीण लाकडाची भूगा करणारी त्याची शक्ती त्या नाजूक पाकळ्यात मात्र लयाला जाते. स्नेह पाकळ्यात माणूसही असाच अडकतो.

                                              ***********


सरड्याचा रंग क्षणाक्षणाला बदलतो. तो ज्या झाडावर बसेल त्या झाडासारखा त्याचा रंग होतो. तुमच्या जीवनाचा रंग बदलावयाचा असेल, तर तुम्ही तुमचा मिळेल तो क्षण ग्रंथांच्या सहवासात काढा. थोरो एकदा म्हणाला: "जगातील उत्तम पुस्तकं वाचा, अगदी प्रथम वाचा, नाहीतर तुम्हाला ती वाचायची संधीच मिळणार नाही."

.................बाळ सामंत यांच्या ग्रंथायन या पुस्तकातून.

                                              ***********


गीता

चंद्र, सूर्य, नद्या, समुद्र, ग्रहगोल, एकंदरीत विश्वाचं ब्रम्हांड इत्यादिकांचे कार्य निसर्ग नियामाप्रमाणे सातत्याने, अखंडित चालू असते.

"हे अर्जुना, ही सृष्टी मीच तयार केली आहे, मग येथे मला काय मिळवायचे ?"

आपण म्हणतो, माझ्या बागेतली फुलं मी देवाला वाहिली.

अरे अगोदरचा संवाद तू ऐकलास ना .

ती झाडे त्या देवाने निर्मिली आहेत.

त्या झाडाला फुले त्यानेच फुलविली आहेत.

आपण फक्त ती बागेतून त्याच्या पर्यंत पोहचविलेली असतात.

                                              ***********


पृथ्वी वरच्या सगळ्याच माणसांच्या जिभांना कळणारी चव, नाकाला येणारे वास, डोळ्यांना दिसणारे रंग आणि हाताच्या बोटांना होणारे स्पर्श "युनिव्हर्सल" असतात परंतु प्रत्येकाचे स्वभाव मात्र भिन्न असतात.

                                              ***********


मानसशास्राचा प्राध्यापक असलेला एक अमेरिकन विद्वान म्हणतो, 'स्रिया आणि पुरुष यांच्या कामाची वाटणी फार प्राचीन काळापासून झाली आहे. तिच्यात बदल होणे शक्य नाही. मर मर करून पैसा मिळविणे, हे जसे पुरुषाचे कर्तव्य , तसा तो झर झर खर्च करणे, हे स्त्रीचे काम आहे.'

असल्या कोपरखळ्या  आजपर्यंत स्त्रीलाच अधिक मिळत आल्या आहेत. हे खरे आहे.

............वि.स. खांडेकर यांनी 1997 मध्ये लिहिलेल्या "पहिले पान" या पुस्तकातून

                                              ***********


गवताची गंजी पेटवायला काही वाजत गाजत मशाली आणाव्या लागत नाहीत. निष्काळजीपणाने विडी ओढणारा मूर्ख मनुष्य एक ठिणगीने ते काम करू शकतो.

वि.स.खांडेकरांनीं 1997 मध्ये लिहिलेल्या "पहिले पान"  या पुस्तकातले साधे विचार आज तंतोतंत लागू पडतात. राजकारणात असो वा टीव्ही सिरियल्स मध्ये , किंवा कोणत्याही न्युज चॅनेल लावून बघा, ठीक ठिकाणी अशा गवताच्या गंजी पेटलेल्या आपल्याला दिसतील.

                                              ***********


टोळ धाडी मधील टोळ लाखोंच्या संख्येने उडतांना देखील एकमेकांना अजिबात स्पर्श ही न करता उडतात. कमळांच्या पानांवरून पाणी आणि धूळ सहज निघून जाते.  पडून गेलेल्या पावसाच्या थेंबापासून प्रचंड आकाशाला गवसणी घालणारे इंद्रधनुष्य. अशा निसर्गाच्या अनेक कारामतींकडे बारकाईने पहिले तर निसर्ग मानवापेक्षा किती तरी पट अधिक श्रेष्ठ कलाकृती सहजतेने निर्माण करतो.

                                              ***********


'विस्मरण' हे मानवाला मिळालेलं एक वरदान आहे ! हे वरदान नसते मिळाले तर आयुष्यभर पूर्वजांचे जाण्याचे दुःख विसरता आले नसते.

                                              ***********


मूर्ख माणूस स्त्रीला तिची वट वट बंद करायला सांगतो, पण शहाणा माणूस तीला आर्जवाने म्हणतो, 'तुझे ओठ मिटलेले असतांना, तेंव्हा ते किती सुंदर दिसतात म्हणून सांगू !'

......शांता शेळके यांच्या मधुसंचय या पुस्तकातून

                                              ***********


आपण जन्म कुठे घ्यावा आणि मृत्यू कधी येईल हे आपल्या हातात नाही. तरीही आपण जगावे कसे हे मात्र आपण ठरवू शकतो.

                                              ***********


लाखो लोकांना समजावणे तुमच्या हातात नाही. संपूर्ण जगाला चामड्याने झाकणे तुमच्या अवाक्यातली गोष्ट नाही. परंतु आपल्या पायात जोडे घालून काट्यांपासून वाचणे सोपे आहे.

                                              ***********


"तुमच्याकडे हातोडा असेल तर तुम्हाला सर्वत्र खिळेच दिसतील, तेंव्हा ठराविक मतांच्या, विचारांच्या चौकटीत राहू नका"

                                              ***********


ठेवलेस जर तू औत तुझे बाजूला
घेतलीस जर का उसंतऔंदा तुला
मग मिळेल जेंव्हा कण कुणा खायला
बसेल चिमटा येईल तेंव्हा सगळ्यांना समजुन
की देशाला तरणोपाय न शेतकऱ्यावाचून

ग. लं. ठोकळ ....(संकलक शरद गोगटे यांच्या वेचक विचार या पुस्तकातून)

                                              ***********