२५ मे २०१९ दुपारचा एक वाजून वीस मिनिटे झालीत. गरम लालबुंद कढईत चणे भाजून काढावेत त्याप्रमाणे तळपता सूर्य दिवसा धरणी भाजून काढत होता. पहिल्या पावसाची वाट बघतांना वेडी झालेली धरणी आतुर झाली होती, परंतु आकाश निरभ्र होते. ऊन मी म्हणत होते. फक्त एक हाती सत्ता होती. आग, ऊन,चटके आणि तेथे कोणाचेच चालत नव्हते. दुपारचा मध्यांनं. मी खडकी फाट्यावर उतरलो होतो. सावली नामशेष झाली होती. डोक्याभोवती सफेद रुमाल लपेटून घेतला. पायावर कोणी ऍसिड ओतत आहे असं जाणवत होतं. तेवढ्यात गोलू मोटरसायकलवर माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मी त्याचे आभार मानावे का देवाचे काहीच सुचत नव्हतं. घरी एकदाचा पोहचलो. तात्पुरती सुटका झाली होती असेच वातावरण होते.
आता सकाळचे पाच वाजलेत, मुंबईला जाण्यासाठी खडकी फाटाच्या दिशेने निघालो होतो. गांवाबाहेरच्या मंदिरात रेकॉर्डिंग वर वाजत असलेलं देवाची सुमधुर धून रात्रीच्या अंधारात स्पष्टपणे ऐकू येत होती. आकाश निरभ्र होतें, थंडगार हवा गालाला घासून जात होती. नांगरून चिरा पडलेली शेतं लक्ष वेधून घेत होती. रस्त्याच्या कडेने झाडे शांत शांत उभी होती. जीसकी आवाज ही पहचान है, दर्शन मात्र तिचे होत नाही अशा त्या कोकिळेचा सुमधुर कुहू ss कुहू ss आवाज कानी पडला आणि वातावरण प्रसन्न झाले. शिवार संपायला अजून वेळ होता. निष्पर्ण झाडे रात्रीच्या गर्भात शितलतेची चादर ओढून आईच्या कुशीत जणू विसावली होती. मला मात्र फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही.