Monday, 15 August 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट२०२२

ज्यांच्यामुळे आपण मुक्त श्वास घेत आहोत आणि ज्यांनी ज्यांनी भारत देश घडवला त्यांना सर्वप्रथम माझे वंदन आणि आपण शीतचंद्रलोकवासीयांना अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या संपूर्ण देशात घर घर तिरंगा ही सुंदर संकल्पना प्रत्यक्षात उदयास येत असताना आपल्या शीतचंद्रलोक मध्ये स्वातंत्र्य दिनाचाअमृतमहोत्सव कार्यक्रम भव्य रूपाने साजरा झाला. भव्य म्हणजे काय तर मोगरा दरवळतो, त्याचा सुगंध हा निव्वळ सुगंध या एका शब्दाने त्याचे वर्णन करता येत नाही. त्याचं उमलणं अनुभवणं आणि त्याच्या सुगांधाच्या लाटा अंगावर घेणे म्हणजे जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव साकार करण्यासाठी प्रचंड प्रतिभा आणि मेहनत लागली आहे, याचा अवाका कळण्यासफोटो आणि व्हिडिओ चा आसरा घेतला खरा परंतु पृत्यक्षात त्याचे स्वरूप, आकार उकार मात्रा वेलांटी आणि उद्गारवाचक किती सुंदर असतील बरे ! हे सर्व श्रेय त्या टीमला जाते की ज्यांनी आपले नाव कुठल्याही पत्रकात नमूद केले नाही. अमृतमहोत्सव यात्रा, गणेश पूजन, भारत माता पुजन, बैलगाडीचा रथ, बाईक धारी, झेंडे धारी, फलक धारी, आणि सोबत जमाव, भारत मातेवर अनोखी पुष्प वृष्टी, ओम् गावडेचा मिलिटरी मार्च, मान्यवरांचे आगमन, मान्यवरांच्या हस्ते तिरंगा पेटीतून बाहेर काढून ध्वजारोहन टीम कडे सुपूर्द केला गेला, आणि त्या नंतर, श्री जगन्नाथ पावसकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण, राष्ट्गीत, सांस्कृतीक कार्यक्रम, ज्येष्ठांचा मान सन्मान, शीतचांदेलोक मधील सर्वच स्री पुरुषांनी घेतलेला सहभाग, आभार प्रदर्शनआणि लक्ष वेधून घेणाऱ्या निवेदिका. इतकं अप्रतिम आणि केवळ अप्रतिम असे नियोजनबध्द काटेकोरपणे नीटनेटका आणि उत्स्फूर्तपणे कार्यक्रम सादर करणे म्हणजे श्रीयुत पोंक्षे साहेबांनी गौरवलेल्या त्यांच्या भाषेत फक्त म्हणजे फक्त श्रीयुत कांडके आणि त्यांची टीमच हे फत्ते करू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. झेंडा वंदन ते झेंडा हातात कसा धरायचा, कोणी कुठे आणि कसे उभे राहायचे, मान सन्मान, ज्येष्ठ मंडळीचे आदराने आदरतिथ्य, या सर्व बारीक सारीक आणि भव्य विचारांचे पडसाद या कार्यक्रमात बघायला मिळालेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम ते देशप्रेम अशा प्रवासाला निघालेल्या शीतचंद्रलोकच्या संस्कृतीच्या उदरात अजून किती रत्ने दडवून ठेवलेली आहेत ! मिसेस गाडगीळ त्यांच्या मेसेज मध्ये लिहितात आजचा स्वातंत्र्याच्या अमृत महत्सवोनिमित्त चंद्रलोक परिवाराचा कार्येक्रम खुप छान आणि दिमाखात साजरा झाला. तसेच श्रीयुत पावसकर साहेब लिहितात 15 ऑगस्ट २०२२ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही कल्पना श्री भरत कांडके यांनी प्रत्यक्षात आणली आणि हा सोहळा दिमाखदार व डोळ्याचे पारणे फिटणारा न भूतो न भविष्यती असा साजरा केला व मला या अमृत महोत्सवी सोहळ्याचे साक्षीदार केलेत. अमृत महोत्सवाच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली ते आदरणीय श्रीयुत कांडके साहेब आणि त्यांच्या टीमला मनापासून सलाम. जयहिंद

Wednesday, 9 February 2022

मी स्वतः माझी गाणी ऐकते तेंव्हा -- लता मंगेशकर

 कवी फक्त काव्य करतो, पण त्याचा रसास्वाद घ्यायला मात्र पंडित लागतो, अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. कलेच्या बाबतीत अक्षरशः खरे आहे हे ! विशेषतः गाण्याबद्दल म्हणाल तर हे कोणालाही पटण्यासारखे आहे. गायक स्वतःला कितीही पट्टीचा समजो; त्याचा गाण्याचा श्रोत्यांना होणारा आनंद काही वेगळाच असतो. गाणाऱ्याला सुद्धा एक प्रकारचा आनंद असतो यात शंका नाही. पण एक गोष्ट केंव्हाही निश्चित , गवयाचा आनंद आणि श्रोत्यांचा आनंद हे काही वेगळेच !

यावरून कोणाचा असा समज होईल, की स्वतःची गाणी ऐकण्याचा माझा रोजचा कार्यक्रम असेल. पण गंमत अशी आहे की, प्रत्यक्ष गाण्यातच माझा इतका वेळ जातो, की स्वतःची गाणी ऐकायला खरच मला वेळ मिळत नाही. स्वतःचा लेख वाचायला लेखकाला काय वाटते, याची मला कल्पना नाही; पण एवढे मी स्वानुभवाने म्हणू शकते की चुकून वेळ मिळाला व स्वतःचे गाणे ऐकण्याचा प्रसंग आला, की मला तो अक्षरशः एक 'प्रसंग' वाटतो !

उदाहरणार्थ गाण्याचे रेकॉर्डिंग घ्या ना - तेंव्हापासून या आपत्तीची सुरुवात होते. प्लेबॅकच्या तालमीकरिता डिस्क रेकॉर्डही घेतली जाते. आणि आजकाल टेपरेकॉर्डिंग ही त्यात भरीला पडले आहे. त्यामुळे होते काय , की घेतलेले गाणे आपण ताबडतोब ऐकू शकतो. आणि तीच मला मोठी आपत्ती वाटते ! खोटे नाही, आपले गाणे ऐकण्याचा मला अजूनही धीर होत नाही ! कधी कधी तीन चार 'टेक्स' आम्ही घेतो. त्यापैकी कोणता 'टेक' ठेवायचा हे तरी ऐकावे लागतेच, पण अशा वेळीही हॉल मधून मी पळून जाते आणि रेकॉर्डिस्ट बसतो ना, त्या खोलीमधून ऐकणारांची तोंडे मी न्याहाळू लागते ! बहुधा सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधानच मला दिसते. मी बाहेर आल्यावर "शाब्बास, लता"! म्हणून कोणी माझी पाठ थोपटते. पण मी मात्र आतून थोडी - तरी नाराजच असते ! ........



(लता मंगेशकर लिखित ...."फुले वेचिता" या पुस्तकातून)