शुक्रवार, १६ मे, २०२५
आहे मनोहर तरी....सुंदर माझे गांव
धुळे चाळीसगांव हाय वे आणि चाळीसगांव धुळे रेल्वे चा आवाज झोपेत कानापर्यंत ऐकू जाईल एवढ्या अंतरावर वसलेले माझे गांव धामणगांव तालुका चाळीसगांव. शहरापासून धामणगांवपर्यंत डांबरी पक्की सडक , आता तर शिदवाडी आणि करमुड पर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. आणि हे पण खरे आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली आहेत. तरी आपलं धामणगांव एसटीच्या नियमित सोईपासून वंचितच आहे. कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी एक बस येते. परंतु सुटी च्या दिवशी आणि उन्हाळ्याच्या सुटीत तसेच पावसाळ्यात ही बस बंद असते. आहे की नाही अफलातून आश्चर्य. येथील मतदार मतदान करून मुकाट्याने हा त्रास प्रामाणिकपणे सहन करत असतो. गांवातील लोकांना पायपीट करत खडकीसीम फाट्यावर जावे आणि यावे लागते. पायपीट करण्यासाठी सरकार पक्के रोड बांधून देते मात्र एसटीची सोय करू शकत नाही हे एक दुसरं मोठं आश्चर्य आहे. मी सुद्धा आता सत्तरी ओलांडली आहे. जेंव्हा चाळीसगाव डेपोमध्ये चौकशी काउंटरला हा प्रश्न विचारला की धामणगांवाला एसटी ची सोय का नाही. तेंव्हा त्याने काय उत्तर दिले माहीत आहे! धामणगांवचे लोक एसटीतून प्रवास करत नाहीत. स्वातंत्र्याच्या अमृत वर्षकालीन देशात अशी उत्तरे आणि कर्तव्य हीन नेतृत्व असलेली पुढारी असतील तर धामणगावातील सामान्य व्यक्तीने कुठे दाद मागावी ! बरं आपल्या गावांत अशा सामान्य जणांना असे प्रश्न देखील पडत नाहीत कारण धामणगावांतून प्रवासासाठी त्यांना वेदना सहन करण्याची सवय पडलेली आहे. आणि हेच खरे जीवन समजून सामान्य लोकांचा दिनक्रम चालला आहे.
ट्रॅक्टरच्या मागील पाण्याच्या टँकरचा आसरा घेवून जीव मुठीत घेऊन प्रवास करतांनाचे बोलके चित्र आपले सहज लक्ष वेधून घेईल.
आजकाल पालक मंत्री असो किंवा जिल्हास्तरीय पक्षीय पुढारी असो, त्यांच्या कडूनन बऱ्याच लोककल्याणपयोगी उपक्रम राबविले जात असतात, व्हॉट्सॲप च्या माध्यमातून अशा उपक्रमांचा खूप गाजावाजा चालतो. गावोगावी नाक्यावर पुढाऱ्यांचे बरेच बॅनर सुद्धा सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी कायम स्वरूपाचे लावलेले आढळतात. आपल्या गावासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी एसटी ची कायम स्वरूपाची सोय असावी असे कोणाला का वाटत नाही. Own vehicle is the best हे जरी खरे असले तरी गावातील सर्वसामान्य स्वतःचे वाहन नाही विकत घेऊ शकत, गावात येणारे सर्वच पाहुणे रावळे स्वतःची किंवा स्पेशियल गाडीची सोय नाही करू शकणार ती मंडळी ?
( उन्मेश दादाना लिहिलेले पत्र 24.01.2019
श्री उन्मेश दादा पाटील
सस्नेह नमस्कार
सर आपले पत्र मिळाले, आपण तुरंत विस्तृत रिस्पॉन्स दिला, हे कौशल्य आमच्या सारख्या साध्या माणसाला जमणे अशक्यच. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार.
सर आम्ही आपल्याकडे एक उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षेने पाहत आहोत , पन्नास वर्षांपासून धामणगावांत एसटी ची सोय नाही. ट्रान्सपोर्ट च्या अभावी बाहेरगावचे आमचे नातेवाईक आमच्या येथे मुली सुद्धा द्यायला कचरतात. कोणत्याही कार्यक्रमाला यायचे टाळाटाळ करतात. गांवातला शेतकरी, विद्यार्थी, महिला, आप्तेष्ट यांना चाळीसगांवी जाण्यासाठी खूप कष्ट पुरतात आणि वेळ वाया जातो. ट्रान्सपोर्ट अभावी कामं ठप्प होतं. कृपया या गावकऱ्यांच्या मागणीला प्राथमिकता दिली तर आम्ही ऋणी तर राहूच, परंतु आपलं आमच्याशी एक कायम स्वरूपाचं नातं निर्माण होईल.
धन्यवाद
आनंदराव कौतिक चव्हाण
धामणगांव, तालुका चाळीसगांव.)
_____
हा सर्व खटाटोप मी एकदा २०१९ मध्ये करून पाहिला होता , त्यांच्याकडून एक उत्तर आले होते परंतु पुढे काही झाले नाही.
आताच्या घडीला हा प्रोजेक्ट जर कोणी घेतला तर त्याचे आपण ऋणी राहू.
या प्रश्नाला वाच्या फोडून त्यांच्या पर्यंत पोहचवून पाठपुरावा केला पाहिजे. नाहीतर सर्व गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे.
ज्या गावांत माझा जन्म झाला, जी माझी जन्मभूमी आहे त्या गावांची एसटी विना अशी उपेक्षा आणि फरफट बघतांना डोळे पाणावतात. आणि अजून किती दिवस!
एसटी ची सोय नसली तरी शहराला जोडणारे पक्के डांबरी रोड आहेत हे काय कमी आहे काय! काही असो , "आहे मनोहर तरी....सुंदर माझे गांव"
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)