गुरुवार, १२ जून, २०२५
विद्रोही साहित्य संमेलन
विद्रोह या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण सर्वांनाच माहीत आहे. अजून थोडे खोलात गेले तर विद्रोह या शब्दाचा हिंदी अर्थ बगावत, प्रतिरोध, सत्ताके खिलाप तर मराठी मध्ये या शब्दाचा अर्थ बंड, उठाव, उद्रेक असे अनेक शब्द मिळतात. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात आयोजित करण्यात आले आहे. आणि यंदाचे विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा साताऱ्यामध्येच भरविले जात आहे अशी बातमी वाचली. हा काही योगायोग आहे असे म्हणता येणार नाही. सर्व सामान्य आम जनतेसाठी खुले असलेले अखिल भारतीय साहित्य संमेलनात सर्वस्तरीय भरगच्च कार्यक्रमाची नांदी असतांना विद्रोही साहित्य संमेलनाची काय गरज पडली असावी बरे ! दोन्ही संमेलनामध्ये काय मूलभूत फरक असेल, अखिल भारतीय साहित्य संमेलन असो किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संमेलन असो, या मध्ये जाणून बुजून कोणी कोणाविरुद्ध आखाड्यात दंड थोपटून उभा नाही आहे मग दोन्ही साहित्य संमेलने एकाच शहरात भरविण्याचं प्रावधान काय !
विद्रोही हे नांव का बरे निवडले असावे. विद्रोह म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे वाद, फूट, बंड, उद्रेक, बगावत इत्यादी. साहित्य क्षेत्रात विद्रोह म्हणजे सर्जनशीलतेच्या आस्तिक मनाला झालेल्या वेदनाच असे म्हणता येईल. आणि या वेदनांचे मुळगाव कोणी सांगेल तर बरे होईल. दोन्ही संमेलनाच्या घटकांनी, आयोजकांनी जर एकत्र येऊन विचारविनिमय करून, सखोल चर्चा करून सहमतीने एकाच व्यासपीठावर, एकाच तंबूमध्ये मराठी भाषेचे एकच साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले तर दुधात साखर पडण्यासारखे होईल. साताऱ्यात या वर्षी भरणारे हे १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यातील सर्व भाषिय लोक, कार्यक्रम, रूढी, रिवाज, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक संमेलने चांगल्या परंपराप्रमाणे, गुण्या गोविंदाने पार पडतात. मग मराठी भाषेच्या साहित्य संमेलनामध्येच विद्रोह का ?
एक भाषा आणि एकच मराठी साहित्य संमेलन असावे असे आपल्या भाबड्या मनाला वाटत राहते . पण आपल्याकडे जेष्ठ विचारवंत, कवी, लेखक, समाजसुधारक, पंडित आहेत, त्यांना सुद्धा असले प्रश्न पडत असतील!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)