Monday, 13 November 2017

बाल कवींची औदुंबर........एक निसर्गशिल्प


आपल्या आयुष्यात कितीतरी अशा गोष्टी आहेत की त्या आपल्या मनाच्या गाभाऱ्यात सदैव वास्तव्य करून असतात. आपण कितीही विसरण्याचा जरी प्रयत्न केला तरी त्या आपल्या दैनंदिन जीवनात डोकावत असतात. कळीला किती सांगितले माझ्या देवघरात भरपूर फुलांच्या राशी पडल्या आहेत, तू आता उमलू नकोस तर ती फुलायचं थांबविणार आहे का. साडेसातशे करोड लोकसंख्या असलेल्या पृथ्वीवरील मानवाच्या सहा इंचाची परीघ लाभलेली चेहरे पट्टी एक सारखी नसावीत ! यासाठी परमेश्वराने कोणते रसायन वापरले असावे बरे , सारेच काही अद्भुत आणि गूढ निर्माण करणारे !!. विशाल पहाडावरून प्रचंड पाण्याचा लोट घेवून स्वतःचा उर बडवून घेवून कोसळणाऱ्या वॉटरफॉल ला अडवायची कोणात हिम्मत नाही, परंतु त्याचा प्रपात आणि अविष्कार आपल्या दोन चिमुकल्या डोळ्यात साठवून ठेवण्याची क्षमता परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. अशी कितीतरी अनमोल रत्ने परमेश्वराने आपल्या निसर्गाच्या खजान्यातून मानवाला बहाल केलेली आहेत.

परंतु या साऱ्या विश्वाच्या अफाट पसाऱ्यावर एक संवेदनशील अदाची नजर होती. सृष्टीचे सौंदर्य उकलून दाखविण्यासाठीच जणू त्याचा जन्म झाला होता. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, या बाल कवीने सृष्टीशी एक सुंदर नाते निर्माण केले होते. शब्दांचे सुंदर रत्नहार त्यांनी त्यांच्या काव्यात गुंफलेत. लहानपणापासून "औदुंबर" या कवितेचे मी सुद्धा कित्येक वेळा वाचन केले असेन तरी मनाचे समाधान होत नाही. परत एकदा आणि परत एकदा वाचण्याचा मोह होतोच. प्रत्येक वेळा अलग अर्थ प्रभावित होत असतो. औदुंबर ही कविता प्रत्येकवेळी अलग रूप घेऊन उभी राहते.  एक छोटीशी केवळ आठ ओळींची कविता आणि त्या कवितेला लाभलेली प्रचंड नैसर्गिक पार्श्वभूमी हे या कवितेचं वैशिष्ठ आहे. मोगरा आणि त्याचा सुगंध या एका शब्दाने जसं त्या मोगऱ्याचं वर्णन करता येत नाही  त्याप्रमाणे औदुंबर कविता वाचतांना समीक्षक तिच्यात गुरफटतो. त्याला त्या निसर्ग चक्रातून बाहेर पडता येत नाही. एखाद्या चित्रकाराने चित्र साकारतांना आपल्या कुंचल्यातून अखेर किती रंग वापरावेत.  परंतु मोजक्या रंगांची रंगसंगती विविध शब्दातून खुलते आणि पैलटेकडी कडच्या चिमुकल्या गावांकडे आपलं लक्ष वेधलं जातं. एका बाजूला हिरव्या बेटातून वाहणारा निर्मळ झरा तर दुसऱ्या बाजूला शेत मळ्यांची दाटी वाटीतून वाट काढत आपण न कळत नागमोडी वळणाच्या पांढऱ्या पाऊल वाटेवर येवून थबकतो. आणि येथूनच त्या डोहाकडे जाण्याचा सस्पेन्स सुरू होतो. झाकळूनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर । पाय टाकु नी जळात बसला असला औदुंबर. या कवितेतला अर्थ शोधण्यासाठी अनेक समिक्षकांनी प्रयत्न करून पाहिलेत आणि या कवितेचे गूढ अजूनच वाढत गेले. सौंदर्याचा अनुभव घेतांना सृष्टीच्या लावण्याला स्पर्शून बालकवींनी औदुंबर या कवितेची रचना केली परंतु ते मात्र सूर्य अस्त पावतो त्याच्याही पलीकडे दूर निघून गेलेत आणि सर्वांना प्रश्न चिन्हात सोडून गेलेत. लहान मुलांना, बालकांना सहज वाचता येईल अशा सरळ आणि साध्या सुबक शब्दातील मांडणी केलेली ही कविता बाल मनावर सहज पकड घेते आणि समिक्षकांपुढे मात्र गूढ निर्माण करून जाते.

औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवळी घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळयांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

पायवाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुन चालली काळया डोहाकडे

झाकळूनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकु नी जळात बसला असला औदुंबर

- बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे

No comments:

Post a Comment