Thursday, 4 October 2018

कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हां !

पोळ्यापर्यंत त्याचं कसं आलबेल चाललं होतं. हिरवी चादर अंथरावी तसा धामाणगांवचा रानोमाळ शिवार हिरवागार पहुडलेला होता. पिके टरटंराट वाढलेली होती. नुकतेच लगीन झालेल्या पोरसवादा नवी नवरीला आपल्या माहेरची ओढ लागून कधी ती माहेराला जाते आणि आईच्या कुशीत पदराखाली विसावते, तशी शेतातील पिकांमध्ये एकमेकात चढाओढ चालू होती !   आम्ही सुद्धा सहकुटुंब सहपरिवार वीर देवाचं दर्शन घेण्यासाठी धामणगांवी आलो होतो. आदल्या दिवशी नुकताच पाऊस पडून वरून देवाने शेतातली वाफ मोडून टाकली होती. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. ते हिरवेगार पीक बघून काका सुद्धा म्हणाले की आज मी अर्धा श्रीमंत झालो आहे. हे वर्ष सुख समृद्धीचे जाणार म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीची ओढ लागली होती. पण ताटात देवाने भलतेच वाढून ठेवले होते आणि तशी त्याने तसूभरही कल्पना लागू दिली नव्हती. टप टप अंगावरती पडती पावसाची फुले असं कविला लिहायला मोह आवरत नाही आणि त्यात मनमुराद ओलाचिंब व्हायलाही त्याला आवडतं.  पण !

पण प्रत्यक्षात टप टप पडणारे पावसाचे थेंबानी यावर्षी चक्क हुलकावणी दिली होती. लहानपणी बघितलेली श्रावणातली पावसाची झडी गायब झाली होती. जंगलातून येणारे गवताचे भारे दिसत नव्हते. पोळ्यापासून पावसाने दडी मारून जशी त्याने आपली कवाडे बंद करून घेतली होती.  बांधावरची खुरटे सुकलेले गवत स्वतःच हसत होते. कापसाची वयात आलेली बोन्डे निपचीत बघत होती. बहिनाबाई चौधरींची कविता स्मरून मन सुन्न झाले. बिना कपाशीन उले त्याले बोंड म्हनू नही, हरी नामा ना बोले त्याले तोंड म्हनू नही.  ती बोन्ड तरी उमलणार कशी. पानं पानं झाडं झाडं करपून गेलीत. बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत. शेवटी काय म्हणू देवासी !  स्वामी कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हांसी !


टप टप पडती चौफेर पानांवरती पहिल्या पावसाचे थेंबे !

नकोरे गरजू असा ओल्या झाल्यात माझ्या पापण्या आणि वेणीची फुले

सांग मजसी, दडी मारुनी गेला होतास कुठे तू आजवरी

वाट बघून फेकून दिली कविता तुझी त्या कोरड्या विहिरीच्या तळाशी

पानं पानं झाडं  करपून गेली, बाभळीच्या ढोलीतली पिलं तहानेने कासावलीत

माजुरे बांधावरचे खुरटे गवत हसते कसे, अजून नाही समजले तुला

तुझ्याविना उमलेल कसे,  कोवळे बोन्ड ते कापसाचे

चारही बाजूने खिन्न अवस्था, दुष्काळ सावटाचे

शेवटी काय म्हणू देवा तुला !

कसा रे तू तिन्ही जगाचा पावसाविना जगवितो आम्हां !



No comments:

Post a Comment