Monday, 26 November 2018

सांडितो अवगुण रे भ्रमरा !

उष्ण कटिबंधातले वाहणारे वारे एखादे वेळेस तुम्हाला शिथिल आढळतील, परंतु हिवाळी मोसमाचा गारवा असून देखील सुद्धा , भारतात सध्या निवडणुकीचे विषम आणि उष्ण वारे वाहत आहेत. आणि राजकारणातला दूषित घनकचरा इतका उफाळून वर आला आहे की सध्याचं सर्व वातावरणच प्रदूषित झालं आहे. कोणी कोणावर कसेही हीन दर्जाचे आरोप करत सुटला आहे. ह्या दुषीत घनकाचाऱ्याला जाळण्यासाठी कायद्याची कुठलीही चौकट अस्तित्वात नाही. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली या लोकांनी चांगलेच अवडंबर माजविले आहे. याच्यात न्युज पेपर आणि मेडिया वाल्यांनी सुद्धा काही प्रमाणात आगीत तेल ओतण्याचं काम प्रामाणिक पणे करीत आहेत.  गोळ्या नसलेल्या बंदुकीचे फुसके बार उडविण्याचे जनक म्हणून क्रेडिट आप पक्षाचा म्होरक्याकडे जाते.  कोणताही हातात पुरावा नसतांना करोडो रुपये भ्रष्टाचार केलेल्या पंधरा ते वीस  लोकांची लिस्ट  जाहीर करणे, हा त्यांचा हातखंडा झाला होता. पण त्यांना एकालाही दोषी सिद्ध करता आलं  नाही . पण अण्णा हजारेंच्या चळवळीत सामील होऊन दिल्लीत दुकान थाटून बसले हे मात्र खरे. त्याप्रमाणे  आपल्या पक्षालाही देशाच्या मध्यभागी दिल्लीत चौकीदाराची नोकरी मिळावी म्हणून काँग्रेसपक्षपती यांनी रोज पंतप्रधानांवर फुसके बार फोडण्याचे अजब शस्त्र शोधून काढलं आहे. काँग्रेस पक्षाच्या साठ वर्षांच्या राजकिर्दीत असंख्य करोडो रुपयांचे महा घोटाळे झालेत हे जनता विसरली असेल असं त्यांना वाटतंय. साठ वर्षे निर्विवाद अधिराज्य करणारा काँग्रेस पक्ष 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत चक्क 45 या आकड्यावर आपटला होता. मोदींनी विश्रांती न घेता विकासाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांची कर्जे माफ केलीत. इराणची थकित रक्कम देण्यासाठी मोदी सरकारने रणनीती, आराखडा आखला, सहा हप्त्यांमध्ये संपूर्ण ४३ हजार कोटीचं थकीत देणं भारतानं दिलं.  जीएसटी आणि नोट बंदीचं धाडसी निर्णय घेण्यात आला. परिणाम असा झाला विरोधकांची दुकाने बंद झालीत, प्रत्येक रुपयामागे सरकारला कर मिळू लागला. टॅक्स रूपाने जमा झालेला पैशाने सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडून जनकल्याणासाठी योजना सरकारकडून सुरू करण्यात आल्यात. वचनपूर्तीसाठी अथक प्रवास करायचा असतो तो त्यांनी या साडेचार वर्षात केला आणि आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे.  बघता बघता 2019 च्या निवडणुकीचे सर्वानाच वेध लागलेत. पण रान कधी सपंतच नाही. काळोख सुरू झाल्यावर भर अरण्यात प्रकाशित चांदण्यांची सुद्धा भीती वाटायला लागते. महापुरात सापडलेल्या ओंडक्यांना काडीचा आधार हवा असतो तशी विविध पक्षांची गत झाली. आपलं अस्तित्व जणू धोक्यात आलं आहे आणि ते टिकविण्यासाठी, नाही ते हीन दर्जाचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.  ही विकृती एवढ्या टोकाला पोहचली, की पंतप्रधानांना नाही त्या हलक्या दर्जाच्या उपाध्या विरोधकांनी दिल्यात. आणि त्यात कोणीही मागे राहिले नाही. व्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली अवडंबर माजवून भारतीय संस्कृतीची ऐशी की तैशी करून टाकली. शहरात ओला सुका घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक   यंत्रणा सज्ज असते. परंतु राजकारणात अतिरंजित तोंडाळ  राजकारणी घनकचऱ्याची विल्हेवाट  लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे मतदारच पुढाकार घेवून अश्या प्रदूषित राजकीय दूषित घनकचाऱ्यांची मतदानाद्वारे   विल्हेवाट लावू शकतात. आणि ही संधी फक्त पाच वर्षांनी एकदाच येते.

No comments:

Post a Comment