Tuesday, 9 July 2019

तुमची गाडी कालच गेली !

प्रवास आणि तोही पावसाळ्यात, माझ्याबाबतीत याच्यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही. परंतु तुमचं पूर्वनियोजित नियोजन असेल तर प्रवास सुद्धा तुमचा आनंदात होतो. नोकरीच्या कालावधीत माझं प्रवासाचं प्रिप्लॅन असायचं, सर्वकाही साहेबासारखं, परंतु रिटायरमेंट नंतर माझी सगळीच गणितं बदललीत. मुंबई पुणे लक्झरीने जायचं असेल तर चारशे रुपये लागतात, ओलाने जायचं असेल तर टोलबील धरून 1900 ते एकविसशे रुपये लागतात. आणि ब्लाब्ला ने जायचं ठरविलं तरी साडेतीनशे ते चारशे रुपये लागतात. आणि ट्रेनने एसी चेअर कारने जायचं म्हटलं तरी दोनशे ते अडीचशे रुपये लागतातच. आजकाल मला पुण्याला वारंवार जावे लागत असल्यामुळे इकॉनॉमी पद्धतीने सुद्धा जात येतं, कल्याण पासून पुणे पर्यंत चक्क मी चाळीस रुपयात सुखरूप आणि फास्ट जातो. आणि हें सर्व क्रेडिट सेंट्रल गव्हर्नमेंटला जातंय. कारण सिनिअर सिटीझनला 40 टक्के प्रवास भाड्यात सूट असल्यामुळे मी अवघ्या चाळीस रुपयात पुणे गाठतो. मी स्टेट गव्हर्नमेंटचे आभार मानणार नाही कारण त्यांनी जेष्ठ नागरिकांचे वय 65 वर्षे ठरविलेले आहे.

तर आज झालं काय, मी काही महत्वाच्या कामानिमित्त एक दिवसासाठी पुणे येथें आयटीआय रोड औंधला गेलो होतो. मला मुंबईला परत यायचं होतं म्हणून जवळच दहा मिनिटांवर असलेललं खडकी स्टेशन गाठायचं होतं. एका रिक्षावाल्याला विचारलं त्याने 100 रुपये सांगितलं, चला याचं चुकलं असेल म्हणून दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारलं तर त्याने 150 रुपये सांगितलं. यांना मी रेसकोर्सचा घोडा वाटलो की काय, असं मला सहज वाटून एक टक आश्चर्यकारक नजरेने मी त्याच्याकडे बघतच राहिलो, अन तो चटकन समजला टांग्यावालं गिऱ्हाईक दिसतंय म्हणून सटकन सटकला ! शेवटी मी ब्रेमेन चौकापर्यंत पायीच गेलो आणि तेथून अवघ्या तीस रुपयात खडकी स्टेशन गाठले. तेथून धोधो पावसात लोकलने  लोणावळा गाठलं. परंतु माणुसकी नांवाची चीज मला अनुभवास मिळाली ती डेक्कन एक्सप्रेस मध्ये. गाडीला अतिवृष्टीमुळे तुरळक गर्दी होती. काही लोक स्टँडिंग होते अर्थात तो रेझर्वडं कंपार्टमेंट होता. मी सुद्धा एका बाजूला खांद्यावर माझी कमी वजनाची बॅग लटकवून केविलवाण्या चेहरेने उभा होतो अर्थात सर्वांचेच चेहरे मला कमी नजरेमुळे सारखेच भासत होते . मधल्या दरवाज्या जवळ तीन चार मुली आणि चार पाच जेन्ट्स उभे होते त्यांनी मला इशारा करून जवळ बोलवून घेतले आणि एक सीट खाली होती ते त्या जागेवर स्वतः न बसता मला बसविले. क्षणभर मला काही सुचलच नाही, गाडीने खंडाळा सोडले होते आणि मला त्यांचे आभार देखील मानायचे भान राहीले नाही. राहून राहून विचार येत होता माणुसकी, आपुलकी, सर्जनशीलता दुनियेत अजून भरपूर शिल्लक आहे. आपल्या नजरेने ती ओळखता आली पाहिजे. ताजे गुलाब फुलतात कसे असा प्रश्न आपल्याला पडणारच नाही.

असाच एक प्रसंग आठवला, रात्रीचे बारा वाजून दहा मिनिटे झाली होती. आम्ही सहकुटुंब सह परिवारासह आमची कुलदेवता तुळजापूर येथे दर्शनासाठी निघालो होतो. आम्ही सोलापूरचं 17 तारखेच्या रिझर्वेशन प्रमाणे कल्याण प्लॅटफार्मवरून चेन्नई एक्सप्रेस रात्री 12.25 ला पकडली. एक्सप्रेस ट्रेन ने केलेला प्रवास तर अविस्मरनियच होता कारण मध्यरात्री नंतर चोर पावलाने येवून बदलणाऱ्या तारखेमुळे होणारा प्रवासाचा महा खेळ खंडोबा झाला होता. आमची स्लीपर सिटे दुसऱ्या लोकांनी अगोदरच ऑक्युपाय केलेली होती.  रेल्वे टीसी हळूच माझ्या कानात कुजबुजला, "तुमची गाडी कालच गेली हो". मी म्हणालो असं कसं काय होऊ शकतं ! त्यांनी सांगितलं "साहेब आज 18 तारीख आहे" कालांतराने या स्मृती जरी जाग्या झाल्यात तरी हसून हसून शरीराची पुरे वाट लागते. शेवटी टीसी मास्तरांनी आमची हतबलता बघून विना तिकीट, विना रिझर्वेशन आणि विदाऊट पेनल्टी घेऊन झोपायची व्यवस्था करून दिली होती. त्याही वेळेस माझ्याकडून त्यांचे आभार मानायचे राहून गेले होते. ताजे गुलाब फुलतात कसे याच उत्तर समजायला मी आयुष्य घालवून दिलं.

No comments:

Post a Comment