Wednesday, 22 April 2020

खमोशियों की सदाएँ बुला रही हैं तुंम्हे (लॉक डाऊन २९ वा दिवस)

सूर्याला झोप लागली आणि तो उगवायचा विसरूनच गेला, असं कधी स्वप्नात सुद्धा घडनार नाही. पण हे असं काही घडू शकतं का असे बालिश प्रश्न वेड्यांच्या इस्पितळात असलेल्या वेड्याला सुद्धा पडणार नाहीत. कारण विश्वाचं चक्र क्षणभरही न थांबता अहोरात्र अखंडपणे चालू आहे. शिशिरची पानगळ नुकतीच थांबली आहे. वसंत ऋतू सुरू झाला आहे. सशाच्या कानासारखी इवली इवली बारीक कोवळी पालवी, लंहान मुले जसे आईला बिलगतात तशी ती पातळ पाने झाडांच्या फांद्यांना कोणी चिटकवली आहेत असा भास होत आहे. थोडक्यात वसंत जागो जागी बहरल्याच्या खुणा दिसत आहेत. कळ्यांनी आपलं उमलणं थांबविलेलं नाही, कोकिळचा मंजुळ स्वर कानाला मंत्रमुग्ध करत आहे. धबधब्यांचा प्रपात अहोरात्र स्वतःचा उर बडवीत सुरू आहे. निळ्या आकाशात आज सुध्दा रवीराजाने वेलबुट्टी काढून ठेवली आहे. सूर्याचं पूर्वेकडून पश्चिमेकडे असं त्याचं सतत भ्रमण चालू आहे. सकाळच्या प्रहरी धुंदपणे विहारणारा तो ओझोन अजून दरवळतो आहे आणि ते बघा क्षितिजावर सूर्याचे द्यूत देखील उभे आहेत. अथांग महासागराचं निळ्याशार पाण्यावर लाटांच्या कमानी उभ्या राहातांना दिसत आहेत. किनाऱ्यावर एका पायावर उभे राहून माडाची झाडे वाकून वाकून बघत आहेत. सूर्याने सकाळची कोवळी सोनेरी उन्हे लांबच लांब  अशा एका ओळीने उभ्या असलेल्या पर्वत राजीवर उधळायला सुरुवात केली आहे. निसर्गात तीच रम्य संध्याकाळ आणि तोच पक्षांचा किलबिलाट सुरू आहे. शतकानुशतके निसर्गाची गुपिते मानवी मनाला न कळत शांतपणे उलगडली जात होती. परमेश्वराने जशी रात्र बनविली तसा दिवसही बनवला, प्रचंड डोंगर, नद्या, दऱ्या, जंगल, वाळवंट, समुद्र, सुपीक जमीन, पाऊस, थंडी, ऊन, वारा, ऋतू बनवून सृष्टी संतुलित ठेवून कशाचीही कमतरता जाणू दिली नाही. म्हणून तर अनादी काळापासून या सृष्टीचं चक्र न थांबता अखंड पणे आणि तेही व्यवस्थित चालू आहे. आणि जगाच्या इतिहासात एकविसावे शतक हे प्रचंड फेरबदल आणि घडामोडीचं शतक ठरले आहे. आपल्यापुरते बोलायचे झाल्यास, आपल्याला कळायला लागल्यापासून ते आजतागायत सर्व काही व्यवस्थित सुरळीत चाललं असतांना अचानक एक विचित्र धोकेदायक वळणावर आपण सगळेजण येवून पोहचलो आहोत. आयुष्याच्या वळणावर कोणती वळणे कशी येतील हे सांगणे खूपच अवघड असतं. अति आत्मविश्वसाच्या जोरावर चाललेल्या या जगाला एकदम ब्रेक लागला आणि होत्याचे नव्हते झाले आहे. मानवाची नशा निसर्गदेवतेने अशा काही पद्धतीने उतरवली आहे की, चंद्रावर भरारी मारणाऱ्या मानवाच्या दोन्ही हात पाय बांधून त्याला जश्या कोरड्या खोल विहिरीत अधांतरी टांगून ठेवले आहे. हवेतला ऑक्सिजन अजून तसूभर ही कमी झालेला नाही, परंतु नाकातून श्वास घेतांना आता चक्क फिल्टर लावून घ्यावी लागत आहे. प्रत्येकाने आपल्या तोंडावर मास्क चढविले आहे. सध्या जगावर कोरोना हुकमत गाजवितो आहे आणि त्याने भल्या भल्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. निर्मनुष्य रस्ते आणि गल्ल्या, निरभ्र आकाश, थंडावलेला कारखान्यांचा गोंगाट, शांत झालेला विमानाचा गगनभेदी सुळसुळाट, निपचित पडलेली कर्कश रेल्वे इंजिने आणि अजगरासारखे पहुडलेले महाकाय एक्प्रेस हायवे, शेपटासारख्या विचलित पडलेल्या विमानांच्या धावपट्ट्या, ओस पडलेली फुटबॉल आणि क्रिकेटची मैदाने सारे कसे शांत शांत.  मोर, नीलगाय  शहरी रस्त्यावर दिसायला लागलेत, बिबट्या जंगल सोडून मानवी वस्त्यांवर फेर फटका मारायला लागला, गंगेचं पाणी निळेशार दिसायला लागले, डोंगर रांगा एक पाठोपाठ एक असे शिस्तीत उभे दिसत आहेत. दुसरीकडे आयफेल टॉवर, नायगारा वॉटर फॉल सारखे प्रेक्षणीय स्थळे मानव विरहित ओस पडली आहेत. हा काय चमत्कार आहे आणि एवढी दहशत अजून कधी वाचनात आली नव्हती की ती आज प्रत्यक्ष आपण अनुभवतो आहोत. बा.सी. मर्ढेकरांच्या कवितेतली एक ओळ वाचाविशी वाटते, "काळ मारुनी गेला टपली, न कळत डोक्यावरती तळुई"

चूका करणे ही काळाची गरज आहे, त्याशिवाय नवनिर्मिती होणे अशक्यच असं म्हणतात ! परंतु कोरोना व्हायरसने सर्व स्तरावर पाणी फिरवले आहे. जागतिक मंदिचं संकट घोंगावत आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, लॉक डाऊन मुळे या विषाणूची साखळी खंडित झाली आहे. जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इतिहासावर नजर टाकली तर पृथ्वीवरील मानवावर आजतागायत अशी बरीच संकटे येवून गेलीत, तसच कोरोनाचं संकट जाईल सुद्धा, परंतु मानवाला निसर्गाच्या प्रकृती बाबतीत बरंच काही शिकवून जाणार आहे हे निश्चित.

कोरोनाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी आपले शास्त्रज्ञ अहोरात्र प्रयत्न करत आहेत. आज लॉक डाऊनचा २९वा दिवस, परंतु ही गोष्ट सोपी तर मुळीच नव्हती. ही मानसिकता, हे धैर्य, हे मनोबल आलं कोठून, देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री पासून ते जय जवान जय किसान पर्यंत,  डॉक्टर्स, सिस्टर्स, कर्मचारी, पोलीस दल ते अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पर्यंत, या सर्वांच्या योगदानाचं मूल्य अमूल्य आहे. ओ सुबह अब दूर नही, सर्व काही सुरळीत होण्याची चिन्हे दिसून येतील. मुलांच्या शाळा परत चालू होतील, रस्त्यावर वाहने धावू लागतील, पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी किलबिल अंगणात उतरतील, म्हणतात ना कुदरत अच्छी चिजे बिना बनाये नही रह सकता. त्याच्या कुशीत परत येण्यासाठी निसर्ग आपल्याला खुणावतो आहे बघा.......मचल मचलती हवाये बुला रही है तुंम्हे.



Friday, 17 April 2020

मला आवडलेली गाणी



**************************************
गीत : शाहीर होनाजी बाळा
चित्रपट   :  अमर भूपाळी


घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळी मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरी धेनु स्तनपानाला

सायंकाळीं एके मेळीं द्विजगण अवघे वृक्षीं
अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी
प्रभातकाळी उठुनि कावडी तीर्थ पथ लक्षी
करुनि सडासंमार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षीं
यमुनाजळासि जाति मुकुंदा दध्योदन भक्षी

कोटी रवीहून तेज आगळें तुझिया वदनाला
होनाजी हा नित्य ध्यातसे हृदयी नाम माला

**************************************

गीत : मधुसूदन कालेलकर
चित्रपट : एक धागा सुखाचा


ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

मऊ जशी ती साय दुधाची,
होती आई का तशी मायेची ?
बागेतील ते कमल मनोहर,
आई होती का तशीच सुंदर ?
देवाघरी का एकटी जाई ?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

चिउकाऊची कथा चिमुकली,
सांगत होती का ती सगळी ?
अम्हांसारखे शुभंकरोती,
म्हणे रोज का देवापुढती ?
गात असे का ती अंगाई ?
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

मऊ साइहुन आई प्रेमळ !
गंगेहून ती आहे निर्मळ
अमृताचे घास भरविते
आभाळापरी माया करीते
आईवाचून मीही विरही
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

**************************************

गीत : पी. सावळाराम
चित्रपट : पुत्र व्हावा ऐसा


जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहते

डोंगर दरिचे सोडून घर ते
पल्लव पाचूचे तोडून नाते
हर्षाचा जल्लोष करुनी जेथे प्रीत नदीची एकरुपते

वेचित वाळूत शंख शिंपले
रम्य बाल्य ते जिथे खेळले
खेळाचा उल्हास रंगात येउनी धुंदीत यौवन जिथे डोलते

बघुनी नभींची कोर ती
सागर हृदयी ऊर्मी उठती
सुखदुःखाची जेथे सारखी प्रीतजीवना ओढ लागते

**************************************


गीत : मधुसूदन कालेलकर
चित्रपट : एक धागा सुखाचा


अ आ आई, म म मका
मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरी खट्याळ, तरी मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडीवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई

**************************************

गीत : मधुसूदन कालेलकर
चित्रपट : बाळा गाऊ कशी अंगाई

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील मधुसूदन कालेलकर 
यांचं गीत सुमन कल्याणपूर यांनी इतक्या मंजुळ आणि सहजतेने 
गोड आवाजात गायले आहे की थोड्या वेळासाठी आपल्या मनाला 
भुरळ पडते आणि आपणही त्या विश्वात रमून जातो की निंबोणीच्या 
झाडामागे चंद्र खरोखर शांतपणे निद्रा घेत पहुडला आहे. अप्रतिम 
शब्द रचना, आणि अप्रतिम भावार्थ भरलेल्या या गाण्याने आपल्या 
मनावर एवढा विलक्षण प्रभाव पडतो की घटकाभर आपण विसरून 
जातो की चंद्रावर मानवाने कधीकाळी पाऊल ठेवले होते.


निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही

गाय झोपली गोठयात घरटयात चिऊताई
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई

देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई

रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती
स्वप्न एक उधळून गेले माय लेकराची नाती
हुंदका गळ्याशी येता गाऊं कशी मी अंगाई

**************************************


गीत     :   संत नामदेव
संगीत   :   दत्ताराम गाडेकर
स्वर      :   गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर

रात्र काळी घागर काळी ।
यमुनाजळें ही काळी वो माय ।।१।।

बुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ।।२।।

मी काळी कांचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ।।३।।

एकली पाण्याला नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ।।४।।

विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहू काळी वो माय ।।५।।



Sunday, 5 April 2020

शहरातली रात्र

 दोन वाजलेत, रातकिडे सुद्धा शांत झोपून गेले होते. काल दुपारच्या शांततेत आणि रात्रीच्या मध्यांनीच्या शांततेत कसलाही फरक जाणवत नव्हता. मी खिडकीच्या आत उभा होतो. आकाशात चांदणं बहरलं यावर असंख्य कविता लेख लिहिणारे कवी लेखक सुद्धा शांत झोपले असतील. ते न्याहळण्यासाठी डोकं खिडकीतून बाहेर काढण्याची माझी सुद्धा हिंमत होत नव्हती. रात्र आपली काळीकुट्ट शाल भूतलावर पांघरून उभी होती. कुत्रे बीभत्स स्वरात विव्हळत होते. सर्व काही अलबेल चालू होतं, मग अचानक असा सन्नाटा चोहोकडे कसा काय पसरला होता. झाडे निपचित उभी होती, पानांची सळसळ नव्हती. त्या हिरव्या कोवळ्या लुसलुशीत पालविला हे कसे ज्ञात असणार. डोक्यातले विचार शांत झोपू देत नव्हते. बालकवींची "खेड्यातली रात्र" ही कविता नजरे समोर तरळू लागली.

त्या उजाड माळावरती
बुरुजाच्या पडल्या भिंती
ओसाड देवळापुढतीं
वडाचा पार - अंधार दाटला तेथ भरे भरपूर.
ओढय़ांत भालु ओरडती
वाऱ्यांत भुतें बडबडती
डोहांत सावल्या पडती
काळ्या शार - त्या गर्द जाळिमधि रात देत हुंकार
भर-रानी काकस्थानी
उठतात ज्वाळ भडकोनी
अस्मान मिळाले धरणी
आर ना पार - अवकाळ रात्रीचा प्रहर घुमे तो घोर

पण कालच मी शहरातली रात्र अनुभवली होती. बाल कवींच्या कवितेतील शब्द प्रहाराप्रमाणे इथे शहरात कोणतेही बुरुज ढासळले नव्हते, उजाड माळरान ही नव्हते, की कुठल्याही डोहाच्या सावल्यानी अक्राळ रूप धारण केले नव्हते. तरी सुद्धा एव्हढा सन्नाटा पसरला होता. कारण कोरोना व्हायरसने दहशत बसविली होती. वैद्यकीय दृष्ट्या बलाढ्य असणाऱ्या देशांमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता, दिवसाला मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी बघून मन बेचैन होत होते. भारतात लॉक डाऊन चा बारावा दिवस होता. एक आशेचा किरण दिशा, बळ आणि साहस देत होता. रात्री नऊ वाजता दीप प्रज्वलित करून सर्व भारतीयांनी आम्ही एक आहोत, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद आमच्यात आहे असे दाखवून दिले. शीतचंद्रलोक सोसायटीतील राहिवासीयांनी सुद्धा रात्री ठीक नऊ वाजता दिपप्रज्वलंन केले आणि "शुभं करोती म्हणा, मुलांनो, शुभं करोती म्हणा" हे ध्वनी कानावर पडले.

आदरणीय रतन टाटाजी, लाखोंचा पोशिंदा, देव माणूसच तो, हातात दिवा घेऊन उभा राहतो, याच्यापेक्षा सुंदर दृश्य असूच शकत नाही.