Sunday, 5 April 2020

शहरातली रात्र

 दोन वाजलेत, रातकिडे सुद्धा शांत झोपून गेले होते. काल दुपारच्या शांततेत आणि रात्रीच्या मध्यांनीच्या शांततेत कसलाही फरक जाणवत नव्हता. मी खिडकीच्या आत उभा होतो. आकाशात चांदणं बहरलं यावर असंख्य कविता लेख लिहिणारे कवी लेखक सुद्धा शांत झोपले असतील. ते न्याहळण्यासाठी डोकं खिडकीतून बाहेर काढण्याची माझी सुद्धा हिंमत होत नव्हती. रात्र आपली काळीकुट्ट शाल भूतलावर पांघरून उभी होती. कुत्रे बीभत्स स्वरात विव्हळत होते. सर्व काही अलबेल चालू होतं, मग अचानक असा सन्नाटा चोहोकडे कसा काय पसरला होता. झाडे निपचित उभी होती, पानांची सळसळ नव्हती. त्या हिरव्या कोवळ्या लुसलुशीत पालविला हे कसे ज्ञात असणार. डोक्यातले विचार शांत झोपू देत नव्हते. बालकवींची "खेड्यातली रात्र" ही कविता नजरे समोर तरळू लागली.

त्या उजाड माळावरती
बुरुजाच्या पडल्या भिंती
ओसाड देवळापुढतीं
वडाचा पार - अंधार दाटला तेथ भरे भरपूर.
ओढय़ांत भालु ओरडती
वाऱ्यांत भुतें बडबडती
डोहांत सावल्या पडती
काळ्या शार - त्या गर्द जाळिमधि रात देत हुंकार
भर-रानी काकस्थानी
उठतात ज्वाळ भडकोनी
अस्मान मिळाले धरणी
आर ना पार - अवकाळ रात्रीचा प्रहर घुमे तो घोर

पण कालच मी शहरातली रात्र अनुभवली होती. बाल कवींच्या कवितेतील शब्द प्रहाराप्रमाणे इथे शहरात कोणतेही बुरुज ढासळले नव्हते, उजाड माळरान ही नव्हते, की कुठल्याही डोहाच्या सावल्यानी अक्राळ रूप धारण केले नव्हते. तरी सुद्धा एव्हढा सन्नाटा पसरला होता. कारण कोरोना व्हायरसने दहशत बसविली होती. वैद्यकीय दृष्ट्या बलाढ्य असणाऱ्या देशांमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता, दिवसाला मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी बघून मन बेचैन होत होते. भारतात लॉक डाऊन चा बारावा दिवस होता. एक आशेचा किरण दिशा, बळ आणि साहस देत होता. रात्री नऊ वाजता दीप प्रज्वलित करून सर्व भारतीयांनी आम्ही एक आहोत, कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद आमच्यात आहे असे दाखवून दिले. शीतचंद्रलोक सोसायटीतील राहिवासीयांनी सुद्धा रात्री ठीक नऊ वाजता दिपप्रज्वलंन केले आणि "शुभं करोती म्हणा, मुलांनो, शुभं करोती म्हणा" हे ध्वनी कानावर पडले.

आदरणीय रतन टाटाजी, लाखोंचा पोशिंदा, देव माणूसच तो, हातात दिवा घेऊन उभा राहतो, याच्यापेक्षा सुंदर दृश्य असूच शकत नाही.



No comments:

Post a Comment