थंडीचा महिना सुरू झाला की आठवतं लहानपणी गल्लोगल्ली
शेकोट्या पेटलेल्या दिसायच्या. थंडी आणि धुक्याने ओल्या
आणि गार झालेल्या पायवाटेने रानात जाण्याची मजा आणि
धुंद नजारा काही वेगळाच असतो. शेतकऱ्याने पावसाळी पिके
आवरलेली असतात आणि रानात शेताच्या बांधावर, पडीक
जागेवर जागोजागी वनफुलें, वेली यांना बहर आलेला असतो.
निसर्ग नवनिर्मितीची बीजे जणू रोपत असतो. शेतकऱ्यांनी
काही शेतात भुईमुगाच्या शेंगांच्या झोपडीवजा गऱ्या
साकारलेल्या असतात. काही पलीकडच्या शेतात कापसाचं
चांदणं विखुरलेलं दिसतं तर झाडाच्या बाजूला असलेल्या
विहिरीवर पिकांना पाणी भरण्यासाठी मोट आणि मोटेचा नाडा
पडलेला दिसायचा. एव्हाना पूर्व दिशेच्या क्षितिजावर कुजबुज
सुरू झालेली असते. दुसऱ्या बाजूला राजवाड्याच्या महालात
झुंबरं लटकावीत त्याप्रमाणे गव्हाच्या टंच भरलेल्या वयात
आलेल्या ओंब्या सूर्य किरणांच्या कवडसात आपल्याकडे वाकून
वाकून कुतूहलाने बघत असतात, तर हरभऱ्याची बुटकी झाडे
आपल्या पायाला चरचर खाजवीत आपले लक्ष विचलित करत
असतात. निसर्ग फळं फुलं पिकं यांना कसं आणि किती गोंडस
रूप देईल याची देही याची डोळा आपण कल्पनाही करू शकत
नाही. नोकरी निमित्त शहरात आयुष्यंची बरीच वर्षे निघून गेलीत.
त्या थंडीच्या दिवसातली रानात चराचर बहरलेली हिरवाई आणि
निसर्गाचे ते अविष्कार बघण्यासाठी अजून बालपण मोठे हवे होते.
कितीही समजावून सांगितले तरी मन मानायला तयारच होत नाही.
बा.सी.मर्ढेकरांच्या ओळी परत त्या विश्वात मनाला ओढून नेतात.
अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी
पाला खाते.