वाळू जर गाढवाने पाठीवरून वाहून नेली आणि ती पोलिसांनी अडविली तर फार फार तर काय होईल, वाळू जप्त होईल परंतु गाढवाच्या केसालाही ते धक्का लावू शकत नाही. हे गाढवाच्या मालकाला पुरेपूर माहीत असते. आपण जर का राजकारणात डोकावून बघितले तर आपल्या लक्षात येईल की असे बरेच गाढव वाळूच्या गोण्या वाहत असतात.
हम दो हमारे दो हे कुटुंबनियोजनाचं ब्रीद वाक्य संसदेत राहुल गांधींच्या तोंडी अवतरलं आणि त्याची तुलना मोदी-अमित शहा आणि अंबानी-अदानी यांच्याशी अप्रत्यक्षपणे करून संसदेत बजेट वर भाष्य न करता एक प्रकारे धुमाकूळच घातला. असाच एकदा म्हणजे 2019 मध्ये चौकीदार चोर है असा धोशा राहुल गांधींनी लावला होता आणि त्याच्या अनुयायी जोरजोरात ढोलताशे बडवीत होते. झालं काय तर चौकीदार चोर है असा धोशा लावणाऱ्या काँग्रेस पक्षाला जनतेने धोबी पछाड दिली होती.
चवताळलेल्या वाघाप्रमाणे राहुल गांधींनी आता नवीन घोषणा बाजारात आणली आहे "हम दो हमारे दो" श्री बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांना एक "नर्व्हस छात्र" असे त्यांच्या पुस्तकात संबोधले होते, राहुल गांधी जणु ते त्याचीच प्रचिती देत आहेत. हम दो हमारे दो म्हणजे 2+2 =4 बहुतेक जनता त्यांची इच्छा पूर्ण ही करेल परंतु आपलं अस्तित्व नाहीसं होत चाललयं याच अजिबात भय या पक्षाला वाटत नाही.
11 फेब्रुवारी 2021 रोजी संसदेत राहुल गांधी यांनी कुंटुंब नियोजनाचं या ब्रीदवाक्याचा विचित्र अर्थ लावून आपले भाषण भलत्याच पातळीवर नेवून ठेवले, यांच्यात कोणाची कितपत बुद्धिमत्ता आहे हा संशोधनाचा विषय जरी असला तरी त्यांच्या मागे जी टीम आहे ती सुद्धा दिशाभूल करणारी आहे असे दिसते. शेवटी कोणाला जाणून बुजून बदनाम करण्याचा संकल्प केला तरी सत्य हे सत्यच असतं. परंतु संसदेत विरोधकांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्वाची असते जेवढी सत्ताधाऱ्यांची असते. उजव्या हाता इतकाच डावा हात देखील महत्वाचा असतो. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यांनी सुद्धा त्रि शतके काढली आहेत. परंतु आपले विरोधक या संधीचा फायदा घेत नाहीत आणि जनतेला संभ्रमात टाकण्यात ते कोणतीही कसूर बाकी ठेवत नाहीत.