Sunday, 7 February 2021

भरीत भाकरी आणि ठेचा

शीतचंद्रलोक मध्ये वार्षिक श्रीसत्यनारायनाची पूजा आटोपल्यानंतर वेध लागतात ते शेकोटी अर्थातच भरीत भाकरीच्या पार्टीचं. वांग्याचं भरीत आणि ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर त्याचा फडशा पाडण्यासाठी आपली जीभ आसुसलेली असते आणि तो आपल्या जिभेवर येईपर्यंत जीव नुसता कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. म्हणून कालच्या दिवशी सोसायटीत शीतचंद्रलोक सख्यांनी बनविलेली भरीत पार्टी कशी झाली याच्याबद्दल काल कोणी चकार शब्द ही काढला नाही. त्याचं सस्पेन्स उलगडण्या अगोदर आपलं लक्ष वेधू इच्छितो की कोरोना काळात आपल्या ईथेच नव्हे तर संपूर्ण जगभरात कार्यक्रम बंद पडलेल्या अवस्थेत असतांना आपल्या सोसायटीतील महिला वर्गाने दरवर्षी नियमित येणाऱ्या भरीत भाकरीच्या पार्टीला खंड पडू दिला नाही त्यामुळे त्यांचे कोणत्या शब्दात कौतुक करावे हे तुम्हीच सुचवा. दुसरी गोष्ट म्हणजे कल्याणला जावून भाजीपाला आणण्यापासून, सकाळी पाण्याने स्टेज साफ कारण्यापासून ते भाजी चिरणे, निवडणे, लसूण, मिरच्या, शेंगदाणे कुटण्यापासून ते ठेचण्यापर्यंत,  बेसन भाकरी भरीत भात आणि चूल मांडून भाकऱ्या रांधण्यापर्यंत आणि ते पण हे मंडळ अजिबात न थकता रात्री साडे अकरा पर्यंत हा व्याप चालू होता ! श्रीयुत पोंक्षे साहेबांनी टाकलेली एक क्लिप बघितली, तर हे सर्व जण आपापली कामे करण्यात व्यस्त दिसत आहेत. कसलीही मिटिंग नाही, कोणताही कॉम्पुटयाराईज्ड प्रिप्लॅन नाही आणि कुठलाही गाजावाजा न करता सर्व काही व्यवस्थित पार पडलं आणि चक्क रात्री साडेआठ पर्यंत पहिला जेवणाचा मान पुरुष मंडळीला दिला. आणि शेवटी जे काही शिल्लक राहील त्याच्यात त्यांनी आपले जेवणे उरकलीत. हा एवढा आदरतिथ्य आणि मनाचा मोठेपणा जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ भारतीय स्त्री संस्कृतीतच आढळतो. कौतुकाची अपेक्षाही न बाळगणाऱ्या या स्त्री संस्कृतीच्या मागे असं कोणतं सूत्र लपलेलं असतं की ते सस्पेन्स पुरुष जातीच्या मानवाला अजूनपर्यंत कळलेलं नाही हे एक आश्चर्यच आहे. म्हणून शीतचंद्रलोक सख्यांच्या विनम्रशील स्त्री सर्जनशीलतेच्या या कर्तुत्वाला प्रथम मानाचा मुजरा.



काल आपल्या येथे शीतचंद्रलोकसख्या यांच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी अगदी शाळेतल्या मुलांसारखी जशी गणवेश परिधान करून, हातात कुपन धरून लायनीत शिस्तीने उभे राहून, कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं की रायबाचं अशा ऐटीत सोसायटीतील पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना, सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं होतं. शीतचंद्रलोकच्या पाणवठ्याखाली आपल्याच डोळ्यासमोर रुजलेल्या त्या लहान बिया आता तरुण, मोठी आणि समजदार झाली होती, ती आपल्याच धुंदीत व्यस्त आणि मस्त होती, बरीच सिनियर मंडळी काही  निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेली आणि काही उंबरठा ओलांडलेली एकमेकांची विचारपूस करत होती. गेस्ट मंडळी सुद्धा अवाक झाली होती. कधी काळी शीतचंद्रलोकला लाभलेल्या भव्य पटांगणाच्या उजाड माडावर आता भव्य दिव्य आलिशान चार चाकी उभ्या दिसत होत्या. काळ बदलला तरी या समृद्धीच्या वाटचाली मागे शीतचंद्रलोक संख्यानी आपला वसा जपलेला होता. काही ठिकाणी कुजबुज चालली होती, तर काहींनी चक्क जमिनीवरच मांडी घालून जेवण करणे पसंत केले होते. बेसन, भरीत, भाकरी, ठेचा, कांदा, निंबु, आणि वरून जिलेबी, आणि एक विसरलोच शेवटी आईस्क्रीम कुल्फी सुद्धा आणि बापरे ते पण फक्त पन्नास रुपयात ! जेवणाची लज्जत एव्हढी भारी आणि चविष्ट होती की खाणारा दाद द्यायलाच विसरून गेला हो ! पाय कोणाचा तेथून निघत नव्हता. फोटोशेशन जोरात चालू होतं. जणु पावलो पावली आपलेपणाच्या खुणा दिसत होत्या. अजून ही तोच जोश आणि उत्साह जाणवत होता. म्हणून मी परत त्याच ठिकाणी येतो. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.

1 comment:

  1. The oneness of our culture is still maintained in Sheet Chandralok family.

    Amazing team work by all at different level and age group.

    I became nostalgic and remembered my childhood days in our society in Vile-Parle way back in 80s.

    I am not going to miss this festival next year also.

    A big salute to all ladies who are used to the "GAS STOVE" for entire year for prepaing the food on "CHOOLHA".

    I missed the opportunity to see the making of the food due to the standard Mumbai problem "Traffic".

    Sudhir Joshi
    (Guest of Gadgils)

    ReplyDelete