Monday, 9 December 2024
चांदणं
एखाद्या चांदण्या रात्री घरातून बाहेर पडायला मिळणे असे म्हणणे मुंबई सारख्या ठिकाणी हास्यास्पद ठरेल. तेथे समुद्र गर्जत राहतो लाटा किनाऱ्यावर येवून काही तरी सांगण्यासाठी आक्रोश करून आदळत राहतात परंतु तेथे कोणी कोणाची दाखल घेत नाही. परंतु हा दुर्मिळ योग, मी जेंव्हा वैशाख महिन्यात गावी जातो त्यावेळेस काळया आभाळाचे आणि अनेक चांदण्या रात्रीचे सौंदर्य मी अनेकदा माझ्या काकांच्या मातीच्या घराच्या धाब्यावर झोपताना अनुभवली आहे. तसेच चांदण्या रात्रीत शेतात राखण करण्यासाठी मी त्यांच्या बरोबर जात असे. शेत माळ्यावर खाटेवर झोपताना आभाळभर अथांग चांदण्याच्या लाह्या आकाशात विखुरलेल्या दिसायच्या. एव्हढ्या असंख्य चांदण्या आल्या तरी कोठून आणि दिवसा कुठे गायब होतात याचं गणित मला कधीच उलगडलं नव्हतं. कधी कधी शेतातून परस्पर शेजारच्या बाजारपेठेच्या गावी तमाशा बघण्यासाठी सुद्धा आम्ही बैलगाडी जुंपून जात असू. अशा बऱ्याच चांदण्या रात्रिंच्या आठवणी आयुष्याच्या गाभाऱ्यात निपचित पडल्या आहेत. त्यांना कोणतेही उपमा अलंकार देण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. परंतु हे शिंपले जेंव्हा उफाळून वर येतात तेंव्हा ते अनुभवतांना कुसुमाग्रजांची कविता गुदगुल्या करते. काढ सखे गळ्यातील तुझे चांद्ण्याचे हात क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दुत.
अचानक झोपेतून जाग आली. रात्रीचे तीन वाजलेत. मी अमृतसर एक्स्प्रेस ने प्रवास करत होतो. खिडकी उघडली. थंडगार वाऱ्याची झुळूक चेहऱ्याला अलगद स्पर्शून जात होती. तोच चांदण्याचा शुभ्र प्रकाश चौफेर उधळला जात होता. खुल्या आभाळाची विशाल चंदेरी चादर जमीवर अंथरली जात होती. ट्रेन डोंगराला चकवा देत मार्ग परिक्रमण करीत होती. चंद्र साक्षीला होता. कधी डोंगर आडून कधी दाट झाडीतून माझ्या संगतीला होता. त्याच्या किरणांनी सारा आसमंत लखलखाट झाला होता. ही रात्र आणि प्रवास संपूच नये अशा वेड्या मनाची समजूत कोण काढणार. सकाळचे साडेचार वाजलेत तरी ट्रेनला रात्रीच्या चांदण्यातून सुसाट धावण्याचा मोह आवरत नव्हता. मघापासून अखंड धावल्याने चंद्रही थकला होता. मी त्याचा निरोप घेण्याच्या तयारीत असताना त्या रमणीय पहाटे मी पाचच्या सुमारास चाळीसगांव प्लॅटफॉर्म वर उतरलो. विनंती वरून मला अक्कलकुआ एस टी बस कंडक्टरने खडकी फाटा स्टॉपवर उतरवून दिले. दीड मैल मला पायी चालावे लागणार होते. गावाकडची ती पहाटेची नवलाई अनुभवल्यानंतर येथे परमेश्वर निसर्गात भरलेला आहे याची खात्री पटली. काही वेळाने मी माझ्या धामणगांवी पोहचणार होतो. माझ्या मनातले आनंदाचे दवबिंदू विरघळलेत. कारण आता आई तेथे नव्हती. ती खूप खूप दूर सात समुद्राच्या पलीकडे निघून गेली होती कधी न वापस येण्यासाठी. अजून एक आशेचा किरण मला उत्साहित करत होता. लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांनी मला प्रचंड माया लावली ते माझे काका अजून आहेत. आणि अजून त्याच मातीच्या भिंतीच्या धाब्याच्या घरात राहतात. ते समोर दिसताच त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला सोडून बसावे आणि त्यांची टोपी डोक्यावरचे केस विस्कटून वस्कटून ओरबाडून घ्यावेत. अजून त्यांच्याबरोबर हातात कंदील आणि काठी घेवून शेतावर जावे. शेंगा भाजून खाव्यात, मोटेवर बसून गाणी ऐकावेत. चांदण्यात गवत कापून बैलांना टाकावे. हे बालपणीच चित्र नेहमी नेहमी आयुष्यात डोकावत राहतं. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment