Monday, 30 December 2024
मेव्हणी माझी जेंव्हा रिटायर होते
व्यासपीठावरील अध्यक्ष, मान्यवर आणि समस्त गुरुजन असा मोठा परिवार जमलेला होता. पी पी चेंबर मधील चवथ्या माळ्यावरच्या हॉल मध्ये लगबग चालू होती. हॉल बाहेर मेव्हणीचा रांगोळीचा विशिष्ठ फोटो काढण्यात आला होता. शिक्षिका आणि मेव्हणीच्या मैत्रिणी अप्सरासारख्या नटून थटून आल्या होत्या. स्टेज च्या मागे "सेवापूर्ती गौरव सोहळा" असा बॅनर मोठ्या दिमाखात झळकत होता. कारण तिने चक्क 37 वर्षे सेवा केली होती. वरिष्ठ मंडळी एकदाची स्थानापन्न झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली देखील. बऱ्याच शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. नंतर
मी जास्त वेळ न घेता माझ्या भाषणाला सुरुवात केली. सगळी हयात शिक्षकी पेशात घालवल्या नंतर कोणता उद्योग आरंभायचा हा जसा मोठा यक्ष प्रश्न असतो. तसे मेव्हणी बद्दल एव्हढे नामवंत गुरुजन शिक्षकांसमोर काय बोलावे हा मला लहान तोंडी .... पडलेला प्रश्नच होता. मी स्वतः रिटायर्ड असल्यामुळे माझ्याकडे गाईड लाईन्स भरपूर असतील परंतु स्टेज वरून भाषण देणे सोपे नक्कीच नव्हते. कारण मी काही वक्ता नाही, की मी कुठे भाषणही दिले नाही. कारण भाषण देण्यासाठी सर्जनशीलतेची प्रतिभा असावी लागते ती माझ्यात मुळीच नाही.
म्हणून मी चक्क भाषणच लिहून आणलं आहे. अर्थात मीच ते लिहिलं आहे. आमच्या हीच आणि माझं लग्न झाल्यापासून गेली चव्वे चाळीस वर्षे मी संगितालां पाहतो आहे. माझ्या समोर तिने ग्रॅज्युएशन केलं, नृत्य कलेत तिने प्रावीण्य मिळविले, तिला आदर्श शिक्षिका म्हणून सुद्धा गौरविण्यात आले. ही किती अभिमानाची आणि मोठी गोष्ट आहे. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात ती अग्रेसर असते. आईवडिलांची सेवा करण्यात ही ती कुठे कमी पडलेली नाही. तिने डीएड पूर्ण केल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची चांगली शिक्षकी पेशातली नोकरी, एवढं सर्व काही आपल्या पदरी विपुलता येणार आहे अशी पुसटशी कल्पना नसताना, एक दिवस घरासमोरच्या सारवलेल्या अंगणात नववधूने तुळशी वृंदावन जवळ नुकतीच रांगोळी काढली, आणि थोड्याच वेळात पावसाची सर येऊन तुळशीवृंदावन पावसात ओलचिम्ब झाले ! पावसाने सारवलेलं ते सारवण रांगोळीसह वाहून नेलं ! जे नशिबात होतं त्याला ती सामोरे गेली. डगमगली नाही. अनेक वळणे आली असतील त्यांच्याशी तीने जुळवून घेतले. आणि इथपर्यंत ती येवून पोहोचली आहे. रिटायरमेंट ला अवघे काही तासच उरले आहेत. मला कल्पना आहे, तिच्या मनात प्रचंड उलथापालथ चालू असेल. शांता शेळके यांच्या गीतातून सांगायचे झाले तर जायचे इथून दूर, काहूर मनी उठले, दाटे नयनात पूर. जसे सर्व ऋतूत येणारे सर्व सण आपण अगदी आनंदाने साजरे करतो, आणि शेवटी आपल्या शरीराची लाही लाही करणारा शिशिर येतोच ना ! झाडांच्या फांदीला तो शुष्क करून टाकतो. त्याला कोणी नाकारले आहे का. कारण नंतर नव पालवी घेवून वसंत येणारच असतोच.
आतापर्यंत जगलेल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुझ्या हातून सुटून गेल्या असतील. ऐन उमेदीच्या काळात जे आयुष्य जगायचं राहून गेलं होतं आता ती जगायची संधी तुला मिळणार आहे. माधव ज्युलियन म्हणतात "चल उडुनी पाखरा पहा जरा, किती रम्य पसरली वसुंधरा". हो, आज आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत. तुझे कोडकौतुक करत आहोत. उद्या मात्र आम्ही सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होणार आहोत. सकाळची लोकल, शाळेची घंटा, विद्यार्थ्यांचा किलबिलाट. अटेंडडन्स रजिस्टर वर केलेली सही आणि विद्यार्थ्यांचा हजेरीपट, हुशार विद्यार्थ्याच्या पाठीवर मारलेली शाबासकीची थाप, हा चालू असलेला अध्याय एकदम खंडित होणार आहे. जसा वीजपुरवठा खंडित होतो आणि चुहुकडे अंधार पसरतो आणि क्षणभर आपल्याला काही सुचत नाही त्याप्रमाणे निवृत्तीनंतर थोडी हुरहूर, थोडे नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक छोटासा गुंता तयार होईल. भिंत असली म्हणजे तिच्यावर पाल फिरणारच, भाजीपाल्याची पिशवी घरी घेवून येतांना रस्त्यावर मांजर आडवी जाणारच, कोणाच्या घरात दूध अजूनपर्यंत ओतू गेलं नाही, हे सांगा बरं ! मग तू त्यांच्या पेक्षा वेगळी कशी असेन. निवृत्तीनंतर आपले कोणी कौतुक करेल ! पण असं घडतं नाही. का बरं अशी अपेक्षा करावी. आपणच आपल्या मुलांचे, त्याच्या लग्नाचे आणि येणाऱ्या नवीन सुनेचे, कौतुक करायचे दिवस चालून येणार आहेत. तो कौतुकाचा शब्द भांडार तुला तुझ्या रेशमी पदरात जपून ठेवावा लागणार आहे. निराशेचे दिवस संपणार आहेत आणि नवीन आयुष्य जगण्याची तुला संधी चालून येणार आहे. कारण अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते.
ही बा.सी. मर्ढेकरांची कविता तुला नेहमी 'प्रेरणा' देत राहील.
पुढच्या भावी आयुष्यासाठी तुला शुभेच्छा.....धन्यवाद.
Monday, 9 December 2024
चांदणं
एखाद्या चांदण्या रात्री घरातून बाहेर पडायला मिळणे असे म्हणणे मुंबई सारख्या ठिकाणी हास्यास्पद ठरेल. तेथे समुद्र गर्जत राहतो लाटा किनाऱ्यावर येवून काही तरी सांगण्यासाठी आक्रोश करून आदळत राहतात परंतु तेथे कोणी कोणाची दाखल घेत नाही. परंतु हा दुर्मिळ योग, मी जेंव्हा वैशाख महिन्यात गावी जातो त्यावेळेस काळया आभाळाचे आणि अनेक चांदण्या रात्रीचे सौंदर्य मी अनेकदा माझ्या काकांच्या मातीच्या घराच्या धाब्यावर झोपताना अनुभवली आहे. तसेच चांदण्या रात्रीत शेतात राखण करण्यासाठी मी त्यांच्या बरोबर जात असे. शेत माळ्यावर खाटेवर झोपताना आभाळभर अथांग चांदण्याच्या लाह्या आकाशात विखुरलेल्या दिसायच्या. एव्हढ्या असंख्य चांदण्या आल्या तरी कोठून आणि दिवसा कुठे गायब होतात याचं गणित मला कधीच उलगडलं नव्हतं. कधी कधी शेतातून परस्पर शेजारच्या बाजारपेठेच्या गावी तमाशा बघण्यासाठी सुद्धा आम्ही बैलगाडी जुंपून जात असू. अशा बऱ्याच चांदण्या रात्रिंच्या आठवणी आयुष्याच्या गाभाऱ्यात निपचित पडल्या आहेत. त्यांना कोणतेही उपमा अलंकार देण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. परंतु हे शिंपले जेंव्हा उफाळून वर येतात तेंव्हा ते अनुभवतांना कुसुमाग्रजांची कविता गुदगुल्या करते. काढ सखे गळ्यातील तुझे चांद्ण्याचे हात क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दुत.
अचानक झोपेतून जाग आली. रात्रीचे तीन वाजलेत. मी अमृतसर एक्स्प्रेस ने प्रवास करत होतो. खिडकी उघडली. थंडगार वाऱ्याची झुळूक चेहऱ्याला अलगद स्पर्शून जात होती. तोच चांदण्याचा शुभ्र प्रकाश चौफेर उधळला जात होता. खुल्या आभाळाची विशाल चंदेरी चादर जमीवर अंथरली जात होती. ट्रेन डोंगराला चकवा देत मार्ग परिक्रमण करीत होती. चंद्र साक्षीला होता. कधी डोंगर आडून कधी दाट झाडीतून माझ्या संगतीला होता. त्याच्या किरणांनी सारा आसमंत लखलखाट झाला होता. ही रात्र आणि प्रवास संपूच नये अशा वेड्या मनाची समजूत कोण काढणार. सकाळचे साडेचार वाजलेत तरी ट्रेनला रात्रीच्या चांदण्यातून सुसाट धावण्याचा मोह आवरत नव्हता. मघापासून अखंड धावल्याने चंद्रही थकला होता. मी त्याचा निरोप घेण्याच्या तयारीत असताना त्या रमणीय पहाटे मी पाचच्या सुमारास चाळीसगांव प्लॅटफॉर्म वर उतरलो. विनंती वरून मला अक्कलकुआ एस टी बस कंडक्टरने खडकी फाटा स्टॉपवर उतरवून दिले. दीड मैल मला पायी चालावे लागणार होते. गावाकडची ती पहाटेची नवलाई अनुभवल्यानंतर येथे परमेश्वर निसर्गात भरलेला आहे याची खात्री पटली. काही वेळाने मी माझ्या धामणगांवी पोहचणार होतो. माझ्या मनातले आनंदाचे दवबिंदू विरघळलेत. कारण आता आई तेथे नव्हती. ती खूप खूप दूर सात समुद्राच्या पलीकडे निघून गेली होती कधी न वापस येण्यासाठी. अजून एक आशेचा किरण मला उत्साहित करत होता. लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांनी मला प्रचंड माया लावली ते माझे काका अजून आहेत. आणि अजून त्याच मातीच्या भिंतीच्या धाब्याच्या घरात राहतात. ते समोर दिसताच त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला सोडून बसावे आणि त्यांची टोपी डोक्यावरचे केस विस्कटून वस्कटून ओरबाडून घ्यावेत. अजून त्यांच्याबरोबर हातात कंदील आणि काठी घेवून शेतावर जावे. शेंगा भाजून खाव्यात, मोटेवर बसून गाणी ऐकावेत. चांदण्यात गवत कापून बैलांना टाकावे. हे बालपणीच चित्र नेहमी नेहमी आयुष्यात डोकावत राहतं.
Subscribe to:
Posts (Atom)