Sunday 22 April 2018

गुलाब ताजे फुलतात कसे

निवृत्तीनंतर फेकून दिलेलं इंजिन जास्तच काळवंडून गेलं. त्याचा रंग निघून पत्र्यांना गंज चढायला लागला होता. आपल्या हाताला इजा होईल म्हणून कोणी त्या गंजलेल्या पत्र्यांना हात लावायला देखील तयार होईना. अशी काहीशी अवस्था आपली देखील होत असते. तशी माझी काही प्रमाणात  झाली होती. अशा परिस्थितीत प्रवासाची कुठे संधी मिळते का, कधी घराच्या बाहेर पडायला मिळेल म्हणून कुठूल्या तरी आमंत्रणाची मन तन्मयतेने वाट बघत असतं. नारळाच्या झाडावरील नारळ केंव्हा खाली पडेल सांगता येत नाही. कधी कधी तुम्ही पाठमोरं झाल्या झाल्या धपकन आवाज येतो तसं, आणि काय म्हणता,  19 एप्रिलला माझ्या गांवी धामाणगांवी जाण्याचा योग चालून आला कारण 20 तारखेचं लग्न अटेंड करायचं होतं. म्हणून मी गुढघ्याला बाशिंग बांधून पुणे भुसावळ ट्रेनचं सिनिअर सिटीझन च्या सवलतीत कल्याण ते चाळीसगांव रिसर्व्हेशन देखील केलं. डोंबिवलीहून भर उन्हातान्हात घरून अडीच वाजता निघालो. अर्धा तास कल्याण स्टेशनवर अगोदरच पोहचलो.  सव्वातीन ला येणारी ट्रेन "बिस मिनीटसे देरीसे चल रही हैं" ची आकाशवाणी झाली ! आणि आली चक्क चाळीस मिनिटांनी. दुःख सांगायचं कोणाला !  एक तर सवलतीत प्रवास करतोय. 'तेरी भी चूप मेरी भी चूप'. कोंबडा बिचारा सकाळी सकाळी अरवण्याचं काम करून मानव जातीवर प्रचंड उपकार करतो, पण त्याला उदंड आयुष्य लाभो असा कोणीही आशीर्वाद देत नाही. परंतु गाडी अर्धा तास काय दोन तास जरी लेट झाली तरी तिचं तोंड भरून कौतुक करून  बिचारे पॅसेंजर सुखासमाधानाने  प्रवास करत असतात. खरी गंमत तर अजून पुढेच आहे. माझं रिझर्वेशन असून सुद्धा माझ्या जागेवर बसलेल्या माणसाला उठवण्यासाठी मला त्याचे पाय धरावे लागले. दुसरं काय "ये मेरा इंडिया हैं" बरं हे चालायचंच ! आपण दुसऱ्याला समजून घ्यायचं असतं. बरं किती समजून घ्यायचं त्याचंही काही मोजमाप नाही. वाशिंद रेल्वे स्टेशनवर आमची आगगाडी चक्क साईडला टाकून दिली. उपनगरीय लोकल पुढे काढण्यात आली. मनाचा थोडा जळफळाटच झाला. ही कसली पद्धत आहे बाबा रेल्वेची. अजून पंधरा मिनिटे गेलीत आणि चक्क मागची सेवाग्राम एक्सप्रेस पुढे काढण्यात आली. अजून पंधरा मिनिटांनी दुसरी कोणतीतरी गाडी पास झाली. आता मनाचा ताबा सुटून रेल्वे अधिकाऱ्यांवर  माझ्या तोंडून आगपाखड सुरु झाली होती. खरं म्हणजे या संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारून चौकशी व्हायलाच पाहिजे. पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण. हेच आपलं चुकतं. माझा तिळपापड झालेला बघून समोरच्या बेंचवर बसलेली ताई मला म्हणालीच. बाबा जाऊद्याना, तुमची कुठं तान्हुली लेकरं वाट बघताहेत, घ्या काकडी खावा. खूप थंड असते.  माझ्या चेहऱ्यावरच्या कळ्या खुलून, लुप्त झालेल्या हसऱ्या पेशी गालावरच्या खळीत सामावल्या. प्रत्येक जण एन्जॉय करत होते. गाडी एवढी लेट झाली तरी सर्व पॅसेंजर शांत आणि आनंदित कसे. कोणताही राग रोष टीका टिपण्या नव्हत्या. किती सहिष्णुता, सर्जनशीलता आणि सहनशीलता आहे या लोकांच्या मर्यादेत. गुलाब ताजे फुलतात तरी कसे याचं उत्तर मिळालं होतं मला. किरकोळ विक्रेते, चायवाले चालत्या गाडीत फेऱ्या मारत होते. परंतु अंधाऱ्या रात्री मला फाट्यावरून चालत धामणगांवी चालत जावं लागणार होतं. त्या भागात बिबट्याचा वावर आहे असं ऐकायला मिळालं होतं. म्हणून घबराहट जाणवत होती. अगोदरच दीड तास लेट झालेली गाडी आता कसारा घाटात धावत होती. आणि तेवढ्यात तिशीतल्या तरुण मुलीने गाडीची चेन खेचली. झालाना दुष्काळात तेरावा महीना. माझ्या तोंडून सहज उद्गार बाहेर पडलेत. एका मिनिटात गाडी जागेवरच थांबली. बरेच पॅसेंजर खाली उतरले. आता पंचनामा होऊन अर्धा तास तरी जाणार अशी खात्री झाली. त्या मुलीचा खिडकीतून मोबाईल पडला म्हणून तिने चेन खेचली होती. ही बातमी वाऱ्यासारखी पोहचली.  गाडी लेट होण्यासाठी होत्या नव्हत्या साऱ्या पॉसीबल गोष्टी आजच घडत होत्या. बहुतेक नियतीचाच हा खेळ असावा. म्हणून शांत राहणेच योग्य होते. केअर टेकर आला आणि निघून गेला. त्या मुलीची कोणतीही चौकशी अथवा दंड तिला झाला नाही. गाडी लवकरच चालू झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागला. मला घेण्यासाठी सुद्धा माझा पुतण्या आला होता आणि मी रात्री अकराच्या सुमारास सुखरूप घरी पोहोचलो. माणसाने संयम शील  असावं, आणि विपरीत परिस्थितीत आयुष्याचा आनंद लुटावा. गुलाब ताजे आपोआपच  फुलतात.
 

 

Tuesday 3 April 2018

खजुराहो





एकेक दगड नी, एकेक कोपरा

शिल्प सौंदर्यानं व्यापून गेला

केवळ "अप्रतिम" या शब्दाचा जन्म

इथेची झाला.

वेगवेगळ्या कोनातून विविध रूपं

आपल्याशी बोलतात

खजुराहोच्या विश्वात शिरतांना

अंगावर रोमांच उभे राहतात

Sunday 1 April 2018

एप्रिल नांवाच फूल


जगात लोकांना मूर्ख बनविणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यांचा सर्वे करता येत नाही म्हणून बरं ! नाहीतर त्या आकडेवारीत कदाचित तुमची आमची ही गणना झाली असती. दुसरी गोष्ट म्हणजे मूर्ख बनविणाऱ्यांच्या दुधात साखर आणून सोडली आहे ती वर्षातून एकदा येणाऱ्या एक एप्रिलने. परंतु खरं सांगायचं म्हणजे एक एप्रिल हा सुज्ञांनी सुज्ञ लोकांना मूरख बनविण्याचा दिवस आहे. पूर्वी न्युज पेपरवाले सुध्दा मोठमोठ्या सिलेब्रिटींचे एप्रिल फूलच्या नांवाखाली लग्न लावून देत असत आणि आम्ही मोठ्या कौतुकाने आणि आश्चर्यचकित नजरेने दोन दोन वेळा तो पेपर वाचत असू. परंतु वर्षातून एक दिवस का होईना आयष्यभर मूर्ख बनविण्याचा पेशा करणार्यांना एक दिवस सज्जनतेची गुढी ऊभारता येते असो.

गोष्ट अशी आहे की, एप्रिलफूल नाही हो ! मनापासून खरं सांगतो. माझ्या मुलीचा मुलगा सोनू याचा बर्थडे दिवस सुद्धा एक एप्रिलच आहे. आता आली की पंचाईत ! त्याला कळायला लागल्यापासून जेंव्हा शाळेत त्याने बर्थडेच्या दिवशी चॉकलेट्स वाटले त्यावेळेस हा सोनू आपल्याला एप्रिल फूल बनवितो आहे अशी सर्व स्टुडंटची खात्री झाली होती. मग शेवटी शाळेच्या बाईंनी आपलं  कौशल्य वापरून हा तिढा सोडविला म्हणे. असेल कदाचित. परंतु दर वर्षी त्याच्या आई वडीलांना कमी अधिक प्रमाणात लोंकाची, नविन रिश्तेदारांची समजूत काढावीच लागते.

पण एक एप्रिलफूल ने असं काही बस्तान बसवलं आहे की सकाळी सकाळी कोणतीही बातमी खरी वाटच नाही. 31 तारखेला नोकरीची ऑर्डर हातात पडल्या पडल्या विश्वास दुसरया दिवशी शेजारीण काकूंना नोकरी मिळाल्याची खबरबात देतो तेंव्हा निमा काकूंना खर वाटेल तेंव्हा ना ! आज एक एप्रिल आहे ना, दिवसभर पोरींच्या मागे हुंदडत असतो, अन म्हणे नोकरी ची ऑर्डर मिळाली त्याला !! असे कॉमेंट्स सहज ऐकायला मिळतात.

तसच आज मला एके ठिकाणचं साखरपुड्याचं आमंत्रण मिळालं आणि माझ्या मनात पाल चुकचुकलीच. आमंत्रण देणारे मुलाचे वडीलच, प्रतिष्ठित माझे नातेवाईक होते म्हणून बरं नाही तर माझाही गोंधळ उडाला असता.

तसं बरं झालं महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती एक एप्रिलला केली नाही म्हणून ठीक, म्हणून विरोधकांना भांडता तरी येतं. यांच्यातली खरी गोम म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती ही एप्रिल फूल होती का अशी शंका आता घर करू लागली आहे.

आपण किती तरी अनावश्यक असे पाश्चात्य देशांचे डेज मोठ्या अनंदाने साजरे करतो आणि आपल्याच भाद्रपद महिन्यावर टीकास्त्र सोडत असतो.