Tuesday 29 October 2019

आपडी थापडी गुळाची पापडी

दुष्काळ कोरडा असो किंवा ओला, दोन्ही बाजुंनी शेतकऱ्याचच अमर्याद नुकसान होतं, तरी तो जनतेसाठी काबाड कष्ट करून साखर पिकविल्याशिवाय राहत नाही, मात्र दारू तयार करणाऱ्या कारखान्याला टाळं लागलेलं आपण कधी पाहिलं नसेल हे आश्चर्यच आहे !  म्हणतात ना दूध द्यायला गवळी घरी येतो पण मद्य प्यायला लोकं अड्ड्यावरच जातात. ह्या काही म्हणी नाहीत, तर हे निर्विवाद सत्य आहे.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी काही पक्षाचे नेते जिभेला लगाम न देता, स्मशान भूमीला तोरण बांधून सजविण्याचे काम प्रामाणिकपणे करतांना दिसत आहेत. त्यांना वांग्याची मॅगी आवडते, का पापड दुधात बुडवून खायचा, हा ज्याचा त्यांचा प्रश्न आहे. आपण व्होटींग केलं ना ! बस, आता त्यांनी आपल्याकडे आपल्यासाठी एवढंच बाकी ठेवलं आहे, आपडी थापडी गुळाची पापडी !

1994 मध्ये यूएन च्या अधिवेशनात जेंव्हा पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व विरोधी पक्ष नेता अटलबिहारी वाजपेयीं यांच्याकडे सोपविले होते, तेंव्हा  विरोधी पक्ष नेता या भूमिकेतून वाजपेयींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते, ते शब्द अजूनही आठवतात "पाकिस्तानके बैगैर हिंदुस्थान अधुरा है" परंतु आताचा आपला भारतीय विरोधी पक्ष फक्त एक नमुनाच आहे,  काश्मीर वर नाही ते बेताल वक्तव्य करून पाकिस्तानला आतंरराष्ट्रीय पातळीवर एक खाद्य तयार करून देवून मदत करत असतो.  कंहा राजभोज और कंहा गंगू तेली हे काही खोटं नाही. गेलेला मनुष्य वापस येणार नाही हे माहीत असून सुद्धा स्मशान भूमीला कुंपण बांधण्याची उठाठेव विरोधी पक्षातले रोज कोणिना कोणी रोजंदारी प्रमाणे करतो आहे हे आपल्या देशाचे आणि जनतेचं दुर्दैव आहे.


ट्रेन मध्ये एक भिकारी गुणगुणत चालला होता, मेरे देश की धरती, सोना उगले, उगले .....आणि दुसऱ्या बाजूला खिडकी जवळ आई आणि वडिलांच्या मांडीवर बसून दोन भावंडांचा खेळ रंगात आला होता, आपडी थापडी गुळाची पापडी ! आपडी थापडी गुळाची पापडी !!