Sunday 22 August 2021

रक्षाबंधन

हॅलो बापू,

आज रक्षा बंधन आहे. तू पुण्याला आला आहेस का, निर्मलाकडे कासारवाडीला आला आहे का ? "नाही गं, मी इंद्रायणीने येत आहे, अकरा ते साडे अकराच्या सुमारास तुझ्याकडे पोहचतो आहे. तुझ्याकडे आल्यानंतर मी कासारवाडीला निर्मलाकडे जाईन. पण नऊ वाजले, दहा वाजले अजून पर्यंत तिचा फोन आलाच नाही !

आज पाच दिवस झालेत, ती आमच्यातून निघून गेली, तिला जगण्याची खूप इच्छा होती, 2019 मध्ये तिचे मेजर बायपास झाले होते, डॉक्टरांनी सुद्धा नाही सांगून दिले होते परंतु प्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर तिने मात केली होती, मी देवाचे आभार मानले की त्याने माझ्या बहिणीला सही सलामत वापस पाठवून दिले होते, नंतर कोविडच्या दीर्घ काळात तीला कधीही ऍडमिट करायची वेळ आली नव्हती, देव तिच्या पाठीमागे उभा होता जणू. पण देवाने यावेळेस हाथ वर करून दिले. मी देवाला दोष देत नाही. देवाने तिला भरपूर आयुष्य दिले, तिच्या मुलासाठी आणि तिच्या मुलींसाठी जगण्याचं तिला सामर्थ्य दिले होते. वायसीएम हॉस्पिटलला ती व्हेंटिलेटर वर होती, डॉक्टरांनी सुद्धा पोझिशन क्रिटिकल आहे असे सांगितले. आमची चांगली समजूत झाली होती की आता बहिणीला एखादा चमत्कारच वाचवू शकेल! आणि काय सांगू.....पुन्हा ती प्रबळ शक्तीच्या सामर्थ्याने ती वापस आली. वायसीएमचे डॉक्टर कनोज सरांचे मी आभार मानले, माझे आनंद अश्रू मी त्यांच्या नजरेआड करू शकलो नाही. आणि त्यांनी सांगितले की थांबा परिस्थिती कधी गरम कधी नरम होवू शकते. तिचे किडनी फंक्शन आणि श्वसन क्रिया संस्था चांगल्या पद्धतीने काम करत नाहीत. परंतु बहीण चांगली बोलायला आणि ओळखायला लागली होती. माझी बहिण निर्मला आणि माझे तिच्यावर बारीक लक्ष होते. डॉक्टरांचा फोन आल्याबरोबर निर्मला हजर राहत होती, तिचा मुलगा प्रवीण (सचिन) हा कायम तिच्या आसपास राहून काळजी घेत होता. अमेरिकेत असलेल्या तिची मुलगी सोनी कॅन्टीन्यू संपर्कात होती. सर्व इथंभूत माहिती तिला पुरविली जात होती. तिला खूप काळजी होती पण ती खूप लांब होती. पण नियती आपले पत्ते शेवटपर्यंत उघडे करत नाही याचा थांगपत्ता आम्हाला लागला नाही. 

नंतर तिला आदित्य बिर्ला चिंचवड येथे तिला हलविण्यात आले. तत्पूर्वी अम्ब्युलन्स मध्ये तिने आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीशी व्हिडियो कॉल द्वारे संपर्क साधला. तीने आपल्या नातीशी देखील हितगुज केले. प्रविणला डॉक्टरानी बोलवून घेतले आणि परत तेच डायलॉग सांगितले की सीचव्हेशन क्रिटिकल आहे. प्रवीण आम्हाला वारंवार रिपीटेडली सांगत होता, आई वायसीम मध्ये पण क्रिटिकल होती आणि वापस आली होती, आणि आता इथेही क्रिटिकल आहे, इथेही वापस येईल. आणि तिला काही होणार नाही. तुम्ही उगीच घाबरू नका. जगाच्या पाठीवर कोणत्याही मुलाला असेच वाटते की आई मुलाला कधीच सोडून जावू शकत नाही. प्रवीण ची आईबद्दलची भोळी भाबडी समजूत कशी आणि कोण काढणार !

आणि मला त्या दिवशी डॉक्टरांचा सकाळी सकाळी फोन आला आणि मी थक्कच झालो, त्यांनी सांगितले की तुमचा पेशंट शशिकला जाधव यांचे हृदय बंद पडले होते, ते चालू करण्यात आले आहे आणि आता ती व्हेंटिलेटरवर आहे. मी त्यावेळेस मुंबई येथे आलो होतो, मी लगेच प्रविणला कळविले आणि आदित्य बिर्ला येथे जाण्यास सांगितले. निर्मला पण जाऊन आली. परिस्थिती नाजूक अवस्थेत होती. मी पु ण्याला पोहचलो आणि एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेतला, दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी मला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि हॉस्पिटलमध्येच थांबायला सांगितले. प्रविणला फोन करून मी बोलवून घेतले आणि त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला. बहिणीचा आयुष्याचा पलीकडचा किनारा दिसत होता. आणि देवाने काही तासांसाठी का होईना तिच्या पाठीमागे उभे राहायचे ठरविले होते. प्रवीण आईला भेण्यासाठी ICU मध्ये गेला खरा ! परंतु ..... परंतु डॉक्टरानी सांगितले तुमचं पेशंट शशिकला जाधव राहिल्या नाहीत. प्रविणला तेथेच रडू कोसळले. सर्वच संपले होते. सर्विकडे वाऱ्यासारखी बातमी पोहचली देखील. मामा हे असं कसं झालं ?, त्याने विचारलेल्या प्रश्नाचे मी उत्तर देऊ शकलो नाही. पाऊण तासानंतर पुढच्या हालचाली संबंधी डॉक्टरांना विचारण्यासाठी मी ICU मध्ये पोहचलो. आणि शशिकला जीवित असल्याचे त्यांनी सांगितले. देव असा कसा काय वागतोय हेच काही कळेना, दुःखाचा आघात कमजोर करण्यासाठी त्याने ही खेळी केली तर नसेन ! प्रवीणचं मन आनंदाने काठोकाठ भरून आलं आणि त्याने सांगितले आईला काहीच होणार नाही. हेच ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल की जेथे 2019 मध्ये तिचं मेजर बायपास ऑपरेशन झालं होतं.

आमच्या मनाने पुन्हा एकदा झेप घेतली, आता ती जात नाही, तिचं संकट टळलंय !  आणि हो, पाच तासानंतर जे व्हायचं नव्हतं तेच झालं, देवाने दुःखाची त्रिव्रता कमी करून टाकली होती, आणि आम्ही ते स्वीकारलं होतं. आणि आम्ही ते स्वीकारलं होतं.

आयुष्याच्या अनेक चढ उतारांवर मी तिच्या सोबत होतो आणि एक दिवस तिला जायचं होतं. पुढच्या जन्मी फिरून जन्मेन मी तुला राखी बांधण्यासाठी पुन्हा येईन मी. 

परंतु नेहमी प्रमाणे येणारा तिचा फोन आज रक्षाबंधनाच्या दिवशी आलाच नाही !



Monday 22 February 2021

बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा, तृण रानोमाळ पांगतसे

वाळू जर गाढवाने पाठीवरून वाहून नेली आणि ती पोलिसांनी अडविली तर फार फार तर काय होईल, वाळू जप्त होईल परंतु गाढवाच्या केसालाही ते धक्का लावू शकत नाही. हे गाढवाच्या मालकाला पुरेपूर माहीत असते. आपण जर का राजकारणात डोकावून बघितले तर आपल्या लक्षात येईल की असे बरेच गाढव वाळूच्या गोण्या वाहत असतात.

हम दो हमारे दो हे कुटुंबनियोजनाचं ब्रीद वाक्य संसदेत राहुल गांधींच्या तोंडी अवतरलं आणि त्याची तुलना मोदी-अमित शहा आणि अंबानी-अदानी यांच्याशी अप्रत्यक्षपणे करून संसदेत बजेट वर भाष्य न करता एक प्रकारे धुमाकूळच घातला. असाच एकदा म्हणजे 2019 मध्ये चौकीदार चोर है असा धोशा राहुल गांधींनी लावला होता आणि त्याच्या अनुयायी जोरजोरात ढोलताशे बडवीत होते. झालं काय तर चौकीदार चोर है असा धोशा लावणाऱ्या काँग्रेस पक्षाला जनतेने धोबी पछाड दिली होती.

चवताळलेल्या वाघाप्रमाणे राहुल गांधींनी आता नवीन घोषणा बाजारात आणली आहे "हम दो हमारे दो" श्री बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांना एक "नर्व्हस छात्र" असे त्यांच्या पुस्तकात संबोधले होते, राहुल गांधी जणु ते त्याचीच प्रचिती देत आहेत. हम दो हमारे दो म्हणजे 2+2 =4 बहुतेक जनता त्यांची इच्छा पूर्ण ही करेल परंतु आपलं अस्तित्व नाहीसं होत चाललयं याच अजिबात भय या पक्षाला वाटत नाही. 

11 फेब्रुवारी 2021 रोजी  संसदेत राहुल गांधी यांनी कुंटुंब नियोजनाचं या ब्रीदवाक्याचा विचित्र अर्थ लावून आपले भाषण भलत्याच पातळीवर नेवून ठेवले, यांच्यात कोणाची कितपत बुद्धिमत्ता आहे हा संशोधनाचा विषय जरी असला तरी त्यांच्या मागे जी टीम आहे ती सुद्धा दिशाभूल करणारी आहे असे दिसते. शेवटी कोणाला जाणून बुजून बदनाम करण्याचा संकल्प केला तरी सत्य हे सत्यच असतं. परंतु संसदेत विरोधकांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्वाची असते जेवढी सत्ताधाऱ्यांची असते. उजव्या हाता इतकाच डावा हात देखील महत्वाचा असतो. डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्यांनी सुद्धा त्रि शतके काढली आहेत. परंतु आपले विरोधक या संधीचा फायदा घेत नाहीत आणि जनतेला संभ्रमात टाकण्यात ते कोणतीही कसूर बाकी ठेवत नाहीत.

Sunday 7 February 2021

भरीत भाकरी आणि ठेचा

शीतचंद्रलोक मध्ये वार्षिक श्रीसत्यनारायनाची पूजा आटोपल्यानंतर वेध लागतात ते शेकोटी अर्थातच भरीत भाकरीच्या पार्टीचं. वांग्याचं भरीत आणि ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर त्याचा फडशा पाडण्यासाठी आपली जीभ आसुसलेली असते आणि तो आपल्या जिभेवर येईपर्यंत जीव नुसता कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. म्हणून कालच्या दिवशी सोसायटीत शीतचंद्रलोक सख्यांनी बनविलेली भरीत पार्टी कशी झाली याच्याबद्दल काल कोणी चकार शब्द ही काढला नाही. त्याचं सस्पेन्स उलगडण्या अगोदर आपलं लक्ष वेधू इच्छितो की कोरोना काळात आपल्या ईथेच नव्हे तर संपूर्ण जगभरात कार्यक्रम बंद पडलेल्या अवस्थेत असतांना आपल्या सोसायटीतील महिला वर्गाने दरवर्षी नियमित येणाऱ्या भरीत भाकरीच्या पार्टीला खंड पडू दिला नाही त्यामुळे त्यांचे कोणत्या शब्दात कौतुक करावे हे तुम्हीच सुचवा. दुसरी गोष्ट म्हणजे कल्याणला जावून भाजीपाला आणण्यापासून, सकाळी पाण्याने स्टेज साफ कारण्यापासून ते भाजी चिरणे, निवडणे, लसूण, मिरच्या, शेंगदाणे कुटण्यापासून ते ठेचण्यापर्यंत,  बेसन भाकरी भरीत भात आणि चूल मांडून भाकऱ्या रांधण्यापर्यंत आणि ते पण हे मंडळ अजिबात न थकता रात्री साडे अकरा पर्यंत हा व्याप चालू होता ! श्रीयुत पोंक्षे साहेबांनी टाकलेली एक क्लिप बघितली, तर हे सर्व जण आपापली कामे करण्यात व्यस्त दिसत आहेत. कसलीही मिटिंग नाही, कोणताही कॉम्पुटयाराईज्ड प्रिप्लॅन नाही आणि कुठलाही गाजावाजा न करता सर्व काही व्यवस्थित पार पडलं आणि चक्क रात्री साडेआठ पर्यंत पहिला जेवणाचा मान पुरुष मंडळीला दिला. आणि शेवटी जे काही शिल्लक राहील त्याच्यात त्यांनी आपले जेवणे उरकलीत. हा एवढा आदरतिथ्य आणि मनाचा मोठेपणा जगाच्या पाठीवर केवळ आणि केवळ भारतीय स्त्री संस्कृतीतच आढळतो. कौतुकाची अपेक्षाही न बाळगणाऱ्या या स्त्री संस्कृतीच्या मागे असं कोणतं सूत्र लपलेलं असतं की ते सस्पेन्स पुरुष जातीच्या मानवाला अजूनपर्यंत कळलेलं नाही हे एक आश्चर्यच आहे. म्हणून शीतचंद्रलोक सख्यांच्या विनम्रशील स्त्री सर्जनशीलतेच्या या कर्तुत्वाला प्रथम मानाचा मुजरा.



काल आपल्या येथे शीतचंद्रलोकसख्या यांच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी अगदी शाळेतल्या मुलांसारखी जशी गणवेश परिधान करून, हातात कुपन धरून लायनीत शिस्तीने उभे राहून, कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं की रायबाचं अशा ऐटीत सोसायटीतील पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना, सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं होतं. शीतचंद्रलोकच्या पाणवठ्याखाली आपल्याच डोळ्यासमोर रुजलेल्या त्या लहान बिया आता तरुण, मोठी आणि समजदार झाली होती, ती आपल्याच धुंदीत व्यस्त आणि मस्त होती, बरीच सिनियर मंडळी काही  निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेली आणि काही उंबरठा ओलांडलेली एकमेकांची विचारपूस करत होती. गेस्ट मंडळी सुद्धा अवाक झाली होती. कधी काळी शीतचंद्रलोकला लाभलेल्या भव्य पटांगणाच्या उजाड माडावर आता भव्य दिव्य आलिशान चार चाकी उभ्या दिसत होत्या. काळ बदलला तरी या समृद्धीच्या वाटचाली मागे शीतचंद्रलोक संख्यानी आपला वसा जपलेला होता. काही ठिकाणी कुजबुज चालली होती, तर काहींनी चक्क जमिनीवरच मांडी घालून जेवण करणे पसंत केले होते. बेसन, भरीत, भाकरी, ठेचा, कांदा, निंबु, आणि वरून जिलेबी, आणि एक विसरलोच शेवटी आईस्क्रीम कुल्फी सुद्धा आणि बापरे ते पण फक्त पन्नास रुपयात ! जेवणाची लज्जत एव्हढी भारी आणि चविष्ट होती की खाणारा दाद द्यायलाच विसरून गेला हो ! पाय कोणाचा तेथून निघत नव्हता. फोटोशेशन जोरात चालू होतं. जणु पावलो पावली आपलेपणाच्या खुणा दिसत होत्या. अजून ही तोच जोश आणि उत्साह जाणवत होता. म्हणून मी परत त्याच ठिकाणी येतो. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.