रेशीम धागे
गुरुवार, १२ जून, २०२५
विद्रोही साहित्य संमेलन
विद्रोह या शब्दाचा अर्थ सर्वसाधारण सर्वांनाच माहीत आहे. अजून थोडे खोलात गेले तर विद्रोह या शब्दाचा हिंदी अर्थ बगावत, प्रतिरोध, सत्ताके खिलाप तर मराठी मध्ये या शब्दाचा अर्थ बंड, उठाव, उद्रेक असे अनेक शब्द मिळतात. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात आयोजित करण्यात आले आहे. आणि यंदाचे विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा साताऱ्यामध्येच भरविले जात आहे अशी बातमी वाचली. हा काही योगायोग आहे असे म्हणता येणार नाही. सर्व सामान्य आम जनतेसाठी खुले असलेले अखिल भारतीय साहित्य संमेलनात सर्वस्तरीय भरगच्च कार्यक्रमाची नांदी असतांना विद्रोही साहित्य संमेलनाची काय गरज पडली असावी बरे ! दोन्ही संमेलनामध्ये काय मूलभूत फरक असेल, अखिल भारतीय साहित्य संमेलन असो किंवा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संमेलन असो, या मध्ये जाणून बुजून कोणी कोणाविरुद्ध आखाड्यात दंड थोपटून उभा नाही आहे मग दोन्ही साहित्य संमेलने एकाच शहरात भरविण्याचं प्रावधान काय !
विद्रोही हे नांव का बरे निवडले असावे. विद्रोह म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे वाद, फूट, बंड, उद्रेक, बगावत इत्यादी. साहित्य क्षेत्रात विद्रोह म्हणजे सर्जनशीलतेच्या आस्तिक मनाला झालेल्या वेदनाच असे म्हणता येईल. आणि या वेदनांचे मुळगाव कोणी सांगेल तर बरे होईल. दोन्ही संमेलनाच्या घटकांनी, आयोजकांनी जर एकत्र येऊन विचारविनिमय करून, सखोल चर्चा करून सहमतीने एकाच व्यासपीठावर, एकाच तंबूमध्ये मराठी भाषेचे एकच साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले तर दुधात साखर पडण्यासारखे होईल. साताऱ्यात या वर्षी भरणारे हे १५ वे विद्रोही साहित्य संमेलन आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यातील सर्व भाषिय लोक, कार्यक्रम, रूढी, रिवाज, सांस्कृतिक कार्यक्रम, आणि सार्वजनिक संमेलने चांगल्या परंपराप्रमाणे, गुण्या गोविंदाने पार पडतात. मग मराठी भाषेच्या साहित्य संमेलनामध्येच विद्रोह का ?
एक भाषा आणि एकच मराठी साहित्य संमेलन असावे असे आपल्या भाबड्या मनाला वाटत राहते . पण आपल्याकडे जेष्ठ विचारवंत, कवी, लेखक, समाजसुधारक, पंडित आहेत, त्यांना सुद्धा असले प्रश्न पडत असतील!
शुक्रवार, १६ मे, २०२५
आहे मनोहर तरी....सुंदर माझे गांव
धुळे चाळीसगांव हाय वे आणि चाळीसगांव धुळे रेल्वे चा आवाज झोपेत कानापर्यंत ऐकू जाईल एवढ्या अंतरावर वसलेले माझे गांव धामणगांव तालुका चाळीसगांव. शहरापासून धामणगांवपर्यंत डांबरी पक्की सडक , आता तर शिदवाडी आणि करमुड पर्यंत त्याचा विस्तार झाला आहे. आणि हे पण खरे आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे उलटली आहेत. तरी आपलं धामणगांव एसटीच्या नियमित सोईपासून वंचितच आहे. कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी एक बस येते. परंतु सुटी च्या दिवशी आणि उन्हाळ्याच्या सुटीत तसेच पावसाळ्यात ही बस बंद असते. आहे की नाही अफलातून आश्चर्य. येथील मतदार मतदान करून मुकाट्याने हा त्रास प्रामाणिकपणे सहन करत असतो. गांवातील लोकांना पायपीट करत खडकीसीम फाट्यावर जावे आणि यावे लागते. पायपीट करण्यासाठी सरकार पक्के रोड बांधून देते मात्र एसटीची सोय करू शकत नाही हे एक दुसरं मोठं आश्चर्य आहे. मी सुद्धा आता सत्तरी ओलांडली आहे. जेंव्हा चाळीसगाव डेपोमध्ये चौकशी काउंटरला हा प्रश्न विचारला की धामणगांवाला एसटी ची सोय का नाही. तेंव्हा त्याने काय उत्तर दिले माहीत आहे! धामणगांवचे लोक एसटीतून प्रवास करत नाहीत. स्वातंत्र्याच्या अमृत वर्षकालीन देशात अशी उत्तरे आणि कर्तव्य हीन नेतृत्व असलेली पुढारी असतील तर धामणगावातील सामान्य व्यक्तीने कुठे दाद मागावी ! बरं आपल्या गावांत अशा सामान्य जणांना असे प्रश्न देखील पडत नाहीत कारण धामणगावांतून प्रवासासाठी त्यांना वेदना सहन करण्याची सवय पडलेली आहे. आणि हेच खरे जीवन समजून सामान्य लोकांचा दिनक्रम चालला आहे.
ट्रॅक्टरच्या मागील पाण्याच्या टँकरचा आसरा घेवून जीव मुठीत घेऊन प्रवास करतांनाचे बोलके चित्र आपले सहज लक्ष वेधून घेईल.
आजकाल पालक मंत्री असो किंवा जिल्हास्तरीय पक्षीय पुढारी असो, त्यांच्या कडूनन बऱ्याच लोककल्याणपयोगी उपक्रम राबविले जात असतात, व्हॉट्सॲप च्या माध्यमातून अशा उपक्रमांचा खूप गाजावाजा चालतो. गावोगावी नाक्यावर पुढाऱ्यांचे बरेच बॅनर सुद्धा सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी कायम स्वरूपाचे लावलेले आढळतात. आपल्या गावासाठी, सर्वसामान्य लोकांसाठी एसटी ची कायम स्वरूपाची सोय असावी असे कोणाला का वाटत नाही. Own vehicle is the best हे जरी खरे असले तरी गावातील सर्वसामान्य स्वतःचे वाहन नाही विकत घेऊ शकत, गावात येणारे सर्वच पाहुणे रावळे स्वतःची किंवा स्पेशियल गाडीची सोय नाही करू शकणार ती मंडळी ?
( उन्मेश दादाना लिहिलेले पत्र 24.01.2019
श्री उन्मेश दादा पाटील
सस्नेह नमस्कार
सर आपले पत्र मिळाले, आपण तुरंत विस्तृत रिस्पॉन्स दिला, हे कौशल्य आमच्या सारख्या साध्या माणसाला जमणे अशक्यच. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार.
सर आम्ही आपल्याकडे एक उज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षेने पाहत आहोत , पन्नास वर्षांपासून धामणगावांत एसटी ची सोय नाही. ट्रान्सपोर्ट च्या अभावी बाहेरगावचे आमचे नातेवाईक आमच्या येथे मुली सुद्धा द्यायला कचरतात. कोणत्याही कार्यक्रमाला यायचे टाळाटाळ करतात. गांवातला शेतकरी, विद्यार्थी, महिला, आप्तेष्ट यांना चाळीसगांवी जाण्यासाठी खूप कष्ट पुरतात आणि वेळ वाया जातो. ट्रान्सपोर्ट अभावी कामं ठप्प होतं. कृपया या गावकऱ्यांच्या मागणीला प्राथमिकता दिली तर आम्ही ऋणी तर राहूच, परंतु आपलं आमच्याशी एक कायम स्वरूपाचं नातं निर्माण होईल.
धन्यवाद
आनंदराव कौतिक चव्हाण
धामणगांव, तालुका चाळीसगांव.)
_____
हा सर्व खटाटोप मी एकदा २०१९ मध्ये करून पाहिला होता , त्यांच्याकडून एक उत्तर आले होते परंतु पुढे काही झाले नाही.
आताच्या घडीला हा प्रोजेक्ट जर कोणी घेतला तर त्याचे आपण ऋणी राहू.
या प्रश्नाला वाच्या फोडून त्यांच्या पर्यंत पोहचवून पाठपुरावा केला पाहिजे. नाहीतर सर्व गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घातला पाहिजे.
ज्या गावांत माझा जन्म झाला, जी माझी जन्मभूमी आहे त्या गावांची एसटी विना अशी उपेक्षा आणि फरफट बघतांना डोळे पाणावतात. आणि अजून किती दिवस!
एसटी ची सोय नसली तरी शहराला जोडणारे पक्के डांबरी रोड आहेत हे काय कमी आहे काय! काही असो , "आहे मनोहर तरी....सुंदर माझे गांव"
मंगळवार, २२ एप्रिल, २०२५
नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा
शिशिरची पानगळ संपली होती, आणि चैत्र सुरु झाला होता.निसर्गात चैत्र महिन्यात झाडांना नवीन पालवी फुटण्याची आणि ऋतू बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु आपले मित्र पराग ओवळेकर यांच्या मनात देखील असेच चैत्र पालवी सारखे एक सुंदर विचाराने घर केले होते आणि चैत्र महिन्यात त्यांनी त्याला आकार दिला सुद्धा. तो त्यांचा स्तुत्य विचार म्हणजे नर्मदा परिक्रमा.
नर्मदा परिक्रमा म्हणजे आहे तरी काय ते थोडक्यात जाणून घेऊ. नर्मदा मैया मधे सर्व देवांचा वास आहे म्हणून नर्मदा मैयाची परिक्रमा ही सर्व देवांची परिक्रमा आहे. नर्मदा मैयाच्या किनारी बळी राजा पासून तर ब्रम्हदेवापर्यंत असंख्य देव देवता, ऋषी मुनी यांनी तप केलं, आणि म्हणून नर्मदा किनारी असलेला प्रत्येक दगड हा शिवस्वरूप समजला जातो. खरे तर हे सर्व माझ्या समजण्याच्या पलीकडचे.
श्रीयुत पराग ओवळेकर चक्क नर्मदा परिक्रमा करून आले आहेत. हे जेंव्हा मला त्यांच्या कडून कळले तेंव्हा आपल्याला कोणीतरी सोनचाफ्याचे फुल आवडीने द्यावे, त्याच्या मुग्ध सुगंधाने आपण उल्हसित व्हावे आणि त्याचा नाजूक पिवळा रंग डोळे भरून पाहत रहावा पाहत रहावा ! कधी कधी माणूस अशा जागेवर पोहचतो की जिथे आजवरचा सारा फोलपणा जाणवू लागतो. कदाचित असाच क्षण पराग ओवळेकरांच्या आयुष्यात समोर उभा राहिला असेल, माता नर्मदेने त्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात दृष्टांत दिला असेल, त्यांच्या जवळीक मित्रांच्या प्रेरणेने त्यांच्यापर्यंत आदेश पोहचवला असेल. आणि इच्छा प्रबळ झाल्याशिवाय ही परिक्रमा शक्य नाही. एकदा का इच्छा प्रबळ झाली तर तेथे त्याला कोणी ही रोखू शकत नाही. असे मला त्यांच्या बोलण्यावरून जाणवले. आणि त्यांच्या पराग रूपी नर्मदेचे कवडसे मला त्यांनी व्हॉट्सॲप द्वारे पाठवून दिलेत.
ते पुढे म्हणतात ही परिक्रमा नर्मदा मातेनेच आमच्या कडून करून घेतली , एवढे सुरक्षेचे कवच तुम्हाला मिळाल्यानंतर खरंच तुम्ही भाग्यवान आहात नर्मदा परिक्रमाची अनुभूती तुम्हाला आयुष्यभर प्रेरणा देत राहतील. त्यांच्या फोनवरील discussion मध्ये त्यांच्या सात्विक वाणीत कुठलाही अभिमानाचा लवलेश नव्हता.
श्रीयुत पराग ओवळेकर आणि त्याचा ग्रूप 12 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 नर्मदा परिक्रमाच्या मार्गावर होते ग्रुप मेंबर डॉक्टर आशुतोष जोशी सर, मिस्टर प्रशांत जोशी, मिसेस मंजिरी जोशी, मिस्टर समीर वैद्य आणि मिस्टर पराग ओवळेकर
ते त्यांच्या शब्दात कथन करतात
13 एप्रिल आणि 14 एप्रिल 2025 रोजी चालत नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी करण्याचा एक संस्मरणीय अनुभव होता. नर्मदा परिक्रमेचे अनेक YouTube व्हिडीओ पाहत असताना. ती नर्मदा परिक्रमा मी एका दिवसात २१ किमी चालवून करू शकतो का ! असे मनात होते. कोणी म्हणतात नर्मदा मैया प्रेरणा देत आहे आणि जर नर्मदा मैयांचा तुमच्यावर आशीर्वाद असेल तर तुम्ही २१ किमी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण करू शकता.
आणि अचानक. एके दिवशी सकाळी माझा मित्र समीर वैद्य मला विचारत होता की तो डॉक्टर आशुतोष जोशी सरांसोबत नर्मदा परिक्रमेला जात आहे आणि त्यांचे भाऊ श्री प्रशांत जोशी त्यांच्या पत्नी सौ मंजरी जोशी सोबत नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीला जात आहेत. मी लगेच म्हणालो हो मी पण येतोय तुमच्या सोबत नर्मदा परिक्रमेला. डॉ आशुतोष जोशी सरांनी मागील २ वर्षात २ वेळा ही परिक्रमा केली होती. त्यामुळे ते आम्हाला परिक्रमा करण्यासाठी मार्गदर्शन करणार होते. त्यामुळे आता आम्ही पाच जणांचा गट चालत नर्मदा परिक्रमेला जाण्याचे निश्चित झाले.
आमचा कार्यक्रम 12 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:50 वाजता एकता एक्सप्रेसने जाण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल 2025 एकता नगर स्टेशनवर पोहोचणे, त्या दिवशी सर्व मंदिरांना भेट देणे जे कार्यक्रमाअतंर्गत अंतर्भूत केले नव्हते. सोमवार 14 एप्रिल 2025 रोजी नर्मदा परिक्रमणासाठी प्रयाण करणे.नर्मदा परिक्रमा संपल्यानंतर परतीचा प्रवास एकता एक्स्प्रेसने सकाळी 5.30 वाजता दादर पर्यंत श्री समीरने सर्वांसाठी ऑनलाइन बुकिंग केले होते.
श्री जोशी यांनी नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीबद्दल वाचण्यासाठी मला एक पुस्तक दिले, त्याच्यात तपशीलवार माहिती होती. लेखक श्री ओझा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव नर्मदा परिक्रमा असे आहे. डॉ. आशुतोष जोशी यांनी नर्मदा परिक्रमेसाठी प्रत्येक सभासदाने आपल्या बरोबर घेण्याच्या वस्तूंची तपशीलवार यादी तयार केली. आणि आता आम्ही सर्व सदस्य नर्मदा परिक्रमेला जाण्यासाठी सज्ज झालो.
12 एप्रिल 2025 रोजी प्रवासाचा दिवस आला आणि आम्ही दादर पश्चिम स्टेशनवर ठरलेल्या सकाळी 11:50 वाजता एकता एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढल्यानंतर आम्ही आमच्या सीटवर स्थानापन्न झालोत. आणि दुसऱ्या दिवशी रविवार 13 रोजी सकाळी 7:30 वाजता आम्ही एकता नगर स्टेशनवर पोहोचलो. तिथून पुढे जीपकारने आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही थेट श्री गरुडेश्वर मंदिरात गेलो जिथे आमची रूम बुकींग त्यांच्या भक्तनिवासात केली होती. आम्ही आंघोळ करून गरुडेश्वर येथील श्री गुरुदेव दत्त मंदिराचे दर्शन घेतले. मग आम्ही गाडीने श्री कुबेर भांडार मंदिराकडे निघालो. रविवारची सुट्टी असल्याने मंदिराबाहेर प्रचंड गर्दी होती. म्हणून आम्ही मंदिराबाहेरून दर्शन घेतले आणि पुढे श्री स्वामी नारायण मंदिराकडे निघालो. हे मंदिराच्या खूप मोठ्या क्षेत्रावर आहे. आम्ही श्री स्वामीनारायणाचे दर्शन घेतले आणि नंतर हॉटेल महाराजा येथे दुपारचे जेवण केले. दुपारचे जेवण करून आम्ही सती अनुसूया मंदिराकडे निघालो, पुढचे मंदिर नरेश्वर मंदिर होते. दर्शन घेतल्यानंतर भालोदला जाण्यासाठी आम्ही छोटी फेरी बोट घेऊन भालोदला पोहोचलो जिथे एक मुखी दत्त मंदिर आहे, तेथे दर्शन घेतले आणि आश्रमात जवळपास ९५ वर्षांचे श्री प्रताप महाराज यांचे आम्ही आशीर्वाद घेतले. त्याआधी आम्ही श्री रंग अवधूत स्वामी महाराज आश्रमाला भेट दिली जिथे आम्ही श्री शंकर महादेव मंदिराचे दर्शन घेतले. मग आम्ही बडी पनोती मंदिर आणि छोटी पनोती मंदिराला भेट देण्यासाठी पुढे गेलोत.भक्तनिवासात परतताना आम्ही दोघांचे दर्शन घेतले.
दुसऱ्या दिवशी सोमवार 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनीचा मुख्य दिवस होता.
पहाटे 2:00 वाजता आपण सर्वजण उठून आंघोळ करून परिक्रमेचा प्रवास सुरू केला. प्रथम आम्ही टिळकवाडा येथील वासुदेव कुटीर आश्रमाला भेट दिली जिथून पहाटे साडेचार वाजता आपली नर्मदा परिक्रमा सुरू झाली. त्यानंतर आम्ही रामेश्वराला भेट दिली की जेथे श्री समर्थ रामदास महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पुढे सप्त मातृका मंदिर आहे जिथे सात देवी माता मूर्ती आहेत. त्यानंतर श्री शंकर महाराज मंदिर जेथे श्री शंकर महाराज पुतळा आहे. त्यानंतर नर्मदा माता मंदिर आहे जिथे आम्ही नर्मदा मातेचे दर्शन घेतले आणि नर्मदा देवीला ओटी समर्पण केली. पुढे मनी नागेश्वर मंदिर, कपिलेश्वर मंदिर मग आम्ही रेंगण घाट येथे छोटी फेरी बोट घेऊन नर्मदेच्या दक्षिण वाहिनीला गेलो. नर्मदा माता नदीवर स्नान केल्यावर आम्ही रामपुरा आणि रणछोडदास मंदिराकडे निघालो जिथे श्रीकृष्णाची मूर्ती आहे. बहुतेक मंदिरात श्री महादेव पिंडीची मूर्ती आहे. नंतर आम्ही मंगळेश्वर मंदिराला भेट दिली, पुढची भेट रामानंद आश्रम, गोपरेश्वर आश्रम जिथे श्री महादेवाची मूर्ती मर्क्युरी पासून बनवली आहे. त्यानंतर तपोवन आश्रम, मग सीताराम मोठा आश्रम आणि नंतर परत टिळकवाडा वासुदेव कुटीर येथे 12.30 वाजता पोहचलो की जेथून आम्ही नर्मदा परिक्रमा सुरू केली होती. 21 किमी चालण्याचा नर्मदा परिक्रमा आपण 7 तासात पूर्ण करू शकलो कारण आपल्याला नर्मदा माता आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद लाभला आहे. नर्मदा परिक्रमा खरोखर एक अविस्मरणीय अनुभूती होती.
रात्री 7:30 वा. सोमवारी आम्ही एकता नगर स्थानकावर एकता एक्सप्रेसमध्ये चढलो आणि मंगळवारी सकाळी 15 एप्रिल 2025 रोजी आम्ही दादर पश्चिम स्थानकावर पोहोचलो आणि त्यानंतर लोकल ट्रेनने आम्ही सकाळी 6:30 वाजता ठाणे स्थानकावर पोहोचलो.
केंव्हा तरी एकदा चांदण्यात पुन्हा जाईन मी
नर्मदा माईच्या जलाशयात पुन्हा जलमय होईन मी
सोमवार, ३० डिसेंबर, २०२४
मेव्हणी माझी जेंव्हा रिटायर होते
व्यासपीठावरील अध्यक्ष, मान्यवर आणि समस्त गुरुजन असा मोठा परिवार जमलेला होता. पी पी चेंबर मधील चवथ्या माळ्यावरच्या हॉल मध्ये लगबग चालू होती. हॉल बाहेर मेव्हणीचा रांगोळीचा विशिष्ठ फोटो काढण्यात आला होता. शिक्षिका आणि मेव्हणीच्या मैत्रिणी अप्सरासारख्या नटून थटून आल्या होत्या. स्टेज च्या मागे "सेवापूर्ती गौरव सोहळा" असा बॅनर मोठ्या दिमाखात झळकत होता. कारण तिने चक्क 37 वर्षे सेवा केली होती. वरिष्ठ मंडळी एकदाची स्थानापन्न झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली देखील. बऱ्याच शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. नंतर
मी जास्त वेळ न घेता माझ्या भाषणाला सुरुवात केली. सगळी हयात शिक्षकी पेशात घालवल्या नंतर कोणता उद्योग आरंभायचा हा जसा मोठा यक्ष प्रश्न असतो. तसे मेव्हणी बद्दल एव्हढे नामवंत गुरुजन शिक्षकांसमोर काय बोलावे हा मला लहान तोंडी .... पडलेला प्रश्नच होता. मी स्वतः रिटायर्ड असल्यामुळे माझ्याकडे गाईड लाईन्स भरपूर असतील परंतु स्टेज वरून भाषण देणे सोपे नक्कीच नव्हते. कारण मी काही वक्ता नाही, की मी कुठे भाषणही दिले नाही. कारण भाषण देण्यासाठी सर्जनशीलतेची प्रतिभा असावी लागते ती माझ्यात मुळीच नाही.
म्हणून मी चक्क भाषणच लिहून आणलं आहे. अर्थात मीच ते लिहिलं आहे. आमच्या हीच आणि माझं लग्न झाल्यापासून गेली चव्वे चाळीस वर्षे मी संगितालां पाहतो आहे. माझ्या समोर तिने ग्रॅज्युएशन केलं, नृत्य कलेत तिने प्रावीण्य मिळविले, तिला आदर्श शिक्षिका म्हणून सुद्धा गौरविण्यात आले. ही किती अभिमानाची आणि मोठी गोष्ट आहे. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात ती अग्रेसर असते. आईवडिलांची सेवा करण्यात ही ती कुठे कमी पडलेली नाही. तिने डीएड पूर्ण केल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची चांगली शिक्षकी पेशातली नोकरी, एवढं सर्व काही आपल्या पदरी विपुलता येणार आहे अशी पुसटशी कल्पना नसताना, एक दिवस घरासमोरच्या सारवलेल्या अंगणात नववधूने तुळशी वृंदावन जवळ नुकतीच रांगोळी काढली, आणि थोड्याच वेळात पावसाची सर येऊन तुळशीवृंदावन पावसात ओलचिम्ब झाले ! पावसाने सारवलेलं ते सारवण रांगोळीसह वाहून नेलं ! जे नशिबात होतं त्याला ती सामोरे गेली. डगमगली नाही. अनेक वळणे आली असतील त्यांच्याशी तीने जुळवून घेतले. आणि इथपर्यंत ती येवून पोहोचली आहे. रिटायरमेंट ला अवघे काही तासच उरले आहेत. मला कल्पना आहे, तिच्या मनात प्रचंड उलथापालथ चालू असेल. शांता शेळके यांच्या गीतातून सांगायचे झाले तर जायचे इथून दूर, काहूर मनी उठले, दाटे नयनात पूर. जसे सर्व ऋतूत येणारे सर्व सण आपण अगदी आनंदाने साजरे करतो, आणि शेवटी आपल्या शरीराची लाही लाही करणारा शिशिर येतोच ना ! झाडांच्या फांदीला तो शुष्क करून टाकतो. त्याला कोणी नाकारले आहे का. कारण नंतर नव पालवी घेवून वसंत येणारच असतोच.
आतापर्यंत जगलेल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुझ्या हातून सुटून गेल्या असतील. ऐन उमेदीच्या काळात जे आयुष्य जगायचं राहून गेलं होतं आता ती जगायची संधी तुला मिळणार आहे. माधव ज्युलियन म्हणतात "चल उडुनी पाखरा पहा जरा, किती रम्य पसरली वसुंधरा". हो, आज आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत. तुझे कोडकौतुक करत आहोत. उद्या मात्र आम्ही सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होणार आहोत. सकाळची लोकल, शाळेची घंटा, विद्यार्थ्यांचा किलबिलाट. अटेंडडन्स रजिस्टर वर केलेली सही आणि विद्यार्थ्यांचा हजेरीपट, हुशार विद्यार्थ्याच्या पाठीवर मारलेली शाबासकीची थाप, हा चालू असलेला अध्याय एकदम खंडित होणार आहे. जसा वीजपुरवठा खंडित होतो आणि चुहुकडे अंधार पसरतो आणि क्षणभर आपल्याला काही सुचत नाही त्याप्रमाणे निवृत्तीनंतर थोडी हुरहूर, थोडे नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक छोटासा गुंता तयार होईल. भिंत असली म्हणजे तिच्यावर पाल फिरणारच, भाजीपाल्याची पिशवी घरी घेवून येतांना रस्त्यावर मांजर आडवी जाणारच, कोणाच्या घरात दूध अजूनपर्यंत ओतू गेलं नाही, हे सांगा बरं ! मग तू त्यांच्या पेक्षा वेगळी कशी असेन. निवृत्तीनंतर आपले कोणी कौतुक करेल ! पण असं घडतं नाही. का बरं अशी अपेक्षा करावी. आपणच आपल्या मुलांचे, त्याच्या लग्नाचे आणि येणाऱ्या नवीन सुनेचे, कौतुक करायचे दिवस चालून येणार आहेत. तो कौतुकाचा शब्द भांडार तुला तुझ्या रेशमी पदरात जपून ठेवावा लागणार आहे. निराशेचे दिवस संपणार आहेत आणि नवीन आयुष्य जगण्याची तुला संधी चालून येणार आहे. कारण अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते.
ही बा.सी. मर्ढेकरांची कविता तुला नेहमी 'प्रेरणा' देत राहील.
पुढच्या भावी आयुष्यासाठी तुला शुभेच्छा.....धन्यवाद.
सोमवार, ९ डिसेंबर, २०२४
चांदणं
एखाद्या चांदण्या रात्री घरातून बाहेर पडायला मिळणे असे म्हणणे मुंबई सारख्या ठिकाणी हास्यास्पद ठरेल. तेथे समुद्र गर्जत राहतो लाटा किनाऱ्यावर येवून काही तरी सांगण्यासाठी आक्रोश करून आदळत राहतात परंतु तेथे कोणी कोणाची दाखल घेत नाही. परंतु हा दुर्मिळ योग, मी जेंव्हा वैशाख महिन्यात गावी जातो त्यावेळेस काळया आभाळाचे आणि अनेक चांदण्या रात्रीचे सौंदर्य मी अनेकदा माझ्या काकांच्या मातीच्या घराच्या धाब्यावर झोपताना अनुभवली आहे. तसेच चांदण्या रात्रीत शेतात राखण करण्यासाठी मी त्यांच्या बरोबर जात असे. शेत माळ्यावर खाटेवर झोपताना आभाळभर अथांग चांदण्याच्या लाह्या आकाशात विखुरलेल्या दिसायच्या. एव्हढ्या असंख्य चांदण्या आल्या तरी कोठून आणि दिवसा कुठे गायब होतात याचं गणित मला कधीच उलगडलं नव्हतं. कधी कधी शेतातून परस्पर शेजारच्या बाजारपेठेच्या गावी तमाशा बघण्यासाठी सुद्धा आम्ही बैलगाडी जुंपून जात असू. अशा बऱ्याच चांदण्या रात्रिंच्या आठवणी आयुष्याच्या गाभाऱ्यात निपचित पडल्या आहेत. त्यांना कोणतेही उपमा अलंकार देण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. परंतु हे शिंपले जेंव्हा उफाळून वर येतात तेंव्हा ते अनुभवतांना कुसुमाग्रजांची कविता गुदगुल्या करते. काढ सखे गळ्यातील तुझे चांद्ण्याचे हात क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दुत.
अचानक झोपेतून जाग आली. रात्रीचे तीन वाजलेत. मी अमृतसर एक्स्प्रेस ने प्रवास करत होतो. खिडकी उघडली. थंडगार वाऱ्याची झुळूक चेहऱ्याला अलगद स्पर्शून जात होती. तोच चांदण्याचा शुभ्र प्रकाश चौफेर उधळला जात होता. खुल्या आभाळाची विशाल चंदेरी चादर जमीवर अंथरली जात होती. ट्रेन डोंगराला चकवा देत मार्ग परिक्रमण करीत होती. चंद्र साक्षीला होता. कधी डोंगर आडून कधी दाट झाडीतून माझ्या संगतीला होता. त्याच्या किरणांनी सारा आसमंत लखलखाट झाला होता. ही रात्र आणि प्रवास संपूच नये अशा वेड्या मनाची समजूत कोण काढणार. सकाळचे साडेचार वाजलेत तरी ट्रेनला रात्रीच्या चांदण्यातून सुसाट धावण्याचा मोह आवरत नव्हता. मघापासून अखंड धावल्याने चंद्रही थकला होता. मी त्याचा निरोप घेण्याच्या तयारीत असताना त्या रमणीय पहाटे मी पाचच्या सुमारास चाळीसगांव प्लॅटफॉर्म वर उतरलो. विनंती वरून मला अक्कलकुआ एस टी बस कंडक्टरने खडकी फाटा स्टॉपवर उतरवून दिले. दीड मैल मला पायी चालावे लागणार होते. गावाकडची ती पहाटेची नवलाई अनुभवल्यानंतर येथे परमेश्वर निसर्गात भरलेला आहे याची खात्री पटली. काही वेळाने मी माझ्या धामणगांवी पोहचणार होतो. माझ्या मनातले आनंदाचे दवबिंदू विरघळलेत. कारण आता आई तेथे नव्हती. ती खूप खूप दूर सात समुद्राच्या पलीकडे निघून गेली होती कधी न वापस येण्यासाठी. अजून एक आशेचा किरण मला उत्साहित करत होता. लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांनी मला प्रचंड माया लावली ते माझे काका अजून आहेत. आणि अजून त्याच मातीच्या भिंतीच्या धाब्याच्या घरात राहतात. ते समोर दिसताच त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला सोडून बसावे आणि त्यांची टोपी डोक्यावरचे केस विस्कटून वस्कटून ओरबाडून घ्यावेत. अजून त्यांच्याबरोबर हातात कंदील आणि काठी घेवून शेतावर जावे. शेंगा भाजून खाव्यात, मोटेवर बसून गाणी ऐकावेत. चांदण्यात गवत कापून बैलांना टाकावे. हे बालपणीच चित्र नेहमी नेहमी आयुष्यात डोकावत राहतं.
सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४
जीनकी बजहसे बिनाका गीतमाला को पहचान मिली
ओ पुराना दौर सकुन का दौर् था, धीरज और संतोष का युग था औंर आज हर चीज जेट स्पीडसे भागती दौडती रहती है l बहनो और भाइयो, रहना तो हमे आखिर आज ही मे है l लेकीन गुजरे हुये दिनकी मिठास और गहराई भी अगर हम अपने साथ रखकर आगे बढते रहे, परंपरा और प्रगतीसे मिलाते रहे, तहजिब और तरक्कीसे जोडते रहे तो, और बिता अनमोल होता जायेगा हमारा जीवन l दुःख और सुख, मिलन और विरह, दोनोको झेलना आसान हो जयेगा l
हे बोल आहेत अमीन सयानी यांचे 1952 ते 1955 च्या रेडिओ वरच्या बिनाका गीतमालातील. गाण्यापेक्षा हे बोल ऐकण्यासाठी शहराच्या चौका चौकातून, पानाच्या टपरीवर, मिळेल तेथे पब्लिक गर्दी करीत असे. मी सुद्धा माध्यमिक विद्यालयात धुळे येथे शिकत असातांना, संध्याकाळी आठ वाजता एक छोट्या चहाच्या टपरीवर बिनाका गीतमाला ऐकण्यासाठी हजेरी लावत असे. रसाळ आणि मधाळ वाणीने अमीन सायानीच्या आवाजाचं गारूड लाखो लोकांच्या हृदयात घर करून बसलं होतं. आज तो रेडियोवरचा आवाज कायमचा बंद झाला. राहिल्या त्या फक्त आठवणीच्या रेकॉर्डिंग्ज. त्यांच्या जाण्याने रेडियोवरचं सुवर्ण युग लयास गेलं आहे असं वाटायला लागलं. बहनों और भाइयों अशी त्यांच्या बोलण्याची शैली आज ऐकायला मिळणे दुरापास्त आहे. त्यांचे निवेदन ऐकत राहणे हा स्वर्गीय आनंद होता, शब्दांना साज चाढविण्याची कला त्यांना ईश्वरी देणगी लाभली होती. तब्बल चार दशके त्यांनी शब्दांची फुले रसिकांच्या मनावर उधळलीत. त्यांच्या शैलीदार निवेदनाने केवळ शहरी भागात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात , खेडोपाडी रसिकांवर भुरळ घातली होती. तसेच गायक, संगीतकार, गीतकार, नट नट्या यांना बोलते केले होते. तारीख 21 फेब्रुवारी 2024 ला असंख्य रसिकांना भुरळ घालणारे अमीन सयानी यांची 91 व्या वर्षी प्राण ज्योत मालवली.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४
शेकोटी 2024
संस्कृती म्हणजे काय तर आपल्या समजाची जीवन पद्धती की जेथे शिष्टाचार, खानपान, भाषा, साहित्य, विचार,आदर, सदभाव, सभ्यता आणि कला याचा संगम. आणि हाच संगम शीतचंद्रलोक सोसायटीत जवळ जवळ दोन ते अडीच दशकापासून बघायला मिळत आहे. मग तो विषय कोणताही असो, राम मंदीर प्राण प्रतिष्ठा असो, श्री सत्यनारायण वार्षिक पुजा किंवा वुमेन्स डे असो, तसेच कोजागिरी पौर्णिमा, किंवा दिवाळी पहाट असो, अशा कितीतरी उत्सव सेलिब्रेट केले जातात की त्यांच्यावर वेळोवेळी भाष्य केले आहे. नेहमी एक गोष्टीचा विसर पडतो ती म्हणजे शीतचंद्रलोक च्या सख्या. चुलितले निखारे आणि टोपलीतले चार पाच वांगे उचलून टाकून चक्क काळेकुट्ट भाजून निघेपर्यंत एका दगडी खलबत्त्यात हिरव्या मिरच्या, लसूण जिर, मीठ कांदा कुटून निघेपर्यंत इकडे वांगी चांगलीच होरपळलेली असतात आणि खमंग वास सुटलेला असतो दुसऱ्या मिनिटाला वांग्याचं भरीत कुच्करून तयार झालेलं असतं, घरधनी नाकात वास भरून मळ्याकडे रवाना होतो. हीच ती संकल्पना शीतचंद्रलोकमध्ये कोणी रुजविली हे कोडे उलगडण्याच्या भानगडीत न पडता लहान थोर सगळीच मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं अशी खूणगाठ बांधून रिपीट रिपीट वांग्याचं भरीतचा फडशा पाडला जात होता. खर म्हणजे आदल्या दिवशी शेकोटी कार्यक्रमावर दुःखाची सावली पसरल्यामुळे शीतचंद्रलोक सख्यानी आपल्या कर्तृत्वाचं भान ठेवून नियोजित शेकोटीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला होता.
सकाळ पासून त्यांची ही लगबग किती शिस्तीत चालू होती ही कॅमेरात बंद झालेली असतांना, घरची कामे आवरून या लोकांना वेळ मिळतोच कसा, बाजार केंव्हा करतात, कोण कोण जातंय बाजाराला, आणि यांना हे जमतं कसं ! खलबत्ता, मुसळ, शेंगदाणे, लसूण, हिरव्या झणझणीत मिरच्या यांचे कुटण, बेसन, वांगे भाजणी, तवा, कढई, मीठ मसाला आणि चुलितील निखारे ....... कुठं थांबायचं तुम्ही सांगा. आणि शेवटी आइस्क्रीम कुल्फी !!
शीतचंद्रलोक सख्यांची ही तपश्चर्या चक्क बारा वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. आणि आम्ही सर्व सदस्य मंडळी अगदी चवीने या मेजवानीवर कोणतेही आढेवेढे न घेता लोट पोट होवून कौतुकाची थाप देवून मार्गस्थ होतो . सर्वांची जेवणं झाल्यानंतर शीतचंद्रलोक सख्यांनी जेवणास सुरुवात केली. सगळा पसारा आवरून, भांडीकुंडी लख्ख करून, साधारणतः 10 वाजता शेकोटी या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
अशाप्रकारे शीतचंद्रलोक सोसायटीत सुसंस्कृतीची सूत्रे घट्ट रोवली गेली आहेत.
धन्यवाद
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)