Tuesday, 27 June 2017

आई सध्या राहते कुठे

ठाऊक नाही मज काही !
ठाऊक आहे का तुज काही,
कशी होती रे माझी आई ?

मधुसूदन कालेलंकरांच्या या काव्यात आई विना बालकाच्या हृदय पिळून टाकणाऱ्या वेदना बघून मन हेलावले. जेंव्हा छोटे छोटे चिमुकले गोजिरवाणे पैंजणाचे पाय आईकडे धावत येतात आणि त्या पायातली चंचलता आणि कोमलता तिला वेलीसारखी बिलगते तेंव्हा जगातली सर्व महान काव्ये गळून सुकलेल्या फुलांसारखी निपचीत पडतात. विश्वाची निर्मिती केल्यानंतर परमेश्वराने ही कोमलता तिच्या पदरात टाकण्याची त्याला इच्छा झाली असेल, सरळ मागे त्रेयांशी वर्षांपूर्वीच साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात श्यामची आई हे अनमोल संस्कारांनी ओथंबलेलं पुस्तक लिहून आईचं महती सांगणारं दैवत, जगाच्या पाठीवर घराघरात पोहोचलं. तरी वेदना देणारी, घायाळ करणारी,  मातृ प्रेमासाठी व्याकुळ झालेला अजून कोणी तरी, 

आई म्हणोनी कोणी 
आईस हाक मारी
ती हाक येइ कानी
मज होय शोककारी
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

हे कवी  यशवंत यांनी लिहलेलं काव्य काळजाचा ठाव घेते. आई या दोन अक्षरात जगातली सारी महाकाव्ये सामावलेली असली तरी सर्व विश्वाचा पसारा उलगडून आई बद्दलचे लिखाण आणि विचार अजून चालूच आहेत. तरी सुद्धा आई सध्या राहते कुठे, असा काळजी वाटणारा दुर्मिळ प्रश्न जेंव्हा विचारला जातो तेंव्हा विचारणाऱ्याला दोन हात नक्कीच जोडावेसे वाटतात. परंतु हाथ न जोडता सरळ अहंकाराची पुसटशी छाया असलेलं भरकटलेलं उत्तर मिळतं, "ती माझ्याकडे राहते". हे उत्तर चुकीचं नाही, पण पाण्यात पडलेल्या निराधार सावलीचाही त्याने आधार घेतलेला असतो. कधी कधी ही निराधार सावली वृद्धाश्रमाच्या अंगणा पर्यंत पोहचते. तेंव्हा त्या सावलीला किती वेदना होत असतील.

परंतु ही कथा येथेच पूर्णविराम घेत नाही. अशाच आशयाची कथा साधारण 2005 साली सकाळ वर्तमान पत्रात छापून आली होती. ते सकाळचे कात्रण मोरपीस म्हणून अजून पर्यंत हुदयाशी जपून ठेवलेलं होतं, ते खाली नमूद करीत आहे.



डॉ.स.वि. सरदेसाई यांचे वडील व लालचंद हिराचंद हे डेक्कन कॉलेज मधील सहाध्यायी (मित्र) होते. डॉ. सरदेसाईंचे वडील निवर्तल्यानंतर काही दिवसांनी डॉ. सरदेसाई व लालचंदजी यांची भेट झाली. लालचंदजींनी त्यांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. आणि विचारलं, "आई तुझ्याकडेच राहते का ?
"नाही"
"तुझ्या भावाकडे राहते का ती"
"नाही"
आता लालचंदजी अचंबित झाले. आपली मित्राची पत्नी, मुलाकडे राहत नसेल तर कुठे राहत असेल, असा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला. त्यांनी तसे विचारलेही.
"अरे मग ती असते तरी कुठे ?"
डॉ. सरदेसाई शांत स्वरात नम्रपणे उत्तरले.
"ती तिच्या घरीच राहते, मी तिच्याकडे राहतो. आईने माझ्याकडे राहावे इतका मी मोठा झालेलो नाही."

आईचे घरातील मानाचे स्थान दर्शविणाऱ्या या उत्तराने लालचंदजीही आनंदीत झालेत. पुण्याच्या वि.स. खांडेकर चौकातील घर डॉ. सरदेसाई यांनी विकत घेतल्याचे लालचंदजींना माहीत होते. त्यामुळे फिरकी घ्यावी म्हणून त्यांनी विचारले.

"अरे हे घर तुझे आहे ना"
डॉ. सरदेसाई उत्तरले. "नाही, माझे फक्त पैसे होते, घर आईचेच आहे."

Sunday, 18 June 2017

प्रतिबिंब

एखाद्या कलाकृतीचे वैशिष्ट्यपूर्ण बारकावे शोधण्यासाठी आपण जेंव्हा निरीक्षण करतो आणि नकळत त्या कलाकृतीच्या बाजूलाच असलेल्या प्रतिबिंब वर नजर पडून त्याचं सौंदर्य न्याहाळत आपण वेडे होतो.  ताजमहल सारख्या एखाद्या विषयावर किंवा काल्पनिक भावना व्यक्त करण्यासाठी मराठीत शब्द साठा विपुल प्रमाणात आहे, तरी सुद्धा दर वर्षी काव्य लिहिली जातातच ना. कधी कधी बायकोला घेतलेली महागडी साडी सुद्धा आवडत नाही, तर तेवढ्याच पैशात पैठणी खरेदी करून बघा काय फरक पडतो ते. म्हणून कल्पना येतात तरी कुठून आणि त्या आपल्याला सुचतात तरी कश्या, आज काल असे प्रश्न विचारायच्या भानगडीत कोणी पडत नाही. कारण सुचलेल्या कल्पना प्रत्यक्षात या जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे किंवा आपल्याच बाजूला दैनंदिन जीवनात सहज प्रतिबिंबित झालेल्या असतात, घडत असतात.

असंच एक प्रचंड मोठं तळं पाण्याने अथांग पसरलेलं. त्यावरून उडत जाणाऱ्या  पक्ष्याच्या चोचीतून निसटलेलं आणि तेवढ्याच चपळाईने चोचीत पकडलेलं. त्यापासून पाण्याच्या पृष्ठभागावर उमंटलेले तरंग दूर दूर पसरत जातांना अस्पष्ट होत जातात. काही घडलं नसतांना अस्पष्ट वलये बरेच काही मनाला चाहूल लावून जातात. आयुष्य जगण्याची कला एक प्रकारे शिकवून जातात.

निवृत्त होऊन वर्ष होत आलं, जसं धावणारं कोळशाचं इंजिन रुळावरून जबरदस्तीने काढून ठेवलेलं. चालण्या शिवाय काही पर्यायच न उरलेला. सकाळी सकाळी रस्त्यावर कोणी नाही, आपणच एकटे पायी चालत आहोत. सारं शहर कसं निपचीत पहुडलेलं. कोणालाच कशी काळजी नाही, सर्व जगाची काळजी आपल्याला लागून राहिलेली आहे असं उगाच मला राहून वाटत होतं. एम आय डी सी च्या दिशेने काहीसा मंद असा छापछुप छापछुप असा जुन्या मशीनींचा आवाज येवून शांततेचा भंग करीत होता. चालता चालता गावं देवी मंदिराजवळ जवळ येताच एक लहानसं तळं दिसलं. आणि मनाच्या गाभाऱ्यातलं निद्रिस्त पडलेलं शिंपलं हलकेच हेलकावे देत ओठावर शब्द रूपाने उघडलं. साधारणतः  माझा रिटायरमेंटच्या आठ ते नऊ वर्षापूर्वीची ही घटना असेल. त्या घटनेने माझ्या मनावर खूपच परिणाम झाला आणि मी कमालीचा बदलून गेलो.  झालं असं. त्या दिवशी फॉरेनेर्स च्या लोकांची कंपनीत व्हिजीट होती. म्हणून सकाळी लवकर उठलो. रात्रीचा पाऊस थांबून थांबून कोसळून सकाळी मात्र पूर्णपणे थांबला होता. सोसायटीतील झाडे भिजून चिंब झाली होती. झाडांची पानं स्वच्छ आणि नितळ दिसत होती. मी ही माझी अंघोळ आटोपून आज लवकर ऑफिस ला जाण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात आतून नेहमीचेच ठरलेले डॉयलॉग्स ऐकू आलेत. चष्मा घेतला का. लोकल पास, पेन, स्वॅपिंग कार्ड चेक करा. केस अजून विंचरलेले नाहीत. हा घ्या कंगवा आणि खोबारेल तेलाची बाटली. बूट कापटातच आहेत, सॉक्स दोरीवरून काढून घ्या, चहा टेबलावर ठेवलेला आहे. रेकॉर्डिंग केलेली टेप सुद्धा एखाद्या वेळेस अडकू शकते हो, परंतु हे बायकांना जमतं तरी कसं. अशी सर्व्हिस तर पूर्वीच्या काळी राजे राजवाड्यातील राजे महाराजांना सुद्धा मिळत नसेल कदाचित. तरी सुद्धा या पस्तीस वर्षात आपण बायकोची कधीही तारीफ केली नाही. हे आज मला आठवल्यावर आश्चर्य वाटतं. आज तिला अदृश्य पणे धन्यवाद देण्यासाठी जेंव्हा मी तिच्याकडे कृतज्ञतेच्या नजरेने बघतो तेंव्हा माझ्याकडे बघून तिला लगेच शंका येते, "का हो बघता माझ्याकडे इतकं अधाशासारखं, हे काय वय आहे का तुमचं असं बघण्याचं"  मी त्यावर काय बोलणार. मला खरं म्हणजे तिला म्हणायचं होतं की तू आयुष्यभर माझ्याशी किती सात्विक पणे वागलीस, पण मी तिला मनातल्या मनात एवढेच म्हणतो, तुझं सुद्धा आता वय झालंय, पण तुझे केस अजून असे काळे कुळकुळीत का" ऑफीसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडताच  विसरलेला हातरुमाल बायकोने गॅलरीतून दिलाच. सकाळच्या पावसामुळे अंगण ओलं झालं होतं. सोसाटीचा बाहेरचा रोड पडून गेलेल्या पावसामुळे निग्रो सारखा भासत होता. घराजवळच रिक्षा स्टॅन्ड असल्यामुळे अवघ्या मिनिटातच मला शेअरिंग मध्ये रिक्षा मिळत असे. आजही एक रिक्षा जाण्याच्या तयारीत होती. आतमध्ये एक जोडपे बसले होते. लेडी उजव्या बाजूला तर पुरुष मधली जागा सोडून डाव्या बाजूला बसलेला होता. त्या माणसाने डोळ्यावर काळा गॉगल घातलेला होता. सकाळी सकाळी पाऊस पडून गेला असल्यामुळे हवेत गारवा पसरलेला होता. तरी त्या माणसाने काळा गॉगल का बरे घातला असावा. भारतीय घटनेने कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाला स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. कोणी कसं राहायचं आणि कसं वागायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. आपल्याला उगीच नाक खुपसण्याचं कारणच कांय. आज काल कोण कधी कशी फॅशन करेल काय सांगता येत नाही. ह्या माणसाने सकाळी सकाळी डोळ्यांवर काळा गॉगल का घातला, ह्या कोड्याचं उत्तर न शोधलेलं बरं. मला रिक्षात बसायचे होते म्हणून मी, तो गॉगल घातलेला मनुष्य मधल्या सीट पर्यंत सरकण्याची वाट बघू लागलो. एव्हाना ड्रायव्हरने रिक्षा सुद्धा स्टार्ट केली होती. मी अजून बाहेरच ताटकळत बॅग घेवून उभा होतो. परंतु तो पठ्ठ्या सरकेल तेंव्हा ना. मनातल्या मनात म्हटलं, सरक की जरा आंधळा आहेस का, तेवढ्यात त्याच्या बायकोने  माझ्या मनाची अवस्था ओळखली. तिने आपल्या नवऱ्याला अदबीने सांगितलं. अहो जरा इकडं सरका, त्यांना बसू द्या. तिने संगील्या प्रमाणे स्वारी लगेच तिकडे सरकला आणि मी आत मध्ये बसलो. रिक्षा 20 च्या स्पीडने धावू लागली. कारण डोंबिवलीचे रस्ते ह्या स्पीड साठी फिट्ट आहेत. पण माझ्या मनात अलग काहूर माजलं होतं. ह्या माणसाला थोडं सरकून जागा द्यायला काय हरकत होती की जे त्याच्या बायकोला समजलं होतं. परंतु पठया जागा द्यायला तयार नव्हता. माझा पण इगो दुखावला गेला होता. कारण मी एक नामांकीत कंपनीत मॅनेजर होतो. थोडी मी मनाची समजूत काढली की आजचा दिवस आपल्यासाठी नाही. अशी मनाची समजूत काढत असतांनाच शेवटचा स्टॉप म्हणजे डोंबिवली स्टेशन आलं. मी खाली उतरलो आणि त्या गॉगल घातलेल्या पुरुषाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. अन बघतो काय. माझा संतापाचा पारा एकदम शून्यावर घरंगळला. कारण ही तसंच होतं. I was really shocked. मी आतापर्यंत या दहा मिनिटाच्या अवधीत त्यांच्या बद्दल काय नाही तो वाईट विचार केला होता. मी माझ्या बुद्धीची स्वतःची किंव करावीशी वाटली, परंतु हे त्याच्याही पलीकडचं होतं. ती स्त्री रिक्षातून उतरताच त्या पुरुषाशी काही एक शब्द न बोलताच स्टेशन कडे निघून गेली. तो पुरुष रिक्षातून खाली उतरला, रिक्षा चालकास पैसे दिले आणि काठी टेकत टेकत हळू हळू रस्ता कापू लागला. एक जण पुढे येवून त्या माणसाला रस्ता पार करण्यास मदत केली. माझ्यातला मी मॅनेजरचा इगो झटक्यात जमिनीवर काही आवाज न करता आदळला होता. मी ज्याच्या बद्दल जो काही विचार करत होतो तो किती चुकीचा होता. ती स्त्री त्याची बायको नव्हती आणि तो मनुष्य ही खरोखरच अंध होता. ती स्त्री आणि तो अंध पुरुष दिसेनासे होई पर्यंत मी त्यांच्या पाठमोरी आकृतीकडे बघत राहिलो. मला कळून चुकले होते, समोरच्या घटनेचा, व्यक्तीचा वेध न घेतातच नकारात्मक विचारसरणीच्या गुणांवर आपण अधिराज्य करत होतो आणि त्यांना मनात जोपासत होतो. त्यामुळे याच्या पुढे समोरच्या व्यक्तीचा,  कुदरतचा आपण आदर करणं शिकलं पाहिजे. आपल्या अंतरंगात नकळत जोपासत जाणारे नको असलेले गुण काळजी पूर्वक तपासत राहीले पाहिजे.

अशी भरपूर शिंपले आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जमा झालेली असतील, आणि न जाणे, ओठावर येवून उघडण्यासाठी  ती आतुरतेने वाट ही पाहत असतील.

पहिल्या पानावरची शाई वाळते न वाळते तोच दुसरं पान उघडण्यासाठी वाऱ्यानेच फड फड करावं आणि दुसऱ्या पानावर लिहिण्यासाठी मन आतुर व्हावं एवढी घाई त्या वाऱ्याला का बरं झाली असावी. मला धडा शिकविण्या साठी कुदरतने जणू विडाच उचलला होता. त्या दिवशी घरी श्राद्ध असल्यामुळे  मी ऑफिसला दुपारून साडे अकराच्या दरम्यान निघालो होतो. लोकल ट्रेन ला तुफान गर्दी असल्यामुळे मी जवळ जवळ तीन वर्षांपासून खासगी व्हेईकलनेच ऑफिसला जाणे पसंद केले होते. आज सुद्धा व्हाया म्हापे मार्गानेच जात होतो. दुपारचा साडेबाराचा सुमार. ऊन मी म्हणत होतं. म्हापे चौकात मी एखादी प्रायव्हेट व्हेईकल मिळते का त्यासाठी ताटकळत उभा होतो. प्रचंड धुराळा आणि रखरखीत ऊन त्यामुळे जीव अगदी मेट्याकुटीला आला होता. कंपनीत वेअरहाऊसिंग आणि डिसपॅच या साऱ्याच गोष्ट हँडल कराव्या लागत असल्यामुळे सतत कस्टमर चे फोन येत होते. भर उन्हात कोणीच लिफ्ट देत नव्हते. माझ्या आजूबाजूचे सर्व जण कोणत्या न कोणत्या सोयीने निघून गेले होते. आता मलाही वाटू लागले होते की आपणही घरी वापस निघून जावे, परंतु तेवढ्यात एक टेम्पो येवून उभा राहिला. थोडक्यात आपला वनवास संपला असंच वाटून गेलं. टेम्पो चालकाची केबिन सोडून मागचा भाग सामानाची वाहतूक करण्यासाठी ओपन ट्रॉलीचा होता. सरळ विचार करण्यासारखं होतं की कुरियर वाहतूक करणारी गाडी असावी, अन तेवढेच पाच रुपयांचं भाडं मिळतंय म्हणून टेम्पो चालकांनी गाडी थांबवली होती. टेम्पो चालक हा सरदारजी होता. तो माझ्यापेक्षा मराठी सुंदर बोलत होता म्हणून मी त्याचं कौतुक ही केलं. मी त्याला विचारलं, सरदारजी आप दिनभर माल की याता यात करते हो,  ये ठीक है । लेकींन मुझे समझमे नही आँ रहा है कीं आपने केबिनमें एअर कंडिशन क्यों लगवाके रखा है । त्याने फक्त माझ्या कडे हसून बघितले. आणि उत्तर देण्याचं मात्र टाळलं याचं मला आश्चर्य वाटलं. थोडं पुढं गेल्यानंतर त्याने मला विचारलं, आप कौन सा कंपनी मे काम करते हो. और कौनसा पोझिशन है आपकी । मी उत्तर देत गेलो परंतु असंही वाटू लागलं की हा सरदारजी का एवढ्या चांभार चौकश्या करतो आहे. बरं तो इथंच थांबला नाही, त्याने पुढे हेही विचारलं की, आप जो कंपनी मे काम करते हो उसका क्या प्रॉडक्ट है और कितना टर्नओहर है आपकी कंपनिका । आता हे अतीच झालं असं मला वाटायला लागलं, म्हणून मी ही त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलं. तेवढ्यात माझं गंतव्य स्थान आलं. सरदारजीला मी हातानेच इशारा केला की मला इथे उतरायचं. टेम्पोतून उतरल्या बरोबर मी सरदारजीला भाड्यापोटी पाच रुपये देवू केले परंतु त्याने घेण्यास नकार दिला. परत मी त्याला पैसे घेण्यासाठी विनंती केली. नंतर त्याने मला जे काही सांगितले त्याच्या नंतर मी एकदम जमिनीवर लॅन्ड झालो. माझ्यातला मॅनेजर मला फार छोटा वाटायला लागला. तो सरदारजी एम आय डी सी रबाले मधील तीन कंपन्यांचा मालक होता. ती व्हीआयपी व्यक्ती होती. एका राजाने आपल्याला त्याच्या सिंहासनाच्या बाजूला बसविण्याचा मान दिला होता. एका करोडपती व्यक्ती एवढा शालीन आणि विनम्र असू शकतो हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. जगात दरवर्षी फोर्ब्ज कंपनी श्रीमंतांची यादी जाहीर करते. परंतु एका गर्भ श्रीमंत व्यक्ती कडून अशी विनयशील नम्रता मी पहिल्यांदाच बघत होतो. मला ड्रॉप करून तो सरदारजी मला आभार मानण्याचं अवसरही न देता केंव्हाच निघून गेला आणि आयुष्य जगण्याचं तत्व मात्र शिकवून गेला. माझ्यातला इगोने माझं पितळ परत उघडं पाडलं होतं. मी मात्र त्या पाठमोऱ्या गाडीकडे किती तरी वेळ बघतच उभा होतो. आयुष्याच्या वळणावर कोण तुम्हाला कुठे भेटेल हे ही गुपित परमेश्वराने अजून त्याच्या जवळच ठेवलेले आहे.

Sunday, 11 June 2017

वट पौर्णिमा.....आहे मनोहर तरी

पूर्वीच्या काळी घोड्यांच्या टापावरून राजकुमारीला कळत असे की, तिच्या स्वप्नातला राजकुमार राजवाड्याच्या दिशेने येत आहे. परंतु तो काळ आता राहिलेला नाही.  मोबाईलच्या रिंग टोन वरून तिला सर्व काही कळून चुकतं की तिचा राजकुमार कोणत्या लोकेशनला आहे. आजचं विज्ञान युगात नवनवीन शोध लागून सॅटेलाइटच्या अचाट शक्ती दर्शन झाल्यावर गर गरायला होतं. हो जमाना खरंच बदलला आहे. परंतु ऋतू बदललेले नाहीत. कूस बदलावी तसे ऋतू पलटतात. सण, व्रत वैकल्ये हे ऋतु नुसारच ओळीने येतात आणि या मॉडर्न जमान्यात यांच्यावरचा विश्वास दुरावत चाललेला आहे हे मात्र खरे.

परंतु आपली हिंदू संस्कृती ही  सण, व्रत, मांगल्य, रीती रिवाज ने काठो काठ भरलेली आहे.  प्रत्येक सणाची मांडणी अतिशय सूष्मपणे कल्पकतेने केली गेलेली आहे. रामायण महाभारतापासून या सण रुढींचे मूल्य जपले गेलेले आहे. भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा टिकवून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. वट पौर्णिमेच्या व्रताचं महत्व ही तसंच अगाध आहे. सावित्री आपल्या पतीचे प्राण वापस मागण्यासाठी यमाचा पाठलाग करते. केवढं विलक्षण इच्छाशक्ती त्यावेळी सावित्रीने प्रगट केली होती.

आकाशात नुकतेच पांढरे ढग गायब होवून काळे ढग गर्दी करू लागतात. शेतात शेतकऱ्यांची नांगरणी, वखरणी होवून शेतकरी बी पेहरणी साठी सज्ज झालेला असतो. जेमतेम पावसाला सुरुवात होते न होते तोच वट पौर्णिमेची चाहूल लागते. हा सण तसा एक दिवसाचा. स्रिया नटून थटून शृंगार करून  वडाला फेऱ्या मारून व धाग्यांनी बंधनात बांधून आर्जव करतात की सात जन्मी हाच पती मिळो. ती आपल्या आशा, अपेक्षा, प्रितीच्या कोमल भावना, संवेदना, तन,  मन धन सर्व काही समर्पित करून आपल्या पतीबद्दल सुयश चिंतितते.

परंतु वट पौर्णिमेची चाहूल लागताच हल्ली चाणाक्ष पुरुष नाही ते आपले अचाट बुद्धीचे कौशल्य पणाला लावून वट पौर्णिमेचं व्रत हे योग्य कि अयोग्य या कूट प्रश्नांची मांडणी करतात आणि सणासुदी आंब्याची डहाळी सहज मोडून आपल्या घराला तोरणं बांधायचे मात्र विसरतात. हा सण जवळ आला म्हणजे ह्या पिढीतल्या पुरुषांच्या मनात वट पौर्णिमे बद्दल बरीच खलबते सुरु होतात. आपण पण या पिढीतलेच. मग ब्रम्हदेवाने आपल्यात कुठलं नवीन रसायन ओतलं असेल !  दसऱ्याला हिरवं सोनं लुटलं जातं, पोळा या सणाला बैलांना पुरण पोळी खावू घातली जाते. गुढी पाडव्याला कडू निंबाची डहाळी बांधून गुढी उभारली जाते, दसरा दिवाळी या सणाला हिरवे तोरणं बांधल्या शिवाय त्या दिवसाची सुरुवातच होत नाही. हे सर्व  पावित्र्य मांगल्याचे भान हरपून वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर कोणी अंध श्रद्धेवर बोलायला लागतो तर काही जण थोडे पुढे जावून त्याच्यावर संशोधन करून शास्त्रीय कारण शोधण्याचा प्रयत्न करतात. ह्या सर्वच गोष्टी तराजू मध्ये तोलता येत नाही म्हणून बरं, नाही तर गटार अमावस्येला माणसाची बुद्धिमत्ता खरोखर किलोने विकली गेली असती !

पुरुषांचा जवळ जवळ नव्व्यांणवं टक्के सहभाग नसलेल्या या वट पौर्णिमेच्या सणात पुरुष हा देव असतो. पतीचे सारे दोष विसरून त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी आणि जन्मो जन्मी हाच पती मिळण्यासाठी ती वट पौर्णिमेंचं व्रत दर वर्षी नित्य नियमाने करत असते. भारतीय स्त्री ने हा सांस्कृतिक मूल्याचा ठेवा सावित्रीच्या काळापासून तिला मिळालेल्या आयुष्याच्या महावस्त्रात घट्ट बांधून ठेवलेला आहे. ही गाठ सोडविण्याचा आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केला. परंतु त्यांना आतापर्यंत यश लाभलेले नाही.  सती सावित्री ह्याच भूमीत महाभारतात वन पर्वतात भेटते.  आणि तेथून ही प्रथा सुरू झाली असे आपणास वाचावयास मिळते.

विवाहात स्त्रीची तिच्या पतीबरोबर जन्माची गाठ बांधली जाते. तसं बघितलं तर कुंकू हे स्त्रीच्या सौभाग्याचं लेणं. देवीच्या दर्शनाला जाते तेंव्हा देवीच्या साक्षीने शेरभर कुंकू खरेदी करते. कुंकुवात तिचा आयुष्यभर जीव अडकलेला असतो. ती पुरुषाच्या आयुष्यात चैत्र पालवी सारखी येते. निसर्गात वसंत जसा बहरतो तशी ती आपल्या संसारात बहरते आणि विनयशील सौंदर्य बहाल करते म्हणून तर स्त्री ही पुरुषाची आदिम प्रेरणा आहे. अश्या प्रकारे ती घराचा स्वर्ग बनविते. याच्याही पुढे जाऊन तिला वाटते की मला जन्मो जन्मी हाच पती मिळो. याच्यापेक्षा पुरुषाला मिळणारी आदिम प्रेरणा कोणती असेल. पुरुषाने तिची भावना, कोमलता आणि प्रसन्नता जपली पाहिजे. कविवर्य सुरेश भट यांनी त्यांच्या कवितेत म्हटलं आहे. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो ।  तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. म्हणूनच तर....वट पौर्णिमा...आहे मनोहर तरी, हे सुभाषित वापरण्याचा मोह टाळता आला नाही.

"आहे मनोहर तरी" हे सुभाषित नसून ते पद्मश्री पु.ल.देशपांडे यांची पत्नी सुनीता देशपांडें यांचं पु.लं. चं मागोवा घेणारे पहिलं अजरामर झालेलं पुस्तकाचं नांव आहे, या सुवर्ण अक्षरांची आठवण झाली आणि वट पौर्णिमा आहे मनोहर तरी...झाली.