Sunday, 18 June 2017

प्रतिबिंब

एखाद्या कलाकृतीचे वैशिष्ट्यपूर्ण बारकावे शोधण्यासाठी आपण जेंव्हा निरीक्षण करतो आणि नकळत त्या कलाकृतीच्या बाजूलाच असलेल्या प्रतिबिंब वर नजर पडून त्याचं सौंदर्य न्याहाळत आपण वेडे होतो.  ताजमहल सारख्या एखाद्या विषयावर किंवा काल्पनिक भावना व्यक्त करण्यासाठी मराठीत शब्द साठा विपुल प्रमाणात आहे, तरी सुद्धा दर वर्षी काव्य लिहिली जातातच ना. कधी कधी बायकोला घेतलेली महागडी साडी सुद्धा आवडत नाही, तर तेवढ्याच पैशात पैठणी खरेदी करून बघा काय फरक पडतो ते. म्हणून कल्पना येतात तरी कुठून आणि त्या आपल्याला सुचतात तरी कश्या, आज काल असे प्रश्न विचारायच्या भानगडीत कोणी पडत नाही. कारण सुचलेल्या कल्पना प्रत्यक्षात या जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे किंवा आपल्याच बाजूला दैनंदिन जीवनात सहज प्रतिबिंबित झालेल्या असतात, घडत असतात.

असंच एक प्रचंड मोठं तळं पाण्याने अथांग पसरलेलं. त्यावरून उडत जाणाऱ्या  पक्ष्याच्या चोचीतून निसटलेलं आणि तेवढ्याच चपळाईने चोचीत पकडलेलं. त्यापासून पाण्याच्या पृष्ठभागावर उमंटलेले तरंग दूर दूर पसरत जातांना अस्पष्ट होत जातात. काही घडलं नसतांना अस्पष्ट वलये बरेच काही मनाला चाहूल लावून जातात. आयुष्य जगण्याची कला एक प्रकारे शिकवून जातात.

निवृत्त होऊन वर्ष होत आलं, जसं धावणारं कोळशाचं इंजिन रुळावरून जबरदस्तीने काढून ठेवलेलं. चालण्या शिवाय काही पर्यायच न उरलेला. सकाळी सकाळी रस्त्यावर कोणी नाही, आपणच एकटे पायी चालत आहोत. सारं शहर कसं निपचीत पहुडलेलं. कोणालाच कशी काळजी नाही, सर्व जगाची काळजी आपल्याला लागून राहिलेली आहे असं उगाच मला राहून वाटत होतं. एम आय डी सी च्या दिशेने काहीसा मंद असा छापछुप छापछुप असा जुन्या मशीनींचा आवाज येवून शांततेचा भंग करीत होता. चालता चालता गावं देवी मंदिराजवळ जवळ येताच एक लहानसं तळं दिसलं. आणि मनाच्या गाभाऱ्यातलं निद्रिस्त पडलेलं शिंपलं हलकेच हेलकावे देत ओठावर शब्द रूपाने उघडलं. साधारणतः  माझा रिटायरमेंटच्या आठ ते नऊ वर्षापूर्वीची ही घटना असेल. त्या घटनेने माझ्या मनावर खूपच परिणाम झाला आणि मी कमालीचा बदलून गेलो.  झालं असं. त्या दिवशी फॉरेनेर्स च्या लोकांची कंपनीत व्हिजीट होती. म्हणून सकाळी लवकर उठलो. रात्रीचा पाऊस थांबून थांबून कोसळून सकाळी मात्र पूर्णपणे थांबला होता. सोसायटीतील झाडे भिजून चिंब झाली होती. झाडांची पानं स्वच्छ आणि नितळ दिसत होती. मी ही माझी अंघोळ आटोपून आज लवकर ऑफिस ला जाण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात आतून नेहमीचेच ठरलेले डॉयलॉग्स ऐकू आलेत. चष्मा घेतला का. लोकल पास, पेन, स्वॅपिंग कार्ड चेक करा. केस अजून विंचरलेले नाहीत. हा घ्या कंगवा आणि खोबारेल तेलाची बाटली. बूट कापटातच आहेत, सॉक्स दोरीवरून काढून घ्या, चहा टेबलावर ठेवलेला आहे. रेकॉर्डिंग केलेली टेप सुद्धा एखाद्या वेळेस अडकू शकते हो, परंतु हे बायकांना जमतं तरी कसं. अशी सर्व्हिस तर पूर्वीच्या काळी राजे राजवाड्यातील राजे महाराजांना सुद्धा मिळत नसेल कदाचित. तरी सुद्धा या पस्तीस वर्षात आपण बायकोची कधीही तारीफ केली नाही. हे आज मला आठवल्यावर आश्चर्य वाटतं. आज तिला अदृश्य पणे धन्यवाद देण्यासाठी जेंव्हा मी तिच्याकडे कृतज्ञतेच्या नजरेने बघतो तेंव्हा माझ्याकडे बघून तिला लगेच शंका येते, "का हो बघता माझ्याकडे इतकं अधाशासारखं, हे काय वय आहे का तुमचं असं बघण्याचं"  मी त्यावर काय बोलणार. मला खरं म्हणजे तिला म्हणायचं होतं की तू आयुष्यभर माझ्याशी किती सात्विक पणे वागलीस, पण मी तिला मनातल्या मनात एवढेच म्हणतो, तुझं सुद्धा आता वय झालंय, पण तुझे केस अजून असे काळे कुळकुळीत का" ऑफीसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडताच  विसरलेला हातरुमाल बायकोने गॅलरीतून दिलाच. सकाळच्या पावसामुळे अंगण ओलं झालं होतं. सोसाटीचा बाहेरचा रोड पडून गेलेल्या पावसामुळे निग्रो सारखा भासत होता. घराजवळच रिक्षा स्टॅन्ड असल्यामुळे अवघ्या मिनिटातच मला शेअरिंग मध्ये रिक्षा मिळत असे. आजही एक रिक्षा जाण्याच्या तयारीत होती. आतमध्ये एक जोडपे बसले होते. लेडी उजव्या बाजूला तर पुरुष मधली जागा सोडून डाव्या बाजूला बसलेला होता. त्या माणसाने डोळ्यावर काळा गॉगल घातलेला होता. सकाळी सकाळी पाऊस पडून गेला असल्यामुळे हवेत गारवा पसरलेला होता. तरी त्या माणसाने काळा गॉगल का बरे घातला असावा. भारतीय घटनेने कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाला स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. कोणी कसं राहायचं आणि कसं वागायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. आपल्याला उगीच नाक खुपसण्याचं कारणच कांय. आज काल कोण कधी कशी फॅशन करेल काय सांगता येत नाही. ह्या माणसाने सकाळी सकाळी डोळ्यांवर काळा गॉगल का घातला, ह्या कोड्याचं उत्तर न शोधलेलं बरं. मला रिक्षात बसायचे होते म्हणून मी, तो गॉगल घातलेला मनुष्य मधल्या सीट पर्यंत सरकण्याची वाट बघू लागलो. एव्हाना ड्रायव्हरने रिक्षा सुद्धा स्टार्ट केली होती. मी अजून बाहेरच ताटकळत बॅग घेवून उभा होतो. परंतु तो पठ्ठ्या सरकेल तेंव्हा ना. मनातल्या मनात म्हटलं, सरक की जरा आंधळा आहेस का, तेवढ्यात त्याच्या बायकोने  माझ्या मनाची अवस्था ओळखली. तिने आपल्या नवऱ्याला अदबीने सांगितलं. अहो जरा इकडं सरका, त्यांना बसू द्या. तिने संगील्या प्रमाणे स्वारी लगेच तिकडे सरकला आणि मी आत मध्ये बसलो. रिक्षा 20 च्या स्पीडने धावू लागली. कारण डोंबिवलीचे रस्ते ह्या स्पीड साठी फिट्ट आहेत. पण माझ्या मनात अलग काहूर माजलं होतं. ह्या माणसाला थोडं सरकून जागा द्यायला काय हरकत होती की जे त्याच्या बायकोला समजलं होतं. परंतु पठया जागा द्यायला तयार नव्हता. माझा पण इगो दुखावला गेला होता. कारण मी एक नामांकीत कंपनीत मॅनेजर होतो. थोडी मी मनाची समजूत काढली की आजचा दिवस आपल्यासाठी नाही. अशी मनाची समजूत काढत असतांनाच शेवटचा स्टॉप म्हणजे डोंबिवली स्टेशन आलं. मी खाली उतरलो आणि त्या गॉगल घातलेल्या पुरुषाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. अन बघतो काय. माझा संतापाचा पारा एकदम शून्यावर घरंगळला. कारण ही तसंच होतं. I was really shocked. मी आतापर्यंत या दहा मिनिटाच्या अवधीत त्यांच्या बद्दल काय नाही तो वाईट विचार केला होता. मी माझ्या बुद्धीची स्वतःची किंव करावीशी वाटली, परंतु हे त्याच्याही पलीकडचं होतं. ती स्त्री रिक्षातून उतरताच त्या पुरुषाशी काही एक शब्द न बोलताच स्टेशन कडे निघून गेली. तो पुरुष रिक्षातून खाली उतरला, रिक्षा चालकास पैसे दिले आणि काठी टेकत टेकत हळू हळू रस्ता कापू लागला. एक जण पुढे येवून त्या माणसाला रस्ता पार करण्यास मदत केली. माझ्यातला मी मॅनेजरचा इगो झटक्यात जमिनीवर काही आवाज न करता आदळला होता. मी ज्याच्या बद्दल जो काही विचार करत होतो तो किती चुकीचा होता. ती स्त्री त्याची बायको नव्हती आणि तो मनुष्य ही खरोखरच अंध होता. ती स्त्री आणि तो अंध पुरुष दिसेनासे होई पर्यंत मी त्यांच्या पाठमोरी आकृतीकडे बघत राहिलो. मला कळून चुकले होते, समोरच्या घटनेचा, व्यक्तीचा वेध न घेतातच नकारात्मक विचारसरणीच्या गुणांवर आपण अधिराज्य करत होतो आणि त्यांना मनात जोपासत होतो. त्यामुळे याच्या पुढे समोरच्या व्यक्तीचा,  कुदरतचा आपण आदर करणं शिकलं पाहिजे. आपल्या अंतरंगात नकळत जोपासत जाणारे नको असलेले गुण काळजी पूर्वक तपासत राहीले पाहिजे.

अशी भरपूर शिंपले आपल्या मनाच्या गाभाऱ्यात जमा झालेली असतील, आणि न जाणे, ओठावर येवून उघडण्यासाठी  ती आतुरतेने वाट ही पाहत असतील.

पहिल्या पानावरची शाई वाळते न वाळते तोच दुसरं पान उघडण्यासाठी वाऱ्यानेच फड फड करावं आणि दुसऱ्या पानावर लिहिण्यासाठी मन आतुर व्हावं एवढी घाई त्या वाऱ्याला का बरं झाली असावी. मला धडा शिकविण्या साठी कुदरतने जणू विडाच उचलला होता. त्या दिवशी घरी श्राद्ध असल्यामुळे  मी ऑफिसला दुपारून साडे अकराच्या दरम्यान निघालो होतो. लोकल ट्रेन ला तुफान गर्दी असल्यामुळे मी जवळ जवळ तीन वर्षांपासून खासगी व्हेईकलनेच ऑफिसला जाणे पसंद केले होते. आज सुद्धा व्हाया म्हापे मार्गानेच जात होतो. दुपारचा साडेबाराचा सुमार. ऊन मी म्हणत होतं. म्हापे चौकात मी एखादी प्रायव्हेट व्हेईकल मिळते का त्यासाठी ताटकळत उभा होतो. प्रचंड धुराळा आणि रखरखीत ऊन त्यामुळे जीव अगदी मेट्याकुटीला आला होता. कंपनीत वेअरहाऊसिंग आणि डिसपॅच या साऱ्याच गोष्ट हँडल कराव्या लागत असल्यामुळे सतत कस्टमर चे फोन येत होते. भर उन्हात कोणीच लिफ्ट देत नव्हते. माझ्या आजूबाजूचे सर्व जण कोणत्या न कोणत्या सोयीने निघून गेले होते. आता मलाही वाटू लागले होते की आपणही घरी वापस निघून जावे, परंतु तेवढ्यात एक टेम्पो येवून उभा राहिला. थोडक्यात आपला वनवास संपला असंच वाटून गेलं. टेम्पो चालकाची केबिन सोडून मागचा भाग सामानाची वाहतूक करण्यासाठी ओपन ट्रॉलीचा होता. सरळ विचार करण्यासारखं होतं की कुरियर वाहतूक करणारी गाडी असावी, अन तेवढेच पाच रुपयांचं भाडं मिळतंय म्हणून टेम्पो चालकांनी गाडी थांबवली होती. टेम्पो चालक हा सरदारजी होता. तो माझ्यापेक्षा मराठी सुंदर बोलत होता म्हणून मी त्याचं कौतुक ही केलं. मी त्याला विचारलं, सरदारजी आप दिनभर माल की याता यात करते हो,  ये ठीक है । लेकींन मुझे समझमे नही आँ रहा है कीं आपने केबिनमें एअर कंडिशन क्यों लगवाके रखा है । त्याने फक्त माझ्या कडे हसून बघितले. आणि उत्तर देण्याचं मात्र टाळलं याचं मला आश्चर्य वाटलं. थोडं पुढं गेल्यानंतर त्याने मला विचारलं, आप कौन सा कंपनी मे काम करते हो. और कौनसा पोझिशन है आपकी । मी उत्तर देत गेलो परंतु असंही वाटू लागलं की हा सरदारजी का एवढ्या चांभार चौकश्या करतो आहे. बरं तो इथंच थांबला नाही, त्याने पुढे हेही विचारलं की, आप जो कंपनी मे काम करते हो उसका क्या प्रॉडक्ट है और कितना टर्नओहर है आपकी कंपनिका । आता हे अतीच झालं असं मला वाटायला लागलं, म्हणून मी ही त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलं. तेवढ्यात माझं गंतव्य स्थान आलं. सरदारजीला मी हातानेच इशारा केला की मला इथे उतरायचं. टेम्पोतून उतरल्या बरोबर मी सरदारजीला भाड्यापोटी पाच रुपये देवू केले परंतु त्याने घेण्यास नकार दिला. परत मी त्याला पैसे घेण्यासाठी विनंती केली. नंतर त्याने मला जे काही सांगितले त्याच्या नंतर मी एकदम जमिनीवर लॅन्ड झालो. माझ्यातला मॅनेजर मला फार छोटा वाटायला लागला. तो सरदारजी एम आय डी सी रबाले मधील तीन कंपन्यांचा मालक होता. ती व्हीआयपी व्यक्ती होती. एका राजाने आपल्याला त्याच्या सिंहासनाच्या बाजूला बसविण्याचा मान दिला होता. एका करोडपती व्यक्ती एवढा शालीन आणि विनम्र असू शकतो हे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. जगात दरवर्षी फोर्ब्ज कंपनी श्रीमंतांची यादी जाहीर करते. परंतु एका गर्भ श्रीमंत व्यक्ती कडून अशी विनयशील नम्रता मी पहिल्यांदाच बघत होतो. मला ड्रॉप करून तो सरदारजी मला आभार मानण्याचं अवसरही न देता केंव्हाच निघून गेला आणि आयुष्य जगण्याचं तत्व मात्र शिकवून गेला. माझ्यातला इगोने माझं पितळ परत उघडं पाडलं होतं. मी मात्र त्या पाठमोऱ्या गाडीकडे किती तरी वेळ बघतच उभा होतो. आयुष्याच्या वळणावर कोण तुम्हाला कुठे भेटेल हे ही गुपित परमेश्वराने अजून त्याच्या जवळच ठेवलेले आहे.

No comments:

Post a Comment