Saturday, 21 October 2017

शीतचंद्रलोक दिवाळी पहाट 2017



दिवाळी पहाटचं आगमन होत आहे हे बघण्यासाठी शीतचंद्रलोक कुटुंबियांना कॅलेंडर मध्ये डोकावं लागत नाही. काळाची रेती पायाखालून अखंड सरकते आहे. ऋतुचक्राचा नाद कानात अव्याहत घुमतो आहे. दिवस रात्रीच्या डोळ्यांची उघडझापही अविश्रांत चालू आहे. आणि प्रगतीचे वारे वेगात वाहत असले तरी नभातला चंद्रमा तोच आहे. स्वच्छ निळेभोर आकाश आणि त्यावर तरंगणारे विरळ पांढरे ढग आणि लसलसीत नवी कोरी उबदार हवा अश्या या आभाळी मंडपाखाली शितचंद्रलोक मधील कलामंचाच्या स्टेज वर पडद्याच्या मागे दिवाळी पहाटचं अमृताहूनी गोडं हे चौथं पुष्प गुंफण्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. पडदा सरकायला अवधी नव्हता मुळी !  तरी रसिक प्रेक्षकांना धीर कुठे होता कारण तोरणांनी सजलेला मंडप, युवक युवतींची लगबग, अंगणातलं बोलकं तुळशीवृंदावन, त्याच्या भोवती भव्य रांगोळी आणि विहीर या आकर्षणामुळे मनात उठलेल्या तरंगांना रसिक आवरू शकत नव्हता. नेहा गाडगीळने पहिल्या गाण्याचं अनाउन्समेंट करताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं खरं, विमानाने टेकऑफ करावं आणि क्षणात हवेत तरंगणाऱ्या पांढऱ्या शुभ्र ढगांतून स्वर्गीय आनंद देणाऱ्या पहाटेचा प्रवास घडावा. अथांग जलाशयातल्या पाण्याच्या पृष्ठभागावर उमटलेली वलये  मिटून शांत व्हावीत त्याप्रमाणे वातावरण सुन्न आणि शांत झालं.

उजळुनी आलं आभाळ रामाच्या पारी

सकाळच्या राम प्रहरी शेतकरी दादा आडवा पहुडलेला असतांनाच तो जागा होतो आणि आपल्याला उठायला उशीर तर झाला नाहीना या चिंतेत कुठलाही आळस न देता उठतो आणि गोठ्यात कामाला लागून बैल जोडीला चरावयास नेतो. भुवड साहेबांचीं ही अदा आणि त्यांच्यातला गावठी रुबाब पाहून,  काय बोलू कौतुके परी ते अमृतातेही पैजा जिंके.  दिवाळी पहाट मधला हा अवर्णनीय प्रसंग ज्यांनी ज्यांनी अनुभवून बघितला तोही धन्य झाला असेल कदाचित. इथे वन्स मोअर नाही तर "सेम अगेन इयर अँड इयर" हाच परफॉर्मन्स आम्हाला दरवर्षी पाहिजे अशीच दाद द्यावी लागेल. अप्रतिम असतं ते केवळ अप्रतिम.

बारा सोडा गडणी त्या अवघ्या कामिनी ओव्या गाऊ बैसुनी तू येरे बा विठ्ठला ।

सवाशिणी (कामिनी) मिसेस भुवड, मिसेस कांडके, मिसेस फडतरे  नटून थटून सकाळच्या प्रहरी पक्ष्यांच्या किलबिलाटात विहिरीवर पाणी भरायला येतात. डोक्यावर हंडा आणि कमरेवर कळशी ठेवून पदर सावरीत, आयुष्याचा बॅलन्स सांभाळणाऱ्या त्या लाल गुलाबी सावरी घोळ शालूचा आवरत आवारत लगबगीने आपल्या घरी निघून जात असतांना मारुती देवळाच्या पारावर बसलेल्या बाबाला नक्कीच प्रश्न पडला असेल कोणाच्या बरं या लेकी सुना !!

कोंबड्यानं बांग दिली मला गं बाई जाग आली, सुपातं जोंधळ घोळीते। घेऊनी  बोटा, मारुनी खुंटा । जात्यावर दळण दळीते।                                  

घरातली लक्ष्मी नऊ वारी साडीत अंगण झाडताना, तुळशी वृंदावनला पाणी घालतांना, आणि सुपातलं जोंधळं पाखडतांना, लाकडाच्या मोठ्या उखळीत दळण कांडताना मिसेस फाटक, मिसेस पावसकर, मिसेस फडतरे, मिसेस गावडे आणि मिसेस सनगरे या कलाकाराचं अप्रतिम अभिनयाचं मौलिक लेणं बघतांना थोडा वेळ का होईना आपण शितचंद्रलोक मध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम बघत आहोत हे विसरायला झालं होतं.

सासू आणि सासरा, दीर तो तिसरा । ओव्या गाऊ भ्रतारा तू येरे बा विठ्ठला ।।
जात्यावर दळण दळतांना मिसेस गावडे आणि साक्षी सनगरे यांनी मारलेली बैठक या दोघांचा उतुंगं अभिनयाचा अविष्कार काय वर्णावा. शब्द कितीही घासून पुसून टाकले तरी, इथे सौंदर्य मूल्याची कसोटी लावणे हे मला न पेलवणारे धनुष्य आहे.

गांव जागवीत आली वासुदेवाची स्वारी.

त्याचं ते तुरु तुरु नाचणं, डोक्यात लांबडी मोरपीसी टोपी, मोठा घेर असलेला बंडी सारखा झगा , घेर धरून चौफेर नाचतांना मोराचा पिसारा फुलावा तसा त्या बंडीचा चुण्या उलगडून मोरपीसी फुललेला चौफेर घेर आणि भिक्षा मागण्यासाठी गळ्यात खांद्यावरून झोळी, आणि सुपातून दान देतांना गृहिणीला दिलेला आशीर्वादाचा अविष्कार बघतांना धन्य वाटलं. सारंच काही अफलातून जमवलं ते श्रीयुत सनगरेनीं. तुमचं कौतुक करायला आणि शब्दांकन करायला मला पौणिमेच्या चांदण्यात बसावे लागेल.

समुद्र मंथनातून एकेक रत्ने बाहेर पडावीत त्याप्रमाणे या गाण्याचे एकेक पदर उलगडवितांना कलाकारांनी किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज बांधता येत नाही. म्हणूनच सहज ओठावर ओवी रेंगाळते, ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला. असे म्हणतात ना, की कॅमेराने काढलेले छायाचित्र कधी खोटे बोलत नाही, खरे तर छायाचित्राबाबत असे खोटे विधान असूच शकत नाही. म्हणून या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा प्रत्यक्ष हजर राहून आनंद घ्यायलाच हवा.

तू सुखकर्ता तू दुखहर्ता आणि मागील वर्षी "शेत बघा आलंया राखणीला" मिसेस पावस्करांचा खूप प्रामाणिक प्रयत्न असतो. गाण्याची निवडीला दाद द्यावी त्या अश्या गायनाला.

अमृताहूनी गोडं नाम तुझे देवा  - मिसेस सनगरेंचा आवाजात जादू आहे (मागील वर्षी "मला हे दत्तगुरु दिसले") देवांवरची श्रद्धा  लाभलेल्या स्वरातून दिसून आली.

2015 मध्ये कांडके सरांनी शोधिसी मानवा, 2016 मध्ये देव माणूस देवळात आला आणि या वर्षी झुंजूमुंजू पहाट झाली , कोंबड्यानं बांग दिली. लेखनापासून ते गायनापर्यंत नंतर गायनापासून ते अभिनयाकडे ही प्रगतीची पाउले अशीच पडू दे । यश तुम्हाला सतत मिळुदे ।

उर्वी गाडगीळ -  पिया बिन तरसत दिन रैन

क्लासिकल गाणे गाण्यात आणि तिच्या आवाजात कमालीची तरलता आहे. तिचं गाणं नुसतं ऐकतच राहावं, मेरी आवाज ही मेरी पहचान है ।  मला माहीत नाही ही मुलगी हसरी आहे किंवा शांत आहे पण दोन तासांच्या मंगलमयी दिवाळी पहाट च्या  कार्यक्रमात तिचं बहरून येणार स्मित हे कार्यक्रमाच्या सौंदर्येत भर टाकीत होतं.

मी.गाडगीळ साहेब - तोच चंद्रमा नभात. म्हणूनच अजून वास येतो फुलांना आणि या शीतचंद्रलोक मातीचा गंधच वेगळा असं तुमच्या गाण्यातून जाणवलं. प्रथा आहे बोलण्याची, बाप तशी लेक असं म्हणतात परंतु  इथे वडील मुलीच्या पावलावर पाऊल ठेवून गात आहेत असा भास होतो. 2015 दिवाळी पहाट मध्ये गायलेले " शुक्र तारा, मंद वारा, तू अशी जवळी रहा" तुम्हाला बघितल्यावर हे गाणं अजून सहज ओठावर दरवळतं. पुढच्या 2018 च्या दिवाळी पहाटमध्ये तुमच्या आवाजात  हे गाणं अजून रसिकांना आकर्षित करेल.

मिसेस गोठीवरेकर - तुमच्या सुरातलं शंभो शंकरा करुणाकरा या गाण्याला मिळालेला वन्स मोअर ही पोच पावती जपून ठेवण्या सारखी आहे. पण 2015 मध्ये गायलेले "साजणबाई येणार साजण माझा" या अश्या लावणीची अपेक्षा करीत रसिक हट्ट करून बसला होता ही कलाकाराला मिळालेली उत्स्फूर्त दाद आहे.

मिसेस गावडे - बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग बाई. मिस्टर गावडे हे पहिल्याच रांगेत बसले होते. म्हणूनच की काय, गाणं अतिशय सुंदर आणि थाटामाटात झालं असेल कदाचित, असं रसिकांच्या मनात अजिबात नाही. परंतु रसिकांनी भरभरून दिलेल्या टाळ्यांचा प्रतिसाद हीच अस्तिवाची तुमची ओळख निर्माण झाली आहे. मागील वर्षी गायलेलं "मायभवानी तुझे लेकरू" अजून स्मरणात आहे.

कु.अस्मि परुळेकर - चाफा बोलेना । चाफा चालेना आणि मोगरा फुलला. या बाल वयात अशी गाण्यांची निवड उत्कृष्ट तर आहेच आणि सूर ही तुला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. सुंदर आणि अप्रतिम या शब्दांचा मिलाप तुझ्या गायलेल्या गाण्यात होतं.

तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालेना - उर्वी आणि नेहा

नेहाचं सूत्र संचलन परिपक्व असं म्हणावं लागेल. रंगमंचकवरून निवेदन करतांना पाय डगमगायला होतात हे माझे अनुभवाचे बोल आहेत, परंतु तू कुठेच अडखळलीस नाहीस. तुमच्या दोघींचं कौतुक करण्यासाठी मला त्याच कवितेचा आधार घ्यावयासा वाटतो की मी, मिसेस गाडगीळांच्या वाढदिवसाला दोनवर्षपूर्वी शुभेच्छा रुपी दिल्या होत्या.

दोन रेशीम धाग्यांनी  ।  विणलं आयुष्याचं महावस्त्र। लाभला दोन कळ्यांचा ।  आयुष्याला मऊशार वाळूचा स्पर्श ।

मिसेस फडतरे -  यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी ।   छान गायलं, प्रेक्षकांनी खूप दाद दिली. काहींनी साहित्यिक शिट्या मारण्याचा देखील प्रयत्न केला. वन्स मोअर देऊन आपल्याला भरभरून वाहवा मिळाली.

हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे -  ओम, श्रावण, येश, हर्ष अस्मि. समूह गान तुम्ही सुद्धा खूप खूप चांगलं गायलं. तुमचं कौतुक केल्याशिवाय पूर्णविराम देता येत नाही.

एकंदरीत शीतचंद्रलोकमधील सदस्य आणि कलाकार फार उत्सव प्रिय झाली आहेत. तो सण नात्यांचा असो किंवा परंपरेचा. याला कारणही तसंच आहे. आपण पाणी पितो त्याच्या एकेक ओंजळीमागे दूर कुठेतरी वाहणारा झरा असतो, पण आपणास हे जाणवत नाही. कोणी आपल्याला स्टेजवरून गायला सांगितलं तर ते आम्हाला शक्य आहे का. नाही. त्यासाठी कलाकारच हवेत. आणि ते कलाकार याच शीतचंद्रलोक भूमीतून तयार होतात म्हणून ताजे गुलाब फुलतात तरी कसे याचं रहस्य उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या अथांग वसुंधरेवर माती तर सर्वच ठिकाणी विखुरली आहे. पण प्रत्येक ठिकाणी मातीला आकार देणारा कुंभार तेथे नसतो. परंतु त्याचं वास्तव्य आपल्या येथे जरूर आहे. भारतीय सणांची, उत्सवांची सांस्कृतिक मूल्य जपण्याची तळमळ, सर्जनशीलता श्रीयुत कांडके साहेबांच्या प्रतिभेत आहे. त्यांनी आपल्या सोसायटीला एक उच्च स्थान प्राप्त करून दिले आहे. बारा लाख लोकसंख्या असलेल्या डोंबिवली शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतके दिवाळी पहाटचे कार्यक्रम साजरे झाले असतील कदाचित. आणि ज्या सोसायटीत दिवाळी पहाट साजरी केली जाते त्या सोसायटीत आपण राहतो याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या सोसायटीत कला ही रुजवली गेली आणि ती नसा नसातून भिनली. त्याची ओल आतपर्यंत झिरपली. नविनपणाच्या  बिया रुजल्यात आणि शितचंद्रलोकच्या पाणथळी निर्माण झाल्यात. म्हणून दिवाळी पहाट सारखं पुष्प येथे सहज फुलतं. दिवाळी पहाटला फक्त तीस वर्षाचा इतिहास असला तरी ही दुर्मिळ उपलब्धी दरवर्षी श्रीयुत कांडके सर आणि त्यांची टीम, सोसायटीतील सदस्यांना निर्माण करून देतात. याचं वर्णन करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी शब्द अपुरे पडतात. शेवटी कांडके सरांना व त्यांच्या टीमला आणि कलाकारांना ओंजळ भरून धन्यवाद.

निरागस

परत एकदा ते निरागस बालपण हवे

मला सहज अलगद उचलून पाळण्यात टाकावे

माझे काका-काकू, आजी-आजोबा, अन आई-बाबा

त्यांच्या अंगा खांद्यावर परत एकदा

निजावे, खेळावे, हिंदळावे

पहाटेच्या कुशीत परत एकदा शिरावे

गवताच्या पात्यावर चमचम करणारे दवबिंदू होवून

कळू न देता अलगद विरघळून लपून राहावे

हिरव्या देठावरची कळी होवुन

जरा वेळ फुलणंच थांबवावं

आईच्या पदराखाली

जसे शुभ्र पाण्याच्या झऱ्याखाली

नदीसारखे एकरूप व्हावे

परत एकदा ते लहानपणीचे बाल्य हवे


Sunday, 15 October 2017

रविवार सकाळ


बरोबर सकाळचे 8.30 वाजलेत. सकाळी चहा हवा असतो ना, म्हणून दुध घेण्यासाठी बाहेर पडलो. पाऊस आपली हजेरी लावून निघण्याच्या तयारीतच होता पण झिरमीर झिरमीर चालूच होता. मी पण गरज नसतांना छत्री बरोबर घेतली. छत्री ऊघडली तेवढ्यात न्युजपेपर टाकणारा मुलगा हातात पेलवेल एवढं वर्तमानपत्राचं मोठं  बंडल घेऊन सोसायटीच्या अगोदरच सताड उघड्या असलेल्या गेटमधून आतमध्ये शिरला. त्याला म्हणालो बाबा वरचा पेपर ओला होतो आहे छत्रिचा वापर कर, योगायोगाने वरचा पेपर माझाच होता, परंतु त्याला काही त्याची फिकीर नव्हती. मी त्याला बी वींग पर्यंत छत्रीत घेऊन सोडलं. शेवटी अनावर झालेला सकाळचा पाऊस माझी छत्री भिजऊनच शांत होत गेला आणि गेटच्या बाहेर पडताक्षणी क्षणभर मी थबकलोच. उजव्या बाजूला नजर टाकली आणि ते सकाळचं द्रुष्य डोळ्यात साठऊन घेतलं. एरवी कामावर जाणाऱ्या गजबजलेल्या वस्तीच्या या रस्त्यावर आज चिटपाखरू देखील नव्हते. कदाचित रविवार असल्यामुळे असु शकेल. डांबरी रोड मात्र ओला चिंब होऊन स्वच्छ निग्रोसारखा भासत होता. हवेत गारवा होता. रस्त्याच्या कडील झाडे कोणाच्या स्वागतासाठी जणू तबक घेऊन शांत ऊभी होती. मनात एक ऊसासा भरला आणि फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. जागो जागी पार्कींग केलेल्या अलीशान गाड्यामुळे रस्त्याचं सौंदर्य अधिकच वाढलं होतं आणि त्यामधून बहीणाबाई गार्डनला वळसा घेत सुनीलनगरवरून अशोकवाटीकेकडे गेलेला त्या स्वच्छ डांबरी रस्त्यावरून न थकता पळत राहावे, पळत राहावे अन नुसतं पळत राहावे असं वाटायला लागलं.....शेवटी पळण्याचा मोह आवरता आला नाही. बघा आपण देखील प्रयत्न करू शकता. हवी हवीशी वाटणारी सकाळ आपण राहतो तेथेच असते. सकाळ एवढी सुंदर असते तर पहाट किती प्रसन्न असेल.

Thursday, 5 October 2017

कोजागिरी पौर्णिमा

विविधतेने आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण नटलेल्या आपल्या भारतात वर्षभरातून अनेक सण आणि उत्सव एका पाठीमागून एक येत असतात. शरद ऋतूत अश्विन महिन्यात मध्यरात्रीला येणारा हा सण कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. दसरा यायच्या अगोदरच कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले होते. आता कुठे पाऊस उघडला आणि सूर्याच्या सहस्त्र किरणांनी सारी सृष्टी उजळून निघाली.  शेतातील टंच भरलेली बाजरीचं कणसं जमिनीकडे झुकायला लागलेली असतात, जसं काही सासरी गेलेल्या मुलीला माहेरपणाची ओढ लागावी. चांदण्या सारखा पांढराशुभ्र गाभा असलेलं कापसाचं ते हिरवकंचं  बोन्ड उमलायच्या तयारीत असते. ज्वारीची ताटं रखवालंदारासारखी आडोशाला उभी असतात. खळ्यात धान्याच्या राशी पडायला सुरुवात झालेली असते. धान्याच्या राशींना पहारा देण्यासाठी रात्री शेतकरी कंदीलाची वात मध्यम करून चारपायी खाट टाकून निरभ्र आकाशाकडे बघत रात्रभर खळ्यावरच त्याचा पडाव असतो. आकाश निरभ्र झालेले असते आणि आकाशातल्या चंदेरी ताटातून चांदण्यांची उधळण चालू असते. दसरा झाला की पाचव्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा येते. ह्या पौर्णिमेला अनेक नांवे जरी असली जशी अश्विन पौर्णिमा, शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, वाल्मिकी पौर्णिमा परंतु सर्वसाधारण निळ्या आभाळातून उतरणारी शरदातल्या चांदण्यातली कोजागिरी म्हणूनच ती सर्वज्ञात आहे. चांदण्या रात्रीत चूल पेटवून दूध तापवत ठेवायचे, त्यात केशर, वेलची, सुका मेवा, चारोळ्या, जायफळ टाकून आटवायचं. मध्य रात्रीच्या प्रहारात चांदण्यात चांदणं मिसळलेलं असतं अन सारे वातावरण कोजागिरीमय झालेले असते. सोसायटीतील सभासद  वर्गणी काढून सर्व लहान थोर मंडळी कोजागिरी आनंदाने साजरी करतात. एका बाजूला पटांगणात निरनिराळ्या प्रकारचे स्किल वापरून खेळ आयोजित केलेले असतात तर दुसऱ्या बाजूला मसाला दूध आटविण्याची प्रक्रिया  चालू असते. त्या चंद्राच्या मंद प्रकाशात आटवलेलं दूध प्रत्येकाला पिण्यासाठी दिलं जातं. त्या कोजागिरी चांदण्या रात्रीतला अनुभव काय वर्णावा ! काय स्वाद असतो त्या दुधाचा. !!

Monday, 2 October 2017

दिवाळी पहाट

या वर्षाचा पाऊस पृथ्वीच्या चराचरात, अणूरेणुत बरसला. नद्या नाले तलाव पाण्याने तुडुंब भरून आलीत. पेहरणीनंतर महिन्याभरात पिके डोलू लागलीत. समुद्रातून एका मागून एक अमूल्ये रत्ने बाहेर पडावीत त्याप्रमाणे पोळा सण करे गोळा असं एकामागून एक सण येण्यास सुरुवात झाली. दसऱ्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला चोहीकडे लक्ख चांदणं पसरलं. सारी सृष्टी चांदण्यात उजळून निघाली. दृष्ट  लागू नये म्हणून निसर्गाने हे सर्व चांदणं आपल्या झोळीत जणू काय भरून घेतलं आणि कानठळ्या सुन्न करणाऱ्या परतीच्या पावसाला  सुरुवात देखील केली परंतु त्याचा खरोखर परतण्याचा विचारच दिसत नाही असं वाटायला लागलंय. वरून दिसत नसल्या तरी भरून आलेल्या भुईमुगाच्या शेंगा जमिनीतून वर येण्यासाठी डोकावू लागल्या आहेत. ज्वारी बाजरीची कणसं टंच भरून आली आहेत. कापसाची बोन्डे उमलायला लागलीत. उडीद, मूग, चवळी, कुळीथ कधीच धाब्यावर सुकायला घातलीत. नुकत्याच लग्न झालेल्या मुली माहेरी दिवाळी सणाला देखील आल्यात. नाही म्हणता दिवाळी सुरू झाली. आणि वेध लागले दिवाळी पहाटचा आनंद लूटण्यासाठी.

आपल्या मनाला हवी हवीशी वाटणारी पहाट कधी कधी वाट पाहूनही आपल्याला भेटायला येत नाही. पण आज दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी पहाट आपल्याला जरूर भेटणार आहे. म्हणून निरव शांततेत कड्याक्याची थंडी जरी नसली तरी हवेत हवा हवासा गारवा जरूर आहे.

प्रभु, तुम्ही मानवाला पृथ्वीवर नितांत सुंदर, स्वर्गीय आनंद देणारी, पहाट निसर्गाच्या चौकटीत प्रत्यक्षात आणून दिली आहे, की ज्या क्षणाला चंद्र आणि तारे एकमेकांचे निरोप घेत असतात. आणि क्षितिजावर सूर्य आपल्या कोवळ्या सोनेरी किरणांचा पिसारा फुलविण्यासाठी आतुर झालेला असतो.  दिवसभर काम करून थकलेला मनुष्य त्यावेळी निद्रेतच असतो !  "देवदूता, हे दिवस आणि रात्र एकाच भिंतीच्या दोन बाजू आहेत. भिंतीच्या अलीकडे दिवस आणि पलीकडे रात्र हाच काय तो फरक आणि हे विभाजन मानवाच्या कल्याणासाठीच निर्माण केले आहे. क्रूस बदलणाऱ्या या ऋतुचक्रात जसा मी दिवस निर्माण केला तशी रात्र ही. दिवसभर तो जसा कामात व्यग्र असतो तसा तो रात्री विश्रांती घेत असतो. याच्यात त्याचं काय चुकलं नाही. देवदूता आपण पृथ्वीतलावर जावून एक फेरफटका मारू या म्हणजे माझं म्हणणं तुला कळेल आणि तुझं समाधान होईल. हे बघ सकाळी सकाळी पहाटेच्या निरव शांततेत खाली उजेड येत असलेल्या समोरच्या घरात काय संभाषण चाललंय, बघू या तर" !

त्याने, झोपेतूनच डोळे न उघडताच तिला विचारलं, "अगं आज भल्या पहाटे ही वर्दळ कसली चालली आहे ! हा तबल्याचा आवाज, आणि ही लांबून येणारी मंगल धून कानाला किती गोड वाटते आहे. कोण गात असेल बरं ह्यावेळेस". "अहो घरधनी, उठा बरं, दिवाळीचा पहिला दिवस आहे ना आज, मग पहिल्या दिवसाची ही पहिली पहाट म्हणजे दिवाळी पहाट". त्याच वेळेस रवींद्र भटांचं आशा भोसले यांनी गायलेलं गाणं रेडियोवर चालू होतं. त्याची लक्ष्मी सुराला सूर जुळवून त्या गाण्याला बारीक आवाजात साथ देत होती.

उठी श्रीरामा । पहाट झाली । पूर्व दिशा उमलली । उभी घेऊनी कलश दुधाचा । कौसल्या माउली।

"म्हणजी ! नाही समजलं गं मला काय म्हणतेस तू ते" ! "दिवाळीचा पहिला दिवस उजेडायच्या अगुदर जी पहाट असतेना, तिला दिवाळी पहाट म्हणत्यांत" ! "आणि हे तुला कसं गं माहीत" ! "अहो वर्तमान पत्रात वाचलं आहे मी बऱ्याच दा, आणि मी काय अडाणी आहे होय"! "बरं चल, मला अंघोळीला पाणी घाल, मी पण जातूया तेथे कसली गडबड आहे ती बगून येतो. अहो पानी कवाचच तयार आहे, व्हा मोरीत. चला मी तुमच्या अंगाला, डोसक्याला उंटणं लावून देते. अंघोळी नंतर ही नवीन कापडं घाला आनी जावा लवकर, वापस आल्यावर मला बी सांगा काय काय जालं तें".

"प्रभू , ऐकला ह्या नवरा बायको जोडीचा संवाद. या गडीला चांगली आणि स्वस्वरूप अशी लक्ष्मी मिळाली आहे. धन्य प्रभो अगाध आहे तुझी लीला. एवढया रामप्रहरी नवीन कपडे घालून हा गडी कुठं निघाला लगबगीनं. चला बरं आपण जावू याच्या पाठीमागनं.!

अभ्यंगस्नान करुन पहाटे पाच वाजल्या पासून प्रसन्न वातावरणात गुलाबी थंडीचा अनुभव घेत मराठमोळ्या वेषात बरीच गर्दी भव्य निरभ्र आकाशाच्या मंडपाखाली जमा झाली होती. तरुण युवती साड्या नेसून आल्या होत्या. स्रियांनी भव्य रांगोळी काढली होती, त्याभोवती पणत्यां लख लखाट करीत होत्या. रांगोळ्या आणि आकाशदिव्यांनी त्या इमारतीचा परिसर सजवण्यात आला होता. त्या शांत वातावरणात सुगंधी उटण्यांचा घम घमाट सुटला होता. चहुदूर मंगलमय वातावरण पसरले होते. हवेत रेशीम थंडी जाणवत होती. त्या इमारतीच्या प्रांगणातील चबूतऱ्यावर कलाकार मंडळी मांडीला मांडी लावून दिपमाळेसारखी एका पंक्तीत बसली होती. उगवत्या सूर्याची किरणे डोकावण्यापूर्वीच गणपती स्तवनचे समूह सूर छेडले गेलेत. आणि मैफिलीला प्रारंभ झाला. नंतर एका मागून एक अशी सुरेल आवाजाची गाणी गायली गेलीत आणि आनंदाचे स्वर फुलून गेलेत.

माय भवानी तुझे लेकरू, मला हे दत्त गुरू दिसले, सूर तेच छेडिता, धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, देव माणूस देवळात आला, तसेच साजणी बाई येणार साजन माझा या गाण्यावर तर वन्स मोअर चा  पाऊस पडला. एक तासाचा भरगच्च कार्यक्रम यथोचित पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर काही जेष्ठ मंडळी एकमेकांना आलिंगन देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत होते.

"आलात तुमी, सांगा बरं कार्यक्रम कसा जाला तो". "अगं खूपच छान कार्यक्रम झाला. मुली साड्या नेसून सवरून सावरून आल्या होत्या. लहान मुलं बी नवीन कापडं घालून आली होती. टेज समोर लई मोट्टी रांगोळी काडली होती. टेजवर बरीच मंडळी एका लायनीत बसली होती. सकाळची वेळ असल्यामुळे लै फ्रेस वाटत होतं. कोनी गाणी म्हणली, कोनी कविता वाचून दाखविल्या. कविता म्हंजी एकंदरीत आपन बोलतो तसं नसतं, पन आपल्याला कळतं ते काय म्हणत्यांत ते. सकाळच्या प्रहारी पेटी तबल्याच्या आवाजात भान हरपून गेलं. शेवटी एक लई झकास लावनी म्हटली गेली. अवो काय बेस्ट लावनी झाली सांगू. तिथल्या एका साहेबासनी शिटी मारून जोरात दाद दिली ! आकाशात पक्षी भुर्रकन उडून गेल्या सारखी वाटली."

"देवदूता, या ब्रह्मांडात पहाट हा निसर्गाचा एक रमणीय अविष्कार आहे. पावसाळ्यात भरभरून मिळालेल्या समृद्धतेतूनच दिवाळीच्या सणातून त्याने ही कृतज्ञता जपली आहे. आणि दिवाळी च्या मंगलमय पहाट च्या माध्यमातून त्याने आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही दिवाळी पहाट त्यानेच निर्माण केली आहे. म्हणून  दिवाळी पाहटचा खरा आनंद लुटण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घ्यायलाच हवा.

"देवदूता क्षितिजावर हालचाल सुरू झालेली आहे, तत्पूर्वी आपण तेथे पोहचायला हवं" !