Sunday, 28 January 2018

नवे पंख

मला आठवतो तो दिवस 31 जुलै 2015. ऑफिसात त्या दिवशी प्रत्येकजण माझ्याशी हस्तांदोलन करण्यात उत्सुक होता. कारण त्या दिवशी मी निवृत्त होणार होतो. दिवसभर फोन वरून रिटायरमेंटच्या शुभेच्छा आणि अभिनंदनचे मेसेजेस. मी अक्षरश: भारावून गेलो होतो. संध्याकाळी चार वाजता सेंडऑफ झाला. सेंड ऑफ झाल्यानंतर सुद्धा मी काही consignments despatch केल्यात. शेवटच्या सेकंदपर्यंत काम केल्याचं समाधानाने गिफ्टचे बॉक्सेस घेवून मी जड पावलांनी घरी आलो. अंतःकरण एकदम जड झाले होते. परंतु चेहऱ्यावरचे हावभाव लपत नव्हते. मी निवृत्त झालो होतो. त्या वेदना जाणवत होत्या. घरी आल्यावर माझा चेहरा उमलला. बायकोने माझे स्वागत केले. थोडक्यात मी आपल्या आयुष्यात कसं योगदान दिलं आणि कुटुंबाचा गाडा कसा ओढून आणला अशी गर्वाने माझी छाती फुगून गेली. स्वर्गातल्या अप्सरा तुमच्या मागेपुढे चवऱ्या ढाळतील अश्या थाटात मी घरातल्या त्या आजूबाजूला फुगे लावलेल्या छोटया खुर्चीवर विराजमान झालो, परंतु गरम हवेचं बाष्पीभवन व्हायला वेळ लागला नाही. आणि लक्षात आलं, एकशेविसच्या स्पीडने धावणारं एक धावतं कोळशाचं इंजिन पटरी वरून खाली उतरवून आपल्याला जमिनीवर सोडून दिलं आहे आणि गेले सर्वजण निघून आपल्या मार्गाला.

रिटायर होवून एक आठवडा झाला, पण बोलायला कोणी नाही, चक्क तोंडाला कुलूप लावल्या सारखं. देवाने तोंड,नाक, कान, जीभ हे काय फुलांसारखे मिटून घेण्यासारखे थोडे दिले आहेत आपल्याला. शेजारी पाजाऱ्यांचे दरवाजे बंद. पिन ड्रॉप सायलेन्स. बरं  आपल्या मिटलेल्या तोंडाच्या कुलुपाला कोणाचीच किल्ली लागत नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त. दुसऱ्या दिवशी खुर्चीला बिलगलेल्या फुग्यातली हवा हळू निघायला सुरुवात झाली होती.  झुकू झुकू आगीन गाडी, धुराच्या रेषा हवेत काढी हे रेडियोवर लागलेलं गाणं बरंच माझ्या मनाची समजूत काढत होते. मन कासावीस होत होतं, नव्हे अगदी रबरसारखं ताणलं जात होतं आणि तुटता तुटत नव्हतं. कोणाला सांगता ही  येत नव्हतं. सांगितलं तर त्याचे निरनिराळे अर्थ लावले जातील अशी भीती वाटत होती. शांतपणे भिंतीवर शेपटी हलवत बसलेली पाल वाकुल्या दाखवत होती. त्या पालीवर झाडू घेऊन सुसाट तिच्यामागे पळत जावून दोन तीन फटकारे मारून आपला राग व्यक्त केला. पण झालं काय, झाडूचे दोन तुकडे तर झाले ! आणि पाल ही पळून गेली.

आपण जेष्ठ  नागरीक आहोत. हे आपल्याला शोभत नाही. काहीतरी केले पाहिजे आणि हा गुंता सोडविलाच पाहिजे. भिंत असली म्हणजे तिच्यावर पाल फिरणारच, भाजीपाल्याची पिशवी घरी घेवून येतांना रस्त्यावर मांजर आडवी जाणारच, कोणाच्या घरात दूध अजूनपर्यंत ओतू गेलं नाही ! हे सांगा बरं. मग मी त्यांच्या पेक्षा वेगळा कसा. आपले कोणी कौतुक करेल !  का बरं अशी अपेक्षा करावी. आपणच आपल्या मुलांचे, नातवांचे, नातीचे कौतुक केले पाहिजे. त्यांच्यात रमलं पाहिजे. त्यांचे हट्ट पूर्ण केले पाहिजेत.

ऐन उमेदीच्या काळात जे आयुष्य जगायचं राहून गेलं होतं आता ती जगायची संधी आपल्याला मिळाली आहे, ती संधी सोडता काम नये. आणि अचानक बालपणाची मोरपिसे डोळ्यासमोर तरळू लागलीत. निळ्या अभाळाचे आणि चांदण्या रात्रीचे सौंदर्य रात्री धाब्यावर झोपतांना न्याहाळावे. अनेक ऋतुतले निसर्गातले बदलते मुड्स अनुभवावेत. कधी कधी कठीण प्रसंगांना सामोरे जावे. औदुंबराच्या झाडावरून डोहात उडी मारलेली आठवावी. शेतावर चक्कर मारणे, गोफणीत दगडाचा खडा ठेवून उभ्या पिकात भिरकावणे, पळसाला पाने खरोखर तीन असतात का ते मोजून बघावेत. रात्री शेतावर राखण करण्यासाठी कंदीलाची वात मोठी करून काकांबरोबर रात्र घालवावी. रात्रीच्याला भुईमुगाच्या शेंगा भाजून रात्रभर चांदणं न्याहाळत बसावं. बैल गाडीवर बसून कापसाच्या गाठी घरी घेवून येणे, बैल पोळ्याला बैलांच्या शिंगांना बेगड चिटकविणे अश्या कितीतरी गोष्टी लहानपणी सुटून गेल्या होत्या. त्या आता प्रत्यक्ष करायला मिळतील. निवृत्तीनंतरच आयुष्य खरंच मजेशीर असतं. आनंद दायी असतं. जे जगलो नाही, ते आता जगायचं असतं भरभरून, अशी इच्छा मनात पाहिजे फक्त. मानवी जीवन विविध पैलूने नटलेले असते. या जीवनाला जेवढे पैलू पाडून जगाल तेवढे ते आकर्षक होवून खुलून दिसणार. पाण्यावरचं शेवाळ बाजूला करून तर बघा, स्वच्छ, नितळ, निर्मळ पाणी आत भरपूर आहे.

No comments:

Post a Comment