Monday, 19 March 2018

निसटलेले

मचल मचलके ये हवाये बुला रही है तूम्हे 

वाऱ्याचा मागमूस नसतांना देखील मोगऱ्याचा वास चौफेर दरवळतो त्याचं किती वारेमाप कौतुक होतं. त्याप्रमाणे न चाहूल लागू देता शिशिरची पानगळीला सुरुवात झालेली असते परंतु त्याचं कोणालाही सोयरसुतक नसतं. पण पाऊस कधी कधी एवढा उतावीळ झालेला असतो , की तो आपल्याला  छत्री उघडू देण्याची थोडी उसंत देखील देत नाही. टप टप आवाज करत तो तिच्या वेणीवरून, गालावर, तिच्या अंगा खांद्यावरनं निथळत तिच्या पदरात सामावतो. पहिल्या पावसामुळे जमिनीतून येणारा विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळला नंतर वातावरणात होणारा बदल, फुलणारे एखादे फुल, आईच्या मांडीवर रांगणारे एखादे मूल, घरात जागा नसल्यामुळे कपाटात कोंबून ठेवलेली वाचनीय आणि आवडती पुस्तके आणि त्यातून येणारा हवा हवासा कुबट वास, स्टेशनवर पोहचण्या आधीच मीस झालेली ट्रेन, आणि कोणी तरी दिलेला मदतीचा हात. पहिल्याच वेळेला सासरी गेलेल्या पोरसवदा मुलीला लागलेली माहेरची ओढ, आईच्या शेजारी उभे राहून तिने फिरविलेला मायेचा हात. दुसऱ्याच दिवशी "मला माहेरी करमत नाही, बाई गं !  असं गाणं म्हणणाऱ्या तिच्या जिवलग मैत्रिणी.  जिवलग मित्राबरोबर रायगडावर पौर्णिमेच्या रात्री मारलेल्या मनसोक्त गप्पा, भर गर्दीच्या ठिकाणी मित्राची आठवण काढावी आणि साक्षात तुमच्यासमोर त्याने प्रगट व्हावे याच्या पेक्षा दुसरा आनंद कोणता बरे असेल. दुपारचा मध्यांनं, ऊन मी म्हणत होतं. जाणाऱ्या गाड्यांचा धुराळा सहन होत नव्हता, ऑफिसला जाण्यासाठी म्हापे बस स्टॉप वर कोणी लिफ्ट देईल का त्याची वाट बघत उभा होतो. एक छोटा टेम्पो ड्रायव्हरने लिफ्ट द्यावी आणि आपल्याला कोणी बघत तर नाहीना अशी खात्री करून अंग दुमडून त्या छोट्या टेम्पोत ड्रायव्हर शेजारी आसनस्थ झालो. अल्फा लावल कंपनीच्या इच्छित बस स्टॉप वर उतरून त्याला भाड्यापोटी पाच रुपये देवू केले असता त्याने नम्रपणे नकार द्यावा. ती व्यक्ती VIP असावी. अहंकाराचा लवलेश नसलेला, नम्रताने भरलेला आणि जमिनीवर चालणारा तो  तीन फॅक्टरीचा मालक निघावा. सारेच काही समजण्या पलीकडचे होते. त्याची गाडी दिसे नाहीसी होईपर्यंत मी ऑ करून बघतच राहिलो आणि एका सेकंदात त्याने माझं आयुष्याचं गणित बदलवून टाकलं. आता पुढच्या क्षणचित्रात रात्रीचे बारा वाजून दहा मिनिटे झाली होती. 17 तारखेच्या रिझर्वेशन प्रमाणे आम्ही कल्याण प्लॅटफार्मवरून चेन्नई एक्सप्रेस पकडली. एक्सप्रेस ट्रेन ने केलेला प्रवास तर अविस्मरनियच होता कारण मध्यरात्री नंतर चोर पावलाने येवून बदलणाऱ्या तारखेमुळे होणारा प्रवासाचा महा खेळ खंडोबा झाला होता. आमची स्लीपर सिटे दुसऱ्या लोकांनी अगोदरच ऑक्युपाय केलेली होती.  रेल्वे टीसी हळूच माझ्या कानात कुजबुजला, "तुमची गाडी कालच गेली हो". कालांतराने या स्मृती जरी जाग्या झाल्यात तरी हसून हसून शरीराची पुरे वाट लागते. अशा छोटया छोटया घटना आपल्या आयुष्यात डोकावत राहतात. अनेकदा असे फजितीचे तर कधी मनाला सुखद धक्का देणारे हे क्षण न सांगता येतात आणि खूप धावपळीचे आयुष्य घालवितांना आपल्याला कधी दिसतात तर कधी ते दिसतच नाही. अश्या निसटलेल्या क्षणातूनच आपलं आयुष्य बनत जातं.

Sunday, 11 March 2018

बांबूच्या बनात

वेळूच्या झाडाला कधी फुले येत नाहीत. परंतु निसर्गाने याच जन्मात त्या झाडाला परतावा दिलेला आहे. झाड नष्ट व्हावयाच्या अगोदर ते फुलांनी बहरून येते हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. शास्त्रीय कारण काहीही असो, परंतु मनुष्य असल्या सद्गुणांनी कमी जास्त अधिक प्रमाणात नखशिखान्त ओतप्रोत भरलेला आहे हे नक्की.

तरुण मुले आणि मुली यांच्यात फरक एवढाच आहे  की, तरुणांना बियरच्या बाटलीचं झाकण कसं उघडायचं याचं प्रशिक्षण जसं कुठंही घ्यावं लागतं नाही, त्याप्रमाणे पारंपारिक आणि अपारंपारिक उत्सव साजरे करण्यासाठी भर रस्त्यावर बांबू गाडण्याचे ज्ञान सुद्धा त्यांना सहजगत्या प्राप्त होतं. परंतु तरुण मुलीला पोळीची कणिक सैल किंवा घट्ट कशी मळायची हे मात्र तिला आईच्या शेजारीच उभं राहूनच शिकावं लागतं.

 तसं म्हटलं तर रानटी झाडांचे सोयरसुतक नसलेल्या कवी लेखकांची प्रतिभा सुद्धा ह्याच बांबूच्या स्टेजवर वृक्ष वेलींचं कौतुक करण्यासाठी बहरते आणि याच स्टेजवर मंत्री महोदय सुद्धा मोठमोठी रस्ते महामार्ग बांधण्याचं सूतोवात करून तोंडभरून स्वतःचं कौतुक करून घेतात. आयुष्यभर बांबूच्या बनात वावरताना शेवटी बांबू हेच मानवाला समशान भूमीकडे नेण्याचे काम दिन रात अव्याहतपणे करत असतात. परंतु खेडोपाडी, गावो गांवी असलेल्या स्मशान भूमीला जाणारा रस्ता सुशोभित असावा आणि तेथेही पाण्याचा नळ असावा असे कोणत्याही मंत्र्यांच्या गांवी नसते. जिकडे तिकडे बांबूचं बन असतं. महिला दिनाचा पुरस्कार करणारा पुरुष सुद्धा एक दिवसापूरताच असतो. बाकीचे तीनशे चौसष्ट दिवस वैकुंठ भूमीला कुंपण का असावं या चर्चेचं गुऱ्हाळ मांडण्यातच तो व्यस्त असतो. कोणतेही न्यूज चॅनेल लावून बघा, अश्या बरेच बांबूचे बन आपल्याला पेटलेले दिसतील.

Monday, 5 March 2018

नाना

अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।

बा.सी. मर्ढेकरांच्या या ओळी मला त्या विश्वात परत परत खेचून नेतात. कारण लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, रुळलो, वागलो, माझ्या बालपणाचं आयुष्य काढलं आणि ज्याने माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला ते माझे नाना, नव्हे माझे दैवतच. अजून त्या माझ्या गांवी राहत आहेत. नात्याने ते माझे काका जरी असले तरी काका हा शब्द अजून पर्यंत माझ्या ओठावर कधी आला नाही आणि आजतागायत "नाना" म्हणूनच मी त्यांना हाक मारतो. बालपणाचा प्रत्येक क्षण मी त्यांच्या सहवासात घालविला. माझे दोन्ही पाय त्यांच्या मानेच्या बाजूला सोडून त्यांच्या खांद्यावर बसून मी प्रवास करत असे. कधी बैल गाडीवर बसून, गर्द रानातून चाकोरीबद्ध खडबडीत रस्त्याने राजमाने या शेजारील गांवच्या खंडोबाच्या यात्रेला जात असू. म्हणूनच मुबंई शहरात वास्तव्याला असून सुद्धा अजून मला बैल गाडी चालविण्याचं कसब माझ्या अंगी मौजुद आहे ते यामुळेच. मला आठवतंय, भाकर बांधून चांदण्या रात्री, बैलांच्या गळ्यातील घुंगर माळांची गाज ऐकत, शेतमळ्यावर राखण करायला झोपायला जात असू, कधी कधी शेतमळ्यावरून परस्पर  कोणाला चाहूल न लागू देता रातोरात शेजारच्या बाजारपेठेच्या गांवी तमाशाला जाण्याची मजा काही अलंगच होती, परंतु  सूर्य नारायणाचे दर्शन व्हावयाच्या आत त्यांचे शेत मळ्यावरील खळ्यात शेताच्या बांधावर गवत कापण्याचे नाही तर मोटेवरून पाणी भरण्याचे काम चालू झालेले असायचे. मी चार पायी खाटेवरच्या अंथरुणात पडल्या पडल्या ही सारी गंमत बघत असे. त्याच क्षणी एक विहंगमय दृश्य नजरेस पडायचं. सकाळच्या प्रहरी टेकड्यांच्या पलिकडून लालबुंद आणि तांबूस रंगाचा गोल मुंगीच्या पावलासारखा तर तर चालत पृथ्वीच्या पोटातून वर येतांना दिसायचा, जणू वसुंधरेने बाळाला जन्म दिला.

सकाळच्या सौंदर्याने ओतपोत भरलेलं ते माझं गांव धामणगांव आणि ते माझे नाना अजून गांवी त्या मातीच्या घरात राहतात. अजून असं वाटतं ते लहानपण परत एकदा यावं आणि त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला टाकून, त्यांच्या डोक्यातली टोपी माझ्या डोक्यात घालून त्यांचे केस विचके-वाचके करून टाकून त्यांच्या खांद्यावर ठाण मांडून बसावे. किती दिवस झालेत रात्रीच्याला त्यांच्या बरोबर शेतावर नाही गेलो, रात्रीच्याला परस्पर चाहूल न लागू देता त्यांच्याबरोबर तमाशा बघायला नाही गेलो. ते सकाळी सकाळी  मोटेवरचं पाणी, शेताच्या बांधावरचं गवत कापणं, तो लालबुंद सकाळचा सूर्यगोल मनातून पुढे सरकतच नाही. म्हणून अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।

Saturday, 3 March 2018

किलबिल कोवळी मने


मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांची मनं निर्व्याज्य असतात. चिखलात उमलल्या स्वच्छ कमळांच्या पाकळ्यांसारखी. फुल उमलायच्या अगोदर त्या निर्व्याज्य नाजूक कळ्यांकडे बघा, कशी हात लावताच ती गळून पडतात.  त्यामुळे त्यांना झाडावरून तोडायचं नसतं. त्यांना झाडावरच फुलू द्यायचं असतं. आपण नुसते डोळे जरी वटारले तर त्यांच्या नाजूक पापण्या चिंब भिजतात. तृणांच्या पात्यांवर दवाने थब थबून गेलेल्या दवबिंदूसारखी त्यांची मने कधी ओथंबून विरघळतील हे त्या मातेशिवाय कोणालाच कळत नाही.  मी ज्यावेळेस तिला विचारलं, कि तुम्ही लहान मुलं पायात बूट का घालतात. "पायमोजे खराब होवू नयेत म्हणून" असं तिने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिलं. या नाजूक, कोवळ्या किलबिल मनाच्या भावना , त्यांनी दिलेली उत्तरे ही तितकीच कोमल पिंजलेल्या कापसासारखी मऊ लुसलुशीत आणि परिपक्व असतात. नितळ आणि निर्मळ पाण्यात खडा टाकून त्या नाजूक लहरी निवळेपर्यंत ती कोवळी मने असच तास न तास आपलं प्रतिबिंब बघत राहतात. त्यांच्या अदा बघा किती सुंदर असतात. रीम झिम पावसात पायाने पाणी तुडविणे, साबणाच्या पाण्याचे बुडबुडे हवेत सोडणे, मोठया माणसाचे बुट पायात घालून चालण्याचा प्रयत्न करणे, बाबांचा चष्मा काढून आपल्या स्वतःच्या डोळ्यावर चढविणे, लग्नात नवरदेवाचा घोडाच पाहिजे असा हट्ट करणे, आईच्या शेजारी उभे राहून छोटया छोटया पोळ्या तयार करणे, वाकडा तिकडा वाळूचा किल्ला तयार करणे, घरात लपंडाव खेळणे, दसरा असो किंवा मकर संक्रात असो, सोनं आणि तिळगुळ घरोघरी जावून यांना कसलां कमालीचा आनंद होतोय. मांजराचं आणि कुत्र्याचं पिलांशी यांची चांगलीच गट्टी जमते.