Monday, 5 March 2018

नाना

अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।

बा.सी. मर्ढेकरांच्या या ओळी मला त्या विश्वात परत परत खेचून नेतात. कारण लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, रुळलो, वागलो, माझ्या बालपणाचं आयुष्य काढलं आणि ज्याने माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला ते माझे नाना, नव्हे माझे दैवतच. अजून त्या माझ्या गांवी राहत आहेत. नात्याने ते माझे काका जरी असले तरी काका हा शब्द अजून पर्यंत माझ्या ओठावर कधी आला नाही आणि आजतागायत "नाना" म्हणूनच मी त्यांना हाक मारतो. बालपणाचा प्रत्येक क्षण मी त्यांच्या सहवासात घालविला. माझे दोन्ही पाय त्यांच्या मानेच्या बाजूला सोडून त्यांच्या खांद्यावर बसून मी प्रवास करत असे. कधी बैल गाडीवर बसून, गर्द रानातून चाकोरीबद्ध खडबडीत रस्त्याने राजमाने या शेजारील गांवच्या खंडोबाच्या यात्रेला जात असू. म्हणूनच मुबंई शहरात वास्तव्याला असून सुद्धा अजून मला बैल गाडी चालविण्याचं कसब माझ्या अंगी मौजुद आहे ते यामुळेच. मला आठवतंय, भाकर बांधून चांदण्या रात्री, बैलांच्या गळ्यातील घुंगर माळांची गाज ऐकत, शेतमळ्यावर राखण करायला झोपायला जात असू, कधी कधी शेतमळ्यावरून परस्पर  कोणाला चाहूल न लागू देता रातोरात शेजारच्या बाजारपेठेच्या गांवी तमाशाला जाण्याची मजा काही अलंगच होती, परंतु  सूर्य नारायणाचे दर्शन व्हावयाच्या आत त्यांचे शेत मळ्यावरील खळ्यात शेताच्या बांधावर गवत कापण्याचे नाही तर मोटेवरून पाणी भरण्याचे काम चालू झालेले असायचे. मी चार पायी खाटेवरच्या अंथरुणात पडल्या पडल्या ही सारी गंमत बघत असे. त्याच क्षणी एक विहंगमय दृश्य नजरेस पडायचं. सकाळच्या प्रहरी टेकड्यांच्या पलिकडून लालबुंद आणि तांबूस रंगाचा गोल मुंगीच्या पावलासारखा तर तर चालत पृथ्वीच्या पोटातून वर येतांना दिसायचा, जणू वसुंधरेने बाळाला जन्म दिला.

सकाळच्या सौंदर्याने ओतपोत भरलेलं ते माझं गांव धामणगांव आणि ते माझे नाना अजून गांवी त्या मातीच्या घरात राहतात. अजून असं वाटतं ते लहानपण परत एकदा यावं आणि त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला टाकून, त्यांच्या डोक्यातली टोपी माझ्या डोक्यात घालून त्यांचे केस विचके-वाचके करून टाकून त्यांच्या खांद्यावर ठाण मांडून बसावे. किती दिवस झालेत रात्रीच्याला त्यांच्या बरोबर शेतावर नाही गेलो, रात्रीच्याला परस्पर चाहूल न लागू देता त्यांच्याबरोबर तमाशा बघायला नाही गेलो. ते सकाळी सकाळी  मोटेवरचं पाणी, शेताच्या बांधावरचं गवत कापणं, तो लालबुंद सकाळचा सूर्यगोल मनातून पुढे सरकतच नाही. म्हणून अजुनी येतो वास फुलांना अजुनी माती लाल चमकते । खुरट्या बुंधावरी चढूनं अजुनी बकरी पाला खाते ।

1 comment: