|
मचल मचलके ये हवाये बुला रही है तूम्हे |
वाऱ्याचा मागमूस नसतांना देखील मोगऱ्याचा वास चौफेर दरवळतो त्याचं किती वारेमाप कौतुक होतं. त्याप्रमाणे न चाहूल लागू देता शिशिरची पानगळीला सुरुवात झालेली असते परंतु त्याचं कोणालाही सोयरसुतक नसतं. पण पाऊस कधी कधी एवढा उतावीळ झालेला असतो , की तो आपल्याला छत्री उघडू देण्याची थोडी उसंत देखील देत नाही. टप टप आवाज करत तो तिच्या वेणीवरून, गालावर, तिच्या अंगा खांद्यावरनं निथळत तिच्या पदरात सामावतो. पहिल्या पावसामुळे जमिनीतून येणारा विशिष्ट प्रकारचा सुगंध दरवळला नंतर वातावरणात होणारा बदल, फुलणारे एखादे फुल, आईच्या मांडीवर रांगणारे एखादे मूल, घरात जागा नसल्यामुळे कपाटात कोंबून ठेवलेली वाचनीय आणि आवडती पुस्तके आणि त्यातून येणारा हवा हवासा कुबट वास, स्टेशनवर पोहचण्या आधीच मीस झालेली ट्रेन, आणि कोणी तरी दिलेला मदतीचा हात. पहिल्याच वेळेला सासरी गेलेल्या पोरसवदा मुलीला लागलेली माहेरची ओढ, आईच्या शेजारी उभे राहून तिने फिरविलेला मायेचा हात. दुसऱ्याच दिवशी "मला माहेरी करमत नाही, बाई गं ! असं गाणं म्हणणाऱ्या तिच्या जिवलग मैत्रिणी. जिवलग मित्राबरोबर रायगडावर पौर्णिमेच्या रात्री मारलेल्या मनसोक्त गप्पा, भर गर्दीच्या ठिकाणी मित्राची आठवण काढावी आणि साक्षात तुमच्यासमोर त्याने प्रगट व्हावे याच्या पेक्षा दुसरा आनंद कोणता बरे असेल. दुपारचा मध्यांनं, ऊन मी म्हणत होतं. जाणाऱ्या गाड्यांचा धुराळा सहन होत नव्हता, ऑफिसला जाण्यासाठी म्हापे बस स्टॉप वर कोणी लिफ्ट देईल का त्याची वाट बघत उभा होतो. एक छोटा टेम्पो ड्रायव्हरने लिफ्ट द्यावी आणि आपल्याला कोणी बघत तर नाहीना अशी खात्री करून अंग दुमडून त्या छोट्या टेम्पोत ड्रायव्हर शेजारी आसनस्थ झालो. अल्फा लावल कंपनीच्या इच्छित बस स्टॉप वर उतरून त्याला भाड्यापोटी पाच रुपये देवू केले असता त्याने नम्रपणे नकार द्यावा. ती व्यक्ती VIP असावी. अहंकाराचा लवलेश नसलेला, नम्रताने भरलेला आणि जमिनीवर चालणारा तो तीन फॅक्टरीचा मालक निघावा. सारेच काही समजण्या पलीकडचे होते. त्याची गाडी दिसे नाहीसी होईपर्यंत मी ऑ करून बघतच राहिलो आणि एका सेकंदात त्याने माझं आयुष्याचं गणित बदलवून टाकलं. आता पुढच्या क्षणचित्रात रात्रीचे बारा वाजून दहा मिनिटे झाली होती. 17 तारखेच्या रिझर्वेशन प्रमाणे आम्ही कल्याण प्लॅटफार्मवरून चेन्नई एक्सप्रेस पकडली. एक्सप्रेस ट्रेन ने केलेला प्रवास तर अविस्मरनियच होता कारण मध्यरात्री नंतर चोर पावलाने येवून बदलणाऱ्या तारखेमुळे होणारा प्रवासाचा महा खेळ खंडोबा झाला होता. आमची स्लीपर सिटे दुसऱ्या लोकांनी अगोदरच ऑक्युपाय केलेली होती. रेल्वे टीसी हळूच माझ्या कानात कुजबुजला, "तुमची गाडी कालच गेली हो". कालांतराने या स्मृती जरी जाग्या झाल्यात तरी हसून हसून शरीराची पुरे वाट लागते. अशा छोटया छोटया घटना आपल्या आयुष्यात डोकावत राहतात. अनेकदा असे फजितीचे तर कधी मनाला सुखद धक्का देणारे हे क्षण न सांगता येतात आणि खूप धावपळीचे आयुष्य घालवितांना आपल्याला कधी दिसतात तर कधी ते दिसतच नाही. अश्या निसटलेल्या क्षणातूनच आपलं आयुष्य बनत जातं.
No comments:
Post a Comment