Saturday, 1 February 2020

शीतचंद्रलोक शेकोटी 2020

देवदूत आपल्या कक्षेत देवांची वाट बघत हेरझारा घालत होता. तेवढ्यात देवांचं आगमन झाले.  "देवा देवा जरा खाली बघा भूतलावर कसला धूर येत आहे आणि काय ठसका सुटला आहे बाबा! हे पृथ्वीवरचे लोक काय उद्योग करतील त्याचा नेम नाही. मला तर खूप काहीसं बोलावसं वाटतंय देवा या लोकांबद्दल. देवदूता जेथून धूर येत आहे तेथे बाजूला भिंतीच्या कडेला एक बोर्ड पण लावला आहे. "झाडे लावा झाडे जगवा, निसर्ग हाच देव आहे". जरा थांब, आपल्या घरात सुद्धा अन्न शिजवले जातेस ना, आणि तू पुरणाची पोळी खाल्ली आहेस का कधी". "हो देवा, प्रत्येक सणाला पुरणपोळीचा नैवैद्य येत असतो आपल्याला". "हो, हे झालं गोड. ज्या सोसायटीत झाडे लावा झाडे जगवा, हा बोर्ड लावला आहे ना तेथेच वांग्याचं भरीत आणि हिरव्यागार मिरचीचा ठेचा चा खमंग सुटणार आहे आज". "चांदणं ढगाआड जरी लपलं असलं तरी शीतचंद्रलोक मध्ये चंद्र उगवतोच". "पण देवा किती प्रेम आहे तुमचं त्यांच्यावर, अजब लीला आहे तुमची, मी नतमस्तक होतो". "देवदूता, निसर्गातील हवा, फळे, फुले, भाजीपाला, धान्य, नद्या, पर्वत, समुद्र हे मीच बनविले आहे, परंतु भरीत आणि ठेचा हा उपहार त्यांनी बनविला आहे. चल तर खाली भूतलावर जावू, शीतचंद्रलोक मध्ये हा झणझणीत उपहार कसा बनवितात त्याची लगभग बघू या, परंतु सूर्यास्ताच्या आत आपल्याला स्वर्गात वापस यायला हवे ! 🍓

आणि काळ्या रंगाची कार शीतचंद्रलोक सोसायटीच्या गेट मधून सकाळी सक्काळी करिबी पावणे सातच्या सुमारास सुसाट वेगाने बाहेर पडली. एवढ्या सकाळी, आतमध्ये तीन चार लेडीज आणि एक गोऱ्या रंगाचे साहेब कार भरधाव वेगाने चालवत कुठे चालले होते हे सर्वजण !  सर्वच काही अनाकलनीय होते. सॅटेलाईट वरून या कारचे रूट डायरेक्शन्स टिपले जात होते का नाही, हे माहीत नाही परंतु सस्पेन्स वाढतच चाललाय ! गाडी चालविणारे कोण होते माहीत आहे तुम्हाला, आपले "सी झिरो झिरो टू" मध्ये राहणारे श्रीयुत गाडगीळ साहेब. यांना मोठा कमालीचा सोस, यांना अशी प्रचंड उठाठेव करण्याची आवड. ही आवड नव्हे तर देवाने त्यांना देणगीच दिलेली आहे. जेंव्हा पासून शेकोटी नांवाचा कार्यक्रम उदयास आला त्या वर्षांपासून आजतागायत हे साहेब आपलं शंभर टक्के योगदान देतात. आणि गाडी कल्याणच्या भाजी मार्केटला येऊन थडकली. शीतचंद्रलोक सख्या म्हणजे सौ. गाडगीळ, सौ. गावडे, सरिता आणि सौ. चव्हाण गाडीतून उतरून टोम्याटो, गाजर, मुळा, वांगी, मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, आलं, लसूण इत्यादी इत्यादी घेतल्यानंतर त्याच रुटने, त्याच स्पीडने, शेकोटी साठी लागणारी सामुग्री घेवून साडेनऊच्या आत घरी सही सलामत वापस. ग्रुप आणि टीम वर्क काय सुंदर असत ना ते हेच.

ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर नुसता जीव कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीतील सख्या यांच्या शेकोटीच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना ! सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं असत. ठेचा म्हटल्यानंतर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही अस होणारच नाही.

"देवदूता बघितलं, किती जय्यत तयारी चालू होती. आता खरी मजा संध्याकाळीच येणार आहे. कारण या शेकोटी कार्यक्रमात शीतचंद्रलोक कुटुंबीय मांडीला मांडी लावून पंक्तीत जेवतील, आज कोणीही घरी स्वयंपाक करणार नाही, आहे की नाही गम्मत"

"पण देवा, काल मी स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर लोकल गाडीची वाट बघत उभ्या असलेल्या दोन मैत्रिणींचं एकमेकातलं संभाषण ऐकलं, आणि त्या सुद्धा याच विषयावर बोलत होत्या. त्यातली एक जण काकुळतीला येवून म्हणत होती की "अगं माझ्या नवऱ्याच सध्या माझ्याकडे अजिबात लक्ष नसतं ! मी मेले फक्त त्याची सावली बनून राहते. त्याची सावली कधी फुटपाथवर पडते तर कधी गटारीवर, याच त्याला काही सुख दुःख नसतं गं, पण असं जगण्याला पण काही अर्थ आहे की नाही ! मी मेलेेआपल सुख दुःख हौस मौस त्याच्या जवळ बोलायला गेली ना बस तो एकच सांगतो, आईला सांग. नेहमी आई आई आई. हो मी पण आई आहे. पण काही क्षण बायकोसाठी सुद्धा राखून ठेवायचे असतात. पण नाही माझं नशीबच फुटकं मेलं ! दुसरी म्हणते, तुझ्यापेक्षा मी सुद्धा निराळ्या जगात जगते असं नाही. घरोघरी मातीच्याच चुली असतात गंं. या नवरे मंडळींना स्वयंपाक घरातली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजूला सारून चक्क लोखंडाच्या खोलगट तुळई मध्ये हिरव्या मिरच्या आणि लसूण घालून व लोखंडाच्याच मुसळीने ठेचा करतात ना तसा तुडवला पाहिजे. पण त्याला पण आता नाईलाज आहे कारण आता लोखंडाचा खलबत्ता आणि मुसळ हद्दपार झाली आहे आणि त्याची जागी आता इलेक्ट्रॉनिक उपकरण मिक्सरने घेतली आहे. मी लहानपणी बघितलं आहे आमची वहिनी घरातली जुनी अडगळ जेंव्हा भंगारात देत असे तेव्हा त्यांनी खलबत्ता मुसळ काढून घेऊन घरात लपवून ठेवला होता."

"देवा बघितलं, तिच्या मंत्रिणीच्या वहिनीसाहेबांनी खलबत्ता मुसळ मोडीत काढला नव्हता, कदाचित तिने तिच्याच  दुःखाच्या भावना खलबत्ता-मुसळ रूपी जपून ठेवल्या असतील का!".  "देवदूता, स्त्रीला रागवतांना तू बघितले असशील परंतु ती चिडलेली मी अजून तरी बघितली नाही. जसा तिला राग येतो तसा त्या रागावर कंट्रोल येण्यासाठी मी तिला सयंमशील असा मौल्यवान गुण प्रदान केलेला आहे. म्हणून तर मानवाचं संसाराचं रहाट गाडगं अखंडपणे व्यवस्थित पणे चालू आहे. स्त्रीयांनी संपूर्ण राग ठेचा बनविण्यात घालविला असं कधी ऐकण्यातही आलेलं नाही किंवा असली कोर्ट मॅटर सुद्धा ऐकवण्यात येत नाही. हे सर्व मनाचे खेळ आहेत  म्हणूनच तर ठेच्याला खमंग चव आहे."


हे वाचून आमचे मित्र गावडे साहेबांना राक्षसी आनंद होणार नाही असं कधी होणारच नाही. कारण ते मला सभ्य गृहस्थ समजून बसले आहेत. कारण मागच्या वेळेस त्यांनी मला काळजी पोटी विचारले. उद्या जेवणाच काय ! लगेच त्यांनी मला चिमटा काढलाच, हो उद्या सिद्धेश यांच्याकडे शास्त्री हॉलला बर्थ डे पार्टी आहे, तुमचं उद्याचं भागलं! म्हणून ते मला चिमटे जरूर काढतील आणि म्हणतील काय राव वर्षातून एक वेळा शेकोटीचा ठेचा खायला मिळतो ! त्याच्यावर पण लिखाण राजकारण !! हाच विषय सापडला का तुम्हाला खरडायला. सुखासुखी मिळतंय ना राव, खाऊ द्या ¡ सुखाचा शोध घेता घेता ठेचा चा शोध कधी लागला असावा ते पुढच्या शेकोटी कार्यक्रमा पर्यंत गावडे साहेबांच्या सांगण्यावरून स्थगित. तो पर्यंत वांग्याचं भरीत आणि खमंग ठेचा खायला, शीतचंद्रलोक आपलोच असा.

1 comment:

  1. superb likhan ani karyakram, hya varshi yayla nahi jamla pan pudhchya varshi nakki.������

    ReplyDelete