वाऱ्याचा मागमूस नसतांना मोगऱ्याचा सुगंध कसा चौफेर दरवळतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी काल शीतचंद्रलोक सोसायटीत आलेल्या खास पाहुण्यांचं आणि शीतचंद्रलोक कुटुंबियांचं मन गहिवरून आलं होतं. आतापर्यंत बऱ्याच कवी लेखकांनी या विषयावर विपुल लिखाण केले असेल कदाचित, परंतु परमेश्वराने सारी कल्पकता वापरून स्त्री साठी जसं सुंदर माहेर निर्माण केलं तसं जोडीला एक सुंदर सासर ही निर्माण केलं पाहिजे असं त्याला कोडं पडलं असेल, म्हणजे लेखिका कुसुमताई देशपांडेंच्या भाषेत *आहे मनोहर तरी..."असावं. असा प्रत्यक्ष प्रत्यय काल साजरा झालेल्या त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या दिनी सौ समता आणि श्रीयुत पावसकर यांची पंचवीस वर्षाच्या आयुष्याची पाने उलगडून दाखविण्यात आलीत.
आकाशाहून विशाल असे अंतःकरण आणि समुद्राहून खोल असे सौंदर्य असलेली जोडी म्हणजे आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीत वास्तव्यात असलेले सौ समता आणि श्रीयुत जगन्नाथ पावस्कर यांचा आज रोजी सहा तारखेला त्यांच्या पंचविसवा लग्नाचा वाढदिवस साजरा झाला. या कार्यक्रमात सौ समता यांच्या सासर आणि माहेरच्या मंडळींनी आवर्जून हजेरी लावली होती. सौ समता यांच्या नणंद, त्यांचे मामा, त्यांची बहीण ही आप्तेष्ट दूर गांवावरून येऊन कार्यक्रमात उपस्थिती राहिलीत, तसेच त्यांच्या ऑफिसमधील वरिष्ठ आणि स्टाफ आवर्जून उपस्थित होते. सौ समता पावसकर जेंव्हा मनोगत व्यक्त करतांना पोडीयम समोर आल्या तेंव्हा त्यांना काहीसे आनंदाने गहिवरून आले. सर्वांचीची नांवे घेतांना त्यांची दमछाक झाली. निमंत्रण पत्रिका सर्वांनाच पाठविल्या गेल्या नाहीत, काहींनी तर स्वतः कार्यक्रमाला येण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु मी सर्व काही मॅनेज करू शकले नाही, हे त्यांनी स्नेहभरीत दाटून आलेल्या अंतकरणाने कबूल केले. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, शीतचंद्रलोक कुटुंबीय आणि त्यांचे दोन्ही परिवाराचं अतूट प्रेम बघून श्रीयुत पावस्कर साहेबांना तर कोणते विचार आधी प्रगट करू आणि प्रथम कोणाचे आभार मानू असे झाले होते. शेवटी त्यांच्या संवेदनशील मनाला शब्द पेलवेनासे झाले. ज्या वेळेस मन अति संवेदनशील होते त्यावेळेस भावनांना फुलायला चांगलं अंगण मिळतं, परंतु त्या अंगणात शुभेच्छां देणाऱ्यां मंडळींनी आधीच कब्जा करून घेतला होता.
समारंभाच्या स्वागतोत्सुक सौ गावडे, सौ भुवड आणि सौ सनगरे यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. शीतचंद्रलोकचा मंच रंगीबेरंगी विशिष्ट फुग्यांनी सजविला होता, सुरुवातीला सौ प्राची भोईर यांनी त्यांच्या मृदू आवाजात सूत्रसंचलन केले. पाठीमागे सौ समता आणि जगन्नाथ यांच्या २५ व्या लग्नाचा वाढ दिवस 25 th wedding anniversary Samata & Jagannath असा सोनेरी अक्षरांनी लिहिलेला बॅनर आपलं लक्ष वेधून घेत होता. हवेत काहीसा गारवा जाणवत होता स्टेजच्या मध्यभागी सजविलेल्या सोफ्यावर सौ समता आणि श्रीयुत जगन्नाथ पावस्कर स्थानापन्न होऊन लक्ष्मी नारायणाची जोडी शोभून दिसत होती. दीप प्रज्वलन झाले. सौ समता आणि श्रीयुत जगन्नाथ पावसकर यांना त्यांच्या २५ व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरघोस शुभेच्छा देण्यात आल्या.
वर चांदणे आकाशाला गुदगुल्या करीत होत्या आणि शीतचंद्रलोकच्या भूतलावर केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर या गाण्याने वातावरण धुंद झाले. आणि एकापेक्षा एक गाण्यांची महफील सादर करत कलाकारांनी अशी गाणी निवडली होती की पाहुणे आणि प्रेक्षक मंडळी जणू सौ समता आणि जगन्नाथ पावसकरांचा जीवनपटच बघत आहेत !
लाजून हसणे लाजून पाहणे, मी ओळखून आहे तुझे बहाणे
स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन
हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा
माझे राणी, माझे मोगा
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
मेंदीच्या पानांवर मन अजुन झुलते गं
जीवनात ही घडी अशीच राहू दे
जसजशी एकएक गाणी सुरेल आवाजात गायली गेलीत, जणू काय समता आणि पावसकर या चित्रपटाचा फ्लॅशबॅक चालू होता.
शालू हिरवा पाच नि मरवा वेणि तिपेडी घाला । सजिणी बाई, येणार साजण माझा ! सौ गौरी गोठीवरेकर यांनी हे आवडीचं गाणं त्यांचा आवाज बसलेला असतांना गाऊन त्यांनी दिवाळी पहाट च्या स्मृती जाग्या केल्यात.
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. सौ शोभा गावडे यांनी हे गाणं एवढ्या सुंदर रीतीने सादर केलं की, त्यांना ते गाणं गाण्यासाठी पुन्हा आग्रह करण्यात आला. हे गाणं चालू असतांना सौ.समता पावसकारांच्या मुद्रा कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासारख्या होत्या, परंतु निर्दोष कॅमेऱ्यांचा काय दोष ! की त्यावेळचा क्षण त्यांना टिपता आला नाही.
गाण्यांच्या सूत्रसंचालन करणाऱ्यांचं नांव जरी मी विसरलो असलो, परंतु त्यांनी गायलेलं "केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर" या गाण्यातच कार्यक्रमाचं निळं अथांग आभाळ सामावलेलं दिसलं.
श्रीयुत महेश पोंक्षे साहेबांचं मनोगत हे श्रीयुत पावस्करांच्या प्रति प्रेमाचं प्रतीक होतं तर श्रीयुत कांडके सरांनी अचानक कविता सादर करून एक सुखद धक्काच दिला. या कवितेत त्यांनी सौ समता आणि श्रीयुत पावसकर यांच्या आयुष्याची सुंदर वीण गुंफली होती. तर सलग ३५ वर्षाचा मित्र सहवास या त्यांच्या मित्रांनी केलेल्या हळव्या आणि स्नेही निवेदनावर पाहुण्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यात.
नटून थटून आलेल्या शीतचंद्रलोक सख्यांनी दोघांचं औक्षण केलं आणि वयाच्या 79 वर्षी जगन्नाथ पावस्करांच्या वडिलांचा वाढ दिवस याच दिवशी येतो. किती शुभ दिवस आणि शुभ घडी होती म्हणून "जीवनात ही घडी अशीच राहू दे" या शेवटच्या गाण्यावर या दोघांच्या आयुष्याचं रेशमी वस्त्र फुललं आणि त्या वस्त्राला वेदांग रूपी जरी काठ लाभला.
सौ समता आणि जगन्नाथ पावसकर यांनी बाशिंग बांधलेलं फोटोज डॉक्युमेंटरी प्रोजेक्टर द्वारे प्रदर्शित करण्यात आली तेंव्हा जमलेले पाहुणे, आप्तेष्ट, मित्रमंडळी, शीतचंद्रलोक कुटुंबीय यांची मने आदराने फुलून गेली. शांता ज. शेळके आपल्या पुस्तकात एके ठिकाणी लिहितात, आयुष्याच्या फिरत्या चाकावर कुशल बोटाखाली दबणारी, समर्पणशील माती जेंव्हा मनाप्रमाणे आकार घेते तेंव्हा त्यांनी आयुष्याचा एक टप्पा यशस्वीपणे पार पडलेला असतो. म्हणून तर आज आपण सगळे जण सौ समता आणि श्रीयुत पावसकर यांच्या लग्नाच्या वर्धापन दिनी एकत्र जमलो आहोत. आयुष्य भरभरून जगणे यालाच तर जीवन म्हणतात.
महाराष्ट्राच्या संस्कृतीत पुराण पोळीच्या जेवणाला खूप महत्त्व आहे, पुरणपोळीची कीर्ती सात समुद्रापालिकडे सुद्धा गेली आहे. आणि आजचा जेवणाचा मेनू देखील सौ समता व जगन्नाथ पावसकर यांनी तोच निवडला होता. एका बाजूला फोटोग्राफीला उधाण आलं होतं तर दुसऱ्या बाजूला शीतचंद्रलोक सोसायटीच्या आवारात पुरणपोळीचा स्वाद घेणं चालू होता.
खरं सांगू का, आम्ही गुलाबाची फुले नाही आहोत हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. परंतु श्रीयुत पावस्कर आणि त्यांच्या सारख्या सोसायटीतील अनेकांची संगत आम्हाला तुमच्या आशीर्वादाने खूप छान लाभली आहे.
खूप खूप धन्यवाद
(सौ.समता आणि जगन्नाथ पावस्कर यांचे दोन्ही कुटुंबियातील सभासद, त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र, वरिष्ठ अधिकारी, स्टाफ, कलाकार, सुत्रसंचालीका यांची नांवे माहीत नसल्यामुळे किंवा कार्यक्रम चालू असतांना त्यांचा नावांचा उल्लेख होत असतांना माझ्या अनवधनापणामुळे मी त्यांची नांवे विसरलो. म्हणून माझ्याकडून त्यांचा उल्लेख होऊ शकला नाही, म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो.)
No comments:
Post a Comment