Wednesday, 25 March 2020

CSC के शोले कर्जतच्या जंगलात !

(आपण आपल्याच घरात बसला आहात ना ! बोअर झालात !  सुचत नाही काय करायचं ! पुस्तक वाचायला जड जातंय, डोळे चुरचुरतात. मॉर्निंग वॉक चा कंटाळा, साखर झोपेत कोण जातंय पायपीट करायला ! चला तर कॅलेंडरच्या मागच्या पानावर नजर टाकू या. तारीख 11.01. 2020 )


येऊरच्या नव्या नवरीची हळद फिटून दोन वर्षे होत आली तरी सुद्धा आमच्या प्रयोजकांना दुसरं गेटटुगेदर करण्यासाठी मुहूर्त काही सापडेना. कारण साहजिकच आहे, एके काळी एक ठिकाणी एका छताखाली काम करणारे सर्वजण, परंतु आता बरेच जण मुंबई पुणे येथे स्थायिक झालेले, रिटायर्ड अवस्थेत तर कोण स्वतःचा बिझिनेस मध्ये व्यस्त, कोण अजूनही सर्व्हिस करत असून आपलं कर्तव्य बजावत आहेत, तर कोण आपलं पूर्वी जगायचं राहून गेलं होतं ते आता जगण्याचा मनमुराद आनंद लुटत असतांना, त्या सर्वांची मोट बांधणे म्हणजे तारेवरची कसरत होती. तरी आपल्या काही मित्रांनी हे धनुष्य उचललं आणि त्यांनी सर्वांनाच सिमेंटच्या जंगलातून काढून थेट कर्जतच्या अभय अरण्यात आणून सोडले. जसा संजीवनी पर्वत हनुमानाने हिमालयातून लक्ष्मणाचे प्राण वाचविण्यासाठी उचलून आणला होता तसा!

 नगरे महानगरे आणि सिमेंटच्या जंगलात राहणारी आणि  महिनाभर ऑफिसातला कामाचा डोलारा सांभाळता सांभाळता माणूस प्राण्याला कुठेतरी ओला सुखा ब्रेक हवा असतो. खरं तर ही आता काळाची गरज बनली आहे. पण ही गरज आता नियतीने वासनात गुंडाळून ठेवायला सांगितली आहे. कारण कोरोना व्हायरस हा राक्षसरुपाने हैदोस घालत आहे.  आपण सर्वांना तीन आठवडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त कदाचित व्हरांडाच्या बाहेर मारलेली लक्ष्मण रेषा ओलांडून जायची नाही आहे. खिडकीतलं बसलेलं मन बसून बसून कंटाळलं आणि ते सरळ 11.01.2020 च्या फ्लॅशबॅक मध्ये जावून गेट टूगेदर साठी कर्जतच्या जंगलात येवून धडकले.

आपलं काहीसं माणूसपण विरघळून गेलेले असतं आणि अशा खुणा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी लपलेल्या असतातच. शहरी संस्कृतीच्या कोरडेपणाला जंगली कोरपडीचा ओरखडे ओढण्याची आवश्यकता भासते. मग तो कोरडे पणा कशात तरी बुडवून ओले करण्यासाठीच सर्वच जण आपाला वेळ काढून, आपल्याच अलिशान गाड्यातून कर्जत येथील लाईफ फार्मवर 11.01.2020 तारखेला सकाळी 11 ते बाराच्या दरम्यान आगमन झाले. पण इथेच एक लोच्या झाला ! झालं काय तर, ......वह कौन थी" या रहस्यमय चित्रपटात साधना ही नटी आपल्या डोक्यावरचे काळे कुरकुरित ओले केस मोकळे करून आणि सफेद साडी परिधान करून तुफान पावसात काळाकुट्ट अंधाऱ्या अमावास्येच्या रात्री रस्त्यावर एकटीच उभी असते. त्याच वेळेस मनोज कुमारची महिंद्रा गाडी भरकटून त्याच रस्त्याने जात असतांना मनोजकुमार साधनाला लिफ्ट देतो. आणि मनोजकुमारच्या गाडीची वायफर बंद पडतात आणि एक विरान जागेवर साधना गाडी थांबवायला सांगते.  स्मशान भूमीची कवाडे आपोआप उघडून ती आत स्मशान भूमीच्या त्या धुंद वातावरणात चालत जाते आणि त्या कब्रस्तानचे दरवाजे करकच आवाज करत आपोआप बंद होतात. मनोजकुमार तिच्या पाठमोरी आकृती कडे बघतच राहतो. थांबा तुमचा संयम बघून मी तुम्हाला अगोदर सॅल्युट करतो.  त्याप्रमाणे आमच्या आय.टी. आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातले तिन्ही मास्टर्स येलने, वैभव आणि तिमिर या मित्राचं गूगल च हरवलं आणि त्यांची मनोजकुमार सारखी केविलवाणी अवस्था होवून त्यांची गाडी भलत्याच दिशेने भरकटली. या ठिकाणी त्यांच्या समोर अमावस्येची रात्र ही नव्हती की मुसळधार पाऊसही नव्हता आणि लिफ्ट मागणारी कोणी सिलेब्रिटी ही नव्हती. हातात गुगल सारखे रायफल असताना आमचे तीनही जवान त्या चकव्यात फसले. चार वर्षांपूर्वी पुण्याजवळील घनघोर पावसाच्या लोंढ्याने, कागदावरची शाई पुसावी तसे एका क्षणात "माळीण" गांव वाहून गेलं होतं आणि सकाळी नेहमी प्रमाणे एसटी, माळीण गावच्या प्रवाशांना घेण्यासाठी आली खरी पण बस चालकाला गावच सापडेना, त्या प्रमाणे आमच्या तिन्ही फौजींना लाईक फार्म हाऊसचा राजमार्ग काही सापडेना ! परंतु आमच्या ओवळेकर साहेबांना काही चैन पडेना! सर्व जगाचे काळजी वाहक ओवळेकर यांना काळजीने सतावले, त्यामुळे ते सतत फोनवरून त्यांची विचारपूस करत होते आणि आमचे तिन्ही मित्र चकव्याच्या चक्रव्युव्हात अडकल्यामुळे त्यांना काही ओवळेकरांचे समाधान करता येत नव्हते. मुळातच रस्ता चुकल्यामुळे जंगलात ते कोणत्या खाणाखुणा सांगणार. म्हणून ओवळेकर कमालीचे गोंधळलेत..... बरं या तिरकूट जवळ होकायंत्र ही नव्हते, आकाशात मांज्याने कटलेला पतंग गिरक्या घेत कुठे तरी गंजलेल्या इलेक्ट्रिक खांब्याला अडकून थांबतो त्याप्रमाणे आमचे वाटसरू लाईक फार्म हाऊस येऊन धडकले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडून त्यांना आपला ग्लास उंचावून चिअर्स केले आणि शेवटी जीव लाईफ फार्मच्या प्रेमात पडला. ......पण खरी गंमत तर अजून पुढेच आहे. कारण खडकीकर साहेबांजवळ कुठलीही व्हेईकल नसतांना भर जंगलातून वाट काढत काढत ते गुगलच्या साहाय्याने सहीसलामत संध्याकाळपर्यंत डेऱ्यावर येवून दाखल झालेत. साहेब येण्यापूर्वी माती आणि शिवार यांचा जसा रंग असेल तसा सरड्याने रंग बदलावा त्याप्रमाणे पार्टीला रंग चढला होता. सकाळपासूनच दाभोळकराने सर्व हक्क विकत घेतल्यासारखे भरघोस उस तोडणीचा सपाटा लावला होता. साहेबांचे आगमन झाल्यामुळे भाजीला लसणाची फोडणी द्यावी तस तसा राजकारणाचा तडका देवून उकाळ्या पाखाळ्या सुरू झाल्यात, कारण सर्वांनीच आपापले ग्लास उपडे करून साहेबांसमोर सरेंडर झाले होते. आणि आता अभयने जसे एक्कावन्न टक्के शेअर खरेदी करून दाभोळकर कडून सर्व मालकी हक्क काढून घेतलेत, त्यामुळे अभय थांबायलाच तयार नव्हता, कोण काय म्हणाले, कोणी काय नाही म्हणायला पाहिजे, तीन पायाचं सरकार कसं चालतं, खिचडी करपणार, की मी पुन्हा येईन खायला अशा गप्पांचा फैरी झडत राहिल्यात. कोण घायाळ होत होतं, कोण उठून उभा राहत होता पण सुप्रीमोंच्या पुढे कोणाची हिंमत होत नव्हती. शेवटी साहेबांनी सर्वांना आपल्या कुशल विचारांनी कुरवाळले. त्यांच्याकडे  एक कटाक्ष टाकला जगत, तिमिर, भास्कर,भाटिया, वैभव पंडित, ओवळेकर, येलने, इथापे, वांजपे, पाठक, दाभोळकर, अभय, रामदास हे सारे वन टीम वन गोलचे सदस्य CSC-THANE कॅप परिधान करून साहेब काय बोलतात त्या उत्सुकतेने त्यांच्याकडे नजरा लावून बसले होते. असं वाटायला लागलं की आपण त्यांच्या आज्ञेत आहोत, त्यांच्या अंडर मध्येच काम करत आहोत. ते केंव्हा आज्ञा देतील आणि आपण कामाला लागू! अगदी सर्वांचे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या गालाच्या मध्यभागी प्रसन्नतेने विसावल्या होत्या. थोड्याच वेळात काही जणांनी स्विमिंग टॅन्कचा आसरा घेतला. येलने, पाठक, रामदास,वांजपे, वैभव, अभय यांनी स्विमिंग टॅन्क मध्ये पोहून येथेच्छ एन्जॉय केला. दाभोलकर आणि ओवळेकर यांनी काठावरच उभे राहून फोटो काढण्यात रस घेतला.पाण्यात उताणे पडून हात पाय न हलवता स्तब्ध पडून राहणे ही एक कलाच आहे. या कलेत वांजपे आणि रामदास हे निपुण आहेत. त्यांच्याकडून खूप शिकून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आडातच पाणी नाही तर पोहऱ्यात येणार कोठून😂

चारही बाजुंनी जंगल, चहूकडे लाल मातीचा सुगंध पसरलेला, कुठे बिबट्याच्या पायाचे ठसे दिसतात का शोधून बघितले पण सापडले नाहीत. फार बरं वाटलं आणि मन तेवढेच हलके झाले. छोट्या छोट्या पर्ण कुट्या आजूबाजूला पाने फुले वेली त्याच्यात आमची ही पर्णकुटी,  परंतु आमच्या सर्वांची एकाच छप्पर असलेल्या कुटीत सोय करण्यात आली होती. बाहेर लांबलचक व्हरांडा, त्याच्यात लांब आयताकृती टेबल आणि त्याच्याभोवती खुर्च्या. रात्रीचे आठ वाजलेत, एरव्ही मिटिंगची वेळ न पाळणारे आजच्या मिटींगला पाच मिनिटे अगोदरच खुर्च्यांवर विराजमान झाले होते. सर्व जुन्या ऑर्डर्स वर उहापोह झाला. विषय सर्व काही अल्फा लव्हल एके अल्फा लव्हल. संचारबंदी असते तशी दुसऱ्या विषयाला बंदी होती जणू. कोणती ऑर्डर कोणी आणि कशी मिळवली आणि ती कशी एक्सिक्युट झाली. कोणी किती योगदान दिले, कोणी किती कष्ट घेतलेत. थोडक्यात एव्हढ्या कमी अवधीत CSC ने कसा आकार घेतला याचं कोडकौतुक आपल्या शिवाय कोण करणार होतं. सांगायचं तात्पर्य

साधारणतः वीस ते पंचवीस वर्षानंतर सुद्धा कामाची पावती मिळते हे सर्वांचं भाग्यच होतं. आपण एकमेकांपासून कसे आणि का अलग झालो याची सर्वांनाच खंत जाणवत होती. आंब्याचे झाड लावणाऱ्याला त्या झाडाची आंबे खायला मिळत नसतात हे खरे आहे, परंतु पुढच्या पिढीला त्या झाडाची फळे आणि सावली नक्की मिळते हे सुसंस्कृतीचं सूत्र त्याच्यात लपलेलं असतं. दुसऱ्याच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप मारणारा, त्याने मात्र स्वतःच्या पाठीवर कधीच कौतुकाची थाप मारून घेतली नाही आणि आजही इतिहासाची तीच पुनवृत्ती होतांना दिसत होती. कारण त्याकाळचे सर्व साक्षीदार आज समोर हजर होते. अशा त्या विनम्रशील सर्जनशीतेला म्हणजे आमच्या खडकीकर साहेबांना आमचा सर्वांचा मानाचा मुजरा.

नेहमी अडीच ते रात्री उशिरापर्यंत चालणारं सिलेब्रेशन यावेळेस मात्र रात्री साडेबाराच्या आसपास थंडावलं. कारण जवळपास सर्वच जण सिनियर सिटीजनच्या अवस्थेत होते आणि त्यांनी आपल्या मर्यादा ओळखून कार्यक्रम यथेच्छ एन्जॉय केला होता. शेजारच्या कुटीमधल्या यंग गर्ल्स अँड बॉईज यांचा धुमाकूळ मात्र रात्री उशिरापर्यंत चालू होता.

मॉर्निग वॉक वारे गांव


धुक्यात हरवलेली डांबरी वाट निग्रोसारखी स्पष्ट दिसायला लागली होती. आम्ही एकेक शेतातल्या पिकांचे निरीक्षण करून,  सायंटिस्ट सारखे अजमावून बघत होतो. परंतु निसर्गाचे ते पेच आम्हाला सोडविता येईनात ! साहेबांनी मला विचारले हे कोणतं पीक आहेरे चव्हाण ? मी शेतकऱ्याचा मुलगा असून मला ते ओळखता येईना, शेवटी ते मुळाचं पीक आहे असं सांगून वेळ मारून नेली खरी पण माझा दावा काही जास्त वेळ टिकला नाही! आणि मी अजून किती कच्चा आहे हे सिद्ध झालं कारण पुढच्याच शेतात त्याच जंगली गवताने रान माजवलं होत. आता गवत म्हटल्यानंतर साहेबांनी काँग्रेस गवत विषय काढून आम्हाला बुचकळ्यातचं टाकलं. आम्हाला म्हणजे मी, इथापे आणि वैभव. कारण काँग्रेस गवत कितीही कापा किंवा नांगरून काढा ते कधीही नष्ट होत नाही. शेतात उगवल्यावर कोणत्याही पिकांना वाढू देत नाही. काँग्रेस गवत कुठून आलं, त्याचा जन्म कसा झाला, त्याची पाळेमुळे इथापेंनी अतिशय चांगल्या रीतीने सोप्या भाषेत समजेल अशी समजावून सांगितली. ज्यावेळेस भारतात 1952 साली दुष्काळ पडला होता त्यावेळचे काँग्रेस सरकारने मिलो हा गव्हाचा प्रकार गरीब लोकांसाठी अमेरिकेतून आयात केला होता. Milo हा शब्द गुळगुळीत आणि सोबर वाटतो खरा परंतु ज्यावेळेस मिलो आयात केला त्यावेळेस त्याच्याबरोबर  या काँग्रेस गवताचा भारतात प्रवेश झाला. तेंव्हा पासून शेताच्या बांधावर, शेतात, नदी नाल्यांच्या काठावर कुठेही लागवड न करता हे काँग्रेस गवताची भरभरून वारेमाप जोपासना होत असते, शेतकऱ्याने कितीही औषध, फवारणी केली तरी त्याचा नायनाट होत नाही. काँग्रेस सरकारने मिलो आणला आणि  मिलो बरोबर मिळते जुळते असे काँग्रेस गवत हे भारतभर अजरामर झालं. पाऊले पडती वारेगावकडे वरेगावाच धूसर दिसायला लागलं,रात्र आपल्या अंगावरचं पांघरून काढत होती तसतसं धारतीचं, तिथल्या शेतीबाडीचं तिथल्या संस्कृतीचं मूळ रूप आमच्या नजरेस पडत होतं. आजूबाजूला विरळ झाडे असलेली, वळणावळणाची, किंचित खड्डे असलेली ती डांबरी वाट लक्ष वेधून घेत होती. शेवटी वारेगाव नजरेस पडले. शोधत शोधत हायवे च्या बाजूस असलेल्या चहाच्या झोपडीवजा टपरीवर आम्ही सर्वांनी चहा मारला आणि परत माघारी लाईक फार्म हाऊसकडे आम्ही प्रयाण केले. मॉर्निंग वॉक करून नऊच्या आसपास सर्व जण आपल्या जागेवर पोहचलेत, सकाळचा परत एकदा चहा झाला, काहींनी क्रिकेटचा आनंद घेतला, काही जण लॉंग मॉर्निंग वॉक करून आले होते.

अलविदा

सर्वजण लाईफ फार्मला अलविदा करण्यासाठी गेटवर जमा झालेत. ग्रुप फोटो काढण्यात आलेत, एकमेकांना आलिंगन देऊन एकमेकांचा निरोप घेतला ते पुढचं गेट टूगेदर लवकर करण्याचं एकमेकांकडून आश्वासन घेण्यात आलं.









3 comments:

  1. How can u remembered all those events ? Really hats off to you. The way u summerized entire day is ultimate. Anyone can recap and reenjoyed it. Keep it up man..one suggestion why cannt u share with Maharashtra Times? They do have word limitations but for u its small issue..we will b honoured to have our names in print..thanks once again

    ReplyDelete
  2. Very nice article and experience shared by you by reading this I am getting the feel of the above get together though I was not with you.Next time I will be there. Thanks to you....soman

    ReplyDelete
  3. Va CHAVAN SAHEB, sundar blog...evade sarv tumhala athvtay and sundar paddtine lihiley...chaan.keep it up. Vaibhav

    ReplyDelete