एखाद्या चित्रकाराने दाट धुक्याचं चित्र रेखाटावं, त्या विरघळलेल्या धुक्यात निसर्गाची अनेक अस्पष्ट रूपे त्याने रेखाटवीत आणि आपण डोळे किलकिले करून फक्त पाहत राहावे पाहत राहावे आणि त्या धुक्याच्या पलीकडे काय असावे याचा अंदाज बांधत राहतो. तसच काही पण अगदी निराळं असं वि.स. खांडेकर यांनी लिहिलेल्या "धुके" या पुस्तकात तीन खेड्यातल्या बायका धुक्याला कसा शृंगार चढवतात आणि लिहिलेल्या पुस्तकाचं नांव कसं सुशोभित करतात ते त्यांच्याच शब्दात वाचा...
धुके
नेहमीप्रमाणे डोक्यावर शेणाच्या पाट्या घेतलेल्या खेडवळ बायका समोरून येत असाव्यात ! असल्या बायका म्हणजे काही फडके-खांडेकरांच्या कादंबऱ्यातल्या नायिका नव्हेत. त्यांच्या जाण्या-येण्याकडे एरव्ही मी क्वचित लक्ष देतो. पण हे अचानक पडलेले धुके वस्तुमात्रावर जणू काही जादूची कांडी फिरवीत होते. समोरून येणाऱ्या त्या तीन स्रियांच्या आकृतीत काही निराळेच सौंदर्य आहे, असे वाटू लागले. सभोवार पसरलेला धुक्याचा समुद्र आणि त्या अस्पष्ट आकृती पाहून समुद्रातून अप्सरा वर आल्याची पौराणिक कथा मला आठवली. अप्सरा म्हटली, की तिची नृत्यचांदण्यातकुशलता आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. समोरून येणाऱ्या त्या बायकांनी डोक्यावरल्या पाट्या संभाळण्याकरिता वर धरलेले अंधुक हात त्या सुंदर धुक्यात तसेच रेखीव वाटत होते !
...........घटकाभराने तो धुक्याचा समुद्र जसा आला होता, तसा निघून गेला.....माझा निरोप सुद्धा न घेता ! त्याचे पुसट पाऊल देखील कुठे दिसेना. तरी माझ्या मनावरील त्याची धुंदी तशीच होती.आज अशावेळी हे धुके कोठून आले, याचा विचार करायला माझे मन तयार नव्हते. धुके झाले, घटकाभर दिव्य आनंदाचा अनुभव देऊन गेले. तेवढ्याने मी तृप्त झालो होतो. मातीला सुगंधी फुलांचा वास लागावा, तसे त्या ब्रम्हानंदाने माझे मन आपलेसे करून टाकले होते.
वि.स. खांडेकर यांच्या __________"धुके" या पुस्तकातून
No comments:
Post a Comment