Monday 5 February 2024

शेकोटी 2024

संस्कृती म्हणजे काय तर आपल्या समजाची जीवन पद्धती की जेथे शिष्टाचार, खानपान, भाषा, साहित्य, विचार,आदर, सदभाव, सभ्यता आणि कला याचा संगम. आणि हाच संगम शीतचंद्रलोक सोसायटीत जवळ जवळ दोन ते अडीच दशकापासून बघायला मिळत आहे. मग तो विषय कोणताही असो, राम मंदीर प्राण प्रतिष्ठा असो, श्री सत्यनारायण वार्षिक पुजा किंवा वुमेन्स डे असो, तसेच कोजागिरी पौर्णिमा, किंवा दिवाळी पहाट असो, अशा कितीतरी उत्सव सेलिब्रेट केले जातात की त्यांच्यावर वेळोवेळी भाष्य केले आहे. नेहमी एक गोष्टीचा विसर पडतो ती म्हणजे शीतचंद्रलोक च्या सख्या. चुलितले निखारे आणि टोपलीतले चार पाच वांगे उचलून टाकून चक्क काळेकुट्ट भाजून निघेपर्यंत एका दगडी खलबत्त्यात हिरव्या मिरच्या, लसूण जिर, मीठ कांदा कुटून निघेपर्यंत इकडे वांगी चांगलीच होरपळलेली असतात आणि खमंग वास सुटलेला असतो दुसऱ्या मिनिटाला वांग्याचं भरीत कुच्करून तयार झालेलं असतं, घरधनी नाकात वास भरून मळ्याकडे रवाना होतो. हीच ती संकल्पना शीतचंद्रलोकमध्ये कोणी रुजविली हे कोडे उलगडण्याच्या भानगडीत न पडता लहान थोर सगळीच मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं अशी खूणगाठ बांधून रिपीट रिपीट वांग्याचं भरीतचा फडशा पाडला जात होता. खर म्हणजे आदल्या दिवशी शेकोटी कार्यक्रमावर दुःखाची सावली पसरल्यामुळे शीतचंद्रलोक सख्यानी आपल्या कर्तृत्वाचं भान ठेवून नियोजित शेकोटीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला होता. सकाळ पासून त्यांची ही लगबग किती शिस्तीत चालू होती ही कॅमेरात बंद झालेली असतांना, घरची कामे आवरून या लोकांना वेळ मिळतोच कसा, बाजार केंव्हा करतात, कोण कोण जातंय बाजाराला, आणि यांना हे जमतं कसं ! खलबत्ता, मुसळ, शेंगदाणे, लसूण, हिरव्या झणझणीत मिरच्या यांचे कुटण, बेसन, वांगे भाजणी, तवा, कढई, मीठ मसाला आणि चुलितील निखारे ....... कुठं थांबायचं तुम्ही सांगा. आणि शेवटी आइस्क्रीम कुल्फी !! शीतचंद्रलोक सख्यांची ही तपश्चर्या चक्क बारा वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. आणि आम्ही सर्व सदस्य मंडळी अगदी चवीने या मेजवानीवर कोणतेही आढेवेढे न घेता लोट पोट होवून कौतुकाची थाप देवून मार्गस्थ होतो . सर्वांची जेवणं झाल्यानंतर शीतचंद्रलोक सख्यांनी जेवणास सुरुवात केली. सगळा पसारा आवरून, भांडीकुंडी लख्ख करून, साधारणतः 10 वाजता शेकोटी या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. अशाप्रकारे शीतचंद्रलोक सोसायटीत सुसंस्कृतीची सूत्रे घट्ट रोवली गेली आहेत. धन्यवाद

No comments:

Post a Comment