Monday 5 February 2024

फुले वेचता वेचता "फुले वेचिता".......

लता मंगेशकर यांना आपल्यातून जावून सहा फेब्रुवारी 2024 ला एक वर्ष होईल. त्यांचे आपल्यात नसण्याने फार मोठी पोकळी जाणवते. त्यांची रेडीयोवरची गाणी ऐकून मन संगीतमय होऊन जातं. कोकीळ गातो त्याचं गाणं कानावर पडतं परंतु त्याचं दर्शन मात्र घडत नाही. सुरच त्याच्या अस्तित्वाची खूण असते. असा कोकीळ आवाज असलेला सुवर्णयुग पुन्हा अवतरेल का नाही सांगणे कठीण आहे परंतु अशी लता पुन्हा होणे दुरापास्त आहे. त्यांची गाणी म्हणजे भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यातला अमूल्य ठेवा आहे. लता मंगेशकर आपल्या "फुले वेचिता" या पुस्तकात लिहितात, कला निर्मितीही अशीच असते. अशीच रम्य, अशीच सहज, अशीच सुंदर, कृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसासारखी, राधेच्या हातातल्या श्रीकृष्णाच्या बासरी सारखी; कर्णाच्या वेदनेसारखी; द्रौपदीच्या जाज्जवल्यासारखी; सीतेच्या त्यागासारखी, ज्ञानेशाच्या मराठी सारखी ! एके ठिकाणी त्या आपल्याच संवेदनशील मनाला प्रश्न विचारतात, खरेच माणसाला पुनर्जन्म असतो का? किती अवघड प्रश्न? काय याचे उत्तर? फक्त शून्य ! क्षितिजाच्या पलिकडे काय आहे? वाऱ्याच्या भरारीत काय आहे ! सूर्याच्या तापात, चंद्राच्या शीतलतेत, सागराच्या खोलीत, मृत्यूच्या उदरात पुनर्जन्म असेल का? हे अथांग, अथांग विश्व पार केल्यावर परत यायला रस्ता असेल का? सगळेच गूढ प्रश्न. या प्रश्नांची उत्तरे म्हणजे प्रतिप्रश्र्नच.

No comments:

Post a Comment