गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

ठेचा

ओबडधोबड शेंगदाणा आणि लसूण कुटून झणझणीत हिरवी मिरचीचा ठेचा म्हटल्यानंतर नुसता जीव कासावीस होतो. कपाळावरच्या नसा तड तड उडायला लागतात. आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीतील सख्या यांच्या शेकोटीच्या भरीत भाकरीच्या पार्टीत सर्व पुरुष लहानथोर मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं. आमच्या सोसायटीतील पुरुष मंडळी डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणी एकमेकांशी ब्र शब्द बोलेल तेंव्हा ना, सर्वकाही चिडीचूप तोंडातल्या तोंडात मिटक्या मारत चाललेलं असत. ठेचा म्हटल्यानंतर कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही अस होणारच नाही, परंतु माझ्या अंगाला मात्र दरदरून घाम फुटतो. ठेचा हा निव्वळ झणझणीत मिरची पासून बनविलेला असतो म्हणून नव्हे तर त्याला स्वयंपाक घरातली सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाजूला सारून चक्क लोखंडाच्या खोलगट तुळई मध्ये घालून व लोखंडाच्याच मुसळीने तुडवला जातो. हे रेखा चित्र नव्हे, तर माझ्या लहानपणी मी एकदा मित्रांबरोबर उकिरडे तुडवीत होतो "हे आईला कळलं" असं बहिणीने मला सांगितलं. आई आज तुझा चांगलाच ठेचा करणार आहे ! परिणाम असा झाला या दहशतीची ही परंपरा वह कौन थी या सिनेमातली मेणबत्ती घेऊन भयाण अमावस्येच्या रात्री फिरणारी स्त्री बघितल्यानंतर सुद्धा घाबरायला होणार नाही एवढी दहशत आमच्या घरी जागृत अवस्थेत वावरते असते. स्त्रीयांनी संपूर्ण राग ठेचा बनविण्यात घालविला असं कधी ऐकण्यातही आलेलं नाही आणि तसं असतं तर त्याला खमंग चवही आली नसती. हे वाचून आमचे मित्र गावडे साहेबांना राक्षसी आनंद मिळणार नाही परंतु मला चिमटे जरूर काढतील आणि म्हणतील काय हाच विषय सापडला का तुम्हाला खरडायला. सुखासुखी मिळतंय ना राव खाऊ द्या ¡ सुखाचा शोध घेता घेता ठेचा चा शोध लागला असावा का म्हणून माझ्या डोक्यातलं चक्री वादळ सैरा वैरा धावत सुटलंय. परंतु या ठेचाचे कुठलेही धागेदोरे, विकपीडिया, लिखाण सापडत नाही. ब्रिटिश लोक 1947 मध्ये भारत देश सोडून गेलेत परंतु त्यांच्या मेजवणीतही ठेचून ठेचलेल्या ठेचाचा उल्लेख सापडत नाही.

आपल्या महाराष्ट्रातला हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा, हा आमच्या शीतचंद्रलोक सोसायटीत दरवर्षी शीचंद्रलोक सख्या कडून शेकोटी या अजरामर झालेल्या नावाने प्रचलित आहे. हा भरीत भाकरीची मेजवाणीचा उपक्रम दरवर्षी न चुकता सोसायटीच्या आवारातच राबविला जातो आणि आम्ही शीतचंद्रलोक रहिवासी सुद्धा तेवढीच आतुरतेने वाट पहात असतात. या वर्षी सुद्धा आमच्या सोसायटीच्या प्रांगणात संध्याकाळी हिरव्या मिरचीचा ठेच्याचा झणझणीत खमंग दरवळणार आहे.

सोमवार, १० डिसेंबर, २०१८

च च च दूध उतू गेलं

बायको दूध घ्यायला गेली आणि येतांना मांजर आडवी गेली. या रांडेला आताच आडवी जायचं होतं का. मागे फिरून पण जाता येत नाही कारण दुधाचा थेंब घरात नव्हता आणि चहा पिल्याशिवाय दिवसाच्या कामाला सुरुवात होणार नव्हती. दूध तापवायला गॅसवर ठेवलं आणि खरोखर ते उतू गेलं याला कसला योगायोग म्हणायचा. तेवढ्यात माजघरातून आवाज आला, तुझ्या हातून नेहमी असं होतंच कसं, लक्ष असतं कुठे तुझं सध्या. असा कितीही ठणठणाट करून झाल्यानंतर सासूबाईंनी दुधाचा फेसाळलेला ओटा साफ केला असं कुठेही वाचण्यात अजून तरी आलेलं नाही. मांजर आडवी गेली तेंव्हाच तिला सिग्नल मिळाला होता आणि आजकाल माझ्या हातून जास्तच मीठ पडायला लागलं, देव जाणे सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं होतं असा किदरलेला आवाज घराघरातून ऐकू येत असतो. आणि दुसऱ्या दिवशी भाजी करपून गेल्यावर आपलं चित्त ठिकाणावर नाही असं उगीच बोलणं खावं लागणार या भीतीने घरातली सवाशिणीन बिचारी चिडीचूप असते. रात्रीचे साडे नऊ वाजले आहेत, बाई आता जेवणावळ्या तयार करायला घेते. पण दुष्काळातला तेरावा महिना अजून कसोटी घेण्यासाठी आसुसलेला असतो. पहिला घास तोंडात टाकणार तेवढ्यात लाईट गेलीच समजा. खरं आहे, कोंबडा बिचारा सकाळी सकाळी अरवण्याचं काम करून मानव जातीवर अनंत उपकार करतो, पण त्याला उदंड आयुष्य लाभो असा कोणीही आशीर्वाद देत नाही हेच खरं.

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

सांडितो अवगुण रे भ्रमरा !

उष्ण कटिबंधातले वाहणारे वारे एखादे वेळेस तुम्हाला शिथिल आढळतील, परंतु हिवाळी मोसमाचा गारवा असून देखील सुद्धा , भारतात सध्या निवडणुकीचे विषम आणि उष्ण वारे वाहत आहेत. आणि राजकारणातला दूषित घनकचरा इतका उफाळून वर आला आहे की सध्याचं सर्व वातावरणच प्रदूषित झालं आहे. कोणी कोणावर कसेही हीन दर्जाचे आरोप करत सुटला आहे. ह्या दुषीत घनकाचाऱ्याला जाळण्यासाठी कायद्याची कुठलीही चौकट अस्तित्वात नाही. म्हणून व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली या लोकांनी चांगलेच अवडंबर माजविले आहे. याच्यात न्युज पेपर आणि मेडिया वाल्यांनी सुद्धा काही प्रमाणात आगीत तेल ओतण्याचं काम प्रामाणिक पणे करीत आहेत.  गोळ्या नसलेल्या बंदुकीचे फुसके बार उडविण्याचे जनक म्हणून क्रेडिट आप पक्षाचा म्होरक्याकडे जाते.  कोणताही हातात पुरावा नसतांना करोडो रुपये भ्रष्टाचार केलेल्या पंधरा ते वीस  लोकांची लिस्ट  जाहीर करणे, हा त्यांचा हातखंडा झाला होता. पण त्यांना एकालाही दोषी सिद्ध करता आलं  नाही . पण अण्णा हजारेंच्या चळवळीत सामील होऊन दिल्लीत दुकान थाटून बसले हे मात्र खरे. त्याप्रमाणे  आपल्या पक्षालाही देशाच्या मध्यभागी दिल्लीत चौकीदाराची नोकरी मिळावी म्हणून काँग्रेसपक्षपती यांनी रोज पंतप्रधानांवर फुसके बार फोडण्याचे अजब शस्त्र शोधून काढलं आहे. काँग्रेस पक्षाच्या साठ वर्षांच्या राजकिर्दीत असंख्य करोडो रुपयांचे महा घोटाळे झालेत हे जनता विसरली असेल असं त्यांना वाटतंय. साठ वर्षे निर्विवाद अधिराज्य करणारा काँग्रेस पक्ष 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत चक्क 45 या आकड्यावर आपटला होता. मोदींनी विश्रांती न घेता विकासाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांची कर्जे माफ केलीत. इराणची थकित रक्कम देण्यासाठी मोदी सरकारने रणनीती, आराखडा आखला, सहा हप्त्यांमध्ये संपूर्ण ४३ हजार कोटीचं थकीत देणं भारतानं दिलं.  जीएसटी आणि नोट बंदीचं धाडसी निर्णय घेण्यात आला. परिणाम असा झाला विरोधकांची दुकाने बंद झालीत, प्रत्येक रुपयामागे सरकारला कर मिळू लागला. टॅक्स रूपाने जमा झालेला पैशाने सरकारी तिजोरीत चांगलीच भर पडून जनकल्याणासाठी योजना सरकारकडून सुरू करण्यात आल्यात. वचनपूर्तीसाठी अथक प्रवास करायचा असतो तो त्यांनी या साडेचार वर्षात केला आणि आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे.  बघता बघता 2019 च्या निवडणुकीचे सर्वानाच वेध लागलेत. पण रान कधी सपंतच नाही. काळोख सुरू झाल्यावर भर अरण्यात प्रकाशित चांदण्यांची सुद्धा भीती वाटायला लागते. महापुरात सापडलेल्या ओंडक्यांना काडीचा आधार हवा असतो तशी विविध पक्षांची गत झाली. आपलं अस्तित्व जणू धोक्यात आलं आहे आणि ते टिकविण्यासाठी, नाही ते हीन दर्जाचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत.  ही विकृती एवढ्या टोकाला पोहचली, की पंतप्रधानांना नाही त्या हलक्या दर्जाच्या उपाध्या विरोधकांनी दिल्यात. आणि त्यात कोणीही मागे राहिले नाही. व्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली अवडंबर माजवून भारतीय संस्कृतीची ऐशी की तैशी करून टाकली. शहरात ओला सुका घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक   यंत्रणा सज्ज असते. परंतु राजकारणात अतिरंजित तोंडाळ  राजकारणी घनकचऱ्याची विल्हेवाट  लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे मतदारच पुढाकार घेवून अश्या प्रदूषित राजकीय दूषित घनकचाऱ्यांची मतदानाद्वारे   विल्हेवाट लावू शकतात. आणि ही संधी फक्त पाच वर्षांनी एकदाच येते.

शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८

शीतचंद्रलोक दिवाळी पहाट २०१८

अजून पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला

रात्र अजून रात्रीच्या काळोखातच गुरफटलेली होती. रात्रीच्या गर्भातला लालबुंद आणि तांबूस रंगाचा गोल पृथ्वीच्या पोटातून बाहेर  पडायला बराच अवकाश होता. आकाश स्वच्छ आणि निरभ्र व्हायला जणू त्यानेच मोकळीक करून दिली होती. अन अशा भव्य मंडपाखाली, शीतचंद्रलोक सोसायटीच्या प्रांगणात एक नवीन पहाट उदयास येत होती. नवीन कपडे परिधान करून आलेल्या लेडीज, जंट्स तरुणाईची लगबग चालू झाली होती. नव युवतींनी रंगमंचकासमोर काढलेली भव्य देखणी रांगोळी लक्ष वेधून घेत होती. तुळशी वृंदावन अंगणात मध्यभागी सजले होते. स्टेजवर दिव्यांचा झगमगाट होता. आकाश कंदील नेहमी प्रमाणे तटस्थ स्टेजच्या मध्यभागी मिणमिणत्या प्रकाशात लुकलुकत होता. थोड्याच वेळात  दिवाळी पहाट २०१८ चे पाचवे पुष्प गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात गुंफले जाणार होते. ज्यांनी १५७ पटकथा लिहून दोनशे पेक्षा जास्त गाण्याचा खजिना आपल्याला उपलब्ध करून दिला होता. हळू हळू काळोख्यातल्या सर्वच चांदण्या भूतलावर अवतरुन प्रज्वलित झाल्यात, एक चांदणीने मात्र दूर काळोखातच अढळपद स्वीकारलं आणि एका अनुत्तरीत प्रश्नाचं वलय निर्माण होऊन कुतूहल जागं झालं. सकाळचे साडेपाच वाजलेत,  रंगमंचकावर सर्व कलाकार भारतीय बैठक मारून स्थानापन्न झालेत. उत्सुकता शिगेला पोहचली होती. पहाटे पहाटे शेतकऱ्याने गोफणीतला दगड आपल्या उभ्या पिकांवर भिरकावून,  भुर्रकन उडणाऱ्या पक्ष्यांचा विहंगमय आवाज अजून तरी कुठल्याही कॅमेरात नजर कैद झाला नव्हता. आणि तेवढ्यात संगीत मानापमान नाटकातील नयन नटवरा विस्मयकारा या समूह गीताने कार्यक्रमाला दमदार सुरुवात झाली.

शांत भासणाऱ्या अथांग जलाशयाच्या पृष्ठभागावर उडणाऱ्या पक्षाच्या पंखाचा स्पर्श व्हावा आणि त्यातून निर्माण होणारी असंख्य वलये हळू हळू शांतपणे विस्तारीत जावून अदृश्य व्हावीत, त्याप्रमाणे निवेदिका मिसेस गाडगीळ यांनी एकेक गाण्यांचे पदर उलगडतांना आपल्या मृदू, शांत आणि सुमधुर आवाजाने हवेत आद्रतेची वलये निर्माण केलीत.  प्रेक्षकांना भुरळ पडली ती त्यांच्या ओघवत्या भाषा शैलीवर. गाणं संपल्यानंतर पुढचं गाणं कसं गुंफलं जाणार आहे, त्या गाण्याचे बोल काय असतील आणि त्या गाण्यांचे आपल्याशी नाते ते कसे उलगडतात यांकडेच सर्व प्रेक्षक कौतुकाने त्यांच्याकडे बघत होते.

सौ समता पावसकरांनी तूच सुखहर्ता तूच दुखहर्ता हे मूळ प्रल्हाद शिंदेच्या आवाजातील गाणं गाऊन एक प्रकारे जगाच्या कल्याणासाठी देवाला साकडं घालून प्रेक्षकांची मने जिंकलीत. त्यांच्या आवाजातला कणखरपणा हा शिक्षकी पेशातून उदयाला आलेला नजराणाच होता. वाऱ्याच्या झोताने शेतातली जोंधळ्यांची ताटं पानं हलवून जशी मुजरा करतात त्याप्रमाणे प्रेक्षक या गाण्याला तल्लीन झाला.

आणि प्रेक्षकांच्या एकाग्रतेला खंड न पडू देता श्री संजय पुराणीक यांनी, संगीत आणि स्वर सुधीर फडके यांच्या आवाजातलं नाचत नाचत गावे हे गाणं गाऊन  प्रेक्षकाला ब्रम्हानंदे तल्लीन व्हायला लावलं.

आताच झिणी झिणी वाजे बीन वाजे सख्यारे हे मूळ आशा भोसलेंच्या आवाजातलं गाणं आपण त्यांच्या आवाजात ऐकलं, ज्यांनी निवेदिकेची भूमिका आजपर्यंत अगदी सहजपणे हसत खेळत पार पाडली होती,  शितचंद्रलोकच्या रंग मंचकावर होणाऱ्या नाटकात आजपर्यंत बहुमूल्य योगदान त्यांनी दिलं होतं, "साजणी बाई येणार साजण माझा" ही गायलेली लावणी दिवाळी पहाट २०१५ चं एक खास आकर्षण ठरलं होतं. आणि आता असे  किती बरे स्वल्पविराम देऊन पुढे जात राहिलो तर त्यांचा नांवाचा उल्लेख करायला विसरेन मी.  त्या म्हणजे, श्रीमती गौरी गोठीवरेकरांना मागे वळून बघायला वेळ कुठे आहे. आज तर त्यांनी कानडी भाषेतलं भाग्यदा लक्ष्मी बरंम्मा हे भजन गाऊन आश्चर्याचा धक्काच दिला. न जाणो भविष्यात त्यांच्याकडून कोणत्या सप्तगुणांची मालिका बघायला मिळेल. आत्ताच असा खोल पाण्यातला तळ न बघितलेला बरा !  परंतु शितचंद्रलोक मधील प्रेक्षकांना समजावणार कोण !

गदिमांचं विकत घेतला शाम बाई मी, विकत घेतला शाम आणि नेसले गं बाई चंद्रकला मी ठिपक्यांची अशा सुदंर गाण्यांची निवड करून सौ साक्षी सनगरे यांनी त्यांच्या सुंदर आवाजात गाऊन  प्रेक्षकांची मने जिंकलीत. त्यांच्या आवाजात गोडवा आहे.

आटपाट एक शीतचंद्रलोक नावांचं नगर होतं आणि त्या नगरात तिचा आवाज घुमतो असे म्हणतात. तर उर्वी तिचं नांव असावं. तीने ज्या स्वरात सुरेख आणि अप्रतिम असं गाणं गायलं, त्या शब्दांचा मोह मलाही आवरता आला नाही आणि चक्क मी माझ्या या अभिप्रायाला त्याच शब्दांची फुले वाहिलीत. अजुनी पान जागे, फुल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला. गाडगीळ साहेबांनी सुरेख साथ दिली.

सौंदर्याची उधळण तू 

लई दिसाची हौस राया, चला आता पुरी करू, चला जेजुरीला जाऊ हे गाणं गाण्यासाठी एकाच या जन्मी जणू फिरुनी जन्मेन मी नव्हे तर पुढच्या वर्षी फिरुनी हीच लावणी गाईन मी. झी चोवीस तास गौरवीत सौ शोभा गावडेंना सौंदर्याची उधळण तू, नवरत्नाची खाण तू म्हणत परत एकदा वन्स मोअर होऊ द्या अशी सर्व जण आतुरतेने वाट बघत आहेत.

प्रीत लपवुनी लपेल का, लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का.श्रीयुत पुराणिक काकां, वॉ क्या बात है. जीसकी तारीफ करना भूल जाय, उससे बडी दाद और क्या हो सकती है.

मनात सुंदरा तूझीच मूर्ती श्यामला  आणि २०१५ ची दिवाळी पहाटचं शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी  चंद्र आहे. अशी एकाहून एक क्लासिकल गाणी आजपर्यंत आपण गायलीत. गाडगीळ साहेब, मनात सुंदरा तूझीच मूर्ती श्यामला तुम्हीच आहात.

देहाची तिजोरी, भक्तीचाची ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा हे जगदीश खेबुडकरांचं गीत सुधीर फडके यांच्या अवजातलं गाणं, काटकर साहेबानी गायलं आणि एका नवीन कलाकार गवसला. त्यांच्या गाण्यावर एवढा कमांड होतं जणू ते आपल्या माध्यमिक शाळेपासून गात असावेत. त्यांना संगीताची देखील आवड आहे असं कळलं. Very good, Excellent

श्रवण गोठीवरेकर - माळीण नाटकात झलक दाखविल्यानंतर सायन आया गाणं गातांना चेहऱ्यावरच्या छटा आणि मुरलेले हावभाव बरच काही दर्शवीत होते. आम्ही म्हणतो म्हणून नव्हे, आता तू सायनला उतरुच नको , असाच पुढे जात रहा. यशस्वीभव.

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. हा अभंग अप्रतिम आवाजाचं लेणं लाभलेल्या नेहा आणि उर्वी यांनी सुरेख आवाजात गायला आणि शीतचंद्रोक मधील पहाट पंढरीमय झाली.

श्रीमती पेडणेकरांचे विशेष कौतुक, की ज्यांनी निवेदनाची रूपरेषा आखून दिली होती. तुमचं ज्ञान कौशल्यं चं प्रतिबिंब त्या नितळ निवेदनात दिसलं.

ज्यांना जर कधी एखादा दुर्मिळ धागा सापडला तर त्याच्यावर एक तास लेक्चर देणारे आणि ज्यांना त्यांची स्तुती केलेली अजिबात आवडत नाही ते श्रीयुत पोंक्षे साहेब आज मला थांबवूच शकत नाहीत. त्यांनी एका उत्कृष्ट गाण्याची निवड केली होती. मंगेश पाडगावकरांचं गीत, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. गाण्याचे शब्दच त्यांच्या सर्जनशीलता विषयी बोलून जातात.  दिवाळी पहाटची सुंदर चकाकणारी किनार त्यांच्यामुळेच प्रकाशित झाली. परंतु हे श्रेय ते स्वतः घेत नाहीत. कोणतंही प्रिप्रेशन नसलेला कागद हातात नसतांना सर्वांचे आभार प्रदर्शन मानून काही चुकलबिकल तर क्षमा असावी असे भाव प्रगट करून कार्यक्रम वेळेत संपवतात. उद्देश साध्य झाल्यानंतर ग्रुप क्लोज सुद्धा करतात. अशा व्यक्तिमत्वाला सलाम. अध्यक्ष श्रीयुत फाटक आणि सेक्रेटरी श्रीयुत कुंभार यांनी दिलेले मोल अनमोल आहेत. श्रीयुत सनगरे यांचं विशेष कौतुक की ज्या कार्यक्रमासाठी तुळशीवृंदावन आणि आकाशकंदील चं ते वर्षभर काळजी घेतात.

दिवाळी पहटच्या निमित्ताने व्यक्तिमत्वाला सांस्कृतिक आकार देण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले, शिवास्पदे शुभदे या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फुर्ती गीताने संपन्न झाला.

कितीही परिसर जलमय झाला, तरी शुभेच्छा वर्षावाचा बोर्ड वाहून जाणार नाही. कारण त्याची ओहरहेअड वायर मजबूत आहे. म्हणून बा. सी. मर्ढेकर त्यांच्या कवितेत म्हणतात,

अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढून, अजून बकरी पाला खाते.

धन्यवाद
                                                 

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

खिडकीतलं चांदणं

आपली कोणतीही गुपितं कोणालाही कळनार नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. आपल्या प्रत्येक गोष्टीची खबर बात हिच्यामार्फत घेतली जावून तुमच्यावर नजर ठेवली जाते. प्रत्येक घर, हवेली, कचेरी, राजवाडा किंवा गगनचुंबी इमारतींचा आराखडा तिच्याशिवाय पूर्ण होत नाही. आकाशाला गवसणी घालणाऱ्या गगनचुंबी इमारतींना भव्य सुशोभित दरवाजे असतील भले, परंतु ही नसेल तर त्याचं रूपांतर बंद अडगळीची कोठडी असाच करावा लागेल. आणि हिच्यातूनच म्हणजे याच खिडकीच्या माध्यमातून, अर्थात कॉम्प्युटरच्या आधुनिक विंडोज मधून साऱ्या जगाचा वेध घेतला जातो.

कोणी कल्पनाही केली नसेल की पूर्ण विश्वात राज राजवाडे पासून गगनचुंबी इमारतींचे सौंदर्य खिडकी शिवाय खुलून दिसत नाही. म्हणूनच गृह रचनेच्या आराखड्यात दरवाजा इतकेतच खिडकीला सुद्धा महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. खिडकी विषयी प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतं. कुणाचं आणि कशासाठी तरी हळवं मन तिच्यात दडलेलं असतं. घड्याळाचा उपयोग न करता खिडकीतूनच रस्त्यावरील चहाची टपरीवर कोणकोण लोक उभे आहेत,  वाण्याचं दुकान अजून उघडलं कसं नाही.  दूधवाला, इस्त्रीवाला यांची दुकानं आज का बरं लवकर बंद झालीत. एरवी बहिणाबाईंच्या गार्डन पर्यंत हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत जाणारी रिक्षावाल्यांची लाईन आज सामसूम का दिसत आहे, आज रिक्षावाल्यांचा संप-बिम्प तर नाहीना,  या सर्व प्रश्नांची उत्तरं या खिडकीतून व्यवस्थित मिळतात. पण खिडकीतून न बघताही भाजीची गाडी केव्हापासून येऊन तो आता जायच्या तयारीत आहे हे खिडकीतून येणारी त्याची ललकारी बायकांच्या लक्षात आलेली असते आणि म्हणून हातातला पेपर वाचायचा सोडून भाजी घ्यायला मला पळावं लागतं.  एरवी नाही त्या रिकामटेकड्या गोष्टींची दखल सुद्धा या खिडकीतूनच घेतली जाते. भिंतीला कान असतात तसे खिडकीलाही डोळे असतात बरे. कोणाच्या घरी मुलगी बघण्यासाठी पाहुणे आले, तरी त्याची खबरबात आपल्या घरच्या मंडळींना या खिडकीतून पुराव्यानिशी लागतो आणि चाळीत त्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी या खिडकीतून त्या खिडकी पर्यंत पोहचते. सासू कितीही चलाख आणि हुशार असली तरी तुमच्या घरातली गुपितं सुद्धा याच खिडकीतून बाहेर पसार होतात. माहेरचा कोणीतरी दिसेल आणि त्याला निरोप देऊ या इच्छेने मिनीमिनीटाला खिडकीच्या बाजूने येरझारा घालणाऱ्या सुनेच्या आशा सुद्धा याच खिडकीत जिवीत असतात.
आपण इतिहासात डोकावून बघितले तर आपल्याला आढळून येईल की गड किल्यातल्या राणी महालांच्या खिडक्या तेवढ्याच सुशोभित असायच्या जेवढे महालांचे दरवाजे. याच खिडकीत बसून राजकुमारी आपल्या स्वप्नातला राजकुमार स्वार होवून येत असलेल्या घोड्याच्या टापांचा आवाज ऐकण्यासाठी तासन तास वाट बघत असे. राजकुमार परतीच्या प्रवासाला निघाला असतांना याच खिडकीच्या पडद्या आडून त्याला प्रेमाचा इशाराही करत असे. अश्या प्रकारे राजकुमारीचं हळवं मन याच खिडकीत दडलेलं असे .शहजहानला ज्या कारागृहात बंदिस्त केले गेले होते त्या कारागृहाच्या खिडकीतूनच ताजमहालचं सौंदर्य तो रात्रंदिवस  न्याहाळत असे.

पूर्वी गडकिल्ल्यांच्या तटबंदीला सुद्धा छोटया छोटया खिडक्या असायच्या, पण त्यांचा उपयोग शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी असायचा. आजच्या युगात अश्या तेल ओतीव खिडक्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजकाल राजकारणातल्या खिडक्यातून गरम गरम तेल एकमेकांच्या अंगावर रोज सर्रास ओतले जात आहे. तालुक्याच्या प्रत्येक ठिकाणी सरकारी मदतीची खिडकी असते परंतु असल्या खिडकीचे गज हे गंजून पूर्ण निकामी झालेले असतात.  नोव्हेंबर 2016 च्या नोट बंदीच्या काळात बँकांच्या मागच्या खिडकीतूनच नोटा बदलल्या गेल्या असं आपण प्रत्यक्ष पाहिलं होतं.

खिडकीत बसून चहा अथवा कॉफीचा घोट घेत मस्त बाहेरचा माहोल न्याहळाने हा आनंदाचा क्षण प्रगट करण्याचा आपला आयुष्यातला एक आविष्कार असतो. अशा प्रकारे मानवी मनाच्या खीडकीतूनही भाव भावनांचे अनेक वारे वाहत असतात. कवी आणि लेखकांनी सुद्धा खिडकीला आपल्या साहित्यात मानाचं स्थान दिले आहे. लेखिका सौ शुभदा खरे, त्यांच्या दोनहजार साली लिहिलेल्या वृत्तपत्रीय लेखात  खिडकीचं वर्णन करतांना म्हणतात "मध्यरात्र टळून गेली पण डोळ्यात झोपेचं नामोनिशाण नाही. येणार कशी झोप ? नुकतीच मिलर आणि बुन्सची बेहद्द रोमँटिक कादंबरी वाचून संपविली....मी लिहियतेना या टेबलावर सुद्धा चांदणं पसरलंय. खिडकी समोरच चंद्र आलाय आणि मिस्किलपणे हसत विचारतोय, काय मधुचंद्राला येणार का माझ्या घरी ! खरच रे, आपल्याला मधुचंद्राला चंद्रावर जाता आलं असतं तर किती छान झालं असतं!" खिडकी बाहेर धुंद वातावरण पसरलय ! कुसुमाग्रजांची कविता मनात बहरून येते ‘काढ सखे, गळ्यातील | तुझे चांदण्यांचे हात 'क्षितिजाच्या पलीकडे | उभे दिवसाचे दूत’

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१८

रंग पानाचा हिरवा सुकला, माझ्या कापसाला ...............!

चाळीसगांव पासून जेमतेम पंधरा किलोमीटरवर वसलेलं माझं गांव "धामणगांव".  या पहिल्याच वाक्यातलं "जेमतेम" हा शब्द माझ्या गांवच्या बाबतीत खूपच अशुभ ठरला आहे. वाहतुकीसाठी चाळीसगांव ते धामणगांव  रोड अतिशय ठणठणीत जरी असले तरी गावकऱ्यांसाठी सरकारची एस.टी. वाहतूक व्यवस्था जेमतेम किंवा नाही म्हटले तरी चालेल. या वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था देखील जेमतेमच होती. मी जेंव्हा चाळीसगांव एस.टी. डेपोला धामणगांवची एस.टी. बस बंद का झाल्याची चौकशी केली , तेंव्हा त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामुळे एस.टी. बंद करण्यात आली आहे. त्यांचं उत्तर ऐकून मी चकितच झालो. त्याच्या डोळ्यात निरखून बघितल्यानंतर त्याचा केविलवाणा चेहरा अधिकच आगीतून काढलेल्या मठ्ठ माठासारखा भासला. गावांत नळाला पाणी सुद्धा जेमतेम अर्धा तास आणि तेही दोन ते तीन दिवसानंतर येतं आणि त्याला पर्याय नसतो, कारण हे सर्व पावसाचे अनियमित खेळ आहेत. गावांतील काही मंडळी वर्गणी काढून सांस्कृतिक उत्सव अति उत्साहाने साजरे करतात ही चांगली बाब आहे, परंतु गांवात कमीत कमी नियमित तीन वेळा एस.टी. वाहन यायला पाहिजे, गावकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांची शाळा-कॉलेज मध्ये जाण्यासाठी सोय झाली पाहिजे असा सुध्दा प्रयत्न करायला हवा परंतु तो उत्साह दिसत नाही. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो त्या मराठी शाळेची फुटलेली, घरंगळलेली कौलं, अर्धवट सताड उघड्या खिडक्या बंदिस्त धर्मशाळेसारखी वाटतात. बऱ्याच वर्षांपासून पाऊस नियमित पडत नाही म्हणून शाळा समितीला ती दुरुस्त करून घ्यावीत असे सुचले नसावे कदाचित.

माझ्या लहानपणी जिथे निसर्गाला निसर्ग भिडत होता. नदीला अथांग पूर येत होता. रान वारा पिकापीकातून शीळ घालत असे आणि जंगल ही चारही बाजूने हिरवी चादर पांघरल्यासारखी भासत असे. तसं दृश्य बऱ्याच वर्षांपासून बघितले नाही. यावर्षी पाऊस श्रावण महिन्यापासून गेला तो गेलाच. त्याला तोंड फिरवून दाखवायला सुद्धा उसंत मिळाली नाही. जेमतेम तीन ते चार वेळा तो आला आणि कौतुकाची थाप घ्यायला तो घाबरलाच. नंतर त्याने फिरून तोंडही दाखविले नाही. तरी शेतकरी अजून आतुरतेने त्याची चातकासारखी वाटच बघतच होता. मंगेश पाडगावकरांची कविता भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. दिवाळी पर्यंत शेतकऱ्यांची शेतातली लगबग थंडावली. कापसाच्या गाठीच्या गाठी शेतातून घरी यायच्या त्या नाहीशा झाल्यात. कोणी बैलजोडी विकून खांद्यावरची ओझी कमी केलीत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार सुद्धा सरकारी पद्धतीने काम करून विलंब करतंय. कापसाच्या झाडाची पानं पानं आकसून मिटलीत. कापसाची झाडाची कच्ची कैरी वयात न येताच उन्हाने केविलवाणी झाली. दिवाळीला येणाऱ्या फुलांच्या पागळ्यांचा फुलोरा फुललाच नाही.

रंग पानाचा हिरवा सुकला,
माझ्या कापसाला..............!