रेशीम धागे
Monday, 30 December 2024
मेव्हणी माझी जेंव्हा रिटायर होते
व्यासपीठावरील अध्यक्ष, मान्यवर आणि समस्त गुरुजन असा मोठा परिवार जमलेला होता. पी पी चेंबर मधील चवथ्या माळ्यावरच्या हॉल मध्ये लगबग चालू होती. हॉल बाहेर मेव्हणीचा रांगोळीचा विशिष्ठ फोटो काढण्यात आला होता. शिक्षिका आणि मेव्हणीच्या मैत्रिणी अप्सरासारख्या नटून थटून आल्या होत्या. स्टेज च्या मागे "सेवापूर्ती गौरव सोहळा" असा बॅनर मोठ्या दिमाखात झळकत होता. कारण तिने चक्क 37 वर्षे सेवा केली होती. वरिष्ठ मंडळी एकदाची स्थानापन्न झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली देखील. बऱ्याच शिक्षकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. नंतर
मी जास्त वेळ न घेता माझ्या भाषणाला सुरुवात केली. सगळी हयात शिक्षकी पेशात घालवल्या नंतर कोणता उद्योग आरंभायचा हा जसा मोठा यक्ष प्रश्न असतो. तसे मेव्हणी बद्दल एव्हढे नामवंत गुरुजन शिक्षकांसमोर काय बोलावे हा मला लहान तोंडी .... पडलेला प्रश्नच होता. मी स्वतः रिटायर्ड असल्यामुळे माझ्याकडे गाईड लाईन्स भरपूर असतील परंतु स्टेज वरून भाषण देणे सोपे नक्कीच नव्हते. कारण मी काही वक्ता नाही, की मी कुठे भाषणही दिले नाही. कारण भाषण देण्यासाठी सर्जनशीलतेची प्रतिभा असावी लागते ती माझ्यात मुळीच नाही.
म्हणून मी चक्क भाषणच लिहून आणलं आहे. अर्थात मीच ते लिहिलं आहे. आमच्या हीच आणि माझं लग्न झाल्यापासून गेली चव्वे चाळीस वर्षे मी संगितालां पाहतो आहे. माझ्या समोर तिने ग्रॅज्युएशन केलं, नृत्य कलेत तिने प्रावीण्य मिळविले, तिला आदर्श शिक्षिका म्हणून सुद्धा गौरविण्यात आले. ही किती अभिमानाची आणि मोठी गोष्ट आहे. शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात ती अग्रेसर असते. आईवडिलांची सेवा करण्यात ही ती कुठे कमी पडलेली नाही. तिने डीएड पूर्ण केल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची चांगली शिक्षकी पेशातली नोकरी, एवढं सर्व काही आपल्या पदरी विपुलता येणार आहे अशी पुसटशी कल्पना नसताना, एक दिवस घरासमोरच्या सारवलेल्या अंगणात नववधूने तुळशी वृंदावन जवळ नुकतीच रांगोळी काढली, आणि थोड्याच वेळात पावसाची सर येऊन तुळशीवृंदावन पावसात ओलचिम्ब झाले ! पावसाने सारवलेलं ते सारवण रांगोळीसह वाहून नेलं ! जे नशिबात होतं त्याला ती सामोरे गेली. डगमगली नाही. अनेक वळणे आली असतील त्यांच्याशी तीने जुळवून घेतले. आणि इथपर्यंत ती येवून पोहोचली आहे. रिटायरमेंट ला अवघे काही तासच उरले आहेत. मला कल्पना आहे, तिच्या मनात प्रचंड उलथापालथ चालू असेल. शांता शेळके यांच्या गीतातून सांगायचे झाले तर जायचे इथून दूर, काहूर मनी उठले, दाटे नयनात पूर. जसे सर्व ऋतूत येणारे सर्व सण आपण अगदी आनंदाने साजरे करतो, आणि शेवटी आपल्या शरीराची लाही लाही करणारा शिशिर येतोच ना ! झाडांच्या फांदीला तो शुष्क करून टाकतो. त्याला कोणी नाकारले आहे का. कारण नंतर नव पालवी घेवून वसंत येणारच असतोच.
आतापर्यंत जगलेल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुझ्या हातून सुटून गेल्या असतील. ऐन उमेदीच्या काळात जे आयुष्य जगायचं राहून गेलं होतं आता ती जगायची संधी तुला मिळणार आहे. माधव ज्युलियन म्हणतात "चल उडुनी पाखरा पहा जरा, किती रम्य पसरली वसुंधरा". हो, आज आम्ही सर्वजण तुझ्या बरोबर आहोत. तुझे कोडकौतुक करत आहोत. उद्या मात्र आम्ही सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होणार आहोत. सकाळची लोकल, शाळेची घंटा, विद्यार्थ्यांचा किलबिलाट. अटेंडडन्स रजिस्टर वर केलेली सही आणि विद्यार्थ्यांचा हजेरीपट, हुशार विद्यार्थ्याच्या पाठीवर मारलेली शाबासकीची थाप, हा चालू असलेला अध्याय एकदम खंडित होणार आहे. जसा वीजपुरवठा खंडित होतो आणि चुहुकडे अंधार पसरतो आणि क्षणभर आपल्याला काही सुचत नाही त्याप्रमाणे निवृत्तीनंतर थोडी हुरहूर, थोडे नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक छोटासा गुंता तयार होईल. भिंत असली म्हणजे तिच्यावर पाल फिरणारच, भाजीपाल्याची पिशवी घरी घेवून येतांना रस्त्यावर मांजर आडवी जाणारच, कोणाच्या घरात दूध अजूनपर्यंत ओतू गेलं नाही, हे सांगा बरं ! मग तू त्यांच्या पेक्षा वेगळी कशी असेन. निवृत्तीनंतर आपले कोणी कौतुक करेल ! पण असं घडतं नाही. का बरं अशी अपेक्षा करावी. आपणच आपल्या मुलांचे, त्याच्या लग्नाचे आणि येणाऱ्या नवीन सुनेचे, कौतुक करायचे दिवस चालून येणार आहेत. तो कौतुकाचा शब्द भांडार तुला तुझ्या रेशमी पदरात जपून ठेवावा लागणार आहे. निराशेचे दिवस संपणार आहेत आणि नवीन आयुष्य जगण्याची तुला संधी चालून येणार आहे. कारण अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढून अजून बकरी पाला खाते.
ही बा.सी. मर्ढेकरांची कविता तुला नेहमी 'प्रेरणा' देत राहील.
पुढच्या भावी आयुष्यासाठी तुला शुभेच्छा.....धन्यवाद.
Monday, 9 December 2024
चांदणं
एखाद्या चांदण्या रात्री घरातून बाहेर पडायला मिळणे असे म्हणणे मुंबई सारख्या ठिकाणी हास्यास्पद ठरेल. तेथे समुद्र गर्जत राहतो लाटा किनाऱ्यावर येवून काही तरी सांगण्यासाठी आक्रोश करून आदळत राहतात परंतु तेथे कोणी कोणाची दाखल घेत नाही. परंतु हा दुर्मिळ योग, मी जेंव्हा वैशाख महिन्यात गावी जातो त्यावेळेस काळया आभाळाचे आणि अनेक चांदण्या रात्रीचे सौंदर्य मी अनेकदा माझ्या काकांच्या मातीच्या घराच्या धाब्यावर झोपताना अनुभवली आहे. तसेच चांदण्या रात्रीत शेतात राखण करण्यासाठी मी त्यांच्या बरोबर जात असे. शेत माळ्यावर खाटेवर झोपताना आभाळभर अथांग चांदण्याच्या लाह्या आकाशात विखुरलेल्या दिसायच्या. एव्हढ्या असंख्य चांदण्या आल्या तरी कोठून आणि दिवसा कुठे गायब होतात याचं गणित मला कधीच उलगडलं नव्हतं. कधी कधी शेतातून परस्पर शेजारच्या बाजारपेठेच्या गावी तमाशा बघण्यासाठी सुद्धा आम्ही बैलगाडी जुंपून जात असू. अशा बऱ्याच चांदण्या रात्रिंच्या आठवणी आयुष्याच्या गाभाऱ्यात निपचित पडल्या आहेत. त्यांना कोणतेही उपमा अलंकार देण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. परंतु हे शिंपले जेंव्हा उफाळून वर येतात तेंव्हा ते अनुभवतांना कुसुमाग्रजांची कविता गुदगुल्या करते. काढ सखे गळ्यातील तुझे चांद्ण्याचे हात क्षितीजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दुत.
अचानक झोपेतून जाग आली. रात्रीचे तीन वाजलेत. मी अमृतसर एक्स्प्रेस ने प्रवास करत होतो. खिडकी उघडली. थंडगार वाऱ्याची झुळूक चेहऱ्याला अलगद स्पर्शून जात होती. तोच चांदण्याचा शुभ्र प्रकाश चौफेर उधळला जात होता. खुल्या आभाळाची विशाल चंदेरी चादर जमीवर अंथरली जात होती. ट्रेन डोंगराला चकवा देत मार्ग परिक्रमण करीत होती. चंद्र साक्षीला होता. कधी डोंगर आडून कधी दाट झाडीतून माझ्या संगतीला होता. त्याच्या किरणांनी सारा आसमंत लखलखाट झाला होता. ही रात्र आणि प्रवास संपूच नये अशा वेड्या मनाची समजूत कोण काढणार. सकाळचे साडेचार वाजलेत तरी ट्रेनला रात्रीच्या चांदण्यातून सुसाट धावण्याचा मोह आवरत नव्हता. मघापासून अखंड धावल्याने चंद्रही थकला होता. मी त्याचा निरोप घेण्याच्या तयारीत असताना त्या रमणीय पहाटे मी पाचच्या सुमारास चाळीसगांव प्लॅटफॉर्म वर उतरलो. विनंती वरून मला अक्कलकुआ एस टी बस कंडक्टरने खडकी फाटा स्टॉपवर उतरवून दिले. दीड मैल मला पायी चालावे लागणार होते. गावाकडची ती पहाटेची नवलाई अनुभवल्यानंतर येथे परमेश्वर निसर्गात भरलेला आहे याची खात्री पटली. काही वेळाने मी माझ्या धामणगांवी पोहचणार होतो. माझ्या मनातले आनंदाचे दवबिंदू विरघळलेत. कारण आता आई तेथे नव्हती. ती खूप खूप दूर सात समुद्राच्या पलीकडे निघून गेली होती कधी न वापस येण्यासाठी. अजून एक आशेचा किरण मला उत्साहित करत होता. लहानपणी मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांनी मला प्रचंड माया लावली ते माझे काका अजून आहेत. आणि अजून त्याच मातीच्या भिंतीच्या धाब्याच्या घरात राहतात. ते समोर दिसताच त्यांच्या खांद्यावर दोन्ही पाय आजूबाजूला सोडून बसावे आणि त्यांची टोपी डोक्यावरचे केस विस्कटून वस्कटून ओरबाडून घ्यावेत. अजून त्यांच्याबरोबर हातात कंदील आणि काठी घेवून शेतावर जावे. शेंगा भाजून खाव्यात, मोटेवर बसून गाणी ऐकावेत. चांदण्यात गवत कापून बैलांना टाकावे. हे बालपणीच चित्र नेहमी नेहमी आयुष्यात डोकावत राहतं.
Monday, 26 February 2024
जीनकी बजहसे बिनाका गीतमाला को पहचान मिली
ओ पुराना दौर सकुन का दौर् था, धीरज और संतोष का युग था औंर आज हर चीज जेट स्पीडसे भागती दौडती रहती है l बहनो और भाइयो, रहना तो हमे आखिर आज ही मे है l लेकीन गुजरे हुये दिनकी मिठास और गहराई भी अगर हम अपने साथ रखकर आगे बढते रहे, परंपरा और प्रगतीसे मिलाते रहे, तहजिब और तरक्कीसे जोडते रहे तो, और बिता अनमोल होता जायेगा हमारा जीवन l दुःख और सुख, मिलन और विरह, दोनोको झेलना आसान हो जयेगा l
हे बोल आहेत अमीन सयानी यांचे 1952 ते 1955 च्या रेडिओ वरच्या बिनाका गीतमालातील. गाण्यापेक्षा हे बोल ऐकण्यासाठी शहराच्या चौका चौकातून, पानाच्या टपरीवर, मिळेल तेथे पब्लिक गर्दी करीत असे. मी सुद्धा माध्यमिक विद्यालयात धुळे येथे शिकत असातांना, संध्याकाळी आठ वाजता एक छोट्या चहाच्या टपरीवर बिनाका गीतमाला ऐकण्यासाठी हजेरी लावत असे. रसाळ आणि मधाळ वाणीने अमीन सायानीच्या आवाजाचं गारूड लाखो लोकांच्या हृदयात घर करून बसलं होतं. आज तो रेडियोवरचा आवाज कायमचा बंद झाला. राहिल्या त्या फक्त आठवणीच्या रेकॉर्डिंग्ज. त्यांच्या जाण्याने रेडियोवरचं सुवर्ण युग लयास गेलं आहे असं वाटायला लागलं. बहनों और भाइयों अशी त्यांच्या बोलण्याची शैली आज ऐकायला मिळणे दुरापास्त आहे. त्यांचे निवेदन ऐकत राहणे हा स्वर्गीय आनंद होता, शब्दांना साज चाढविण्याची कला त्यांना ईश्वरी देणगी लाभली होती. तब्बल चार दशके त्यांनी शब्दांची फुले रसिकांच्या मनावर उधळलीत. त्यांच्या शैलीदार निवेदनाने केवळ शहरी भागात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात , खेडोपाडी रसिकांवर भुरळ घातली होती. तसेच गायक, संगीतकार, गीतकार, नट नट्या यांना बोलते केले होते. तारीख 21 फेब्रुवारी 2024 ला असंख्य रसिकांना भुरळ घालणारे अमीन सयानी यांची 91 व्या वर्षी प्राण ज्योत मालवली.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Monday, 5 February 2024
शेकोटी 2024
संस्कृती म्हणजे काय तर आपल्या समजाची जीवन पद्धती की जेथे शिष्टाचार, खानपान, भाषा, साहित्य, विचार,आदर, सदभाव, सभ्यता आणि कला याचा संगम. आणि हाच संगम शीतचंद्रलोक सोसायटीत जवळ जवळ दोन ते अडीच दशकापासून बघायला मिळत आहे. मग तो विषय कोणताही असो, राम मंदीर प्राण प्रतिष्ठा असो, श्री सत्यनारायण वार्षिक पुजा किंवा वुमेन्स डे असो, तसेच कोजागिरी पौर्णिमा, किंवा दिवाळी पहाट असो, अशा कितीतरी उत्सव सेलिब्रेट केले जातात की त्यांच्यावर वेळोवेळी भाष्य केले आहे. नेहमी एक गोष्टीचा विसर पडतो ती म्हणजे शीतचंद्रलोक च्या सख्या. चुलितले निखारे आणि टोपलीतले चार पाच वांगे उचलून टाकून चक्क काळेकुट्ट भाजून निघेपर्यंत एका दगडी खलबत्त्यात हिरव्या मिरच्या, लसूण जिर, मीठ कांदा कुटून निघेपर्यंत इकडे वांगी चांगलीच होरपळलेली असतात आणि खमंग वास सुटलेला असतो दुसऱ्या मिनिटाला वांग्याचं भरीत कुच्करून तयार झालेलं असतं, घरधनी नाकात वास भरून मळ्याकडे रवाना होतो. हीच ती संकल्पना शीतचंद्रलोकमध्ये कोणी रुजविली हे कोडे उलगडण्याच्या भानगडीत न पडता लहान थोर सगळीच मंडळी लायनीत उभे राहून कधी बाजरीच्या भाकरीचा पापडा काढून पहिला घास ठेचाचा मग वांग्याचं भरीतचा. थोडक्यात आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं अशी खूणगाठ बांधून रिपीट रिपीट वांग्याचं भरीतचा फडशा पाडला जात होता. खर म्हणजे आदल्या दिवशी शेकोटी कार्यक्रमावर दुःखाची सावली पसरल्यामुळे शीतचंद्रलोक सख्यानी आपल्या कर्तृत्वाचं भान ठेवून नियोजित शेकोटीचा कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला होता.
सकाळ पासून त्यांची ही लगबग किती शिस्तीत चालू होती ही कॅमेरात बंद झालेली असतांना, घरची कामे आवरून या लोकांना वेळ मिळतोच कसा, बाजार केंव्हा करतात, कोण कोण जातंय बाजाराला, आणि यांना हे जमतं कसं ! खलबत्ता, मुसळ, शेंगदाणे, लसूण, हिरव्या झणझणीत मिरच्या यांचे कुटण, बेसन, वांगे भाजणी, तवा, कढई, मीठ मसाला आणि चुलितील निखारे ....... कुठं थांबायचं तुम्ही सांगा. आणि शेवटी आइस्क्रीम कुल्फी !!
शीतचंद्रलोक सख्यांची ही तपश्चर्या चक्क बारा वर्षांपासून अखंडितपणे चालू आहे. आणि आम्ही सर्व सदस्य मंडळी अगदी चवीने या मेजवानीवर कोणतेही आढेवेढे न घेता लोट पोट होवून कौतुकाची थाप देवून मार्गस्थ होतो . सर्वांची जेवणं झाल्यानंतर शीतचंद्रलोक सख्यांनी जेवणास सुरुवात केली. सगळा पसारा आवरून, भांडीकुंडी लख्ख करून, साधारणतः 10 वाजता शेकोटी या कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
अशाप्रकारे शीतचंद्रलोक सोसायटीत सुसंस्कृतीची सूत्रे घट्ट रोवली गेली आहेत.
धन्यवाद
फुले वेचता वेचता "फुले वेचिता".......
लता मंगेशकर यांना आपल्यातून जावून सहा फेब्रुवारी 2024 ला एक वर्ष होईल. त्यांचे आपल्यात नसण्याने फार मोठी पोकळी जाणवते. त्यांची रेडीयोवरची गाणी ऐकून मन संगीतमय होऊन जातं. कोकीळ गातो त्याचं गाणं कानावर पडतं परंतु त्याचं दर्शन मात्र घडत नाही. सुरच त्याच्या अस्तित्वाची खूण असते. असा कोकीळ आवाज असलेला सुवर्णयुग पुन्हा अवतरेल का नाही सांगणे कठीण आहे परंतु अशी लता पुन्हा होणे दुरापास्त आहे. त्यांची गाणी म्हणजे भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यातला अमूल्य ठेवा आहे.
लता मंगेशकर आपल्या "फुले वेचिता" या पुस्तकात लिहितात, कला निर्मितीही अशीच असते. अशीच रम्य, अशीच सहज, अशीच सुंदर, कृष्णाच्या मुकुटातल्या मोरपिसासारखी, राधेच्या हातातल्या श्रीकृष्णाच्या बासरी सारखी; कर्णाच्या वेदनेसारखी; द्रौपदीच्या जाज्जवल्यासारखी; सीतेच्या त्यागासारखी, ज्ञानेशाच्या मराठी सारखी ! एके ठिकाणी त्या आपल्याच संवेदनशील मनाला प्रश्न विचारतात, खरेच माणसाला पुनर्जन्म असतो का? किती अवघड प्रश्न? काय याचे उत्तर? फक्त शून्य ! क्षितिजाच्या पलिकडे काय आहे? वाऱ्याच्या भरारीत काय आहे ! सूर्याच्या तापात, चंद्राच्या शीतलतेत, सागराच्या खोलीत, मृत्यूच्या उदरात पुनर्जन्म असेल का? हे अथांग, अथांग विश्व पार केल्यावर परत यायला रस्ता असेल का? सगळेच गूढ प्रश्न. या प्रश्नांची उत्तरे म्हणजे प्रतिप्रश्र्नच.
Sunday, 23 July 2023
तिकडंम आघाडी
विरोधी पक्षांचे महागठबंधन UPA चे नाव बदलून नवीन नाव ऐकून आश्चर्य वाटून घेवू नका, तर ते आघाडीचे नवीन नाव आहे Indian national developmental inclusive alliance (INDIA)
राहुल गांधी यांच्या सुपर मेमरितून निघालेल्या या नवीन नावाचा अर्थ तरी काय आहे अजून तरी त्याचा नीटसा अर्थ उमगलेला दिसत नसला तरी बरीच मंडळी त्याचा अर्थ शोधण्यात गूगल ची पाने उलथापालट करण्यात व्यस्त असावेत.
या I.N.D.I.A नाव असलेल्या गठबंधन मध्ये बरीच अशी मंडळी नेते किंवा पक्ष असे आहेत की ज्यांचे विळा भोपळ्याचे नाते आहे, कोणाचं हिंदुत्व वर जिवाआड प्रेम आहे आणि ते आता सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्यां पक्षांचे कधी आयुष्यभर एकमेकांशी पटले नाही त्यांचे एकमेकांवर एव्हढे प्रेम कसे काय दाटून आले! या कोड्याचे उत्तर अतिशय सोपे आहे ते सांगायची गरज वाटत नाही.
श्रीयुत अनय जोगळेकर यांची मी आज एक यूट्यूब पहिली, ही चर्चा चालू असताना त्यांना एक सुंदर गोष्ट आठवली. ते मजेशीर वर्णन करून सांगतात. एक नवरा बायको असतात, दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. नवरा असतो त्याने हातावर एक घड्याळ बांधलेलं असतं. (राष्ट्रवादीचं नव्हे) पण एक घड्याळ बांधलेलं असतं. ते घड्याळ बांधलेलं असलं तरी त्या घड्याळाचा पट्टा तुटलेला असतो. (ही शिवसेनेची गोष्ट आहे असं समजू नका कारण ही खूप खूप जुनी गोष्ट आहे.) त्याचा घड्याळाचा पट्टा तुटलेला असतो, त्याची पत्नी सुंदर असते. तिला लांबसडक केस असतात. पण ते बांधायला तिच्याजवळ पिन किंवा क्लिप नसते. त्यामुळे त्या बिचारीला आपले केस मोकळे ठेवावे लागत असतात. नवऱ्या बिचाऱ्याला वाईट वाटत असतं की आपण गरीब आहोत, आपण बायकोला केस बांधायला साधी क्लिप ही आणून देवू शकत नाही. बायकोलाही वाईट वाटत असतं की आपल्या नवऱ्याचा घड्याळाचा पट्टा तुटला आहे तो पट्टा ही आपण बदलून देत नाही. दोघांचं प्रेम ही एव्हढ, एक दिवस काय होतं तर त्याची बायको तिचे लांबसडक केस कापून टाकते आणि विग वगैरे जे बनवतात त्यांना ते केस अर्पण करते. त्याचे जे पैसे येतात त्यातून ती नवऱ्याच्या घड्याळासाठी पट्टा विकत घेते. नवरा काय करतो, घड्याळाचा पट्टा तुटलेला आहे, घड्याळ असही काही उपयोगाचं नाही . नवरा विचार करतो की निदान आपल्या बायकोला चांगली क्लिप तरी घेता येईल, म्हणून तो आपले घड्याळ विकून टाकतो आणि बायकोसाठी क्लिप घेतो. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की नवरा बायकोचे एकमेकांवर किती प्रेम आहे. शेवटी तात्पर्य काय तर दोघांचे एकमेकांवर प्रेम असुनही नवऱ्याचं घड्याळ ही जातं आणि बायकोचे केस ही कापले जातात. शेवटी राहतो तो पट्टा आणि क्लिप चं करायचं काय ?
आघाडीतील विविध पात्रे एकाच टांग्यात दाटीवाटीने येवून बसलीत आणि घोडा घाससे दोस्ती नही करेगा तो खायेगा क्या ? उसको खाली पेट सोना पडेगा. मतदाराला ही पूर्वा अनुभवानुसार चांगले माहीत आहे की असली सरकारे देश चालवू शकत नाहीत.
Monday, 15 August 2022
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव १५ ऑगस्ट२०२२
ज्यांच्यामुळे आपण मुक्त श्वास घेत आहोत आणि ज्यांनी ज्यांनी भारत देश घडवला त्यांना सर्वप्रथम माझे वंदन आणि आपण शीतचंद्रलोकवासीयांना अमृतमहोत्सव स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आपल्या संपूर्ण देशात घर घर तिरंगा ही सुंदर संकल्पना प्रत्यक्षात उदयास येत असताना आपल्या शीतचंद्रलोक मध्ये स्वातंत्र्य दिनाचाअमृतमहोत्सव कार्यक्रम भव्य रूपाने साजरा झाला. भव्य म्हणजे काय तर मोगरा दरवळतो, त्याचा सुगंध हा निव्वळ सुगंध या एका शब्दाने त्याचे वर्णन करता येत नाही. त्याचं उमलणं अनुभवणं आणि त्याच्या सुगांधाच्या लाटा अंगावर घेणे म्हणजे जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव साकार करण्यासाठी प्रचंड प्रतिभा आणि मेहनत लागली आहे, याचा अवाका कळण्यासफोटो आणि व्हिडिओ चा आसरा घेतला खरा परंतु पृत्यक्षात त्याचे स्वरूप, आकार उकार मात्रा वेलांटी आणि उद्गारवाचक किती सुंदर असतील बरे ! हे सर्व श्रेय त्या टीमला जाते की ज्यांनी आपले नाव कुठल्याही पत्रकात नमूद केले नाही.
अमृतमहोत्सव यात्रा, गणेश पूजन, भारत माता पुजन, बैलगाडीचा रथ, बाईक धारी, झेंडे धारी, फलक धारी, आणि सोबत जमाव, भारत मातेवर अनोखी पुष्प वृष्टी, ओम् गावडेचा मिलिटरी मार्च, मान्यवरांचे आगमन, मान्यवरांच्या हस्ते तिरंगा पेटीतून बाहेर काढून ध्वजारोहन टीम कडे सुपूर्द केला गेला, आणि त्या नंतर, श्री जगन्नाथ पावसकर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण, राष्ट्गीत, सांस्कृतीक कार्यक्रम, ज्येष्ठांचा मान सन्मान, शीतचांदेलोक मधील सर्वच स्री पुरुषांनी घेतलेला सहभाग, आभार प्रदर्शनआणि लक्ष वेधून घेणाऱ्या निवेदिका. इतकं अप्रतिम आणि केवळ अप्रतिम असे नियोजनबध्द काटेकोरपणे नीटनेटका आणि उत्स्फूर्तपणे कार्यक्रम सादर करणे म्हणजे श्रीयुत पोंक्षे साहेबांनी गौरवलेल्या त्यांच्या भाषेत फक्त म्हणजे फक्त श्रीयुत कांडके आणि त्यांची टीमच हे फत्ते करू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
झेंडा वंदन ते झेंडा हातात कसा धरायचा, कोणी कुठे आणि कसे उभे राहायचे, मान सन्मान, ज्येष्ठ मंडळीचे आदराने आदरतिथ्य, या सर्व बारीक सारीक आणि भव्य विचारांचे पडसाद या कार्यक्रमात बघायला मिळालेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम ते देशप्रेम अशा प्रवासाला निघालेल्या शीतचंद्रलोकच्या संस्कृतीच्या उदरात अजून किती रत्ने दडवून ठेवलेली आहेत !
मिसेस गाडगीळ त्यांच्या मेसेज मध्ये लिहितात
आजचा स्वातंत्र्याच्या अमृत महत्सवोनिमित्त चंद्रलोक परिवाराचा कार्येक्रम खुप छान आणि दिमाखात साजरा झाला.
तसेच श्रीयुत पावसकर साहेब लिहितात
15 ऑगस्ट २०२२ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही कल्पना श्री भरत कांडके यांनी प्रत्यक्षात आणली आणि हा सोहळा दिमाखदार व डोळ्याचे पारणे फिटणारा न भूतो न भविष्यती असा साजरा केला व मला या अमृत महोत्सवी सोहळ्याचे साक्षीदार केलेत.
अमृत महोत्सवाच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली ते आदरणीय श्रीयुत कांडके साहेब आणि त्यांच्या टीमला मनापासून सलाम.
जयहिंद
Subscribe to:
Posts (Atom)