गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५
झेप
आयुष्य ही एक सुंदर कविता आहे. जिच्या प्रत्येक ओळीमध्ये एक नवीन अर्थ लपलेला आहे. आपल्या जीवनाच्या कवितेला सुंदर बनविण्याचे काम त्याने केले. त्याच्याबद्दलच मी आज दोन शब्द तुमच्यासाठी मांडत आहे.
फार वर्षापूर्वी नव्हे तर तुमच्या आमच्या समोर आकार घेत असलेल व्यक्तिमत्व. साधारण कल्याणच्या वस्तीमध्ये राहणारा एक लहान मुलगा अल्फा लव्हल मध्ये क्याज्युअल म्हणून शॉपफ्लोअर ऑफिस मध्ये कामास लागला. नवीनच होता तो. आणि एके दिवशी मी त्याला हटकले कारण मटेरियल रिक्विझीशनचे खालीवर विस्कळीत प्रिंट झालेले स्टिकर्स घेऊन शॉपफ्लोअर साठी लागणारे स्पेअर्स घेण्यासाठी माझ्याकडे आला. मी तिमिरला सांगितले की याला साधे स्टिकर सुद्धा प्रिंट करता येत नाहीत. अगोदर त्याला शिकवा. पण म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण जेवढी गोंडस आहे तेवढीच ती कर्तृत्वाने ओत प्रोत भरून त्याच्या कामाच्या मूल्यांची उंची गाठणारी आहे. आणि तेथेच ते छोटं रोप फुललं आणि त्याची वेल गेली गगनावरी. त्याच्या कर्तृत्वाचं सौंदर्य लेखणीने पकडणे मला कदाचित जमणार नाही.
त्याने अल्फा लव्हल मध्ये बरीच वर्षे घालवल्या नंतर असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करून सुद्धा अल्फा लव्हल मध्ये त्याला स्थिरता मिळाली नाही परंतु तो सिस्टीम मध्ये मास्टर झाला होता. ज्या प्रमाणे नदी एकाच ठिकाणी कधी थांबत नाही, ती सतत पुढे अविश्रांत वाहत असते त्या प्रमाणेच या तरूण मुलाने मागे कधी वळून पाहीलेच नाही. त्याने नोकरी सोडली नंतर simphony कंपनी तर्फे अल्फा लव्हल मध्ये ट्रेनिंग देण्यासाठी येऊ लागला. ही एक सुवर्ण संधी होती काय मला माहित नाही कारण बरीच वर्षे मी त्याच्या संपर्कात नव्हतो, आणि त्या संधीचे सोने करायचे असे त्या अभ्यासु आणि जिद्दी मुलाने पक्का निर्धारच केला असेन. पूर्णविराम आणि स्वल्पविराम कुठे द्यायचा मी गोंधळात पडलो आहे पण ही कहाणी इथेच थांबत नाही. तो तरूण मुलगा म्हणजे आपला जितेंद्र अनारे इंग्लंड मध्ये स्थायिक झाला. त्याला ब्रिटिश नागरिकत्व मिळाले. खरोखर त्याच्याबद्दल अभिमानाने ऊर भरून येतो. ताजे गुलाब फुलतात कसे त्याचं उत्तर सहज मिळालं. म्हणून अजून वाहतात वारे, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंधावर चढूनी अजून बकरी पाला खाते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा