Wednesday 3 January 2018

चिंचेचे पाणी जिभेला हवं हवंसं


निसर्गाने चिंच या फळात अस काही रसायन भरलं आहे की चिंच या शब्दात सुद्धा त्याचे गुण उतरले आहेत.  जिभेला पाणी सुटले नाही तर नवलच, अती आंबट काहीसं गोड, नको नको म्हणत पण जिभेला हवं हवंसं ! तशाच मनाला हव्या हव्याशा वाटणाऱ्या त्या गांवाकडच्या शिवार गप्पा सुद्धा अश्याच. नाही नको म्हणत बायकांची सकाळची स्वयंपाकघरातली कामे आणि नदीवरची धुणी आटोपली की मग निवांत एक एक जणी जमा होऊन दाराशी असलेल्या उतरत्या पायऱ्यांवर जागच्या जागी  पुरुष मंडळी रमी खेळतात तशा ठाण मांडून बसतात. अंगणातली सावली भिंतीवर कधी सरकते आणि भिंतीला असलेले कान सुद्धा त्या चर्वितचर्वण गप्पा, गोष्टी, बातम्या, चघाटया ऐकण्यात सामील होतात. नंतर वारू उधळावा तसे टोमणे , तिरकस, खोचक बोलण्याला उधाण येतं. या साऱ्यांमध्ये कुठेही अहंकार दिसून येत नसला तरी काही जणी आपली काठी मोडू न देता सापालाही जिवंत ठेवण्याचं कौशल्य दाखवत असतात. पण तोही आपल्याला हवा हवासा आणि फायदेशीरच असतो.

झालं काय मी मुंबईवरून गांवी गेलो. रिटायरमेंट नंतर माझ्या गावाकडच्या फेऱ्या वाढल्या होत्या. माझ्या घरासमोरील व्हरांड्यावर  बायकांचा जमाव बघून मी गांगरलोच. मी माझ्या घराच्या अंगणात पोहचताच एक तिरकस शब्दाचा बाण माझ्यावर झेपावला !  काय 'बापू' घर एक महिन्यापासून बंद आणि फॅन तसाच चालू ठेवून गेला होतास की काय !  आणि आज काय गावी अचानक मध्येच येण्याची आठवण झाली. तेवढयात तोल जावून डोईवरून पाण्याचा मातीचा घडा खाली आपटून भदाक असा आवाज यावा त्याप्रमाणे दुसरी ताई टपकलीच. कापसाच्या कैरीत पडलेल्या बोण्ड अळीचं सरकारी अनुदान घ्यायला आला असेल बिचारा. हा त्यांचा तोफखाना थंड होईल असं वाटलं होतं पण छे ! दुसरा बॉम्बगोळा तयारच होता. घरात गव्हाचं पोतं होतं. घर एक महिन्यापासून बंद अवस्थेत होतं. धान्याला कीड लागून गेली होती आणि ही बातमी मला त्या बायकांकडून मिळाली. घर उघडून बघतो तर काय गव्हाचा प्रत्येक दाणा पोखरलेला. धनूर नावाचं धन लुबाडून घेऊन जाणारं कीड सैरा वैरा पळत होतं. बरं या लोकांनी लगेच उपाय देखील सांगून मोकळे झाले. धान्य अंगणात वाळत घालणे माझ्याकडून शक्य नव्हते. फॅनचं बटन खरोखरच ऑन होतं. सुदैवाने शॉर्टसर्किट झालेलं नव्हतं. आणि बोण्ड अळीचं अनुदान येणार ही गावांत चर्चा चालू होती. खरंच मला किती फायदेशीर हिंट्स मिळाल्या होत्या त्या आमच्या ताईंकडून. अशाप्रकारे नको नकोसं वाटणारं चिंचेचे पाणी काहीसं आंबट काहीसं गोड परंतु जिभेला हवंहवंसं वाटणारं असतं हे मात्र खरं.
.

No comments:

Post a Comment