Saturday 7 December 2019

कुठं नेवून ठेवायचा महाराष्ट्र माझा

माननीय श्रीयुत उद्धव साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला आहात. तुमचं कौतुक ही झालं. आता त्याप्रमाणे तुमचा बाणा, तुमचे प्रोजेक्ट्स, तुमची वाटचाल, तुमची कार्यपद्धती असायला हवी. चालू प्रोजेक्टस् वर स्थगितीचं लेबल चिटकवून काही साध्य होईल असे वाटत नाही, आणि तुमचे आकार घेत असलेले नवीन प्रोजेक्ट म्हणजे पार्कचे नांव बदलणे, युनिव्हर्सिटी चे नांव बदलणे, स्मारके उभारणे, शहरांची नांवे बदलणे, रस्त्यांना नवीन नांवे देणे अशा दुय्यम unproductive कामांना स्थगिती द्या. खेड्यातील शेतकरी ओला दुष्काळाने हैराण झाला आहे आणि राजा जवळ तुतारी पण वाजवायला नाही. मुख्यमंत्री पदाची शपथ घेवून बराच अवधी उलटला आहे तरी तुम्हाला मंत्रिमंडळ बनवायला वेळ लागतो आहे. एखादा माणूस परक्या घरात राहात असेल तर त्याच्यासमोर अडचणीच अडचणी असतात. दुसऱ्यांच्या घरी राहिल्याने आपले स्वातंत्र्य नष्ट होते. अशा वेळी मनुष्य आपल्या मर्जीने काहीही करू शकत नाही अशी तुमची अवस्था झाली आहे. मुंगी मानवाच्या घरात राहिली तरी ते घर तिचे घर होत नाही. ती त्यामध्ये आपले वारुळ करुन राहते, तसं तुम्हाला या तीन पक्षाच्या घरात स्वतःचे वारुळ तयार करावे लागणार आहे. चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली होती, परंतु आपला चाणक्य रिकाम्या न्हाव्याची कामे करतो आहे. त्यांना कमीत कमी विधायक कामे करायचा सल्ला द्या नाही तर वारुळाची माती व्हायला वेळ लागणार नाही.
 
मुंबईतून बाहेर आले म्हणजे महाराष्ट्रावर चौफेर नजर टाकता येईल, मोठमोठे प्रश्न आ काढून उभे आहेत. राजकारणात असंगाशी संग केली यां टिकाटिपणीचा मीडियावर जोरात पाऊस पडत आहे. पूर्वी गडकिल्ल्यांच्या तटबंदीला सुद्धा छोटया छोटया खिडक्या असायच्या, पण त्यांचा उपयोग शत्रूवर गरम तेल ओतण्यासाठी असायचा. आजच्या युगात अश्या तेल ओतीव खिडक्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजकाल राजकारणातल्या खिडक्यातून गरम गरम तेल एकमेकांच्या अंगावर रोज सर्रास ओतले जात आहे. परंतु आपण काय करत आहात याकडे महाराष्ट्र जनतेची आपल्यावर कडी नजर आहे.

सुभाषचंद्र बोस यांना एका मुलाखतीच्या वेळी स्टेशनमास्टर आणि स्कूलमास्टर यांच्यात काय फरक आहे असा प्रश्न विचारला गेला होता. आणि एका क्षणात त्यांनी उत्तर दिलं होतं.

Schoolmaster trains the minds, Stationmaster minds the trains

तुम्हाला यांच्यातून काय व्हावयास आवडेल आणि महाराष्ट्र कसा घडवायचा ते तुम्ही ठरवा.

जय महाराष्ट्र