Friday 14 February 2020

लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची



एक लहान मुलगी, शीतचंद्रलोक मध्ये आपल्या समोर लहानाची मोठी झाली. शाळेत जाता जाता खेळली, बागडली, हसली, फुलासारखी दरवळली. निसर्ग आपली रूपे कळू देत नाही ते खरेच आहे, त्याप्रमाणे दारातली कोमल वेल कधी वाढली हे कोणाच्या लक्षात आलेच नाही. नेहमी फुलांच्या कळीसारखा खुललेल्या तिच्या चेहऱ्यावर आज मात्र, वसंत ऋतूत झाडांना पालवी फूटावी तसं तेज तिच्या चेहऱ्यावर बहरलं होतं. काल पावेतो पोरसवदा होतीस. पी हळद आणि हो गोरी ही म्हण सुद्धा तिच्या पुढे फिकी वाटते, ती म्हणजे तीच तिच्या बापाची एकुलती एक लाडकी लेक "जागृती"आज रोजी १४ फेब्रुवारी 2020 ला तिला लग्नाची हळद लागतांना तिच्या वडिलांच्या गालावर आनंदाश्रू ओघळलेत.

शीतचंद्रलोकमधील सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकारिणी अधिकाऱ्यांनी लहान मुले मुली यांच्यातील सुप्त गुणांना वाव दिला आणि त्यांच्यासाठी शीतचंद्रलोक सांस्कृतिक  कला मंच असा भव्य  प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. याच प्लॅटफॉर्मवर जागृतीचा अभिनय फुलला आणि पुढे तिने कॉलेजमध्ये सुद्धा आपल्यातले कलागुण जोपासलेत.

स्त्रीला तिचं माहेर म्हणजे भूतलावरचं नंदनवंन वाटतं असतं. सासरी एक वेळेस मोरपीस गालावर खरचटल्यासारखे वाटेल पण माहेरचा वारा तिच्या मुलायम मनात इतका गारवा निर्माण करतो की, तेंव्हा तिला स्वर्गीय आभास निर्माण होत असतो. शीतचंद्रलोक असंच भूतलावरचं नंदनवनच आहे. काल शीतचंद्रलोक मध्ये "मी जाते माझ्या गांवा माझ्या, अंगाला हळद लावा" या क्षणाला  तिच्या जवळच्या नातेवाईकांनी तसेच शीतचंद्रलोक मधील तर तरुणी आणि विशेष शीतचंद्रलोक सख्यांनी मंडपात हजेरी लावली. तरुण, तरुणी आणि शीतचंद्रलोक सख्यांनी मुझिकच्या तालावर नृत्य केले. हा सोहळा बराच उशिरापर्यंत चालू होता. त्यानंतर जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. एक लेक शीतचंद्रलोक मधून सासरी जाईल तेंव्हा शीतचंद्रलोक सख्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू असतील हे सांगायला नको.

"झाडाने  एका कळीला उमलतांना पाहिलं, आणि बघता बघता कळीचं फुलात कधी रूपांतर झालं ते कळलंच नाही"

No comments:

Post a Comment