Wednesday 9 February 2022

मी स्वतः माझी गाणी ऐकते तेंव्हा -- लता मंगेशकर

 कवी फक्त काव्य करतो, पण त्याचा रसास्वाद घ्यायला मात्र पंडित लागतो, अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. कलेच्या बाबतीत अक्षरशः खरे आहे हे ! विशेषतः गाण्याबद्दल म्हणाल तर हे कोणालाही पटण्यासारखे आहे. गायक स्वतःला कितीही पट्टीचा समजो; त्याचा गाण्याचा श्रोत्यांना होणारा आनंद काही वेगळाच असतो. गाणाऱ्याला सुद्धा एक प्रकारचा आनंद असतो यात शंका नाही. पण एक गोष्ट केंव्हाही निश्चित , गवयाचा आनंद आणि श्रोत्यांचा आनंद हे काही वेगळेच !

यावरून कोणाचा असा समज होईल, की स्वतःची गाणी ऐकण्याचा माझा रोजचा कार्यक्रम असेल. पण गंमत अशी आहे की, प्रत्यक्ष गाण्यातच माझा इतका वेळ जातो, की स्वतःची गाणी ऐकायला खरच मला वेळ मिळत नाही. स्वतःचा लेख वाचायला लेखकाला काय वाटते, याची मला कल्पना नाही; पण एवढे मी स्वानुभवाने म्हणू शकते की चुकून वेळ मिळाला व स्वतःचे गाणे ऐकण्याचा प्रसंग आला, की मला तो अक्षरशः एक 'प्रसंग' वाटतो !

उदाहरणार्थ गाण्याचे रेकॉर्डिंग घ्या ना - तेंव्हापासून या आपत्तीची सुरुवात होते. प्लेबॅकच्या तालमीकरिता डिस्क रेकॉर्डही घेतली जाते. आणि आजकाल टेपरेकॉर्डिंग ही त्यात भरीला पडले आहे. त्यामुळे होते काय , की घेतलेले गाणे आपण ताबडतोब ऐकू शकतो. आणि तीच मला मोठी आपत्ती वाटते ! खोटे नाही, आपले गाणे ऐकण्याचा मला अजूनही धीर होत नाही ! कधी कधी तीन चार 'टेक्स' आम्ही घेतो. त्यापैकी कोणता 'टेक' ठेवायचा हे तरी ऐकावे लागतेच, पण अशा वेळीही हॉल मधून मी पळून जाते आणि रेकॉर्डिस्ट बसतो ना, त्या खोलीमधून ऐकणारांची तोंडे मी न्याहाळू लागते ! बहुधा सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधानच मला दिसते. मी बाहेर आल्यावर "शाब्बास, लता"! म्हणून कोणी माझी पाठ थोपटते. पण मी मात्र आतून थोडी - तरी नाराजच असते ! ........



(लता मंगेशकर लिखित ...."फुले वेचिता" या पुस्तकातून)

No comments:

Post a Comment