Tuesday, 28 February 2017

एक होतं माळीण

ही एक समीक्षा नसून "एक होतं माळीण" बद्दल दोन शब्द आहेत.


सकाळी सकाळी तृणाच्या पात्यावर पाण्याचे दवबिंदू येतात तरी कुठून आणि कमळाच्या पाकळ्यांवर साचलेले पावसाचे थेंब कधी आपण पाहिले आहेत का, जर ती दृष्टी आपल्याला असती तर आतापर्यंत आपल्या शास्त्रज्ञांनी मोटारीला पावसात लागणारी बिगर वायफारची ग्लास नसती बनविली का.

त्याप्रमाणे एखादी गोष्ट स्वप्नातही घडू शकत नाही, मग ती घटना आपल्या प्रत्यक्ष जीवनातही घडणे अशक्यच, हे निर्विवाद सत्य कुठल्याही न्यायालयात सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. परंतु असं घडलं मात्र "माळीण" गावांत. आपण आपल्या डोळ्यांना सुखावणारे निसर्गाचे चमत्कार मोठया कौतुकाने बघत असतो. पण निसर्गाचा फुत्कार किती महाभयानक असतो याचा विचारही करू शकत नाही. डोंगराच्या उतारावरून प्रचंड वेगाने येणाऱ्या पाण्याच्या महापुरात माळीण गांव कागदावरची शाई पुसावी तसं क्षणार्धात वाहून गेलं. नेहमी प्रमाणे सकाळी एसटी आली खरी, पण एसटी चालकाला गावंच सापडेना !

एका डोंगराच्या कुशीत वसलेलं हे माळीण गावं आदल्या दिवशी मंगळवारी रात्री गाढ झोपी गेलं. आणि कायमचं काळाच्या उदरात गडप झालं.  माळीण गावच्या घटनेवर न्यूज वृत्तपत्रात भरभरून लिहलं गेलं असेल तसेच विचारवंत आणि लेखकांनी सुद्धा याच्यावर भाष्यही केलंही असेल, परंतु एक होतं माळीण या हृदयस्पर्शी विषयाला हात घालून तो निसर्गाचा उद्रेक रंगमंचकावर आणणं एवढे सोपे नक्कीच नव्हते. ह्या चौकटीच्या आत शिरून एक भयानक दाहक घटना  चिमटीने आपल्या लेखणीने पकडून आपल्या उत्कट भावनांचे मिश्रण आणि विचार स्पर्शाच्या अनुभवातून श्रीयुत भरत कांडकेनीं हे नाटक अधिक प्रगल्भ आणि दर्जेदार देण्याचा प्रयत्न केला आहे. एक होतं माळीणचं मूळ घटनेचं प्रतिबिंब अश्या काही पद्धतीने सादर केले आहे की माळीण गांव काळाच्या उदरात गडप झालं होतं खरं.  एखाद्या ग्रंथाची मोर पिसे हळुवारपणे अलगद उलगडत उलगडत जावेत त्याप्रमाणे लेखकाने एक एक धागा कधी सुखाचा तर कधी दुःखाचा असा एक एक पीळ उलगडून नाटकाची उंची नुसती एका विशिष्ट पातळीवर नेऊन सोडली असे नव्हे तर अश्या किती कहाण्या त्या काळाच्या उदरात गडप झाल्या असतील असा विचार सर्वसामान्यांना करायला लावला आहे. आणि शितचंद्रलोकच्या एक छोट्या रंगमंचकावर "एक होतं माळीण" या नाटकाचा जन्म 28 जानेवारी 2017 ला झाला. आणि कलाकार होतें शीत चंद्रलोकचे रहिवासी, आहेना खरी गंमत. कारण ही परंपरा 2003 पासून अखंडपणे चालू आहे.

येथे जुन्या चौकटींची मोडतोड नसून हे एक नाविन्यपूर्ण नाटक आहे. ह्या नाटकाला विविध सुख दुःख, तळमळ आणि जिद्दीचे कंगोरे आहेत. आज समाजात गळेकापू डॉक्टरांचा सुळसुळाट वाढलेला असतांना, डॉक्टर विवेक पंडितांनी गरीब लोकांना उपचारासाठी वण वण भटकू लागू नये म्हणून ग्रामीण भागात वाजवी दरात उपचाराची संधी निर्माण करून देण्यासाठी हॉस्पिटल सुरु करण्याची इच्छा आणि तळमळ त्यांच्यात आहे. जय आणि राजू हे माळीण गावचेच, बऱ्याच अडचणींवर मात करत माळीण गांवचं पुनर्वसन करण्याचं धनुष्य त्यांनी जिद्दीने उचललेलं असतं. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन धीर देणारी रुपाली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून नशिबाने वाचलेली परंतु आई वडीलांपासून कायमचे वंचित झालेली ती हर्ष आणि यश ही दोन कोवळी मुले आणि त्यांचं कारुण्य भोवती कथानक गुंफून त्याचं प्रतिबिंब डॉ.विवेक पंडित यांच्या घरात पडलं आहे.  देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठे ठेऊ माथा असा टाहो फोडणारा त्या मुलांचा केविलवाणा सदा मामा आहे. स्मृति गेलेला यश जेंव्हा सदा मामांना काका म्हणून संभोदितो तेंव्हा सदामामांच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील. आणि तोच यश जेंव्हा डॉ.शुभांगीला मम्मी म्हणून हाक मारतो तेंव्हां त्यांच्या ममत्वाला पाझर फुटतो. डॉ. शुभांगी ही घटना विवेक पंडितांच्या कानावर घालतात. शुभांगीच्या आयुष्यात एका विशिष्ट टप्प्यावर उमटलेली मातृत्वाची भावना जागी होते. ती यशला आपलं मातृत्व देवू पाहते हा या नाटकातला सर्वात हळवा क्षण प्रेक्षकांच्या पापण्यांच्या आत सहारा घेतो.  रामदास स्वामींनी खरंच म्हटलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

खरं म्हटलं तर या नाटकाचा खरा सूत्रधार गागाभट्टच आहे कारण त्याच्याविना राज्याभिषेक होणे अशक्यच. बंडू हे लेखकाचं डोक्यातलं कुशाग्र प्रतिभेचं लेणं आहे. याचं रोपण त्यांनी नाटकात अशा ठिकाणी लावलं की नाटकाचा ढाचा न ढळू देता त्याची वेल या नाटकाला संजीवनी देतच राहते. शिवरायांचा गड किल्ला पुणे जिल्हा पुणे जिल्हा. जसा स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. ओढवलेलं संकटा वर मात करण्यासाठी राजांनी मूठभर मावळ्यांच्या संगतीनं  हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेली शपथ. हर हर महादेव !  ह्या घटनेने जय ला आपल्या प्रश्नांची उत्तरे इथेच मिळून जातात ! आणि माळीण गांवच्या पुनर्वसनच्या कामाला स्फुर्ती मिळते.

हिरवे हिरवे गार गालिचे हे शब्द कागदावर लिहिणे सोपे आहे, पण काळाच्या उदरात गडप झालेलं "एक होतं माळीण" ही हृदयस्पर्शी घटना रंगमंचकावर आणण्यासाठी लेखकाने आपली प्रतिभा पणाला लावून साऱ्या समाजाचं लक्ष वेधून घेतलं आहे हे निर्विवाद सत्य आहे.

Wednesday, 22 February 2017

तू एक ग्रेट

साखर न खाताच गोड कशी लागते आणि चिंच या शब्दानेच जिभेला पाणी का सुटते असे कितीही फसवे प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आपण बरोबर देऊ शकतो  असं तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. कारण साध्या प्रश्नाचं उत्तर देतांना देखील आपला गोंधळ उडतो. मग तुम्हालाच प्रश्न पडेल की, आयुष्यात तुमचं भागतं तरी कसं. याचं उत्तर मात्र आपण सहजपणे देवू शकतो. मोराचा पिसारा फुलावा तशी ती माझ्या जीवनात आली आणि जिच्या शिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही, असं जेंव्हा मला कळून चुकलं तेंव्हा मी तिच्याबद्दल विचार करू लागतो, आणि मला स्वतःलाच तिच्याबद्दल भरपूर प्रश्न पडतात. तिचं वर्णन कुठे, केंव्हा, कसं आणि कुठपर्यंत करावं हे माझ्या मनाला पडलेलं आणि न सुटणारं कोडंच आहे.... एका सुंदर सकाळी झाड गदगदा हलवून, फुलांची रास पडू द्यावी. अलगद एक फुल उचलून आपल्या नाकाजवळ न नेता त्याला विचारावं, तुझा जन्म कोणासाठी झाला. ज्या वेळेस तुझाच गजरा करून ती आपल्या वेणीत खोवेल त्यावेळी ती सुंदर दिसेल, का तुझे तिच्यामुळे सौंदर्य वाढेल. दोन वेण्यांपैकी एक वेणी उरावर आणि एक पाठीवर सोडतांना वेणीत माळलेल्या गजऱ्याची खूपच खेचाताण होते हे तिला जाणवत नसेल कदाचित. म्हणून ती माझ्या आयुष्याला सौंदर्य बहाल करणारी, नाजूक भावना जपणारी भावकोमल वेल आहे. ती आहे अजूनही तशीच. तिच्यात अजून कुठलाही बदल झालेला आढळला नाही. ती माझ्या आयुष्यात आली म्हणजे आमचं प्रेम वगैरे नव्हे तर आमचं अरेंज मॅरेज होतं.  तिचं नावच पुष्पा असल्यामुळे तिने दोन फुलांना जन्म दिला आणि आयुष्याला मऊशार वाळूचा स्पर्श निर्माण झाला.

तसा मी माझ्या आयुष्याच्या कोणत्याच गोष्टीबद्दल सिरीयस नव्हतो. याबद्दल मला चांगलंच आठवतं, ग्रॅज्युएशन नंतर मी एकदा गावावरून पुण्याला बहिणीकडे आलो होतो, कोणाताही सल्ला आणि कसलाही न विचार करता, खाण्या पिण्याची राहण्याची व्यवस्था न करताच सरळ चिंचवड कॉलेजला एम.कॉम.ला  प्रवेश घेऊन टाकला होता, नंतर माझ्या लक्षात आले की आपण राहणार कुठे, आपल्या खाण्या पिण्याची सोय काय. आपला खर्च कोण भागविणार. नंतर घेतलेला प्रवेश नाईलाजास्तव कॅन्सल करावा लागला होता. आपल्या हातून एवढी मोठी चूक होते असं नव्हे तर आपण एवढी मोठी चूक करतो आणि आपल्याला साधं जाब विचारणारंही कोणी नाही. आपल्या आयुष्यात आपण किती प्रामाणिक आणि सिरिअस आहोत आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची जाण नसणं म्हणजे आईचं लाडावलेलं कारटच असं विचित्र वागू शकतं का. बरं लग्न झाल्यानंतर आपला असा आगळा वेगळा आणि प्रांजळ स्वभाव बायकोच्या कदाचित लक्षात आला असेल. घराचं मॅनेजमेंट कसं करावं याच्या बद्दल तिला उपजतच ज्ञान अवगत होत. नाही नाही म्हणता चांगली अकरा वर्षे आम्ही डोंबिवली वेस्टला राहत होतो. परंतु आपल्यालाही स्वतःचं घर असावं हे माझ्या कधीही लक्षात आलं नव्हतं. तिने सुचविल्यावरून आयुष्यात पहिल्यांदा स्वतःचं घर घेण्याचं भाग्य लाभलं. आईने गांवाला आयुष्यभर चुलीवर स्वयंपाक केला आणि त्या चुलीवरच्या स्वयंपाकाची चव फार अलंगच होती. परंतु लग्नानंतर बायकोने गॅस साठी नंबर लावला आणि तो मिळवलाच. कारण त्यावेळेस गॅस मिळविणे फार जिकरीचे आणि मोठे काम होते. सणासुदी कपडे लत्ते विकत घेणे असो वा दिवाळीला फटाके, आकाश कंदील घेणे असो सर्व ठिकाणी तिचाच पुढाकार असतो. किराणा दुकानात मी अजूनपर्यंत गेलेलो नसेल. वृत्तपत्र ही मी कधी विकत घेतले नसेल, परंतु तिच्या या सुसंस्कृतपणामुळे ह्या सर्व जिवनावश्यक गरजेच्या वस्तू नियमितपणे घरात येण्यास सुरुवात झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे जिथे पुस्तक प्रदर्शन असेल तेथे हंजेरी लावणे, निरनिराळ्या विषयांची पुस्तके चाळणे. तिच्या या अभ्यासू आणि पुस्तकी वेड मुळेच आम्ही पुस्तकाची लायब्ररी लावली, आणि इथूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली ती आजतागायत. घराचा एक कोपरा पुस्तकाने भरला गेला. घराला कोणता कलर द्यायचा, कोणती वस्तू कुठे ठेवायची, पंखे किती पात्यांचे आणि कोणत्या रंगाचे घ्यावेत, घरातलं देवघर कोणत्या दिशेने असावे, एव्हाना कुकर आणि गॅस कोणत्या कंपनीचा घ्यावा, हँगर्स, कर्टन्स याचं सिलेक्शन या विषयावर तिची मास्टरी आहेच, शिवाय रेडियोचे सेल वा औषधं विकत घ्यायची असोत, एक्सपायरी डेट बघूनच खरेदी करावेत हे सुद्धा मी तिचं अनुकरण करूनच शिकलो. मी एकदा कंपनीच्या कॉन्फ्रन्सच्या निमित्ताने चार दिवसासाठी नेपाळला गेलो होतो. त्यासाठी लागणारे सामान कपडेलत्ते स्वेटर पासून ते शर्टाच्या स्पेअर बटन सुई धागा पर्यंत तिने करून दिलेला किट अजून माझ्या चांगला स्मरणात राहिला आहे. म्हणूनच मी तिला तू एक ग्रेट आहेस असं म्हणतो. घरात कॅलेंडर कुठे लावावे असं ज्या वेळेस ती मला विचारते त्यावेळेस मी तिला फक्त एवढेच सुचवितो की घराच्या भिंतींना जास्त खिळे ठोकू नको म्हणजे झालं. तिच्यामुळ जीवनाची भरभराट झाली आणि सारं काही सुरळीत चाललं असतांना कोणालाही सहज प्रश्न पडू शकतो की तुमच्या दोघांत कधी भांडण तंटा होत नाही का !  होतोना !! एकदा मी ऑफिस मधून घरी येत असतांना मला तिने भाजी आणावयास सांगितले. मी फ्लावर, भेंडी आणि मेथीची भाजी घेऊन आलो. फ्लावरच्या भाजीतून एकच अळी निघाली, तिने तो संपूर्ण फ्लावरचा गड्डाच फेकून दिला. भेंडी निबर आणि मेथी जून असल्यामुळे त्या पण केराच्या टोपलीत सामील झाल्यात. मला बजावून सांगितलं गेलं की तुम्ही चुकून सुद्धा आजपासून भाजीपाला आणायचा नाही.  नियमाला अपवाद असतो ना तो हाच. आपण प्रत्येक काम चुकीचं करायचं आणि त्या कामातून आपली सुटका करून घ्यायची असा विचार माझ्या मनात सहज डोकावून गेला खरा, आणि ह्या अज्ञानाचा फायदा जर आपण अश्या पद्धतीने घेत गेलो तर कधीतरी शाहिस्तेखानाची बोटे तुटल्याशिवाय राहणार नाहीत हे उमगल्यावर कपटी पोटी जन्म घेणाऱ्या त्या अविचाराला मी आतल्या आत दडपून टाकले. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं भाजीपाला घेण्यासाठी  कल्याण मार्केटला गेलोच. आमच्या सौभाग्यवतींची भाजी  निवडीची पाहिली पसंद म्हणजे आलं आणि कोथिंबीरची जुडी. सर्व मार्केट पायाखाली चेंदून झाल्यावर, दहा मिनिटे झाली तरी आलटून पालटून कोथिंबीरच्या जुड्या आणि आलंचं चेकिंग चालू असतं. लाखो रुपयांचा व्यवहार होतांना देखील आधार किंवा पॅन कार्डचं एवढं चेकिंग केलं जात नसेल, एवढ्या त्या कोथिंबीरच्या जुड्या आणि आलं तोफेच्या तोंडी देवून चेक केलं जातं. सौ.च्या लक्षात आणून दिल्यानंतर देखील "कोथिंबीरच्या वड्या आपल्याच पोटात जाणार आहेत ना मग व्यवस्थित बघून घ्यायला नको का". असं अपेक्षित उत्तर मिळाल्या नंतर, आपल्याला पालेभाज्यांबद्दल जास्त कळत नाही, म्हणून साहेबाची बॅग घेऊन पुढे पुढे वाट दाखवणारा सेक्रेटरी मला आठवतो. आपण सुद्धा मागे मागे भाज्यांच्या पिशव्या घेऊन चाललेलं बरं याच्यापेक्षा मेंदूला त्राण न देता सुख येता दारी त्याची करावी चाकरी. घरातून बाहेर पडताना घरातला गॅस, नळ बंद करण्यापासून ते घराला कडी कुलूप लावून चावी संभाळण्याचं कामाचं कॉन्ट्रॅक्ट तिलाच मिळालेलं असतं. कारण हे काम सुद्धा ती इमाने इतबारे सांभाळते.

परंतु लोकांचं बरं असतं, बायकोने  माहेरी नुसतं जायचं नांव जरी काढलं, तर नवरे मंडळीच्या चेहऱ्यावर कशी सफारचंदासारखी टवटवी येते. जेवढे जास्त दिवस बायको माहेरी जाईल तेवढे त्यांना रिकामे उकिरडे फुंकायला बरे असते. माझं सुरुवातीलाही तेच मत होतं. परंतु मी ज्या गावांत म्हणजे डोंबिवलीला राहतो त्याच गावातलं म्हणजे डोंबिवलीच तिचं माहेर असल्यामुळे ती कधी माहेरी गेलेली मला अजून तरी आठवत नाही. याच्या पुढे ती माहेरी जाईल का नाही ही सुद्धा शंकाच आहे. कारण तिचे आई वडील माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरच राहतात. ती जरी माहेरी गेली तरी केवळ दोन तासातच वापस घरी येते असं वचन देऊन जाते. स्रियांच्या डिक्शनरीत शब्दांचे अर्थ बहुतेक उलटेच असावेत. कारण ती दोन तासात कधीच वापस आलेली मला आठवत नाही. प्राण जाय परंतु वचन न जाय या हिंदी काहावत चा अर्थ त्यांना चांगला अवगत असला तरी माहेर म्हटलं म्हणजे त्या म्हणीला काही अर्थ नसतो. ती चार तासांनी वापस येईपर्यंत माझा ज्वालामुखीचा भडका वरच्या थराला पोहचलेला असतो. येतांना तिच्या आईकडून माझ्यासाठी जेवणाचा डबा तरी आणलेला असतो  किंवा दुकानावरून भाकरवड्या तरी आलेल्या असतात. तो पर्यंत माझी धुसफुसणारी ज्वालामुखीची शेगडी केंव्हा  विझून जाते हे मला कळत ही नाही. एरव्ही बायकांना पेटलेली शेगडी विझवायची कशी आणि हिरव्या मिरचीचा लसूण घालून ठेचा करायचा कसा, याचं तंत्रज्ञान त्यांना चांगलंच अवगत असतं. नाही तर घरोघरी ज्वालामुखीच्या मेणबत्त्या पेटवून रोज वाढदिवस साजरे झाले असते. माहेरवरून आलेल्या सौ.ना किचनच्या प्लॅटफार्मवर मोहरी आली कशी याचा तोपर्यंत सुगावा लागलेला असतो. कारण आपण अंडी तळून खाल्लेली असतात हे तिला सांगावे लागत नाही. हिंदू संस्कृती मध्ये अस्स माहेर सुरेख बाई वर बरेच लेखक आणि कवींनी अमर्याद स्तुतीसुमने उधळली आहेत. एवढा मोठा परवाना मिळून सुद्धा माहेरवरून येतांना त्या डोळ्याला पदर लावूनच त्या सासरी येतात. आणि या दुःखात सामील होण्यासाठी अजूनपर्यंत कोणत्याही नवरेमंडळी कडून व्यक्त केलेली खंत माझ्या वाचनात आलेली नाही. म्हणून मी मनोमनी ठरवूनच टाकले, जर पुढचा जन्म मानवाचा मिळाला तर एकाच गांवच्या बोरी आणि बाभळी नको. माझ्या बाबतीत "बायको माहेराला जाते हो नाखवा" हे सुभाषित माझ्या डायरीतून कधीच हद्दपार झालेलं आहे. दिवाळीला बायको माहेरी जाण्याचा जो आनंद पुरुष वर्ग लुटतात, तो आपल्या नशिबी जरी नसला तरी आम्ही सहकुटुंब एकत्र दिवाळी साजरी करतो हे काय कमी आहे का.  बरं दिवाळीला बायको माहेरी गेलीच पाहिजे असं कुठल्याही कायद्यात लिहिलेलं नाही. समाधान मानून घेणे हेंच तर खरे सुखाचे मूळ आहे. मी प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर असल्यामुळे कामाची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. ड्युटी जरी आठ घंटे असली तरी  सरासरीने मला नऊ ते दहा तास काम करण्याची सवय होती. कारण माझ्या शिवाय कंपनीच्या कामाचं कसं व्हायचं अशी नेहमी काळजी वाटणारा एकमेव प्राणी मी अल्फा लावल या कंपनीत होतो. सर्वांची कामे गळ्यांत बांधून घ्यायची परंपरा मी माझ्या साहेबांकडूनच शिकलो होतो. नऊ ते दहा तास काम करणे ओघाने आलंच, लग्न झाल्यापासून आपण रोज घरी उशिरा पोहचतो या विषयी बायकोनेही कधी ब्र काढला नव्हता. त्यामुळे गाडी व्यवस्थित रुळावरून धावत होती. तिनं इंजिन कधी रुळावरून घसरुच दिलंच नव्हतं. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असे म्हणतात ते काही खोटे नाही. एके दिवशी माझ्या अर्धांगिनीने पुण्याला तिच्या बहिणीकडे एक आठवड्यासाठी जाण्याचा विषय काढला. आणि मनातल्या मनात  माझ्या आनंदाला उधाणच आलं. मी तिला आनंदाने सांगितले एक आठवडा कशाला पंधरा दिवसासाठी जा ना. आणि रोज फोन करत चल.  बस. झाले मोकळे आकाश. कापसासारखं मनं अगदी हलकं फुलकं झालं. ससा ससा दिसतोस कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा. परीक्षेचा पेपर देऊन घंटा झाल्यासारखं हायसं वाटलं. सकाळी सहा पस्तीसच्या इंद्रायनीणे तिला बसवून दिले, अर्थात रिझर्वेशन केले होते, अन तेवढी काळजी मी घेतली होती. संध्याकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसात दोन तास थांबलो. अर्थात ऑफिसची बस सहालाच निघून गेली होती. माझं ऑफिस एम आय डी सी नवी मुंबई येथे असल्यामुळे, जवळपास वाहनांची सोय नव्हती. म्हणून नाक्यावरून रिक्षा मागवून घेण्याची नेहमीप्रमाणे सेक्युरिटी ऑफिसरला विनंती केली. रात्रीचे आठ वाजून गेले तरी ऑटो येईना म्हणून गेटवर फोन करून ऑटो यायला किती वेळ लागेल म्हणून विचारलं. सर आज नाक्यावर रिक्षा नाही आहे, तुम्ही येथून दहा मिनिटे चौका पर्यन्त पायी चालत जावून तेथे काही वाहन मिळते का बघा. आणि येथूनच प्रोब्लेमला सुरुवात झाली. पाच मिनिटात कॉम्पुटर शट डाऊन करून ऑफिसच्या बाहेर पडलो आणि चौकापर्यंत चालत जावून कसं बसं रबाळे स्टेशन गाठून ठाण्याला साडेनऊ पर्यन्त पोहचलो. हॉटेल मध्ये येथेच्छ ताव मारून डोंबिवलीला रात्री अकरा पर्यन्त घरी पोहोचलो. प्रचंड थकवा आला होता. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी प्रामाणिकपणे लवकर उठलो खरा, परंतु पाण्याच्या टाकीत एक थेंब नव्हता. कारण पाणी भरण्यासाठी काल मी घरी लवकर यावयास पाहिजे होते परंतु तशी सवय नसल्यामुळे मोठया प्रोब्लेमला सामोरे जावं लागलं. आज ऑफिसला जाणं शक्यच नव्हतं. दुपारचे दोन वाजलेत, बाहेर ऊन मी म्हणत होतं, तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. ऑफिसचा फोन असेल म्हणून लगेच रिसिव्ह केला. पलीकडून बायकोचा आवाज !

"आज काय हो ऑफिसला दांडी" ! दडी मारलेल्या पावसाने आज अचानक हजेरी लावावी !! अन दिवसां काजवे चमकल्यासारखे भास झाला आणि  आश्चर्यचकितच झालो. हिला कसं कळलं हे ! कसं शक्य आहे, कमालच आहे ! सारेच उद्गारवाचक भेसूर वाटू लागलेत.

"तुला हे कसं माहीत की मी आज घरीच आहे."  . शंभर कौरवांचा बाप आंधळ्या धृतराष्ट्रला कुरुक्षेत्रावर काय घडतंय हे सांगण्यासाठी अंतर्ज्ञानी त्याचा सारथी संजय होता. परंतु हिला सांगण्यासाठी कोणता अंतर्ज्ञानी असेल असा तर्क करणं सुद्धा  मर्कटपणाचं होतं.

"अहो, आम्हा बायकांना सगळं माहीत असतं, बायकांच्या विरहीत पुरुष काय काय नाही करतात."

त्याचं रहस्यही तिने लगेच उलगडून टाकलं. तिची मैत्रीण सोसायटीत राहते, अर्थात मैत्रिणीला माहीत होते की ती पुण्याला गेलेली आहे. तिची मैत्रीण बाजारातून घरी परत येत असतांना, आमच्या घराची खिडकी उघडी आहे असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच आमच्या सौ.नां फोन केला आणि विचारलं, "कधी आलात हो  पुण्यावरून". बस आमच्या सौ.नीं तेथूनच उत्तुंग षटकार हाणला तो सरळ स्टेडियमच्या बाहेर.  "काय हो आज ऑफिसला दांडी" अन तशीच टेप पुढे चालू ठेवली. वाटलं ही जर इंडियाच्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट झाली असती तर प्रचंड फटजेबाजी  केली असती. मनातल्या मनात "तू एक ग्रेट आहेस" असं म्हणण्या ऐवजी मी तिला म्हटलं तुझा मुसळधार पाऊस पडून झाला असेल तर तोपर्यंत मी गारा वेचून घेऊ काय !. ऐक, काल मी नेहमी प्रमाणे घरी उशीरा आलो. अर्थातच रात्री आठ वाजता येणारे पाणी अप्पर टँक मध्ये भरले गेले नाही. आता घरात पाण्याचा एक थेंब नाही, बिगर अंघोळीच्या ऑफिसला जाऊ शकत नाही.असं इथपासून घडलेला वृत्तांत कथन करून झाल्या नंतर तिला जास्त दिवस न राहण्याचं बजावलं. तू जास्त दिवस राहू नको लवकर निघून ये. तिच्या शिवाय हे भूमंडल चालणं अश्यक्य आहे,  असं थोडं थोडं पटू लागलं होतं. रात्री आठ वाजता पाणी आल्यानंतर आयुष्यातून पहिल्यांदाच एवढी उशिरा अंघोळ केली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या नंतर राहून राहून शंका येत होती की गॅस बंद करावयाचा राहून तर गेला नसेन ना. शंकेचं निरसन करण्यासाठी तडक वापस घरी आलो. गॅस तर बंद केला होता परंतु बेडरूमचा फॅन चालूच राहीला होता. खिडक्या देखील अर्धवट उघड्याच होत्या. संध्याकाळी येणाऱ्या पाण्याचा नळ चालू अवस्थेतच राहून गेला होता. समजा संध्याकाळी कालच्या सारखं उशिरा आलो असतो तर घराचा जलाशय झाला असता.    गाडीने पहिल्या स्थानकापासून हळू हळू मजल दरमजल वेग घेत प्रत्येक स्थानकावर सिग्नलचा मान राखत आपल्या गंतव्य स्थानकावर वेळेवर पोहचावे तसंच काही सुरळीतपणे चाललं असतांना, ह्या तीन दिवसात अचानक गाडीला ब्रेक लागावेत आणि पुढच्या प्रवासाचा बोजवारा उडावा तसा एकंदरीत व्यत्यय आला होता. आता सरळ बायकोला आजच्या आज वापस बोलवून घेतले पाहिजे, असा विचार मनात दाटून आला खरा, पण हा अन्याय झाला असता. आपल्याला थोडा नव्हे जास्त त्रास झाला तरी चालेल पण कोणावर अन्याय करू नये अशी सर्जनशीलतेची शाल पांघरून बायकोला फोन केला. तू अजून एक आठवडा राहिली तरी चालेल, सावकाश ये, घाई करू नको.

दुसऱ्या दिवशी जरा लवकरच उठलो. नेहमी प्रमाणे सर्व काही आटोपून, विस्कटलेले केस मी नीट केलेत आणि घरातल्या सर्व वस्तू जागो जागी व्यवस्थित चेक करून घराच्या बाहेर पडलो. सकाळच्या अचानक तुरळक पावसाच्या सरींमुळे अंगण थोडं ओलं झालं होतं. त्यामुळेच सकाळी हवेत गारवा आला होता. परंतु दुपारचं ऊन कडकच असतं. सोसायटीच्या बाहेरचा रोड, पडून गेलेल्या पावसामुळे निग्रो सारखा भासत होता. घराजवळच रिक्षा स्टॅन्ड असल्यामुळे रिक्षा मिळायला प्रयास पडत नसे. परंतु आज अलंगच काहीतरी जाणवत होतं. कारण रोज, ती मला ऑफिसला जातांना पेन, चष्मा, रेल्वेचा पास पासून लागणाऱ्या सर्व वस्तू हातात देत असे. आज ती नसल्यामुळे असेल कदाचित. एक रिक्षा जाण्याच्या तयारीत होती. रिक्षा मध्ये एक जोडपे बसले होते. लेडीज डाव्या बाजूला तर पुरुष उजव्या बाजूला बसला होता. हवेत गारवा होता तरी त्या व्यक्तीने काळा गॉगल का परिधान केला असावा बरं. माझ्या मनात त्याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आणि थोडं कुतूहल निर्माण झालं. पण जाऊ दे ! काय संबंध आपला या गोष्टींशी म्हणून आतमध्ये बसण्यासाठी तो मधल्या शीट पर्यंत सरकण्याची वाट मी बघू लागलो. ड्रायव्हरने देखील एव्हाना रिक्षा चालू केली होती. मी अजून रिक्षाच्या बाहेरच ताटकळत बॅग घेऊन उभा होतो.  परंतु गॉगल घातलेला मनुष्य सरकेल तेंव्हा ना. मनातच म्हटलं सरक की जरा, आंधळा आहेस का. मी अजून रिक्षाच्या बाहेरच उभा आहे, हे जेंव्हा त्याच्या बायकोच्या लक्षात आले, तेंव्हा तिने आपल्या नवऱ्याला अदबीने सांगितलं, अहो जरा इकडे सरका, त्यांना बंसू द्या. तिने सांगितल्याप्रमाणे स्वारी लगेच तिच्याकडे सरकली आणि मी आतमध्ये बसलो. रिक्षा विसच्या स्पीडने धावू लागली. पण माझ्या मनात अलगच काहूर माजलं होत. हा पठया सरकायला तयार नव्हता. मनातल्या मनात म्हटलं, आजकालचे पुरुष असेच असतात तिरसट डोक्याचे. म्हनूनच स्रियांच्या मनातून पुरुष का उतरतात ते असल्या लोकांमुळेच. असू दे आजचा दिवस आपल्यासाठी नाही अशी मनाची समजूत घालत असतानाच स्टेशन आले. मी खाली उतरलो आणि त्या पुरुषाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. अन बघतो तर काय माझा ज्वालामुखीचा पारा एकदम शून्यावर आला. कारणही तसंच होतं. मी त्याच्या बद्दल काय काय वाईट विचार केला होता, माझ्या कुशाग्र बुद्धीची कौलं गळून पडली होती. ती स्त्री रिक्षातून उतरताच त्या गॉगल घातलेल्या पुरुषाशी न बोलताच निघून गेली. तो पुरुष रिक्षातून खाली उतरला, रिक्षा चालकास पैसे दिले आणि काठी टेकत टेकत हळू हळू रस्ता कापू लागला. एक जण पुढे येवून त्या माणसाला रस्ता पार करण्यास त्याने मदत केली.  मी माझ्या शून्यातून माझे मलाच सावरण्याचा प्रयत्न केला. मी ज्याच्या बद्दल अभद्र विचार केला होता ते माझं किती चुकीचं होतं. ती त्याची बायको नव्हती आणि तो मनुष्य खरोखरच अंध होता. जीवन तेच असते, परंतु दृष्टी बद्दलताच सारे काही बदलून जाते. माझ्या स्वतःत अपराधी पणाची भावना निर्माण झाली. नियतीने चांगलीच चपराक मारली होती. रामकृष्ण हरी म्हणण्या शिवाय गत्यंतर नव्हते. पण खूप  काही शिकायला मिळालं होतं.

बायकोच्या विरहित आज ऑफिसला जाण्याचा तिसरा दिवस होता. तरीपण आज उशिरा उठायचे काही कारणच नव्हते. कारण उठवणारं कोणी नव्हतं असं म्हणणं चुकीचे ठरेल. शेवटी सेकंड हाल्फ ला जाण्याचा विचार केला. दुपारी लोकल ट्रेन ला गर्दी असल्यामूळे व्हाया महापे बसने ऑफिसला जाण्याचे ठरविले. महापे पर्यंत पोहचल्यावर तेथून ऑफिस दीड किलोमीटर अंतरावर होते. त्या मार्गाने बस सेवा नसल्याने खाजगी वाहनांच्या प्रतीक्षेत होतो. तेवढ्यात एक सरदारजीचा मालवाहू टेम्पो माझ्यासमोर येवून उभा राहिला. मी सांगितलं रबाले अल्फा लावल जानेका है, मी ड्रायव्हर शीट शेजारी टेम्पोत बसलो. सरदारजी स्वतः ड्रायव्हिंग करत होता. टेम्पो जरी साधा असला तरी ड्रायव्हिंग केबिन मात्र वातानुकूलित होती, याचं मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. टेम्पो ड्रायव्हर ने माझ्या कंपनी बद्दल, प्रोडक्शन, मॅनपॉवर बद्दल चौकशी केली. त्याच्या चौकस बुद्धि बद्दल मला कौतुक वाटलं. अल्फा लावल बस स्टॉप आल्यानंतर मी त्याला भाड्यापोटी पाच रुपये देवू केलेत. त्याने नम्रतेने त्याचा अस्वीकार केला. मी त्याला भाडं न स्वीकारण्याचं कारण विचारलं. तेंव्हा त्याने दिलेलं उत्तर ऐकून मी आश्चर्यचकीत झालो. माझी मलाच लाज वाटू लागली. कारण तो जरी साधा टेम्पो ड्रायव्हर असला, पण तो एक व्हीआयपी मनुष्य होता. रबाले एम आय डी सी मधील दोन फॅक्टरींचा तो मालक होता.  तरी तो किती विनयशील आणि नम्रतेने बोलत होता. त्याची सर्जनशीलता बघून मी अवाक झालो. मानवी जीवन हे असंच विविध पैलूने नटलेलं असतं. या जीवनाला जेवढे उत्तम पैलू पाडाल तेवढे ते अधिक आकर्षक आणि प्रतिभाशील होत जातं. जगात किती चांगली माणसे अस्तित्वात आहेत. मी माझ्या कंपनीत मॅनेजर जरी असलो, माझी जागा कुठे आहे मला कळून चुकले होते. बराच वेळ मी त्या पाठमोऱ्या गाडीकडे सुन्न होऊन बघत होतो. मी सरळ हवेतून जमिनीवर उतरून चालायला लागलो. आपण किती छोटे आहोत आहे याची मला जाणीव झाली होती. नियती सुद्धा कधी कधी परीक्षा घेत असते. याचं आपल्याला भान जरी नसलं तरी योग्यता आपल्यात असलीच पाहिजे. रोज नव नवीन आश्चर्याला सामोरे जाण्याचा योग हा माझं आयुष्य घडवून गेला याची मला जाणीव झाली. सुरुवातीला नमूद केल्या प्रमाणे आपण फसव्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो हा भ्रम पुन्हा एकदा स्पष्ट झाला होता. ते नजरेआड करणं शक्य नव्हतं.

पुढच्या अग्निदिव्याला सामोरे जायचे अगोदर तिची पुन्हा आठवण झाली. संध्याकाळी फोन केला, "मी उद्या पुण्याला तुला घेण्यासाठी येत आहे. तयारीत रहा". कधी कधी नव्हे बऱ्याच वेळा आपल्या आयुष्याच्या वळणावर ती मात्र पुरुषापेक्षा ग्रेट असते. तिच्यामुळे आपलं जीवन अमाप सौंदर्याने बहरून येतं. बाबा आमटे यांचं चरित्र जर आपण वाचलं तर आपल्याला हे प्रखरतेने जाणवते आणि पुरुषी अहंकार गळून पडल्या शिवाय राहत नाही. राष्ट्रपती कडून गौरव स्विकारतांना सरकारी अधिकाऱ्यांनी जेंव्हा त्यांना सांगितलं, भाषणाची सुरुवात राष्ट्रपती महोदयांना संबोधून करण्याचा प्रघात आहे. तेंव्हा बाबांनी बजावले, "हा प्रघात मी मोडेन, अन्यथा मला पारितोषिक नको". बाबांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात साधनाताईंच्या प्रति आदर व्यक्त करीत केली होती. ओंजळीतल्या फुलांना त्यांनी आपल्या प्रतिभाशील विचारांच्या रेशमी वस्रात अश्या प्रकारे सांभाळून ठेवले होते.

मध्य रात्र टळून गेली, खांडेकरांची अमृतवेल कादंबरीची प्रस्तावना अजून कुठे वाचून झाली होती. उद्या सकाळी इंद्रायणीने पुण्याला सौ.ना घ्यायला जायचं होतं, परंतु झोप येत नव्हती. म्हणून गॅलरीत येऊन उभा राहिलो. सोसायटीतील अशोकाची झाडे लख्ख चांदण्यात पानांचा सळसळ आवाज न करता शांत उभी होती. साऱ्या सृष्टीवर मंद चांदणं चरा चरात पसरलं होतं. आकाशातला चंद्र ढगाआड जाण्याचा प्रयत्न करत असतांनाच थबकला जणू. असंख्य चांदण्या त्याच्या झगमगाटात मादक झाल्या होत्या. वातावरण बेहद्द रोमँटिक आणि काव्यमय झालं होतं. कुसुमाग्रजांनी ह्याच चांदण्या रात्रीच्या वेड लावणाऱ्या प्रतिभेला आपल्या कवितेत स्थान देऊन अजरामर केली आहे.

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

Friday, 10 February 2017

शिशिरची पानगळ

शरद ऋतू हा मुळातच समृद्ध असल्यामुळे शरद ऋतुवर कवींनी अनेक काव्य लिहिली आहेत. पावसाळाने आपले आटोपते घेतलेले असते. शेतकरी पिकं आवरण्यात व्यस्त असतो. कधी कधी परतीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानकारकच असतो. दिवसां लख्ख ऊन पडतं  आणि याच ऊन्हात कापसाची कच्ची बोण्डं फुटतात अन त्यालाच उमलंणं असं म्हणतात. रात्री शरदाचं चांदणं पसरलेलं असतं. ह्याचं चांदण्यात वसुंधरा मनसोक्त भिजलेली असते. हवेत किंचित गारवा सुटलेला असतो. शेतकरी रात्री कंदीलाची वात मोठी करून शेतात काढलेल्या दाना पाणी सांभाळण्यासाठी पहारा देतात. बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळेची गाज ऐकून शेजारच्या शेतावरच्या जागल्याला आपण आलो आहोत असा इशारा मिळतो. चांदणं चौफेर शेतावर, उभ्या कापसाच्या पिकावर पसरलेलं असतं. कापसाचे उमलले पांढरे शुभ्र बोन्डे अधिकच चांदण्यासारखे चमकत असतात. पावसाळा संपत आला असल्यामुळे बाजूलाच वाहत असलेला झऱ्याचा घोंगावणारा आवाजाचे रूपांतर मंजुळ अश्या चुररर आवाजात झालेलं असतं आणि रातकिडेही त्या आवाजात स्वखुशीने सामील झालेले असतात. त्यांचं असं साग्र संगीत रात्र भर सुरु असतं. सूर्योदयापूर्वी ह्या संगीताचा प्रभाव काही अंशी कमी होतो. शुभ्र चांदण्यात रात्रीच्या प्रहरी आजूबाजूच्या शेतातील शेतकरी एके ठिकाणी जमा होतात. बारीक काटक्या, सुकलेल्या ताटांची धुनी पेटवली जाते. ओल्या भुईमुगाच्या शेंगा भाजल्या जातात. रात्रीच्या दीड दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या जातात. त्याच गप्पांच्या ओघात तमाशा बघण्यासाठी जाण्याचा बेतही आखला जातो. लहानपणी शालेय वयात असतांना असे बरेंच आखलेल्या बेतात मी काकांबरोबर सामील झालो होतो. असं ते शरदाचं अनुभवलेलं चांदणं नेहमी ओठावर येवून माझ्या आयुष्यात डोकावण्याचं प्रयत्न करत असतं. तो लहानपणी पाहिलेला, अनुभवलेला शरद  ऋतू संपूच नये असे वाटत असते पण निसर्गाचे ऋतू चक्र न थांबता अखंडपणे चालू असते. आता शिशिर चालू झालेला असतो. चांदण्यातलं काव्य संपलेलं असतं. रानातली शेतकऱ्यांची पिके आवरून झालेली असतात. कणसं कापलेली जोंधळ्याची ताटं उभी असतात. शेत उलगू नये म्हणून तुरीची पांभर उभीच असते. गहू कापणीला येवून गव्हाच्या ओंब्या नारळाच्या झाडांसारखे वाकून सरेंडर झालेली असतात. कापूस वेचणीचा शेवटचा हात मारला जात असतो, मग उरतो तो सुकलेल्या पानांच्या त्या बारीक बारीक काटक्यांच्या पैखाट्या, जणू इथे भयाण दुष्काळच पडला होता असा भास होतो. शेतकरी थंड गारव्यातच नांगरणी करण्याची घाई करतो. कारण उन्हाळ्यात बैल जोडीला जास्त त्रास होऊ नये म्हणून शेतकरी काळजी घेतो. यांच्यावरून शेतकरी आपल्या प्रपंचाची, बैल जोडीची तसेच शेतमालाची किती काळजी घेतो हे दिसून येते, तरी सुद्धा शेतकरी दिवाळीला शहाणा होतो ही म्हण कोणी शोधून काढली असेल माहीत नाही परंतु ती तिच्या अर्थाला न्याय देऊ शकत नाही. अभ्यास करूनही परीक्षा झाल्यावर बरीच मुले नापास होतात. मग परीक्षा झाल्यावर विद्यार्थी शहाणे होतात अशी म्हण का नाही प्रचलीत झाली. ह्याच महिन्यात झाडांचीही पानगळ हळू हळू सुरु होते. झाडे निष्पर्ण केविलवाणी बापडी हात जोडून उभी आहेत अशी वाटतात. परंतु जिथे नदी खंडित होते, ती जागा कोसळणाऱ्या धबधब्याने घेतलेली असते. नदीने धबधब्याचं क्रौर्य रूप जरी धारण केलं असलं तरी, ते निसर्गाचेच सुंदर रूप असतं म्हणूनच तर लोक त्याला बघण्यासाठी गर्दी करतातच ना. तसंच शिशिरची पानगळ जरी सुरु झालेली असली तरी ती हवी हवीशी वाटते. एकदाच मिळालेलं जीवन ती पानं भरभरून जगत असतात. झाडांच्या पायथ्याशी पिवळ्या करड्या पानांचा ढीग जमा व्हावयास सुरुवात झालेली असते. उबदार थंडीमध्ये पानांची सळ सळ अगदी मोहक वाटते. परंतु त्या पानगळीकडे कोणाचे लक्षच नसतें. त्यांच्या सळ सळणाऱ्या आवाजाकडे बघून असं वाटतं की ते आपलं लक्ष वेधू इच्छितात आणि त्यांना काही तरी सांगायचं आहे. मधु मागशी माझ्या सख्या परी । मधू घटची रिकामी पडती घरी । आजवरी कमळाच्या द्रोणी मधू पाजीला तुला भरोनी । सेवा ही पूर्वीची स्मरुनी । करी न रोष सख्या दया करी । भा.रा.तांबे यांच्या मृत्यूच्या आधीची ही कविता, अद्वितीय ज्ञान सांगणाऱ्या या कवितेत त्यांची विलक्षण खंत स्पष्ट जाणवते. पानगळ सुद्धा हेच दर्शविते, आतापर्यंत मी उन्हाचे चटके सोसून तुला भरभरून सावली दिली. तू माझ्या सावलीत खेळलास, जेवलास, निजलास. परंतु आता मी जीर्ण होऊन निपचीत खाली पडले आहे, नकोरे माझी अशी अव्हेलना करू.  सुकलेलं पान जेंव्हा झाडाला शेवटचा निरोप देतं, तेंव्हा त्याला खरंच वेदना होत असतील का. परंतु, हा निसर्गाचा एक सोहळाच असतो. कोणताही लोभ न ठेवता पानं आपल्या झाडांची निरोप घेतांना दिसतात आणि आनंदाने गिरक्या घेत पायथ्याशी विसावतात. साधारणतः  कोणाचं लक्ष जात जरी नसले तरी फुटपाथवर पडलेल्या पानांचा सडा जसा लग्नाच्या वरातीसाठी कोणी पायघड्या अंथरून ठेवल्या सारख्या वाटतात. कोवळ्या पालवी पासून ते हिरव्या देठाच्या पानांपर्यंत त्या झाडाच्या फांदीवर ते लहानचं मोठं होतं. झाड त्याचं आनंदानं पालन पोषण करतं. वाऱ्याने कितीही लगट केली किंवा कितीही वृष्टी आणि वादळ आलं तरी झाड त्या पानाला आपल्या पासून अलग होऊ देत नाही. परंतु शिशिरची चाहूल लागली की लग्न झाल्यानंतर नव्या नवरीने आपला सर्व साज शृंगार उतरवून लॉकर मध्ये ठेवावा त्या प्रमाणे ही झाडे आपल्या अंगावरची सर्व हिरवी विभूषणे गाळून टाकतात आणि त्याला शरण जातात. परंतु हा जीवनाला मिळालेला तो आराम आहे, हे भान त्यांना असतं.जन्म आणि त्याग ही परंपरा ते कसोशीने पाळतात. निसर्गाने मानवाच्या झोळीतही तेच वरदान टाकले असतांना, जेंव्हा त्याच्या आयुष्यात पानगळीसारखी जायची वेळ येते तेंव्हा त्याला मात्र त्याग कारावसा वाटत नाही आणि तो भयभीत होतो. पानगळी सारखा निसर्गाचा बदलाव चा आनंद त्याला घेता येत नाही. पानगळी नंतर सर्वच झाडे आपली निष्पर्ण काया घेऊन हात जोडून प्रार्थना करीत स्तब्ध उभी आहेत असा भास होतो.  पक्ष्यांचा किलबिलाट नाही की कोकिळेचा मंजुळ स्वर नाही. सारे कसे शुकशुकाट असते. शिशिरातली पानगळ ही सृष्टीची कुवारपणाची पहिली पायरीच असते कारण ती रंगमंचावर शृंगार करून येण्यासाठी वसंताची आतुरतेने वाट बघत असते. आणि या वसंताच्या रंगमंचकावर येण्यासाठी सर्वच झाडे वड, बाभळी,  निंब, पिंपळ, चिंच, आंबा आणि वेली सामील होतात. अगदी बारीक बारीक पालवी फुटून ती  काजूच्या गाभ्यासारखी वाटतात. आई आणि मुलगी एकाच वयाच्या दिसाव्यात तशी ही झाडे पावसात डवरतात, फुलतात आणि बहरतात. परंतु शिशिर हा ऋतू नसून ती निसर्गाची वेगळीच अदा आपल्या मनाच्या आत झिरपते.


शिशिर ऋतू येतो नि येतो ।
तोच मी त्याच्या आधीन झाले

गालावरची हिरवी पाने ।
मखमखलेली होती तारुण्याने

हवेतला किंचित गारवा ।
झाली पिवळी सोनेरी राने

शिशिरच्या मिलनाने ।
उन्मत्त झाली रात्र

हिरवा साज उतरवुनी ।
एकेक पान गळाया

उन्हाच्या चांदण्यात ।
पानं पानं गळालीत

चिंच चाफ्याची ।
पळस पिंपळाची

फांद्यातल्या ढोलीतली ।
घरटी उघडी पडली

सोडुनी घरटी पक्षी  ।
निवारा शोधिती पसारा

हाथ जोडूनी उभी मी ।
निष्पर्ण  माझी काया

वसंताच्या रंगमंचकावर ।
बहरून फुलेल मी पुन्हा