Wednesday 22 February 2017

तू एक ग्रेट

साखर न खाताच गोड कशी लागते आणि चिंच या शब्दानेच जिभेला पाणी का सुटते असे कितीही फसवे प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आपण बरोबर देऊ शकतो  असं तुम्हाला वाटत असेल तर तो भ्रम आहे. कारण साध्या प्रश्नाचं उत्तर देतांना देखील आपला गोंधळ उडतो. मग तुम्हालाच प्रश्न पडेल की, आयुष्यात तुमचं भागतं तरी कसं. याचं उत्तर मात्र आपण सहजपणे देवू शकतो. मोराचा पिसारा फुलावा तशी ती माझ्या जीवनात आली आणि जिच्या शिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होऊ शकत नाही, असं जेंव्हा मला कळून चुकलं तेंव्हा मी तिच्याबद्दल विचार करू लागतो, आणि मला स्वतःलाच तिच्याबद्दल भरपूर प्रश्न पडतात. तिचं वर्णन कुठे, केंव्हा, कसं आणि कुठपर्यंत करावं हे माझ्या मनाला पडलेलं आणि न सुटणारं कोडंच आहे.... एका सुंदर सकाळी झाड गदगदा हलवून, फुलांची रास पडू द्यावी. अलगद एक फुल उचलून आपल्या नाकाजवळ न नेता त्याला विचारावं, तुझा जन्म कोणासाठी झाला. ज्या वेळेस तुझाच गजरा करून ती आपल्या वेणीत खोवेल त्यावेळी ती सुंदर दिसेल, का तुझे तिच्यामुळे सौंदर्य वाढेल. दोन वेण्यांपैकी एक वेणी उरावर आणि एक पाठीवर सोडतांना वेणीत माळलेल्या गजऱ्याची खूपच खेचाताण होते हे तिला जाणवत नसेल कदाचित. म्हणून ती माझ्या आयुष्याला सौंदर्य बहाल करणारी, नाजूक भावना जपणारी भावकोमल वेल आहे. ती आहे अजूनही तशीच. तिच्यात अजून कुठलाही बदल झालेला आढळला नाही. ती माझ्या आयुष्यात आली म्हणजे आमचं प्रेम वगैरे नव्हे तर आमचं अरेंज मॅरेज होतं.  तिचं नावच पुष्पा असल्यामुळे तिने दोन फुलांना जन्म दिला आणि आयुष्याला मऊशार वाळूचा स्पर्श निर्माण झाला.

तसा मी माझ्या आयुष्याच्या कोणत्याच गोष्टीबद्दल सिरीयस नव्हतो. याबद्दल मला चांगलंच आठवतं, ग्रॅज्युएशन नंतर मी एकदा गावावरून पुण्याला बहिणीकडे आलो होतो, कोणाताही सल्ला आणि कसलाही न विचार करता, खाण्या पिण्याची राहण्याची व्यवस्था न करताच सरळ चिंचवड कॉलेजला एम.कॉम.ला  प्रवेश घेऊन टाकला होता, नंतर माझ्या लक्षात आले की आपण राहणार कुठे, आपल्या खाण्या पिण्याची सोय काय. आपला खर्च कोण भागविणार. नंतर घेतलेला प्रवेश नाईलाजास्तव कॅन्सल करावा लागला होता. आपल्या हातून एवढी मोठी चूक होते असं नव्हे तर आपण एवढी मोठी चूक करतो आणि आपल्याला साधं जाब विचारणारंही कोणी नाही. आपल्या आयुष्यात आपण किती प्रामाणिक आणि सिरिअस आहोत आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची जाण नसणं म्हणजे आईचं लाडावलेलं कारटच असं विचित्र वागू शकतं का. बरं लग्न झाल्यानंतर आपला असा आगळा वेगळा आणि प्रांजळ स्वभाव बायकोच्या कदाचित लक्षात आला असेल. घराचं मॅनेजमेंट कसं करावं याच्या बद्दल तिला उपजतच ज्ञान अवगत होत. नाही नाही म्हणता चांगली अकरा वर्षे आम्ही डोंबिवली वेस्टला राहत होतो. परंतु आपल्यालाही स्वतःचं घर असावं हे माझ्या कधीही लक्षात आलं नव्हतं. तिने सुचविल्यावरून आयुष्यात पहिल्यांदा स्वतःचं घर घेण्याचं भाग्य लाभलं. आईने गांवाला आयुष्यभर चुलीवर स्वयंपाक केला आणि त्या चुलीवरच्या स्वयंपाकाची चव फार अलंगच होती. परंतु लग्नानंतर बायकोने गॅस साठी नंबर लावला आणि तो मिळवलाच. कारण त्यावेळेस गॅस मिळविणे फार जिकरीचे आणि मोठे काम होते. सणासुदी कपडे लत्ते विकत घेणे असो वा दिवाळीला फटाके, आकाश कंदील घेणे असो सर्व ठिकाणी तिचाच पुढाकार असतो. किराणा दुकानात मी अजूनपर्यंत गेलेलो नसेल. वृत्तपत्र ही मी कधी विकत घेतले नसेल, परंतु तिच्या या सुसंस्कृतपणामुळे ह्या सर्व जिवनावश्यक गरजेच्या वस्तू नियमितपणे घरात येण्यास सुरुवात झाली. सर्वात महत्वाचे म्हणजे जिथे पुस्तक प्रदर्शन असेल तेथे हंजेरी लावणे, निरनिराळ्या विषयांची पुस्तके चाळणे. तिच्या या अभ्यासू आणि पुस्तकी वेड मुळेच आम्ही पुस्तकाची लायब्ररी लावली, आणि इथूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली ती आजतागायत. घराचा एक कोपरा पुस्तकाने भरला गेला. घराला कोणता कलर द्यायचा, कोणती वस्तू कुठे ठेवायची, पंखे किती पात्यांचे आणि कोणत्या रंगाचे घ्यावेत, घरातलं देवघर कोणत्या दिशेने असावे, एव्हाना कुकर आणि गॅस कोणत्या कंपनीचा घ्यावा, हँगर्स, कर्टन्स याचं सिलेक्शन या विषयावर तिची मास्टरी आहेच, शिवाय रेडियोचे सेल वा औषधं विकत घ्यायची असोत, एक्सपायरी डेट बघूनच खरेदी करावेत हे सुद्धा मी तिचं अनुकरण करूनच शिकलो. मी एकदा कंपनीच्या कॉन्फ्रन्सच्या निमित्ताने चार दिवसासाठी नेपाळला गेलो होतो. त्यासाठी लागणारे सामान कपडेलत्ते स्वेटर पासून ते शर्टाच्या स्पेअर बटन सुई धागा पर्यंत तिने करून दिलेला किट अजून माझ्या चांगला स्मरणात राहिला आहे. म्हणूनच मी तिला तू एक ग्रेट आहेस असं म्हणतो. घरात कॅलेंडर कुठे लावावे असं ज्या वेळेस ती मला विचारते त्यावेळेस मी तिला फक्त एवढेच सुचवितो की घराच्या भिंतींना जास्त खिळे ठोकू नको म्हणजे झालं. तिच्यामुळ जीवनाची भरभराट झाली आणि सारं काही सुरळीत चाललं असतांना कोणालाही सहज प्रश्न पडू शकतो की तुमच्या दोघांत कधी भांडण तंटा होत नाही का !  होतोना !! एकदा मी ऑफिस मधून घरी येत असतांना मला तिने भाजी आणावयास सांगितले. मी फ्लावर, भेंडी आणि मेथीची भाजी घेऊन आलो. फ्लावरच्या भाजीतून एकच अळी निघाली, तिने तो संपूर्ण फ्लावरचा गड्डाच फेकून दिला. भेंडी निबर आणि मेथी जून असल्यामुळे त्या पण केराच्या टोपलीत सामील झाल्यात. मला बजावून सांगितलं गेलं की तुम्ही चुकून सुद्धा आजपासून भाजीपाला आणायचा नाही.  नियमाला अपवाद असतो ना तो हाच. आपण प्रत्येक काम चुकीचं करायचं आणि त्या कामातून आपली सुटका करून घ्यायची असा विचार माझ्या मनात सहज डोकावून गेला खरा, आणि ह्या अज्ञानाचा फायदा जर आपण अश्या पद्धतीने घेत गेलो तर कधीतरी शाहिस्तेखानाची बोटे तुटल्याशिवाय राहणार नाहीत हे उमगल्यावर कपटी पोटी जन्म घेणाऱ्या त्या अविचाराला मी आतल्या आत दडपून टाकले. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं भाजीपाला घेण्यासाठी  कल्याण मार्केटला गेलोच. आमच्या सौभाग्यवतींची भाजी  निवडीची पाहिली पसंद म्हणजे आलं आणि कोथिंबीरची जुडी. सर्व मार्केट पायाखाली चेंदून झाल्यावर, दहा मिनिटे झाली तरी आलटून पालटून कोथिंबीरच्या जुड्या आणि आलंचं चेकिंग चालू असतं. लाखो रुपयांचा व्यवहार होतांना देखील आधार किंवा पॅन कार्डचं एवढं चेकिंग केलं जात नसेल, एवढ्या त्या कोथिंबीरच्या जुड्या आणि आलं तोफेच्या तोंडी देवून चेक केलं जातं. सौ.च्या लक्षात आणून दिल्यानंतर देखील "कोथिंबीरच्या वड्या आपल्याच पोटात जाणार आहेत ना मग व्यवस्थित बघून घ्यायला नको का". असं अपेक्षित उत्तर मिळाल्या नंतर, आपल्याला पालेभाज्यांबद्दल जास्त कळत नाही, म्हणून साहेबाची बॅग घेऊन पुढे पुढे वाट दाखवणारा सेक्रेटरी मला आठवतो. आपण सुद्धा मागे मागे भाज्यांच्या पिशव्या घेऊन चाललेलं बरं याच्यापेक्षा मेंदूला त्राण न देता सुख येता दारी त्याची करावी चाकरी. घरातून बाहेर पडताना घरातला गॅस, नळ बंद करण्यापासून ते घराला कडी कुलूप लावून चावी संभाळण्याचं कामाचं कॉन्ट्रॅक्ट तिलाच मिळालेलं असतं. कारण हे काम सुद्धा ती इमाने इतबारे सांभाळते.

परंतु लोकांचं बरं असतं, बायकोने  माहेरी नुसतं जायचं नांव जरी काढलं, तर नवरे मंडळीच्या चेहऱ्यावर कशी सफारचंदासारखी टवटवी येते. जेवढे जास्त दिवस बायको माहेरी जाईल तेवढे त्यांना रिकामे उकिरडे फुंकायला बरे असते. माझं सुरुवातीलाही तेच मत होतं. परंतु मी ज्या गावांत म्हणजे डोंबिवलीला राहतो त्याच गावातलं म्हणजे डोंबिवलीच तिचं माहेर असल्यामुळे ती कधी माहेरी गेलेली मला अजून तरी आठवत नाही. याच्या पुढे ती माहेरी जाईल का नाही ही सुद्धा शंकाच आहे. कारण तिचे आई वडील माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावरच राहतात. ती जरी माहेरी गेली तरी केवळ दोन तासातच वापस घरी येते असं वचन देऊन जाते. स्रियांच्या डिक्शनरीत शब्दांचे अर्थ बहुतेक उलटेच असावेत. कारण ती दोन तासात कधीच वापस आलेली मला आठवत नाही. प्राण जाय परंतु वचन न जाय या हिंदी काहावत चा अर्थ त्यांना चांगला अवगत असला तरी माहेर म्हटलं म्हणजे त्या म्हणीला काही अर्थ नसतो. ती चार तासांनी वापस येईपर्यंत माझा ज्वालामुखीचा भडका वरच्या थराला पोहचलेला असतो. येतांना तिच्या आईकडून माझ्यासाठी जेवणाचा डबा तरी आणलेला असतो  किंवा दुकानावरून भाकरवड्या तरी आलेल्या असतात. तो पर्यंत माझी धुसफुसणारी ज्वालामुखीची शेगडी केंव्हा  विझून जाते हे मला कळत ही नाही. एरव्ही बायकांना पेटलेली शेगडी विझवायची कशी आणि हिरव्या मिरचीचा लसूण घालून ठेचा करायचा कसा, याचं तंत्रज्ञान त्यांना चांगलंच अवगत असतं. नाही तर घरोघरी ज्वालामुखीच्या मेणबत्त्या पेटवून रोज वाढदिवस साजरे झाले असते. माहेरवरून आलेल्या सौ.ना किचनच्या प्लॅटफार्मवर मोहरी आली कशी याचा तोपर्यंत सुगावा लागलेला असतो. कारण आपण अंडी तळून खाल्लेली असतात हे तिला सांगावे लागत नाही. हिंदू संस्कृती मध्ये अस्स माहेर सुरेख बाई वर बरेच लेखक आणि कवींनी अमर्याद स्तुतीसुमने उधळली आहेत. एवढा मोठा परवाना मिळून सुद्धा माहेरवरून येतांना त्या डोळ्याला पदर लावूनच त्या सासरी येतात. आणि या दुःखात सामील होण्यासाठी अजूनपर्यंत कोणत्याही नवरेमंडळी कडून व्यक्त केलेली खंत माझ्या वाचनात आलेली नाही. म्हणून मी मनोमनी ठरवूनच टाकले, जर पुढचा जन्म मानवाचा मिळाला तर एकाच गांवच्या बोरी आणि बाभळी नको. माझ्या बाबतीत "बायको माहेराला जाते हो नाखवा" हे सुभाषित माझ्या डायरीतून कधीच हद्दपार झालेलं आहे. दिवाळीला बायको माहेरी जाण्याचा जो आनंद पुरुष वर्ग लुटतात, तो आपल्या नशिबी जरी नसला तरी आम्ही सहकुटुंब एकत्र दिवाळी साजरी करतो हे काय कमी आहे का.  बरं दिवाळीला बायको माहेरी गेलीच पाहिजे असं कुठल्याही कायद्यात लिहिलेलं नाही. समाधान मानून घेणे हेंच तर खरे सुखाचे मूळ आहे. मी प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर असल्यामुळे कामाची मोठी जबाबदारी माझ्यावर होती. ड्युटी जरी आठ घंटे असली तरी  सरासरीने मला नऊ ते दहा तास काम करण्याची सवय होती. कारण माझ्या शिवाय कंपनीच्या कामाचं कसं व्हायचं अशी नेहमी काळजी वाटणारा एकमेव प्राणी मी अल्फा लावल या कंपनीत होतो. सर्वांची कामे गळ्यांत बांधून घ्यायची परंपरा मी माझ्या साहेबांकडूनच शिकलो होतो. नऊ ते दहा तास काम करणे ओघाने आलंच, लग्न झाल्यापासून आपण रोज घरी उशिरा पोहचतो या विषयी बायकोनेही कधी ब्र काढला नव्हता. त्यामुळे गाडी व्यवस्थित रुळावरून धावत होती. तिनं इंजिन कधी रुळावरून घसरुच दिलंच नव्हतं. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे असे म्हणतात ते काही खोटे नाही. एके दिवशी माझ्या अर्धांगिनीने पुण्याला तिच्या बहिणीकडे एक आठवड्यासाठी जाण्याचा विषय काढला. आणि मनातल्या मनात  माझ्या आनंदाला उधाणच आलं. मी तिला आनंदाने सांगितले एक आठवडा कशाला पंधरा दिवसासाठी जा ना. आणि रोज फोन करत चल.  बस. झाले मोकळे आकाश. कापसासारखं मनं अगदी हलकं फुलकं झालं. ससा ससा दिसतोस कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा. परीक्षेचा पेपर देऊन घंटा झाल्यासारखं हायसं वाटलं. सकाळी सहा पस्तीसच्या इंद्रायनीणे तिला बसवून दिले, अर्थात रिझर्वेशन केले होते, अन तेवढी काळजी मी घेतली होती. संध्याकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसात दोन तास थांबलो. अर्थात ऑफिसची बस सहालाच निघून गेली होती. माझं ऑफिस एम आय डी सी नवी मुंबई येथे असल्यामुळे, जवळपास वाहनांची सोय नव्हती. म्हणून नाक्यावरून रिक्षा मागवून घेण्याची नेहमीप्रमाणे सेक्युरिटी ऑफिसरला विनंती केली. रात्रीचे आठ वाजून गेले तरी ऑटो येईना म्हणून गेटवर फोन करून ऑटो यायला किती वेळ लागेल म्हणून विचारलं. सर आज नाक्यावर रिक्षा नाही आहे, तुम्ही येथून दहा मिनिटे चौका पर्यन्त पायी चालत जावून तेथे काही वाहन मिळते का बघा. आणि येथूनच प्रोब्लेमला सुरुवात झाली. पाच मिनिटात कॉम्पुटर शट डाऊन करून ऑफिसच्या बाहेर पडलो आणि चौकापर्यंत चालत जावून कसं बसं रबाळे स्टेशन गाठून ठाण्याला साडेनऊ पर्यन्त पोहचलो. हॉटेल मध्ये येथेच्छ ताव मारून डोंबिवलीला रात्री अकरा पर्यन्त घरी पोहोचलो. प्रचंड थकवा आला होता. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी प्रामाणिकपणे लवकर उठलो खरा, परंतु पाण्याच्या टाकीत एक थेंब नव्हता. कारण पाणी भरण्यासाठी काल मी घरी लवकर यावयास पाहिजे होते परंतु तशी सवय नसल्यामुळे मोठया प्रोब्लेमला सामोरे जावं लागलं. आज ऑफिसला जाणं शक्यच नव्हतं. दुपारचे दोन वाजलेत, बाहेर ऊन मी म्हणत होतं, तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. ऑफिसचा फोन असेल म्हणून लगेच रिसिव्ह केला. पलीकडून बायकोचा आवाज !

"आज काय हो ऑफिसला दांडी" ! दडी मारलेल्या पावसाने आज अचानक हजेरी लावावी !! अन दिवसां काजवे चमकल्यासारखे भास झाला आणि  आश्चर्यचकितच झालो. हिला कसं कळलं हे ! कसं शक्य आहे, कमालच आहे ! सारेच उद्गारवाचक भेसूर वाटू लागलेत.

"तुला हे कसं माहीत की मी आज घरीच आहे."  . शंभर कौरवांचा बाप आंधळ्या धृतराष्ट्रला कुरुक्षेत्रावर काय घडतंय हे सांगण्यासाठी अंतर्ज्ञानी त्याचा सारथी संजय होता. परंतु हिला सांगण्यासाठी कोणता अंतर्ज्ञानी असेल असा तर्क करणं सुद्धा  मर्कटपणाचं होतं.

"अहो, आम्हा बायकांना सगळं माहीत असतं, बायकांच्या विरहीत पुरुष काय काय नाही करतात."

त्याचं रहस्यही तिने लगेच उलगडून टाकलं. तिची मैत्रीण सोसायटीत राहते, अर्थात मैत्रिणीला माहीत होते की ती पुण्याला गेलेली आहे. तिची मैत्रीण बाजारातून घरी परत येत असतांना, आमच्या घराची खिडकी उघडी आहे असं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच आमच्या सौ.नां फोन केला आणि विचारलं, "कधी आलात हो  पुण्यावरून". बस आमच्या सौ.नीं तेथूनच उत्तुंग षटकार हाणला तो सरळ स्टेडियमच्या बाहेर.  "काय हो आज ऑफिसला दांडी" अन तशीच टेप पुढे चालू ठेवली. वाटलं ही जर इंडियाच्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट झाली असती तर प्रचंड फटजेबाजी  केली असती. मनातल्या मनात "तू एक ग्रेट आहेस" असं म्हणण्या ऐवजी मी तिला म्हटलं तुझा मुसळधार पाऊस पडून झाला असेल तर तोपर्यंत मी गारा वेचून घेऊ काय !. ऐक, काल मी नेहमी प्रमाणे घरी उशीरा आलो. अर्थातच रात्री आठ वाजता येणारे पाणी अप्पर टँक मध्ये भरले गेले नाही. आता घरात पाण्याचा एक थेंब नाही, बिगर अंघोळीच्या ऑफिसला जाऊ शकत नाही.असं इथपासून घडलेला वृत्तांत कथन करून झाल्या नंतर तिला जास्त दिवस न राहण्याचं बजावलं. तू जास्त दिवस राहू नको लवकर निघून ये. तिच्या शिवाय हे भूमंडल चालणं अश्यक्य आहे,  असं थोडं थोडं पटू लागलं होतं. रात्री आठ वाजता पाणी आल्यानंतर आयुष्यातून पहिल्यांदाच एवढी उशिरा अंघोळ केली. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या नंतर राहून राहून शंका येत होती की गॅस बंद करावयाचा राहून तर गेला नसेन ना. शंकेचं निरसन करण्यासाठी तडक वापस घरी आलो. गॅस तर बंद केला होता परंतु बेडरूमचा फॅन चालूच राहीला होता. खिडक्या देखील अर्धवट उघड्याच होत्या. संध्याकाळी येणाऱ्या पाण्याचा नळ चालू अवस्थेतच राहून गेला होता. समजा संध्याकाळी कालच्या सारखं उशिरा आलो असतो तर घराचा जलाशय झाला असता.    गाडीने पहिल्या स्थानकापासून हळू हळू मजल दरमजल वेग घेत प्रत्येक स्थानकावर सिग्नलचा मान राखत आपल्या गंतव्य स्थानकावर वेळेवर पोहचावे तसंच काही सुरळीतपणे चाललं असतांना, ह्या तीन दिवसात अचानक गाडीला ब्रेक लागावेत आणि पुढच्या प्रवासाचा बोजवारा उडावा तसा एकंदरीत व्यत्यय आला होता. आता सरळ बायकोला आजच्या आज वापस बोलवून घेतले पाहिजे, असा विचार मनात दाटून आला खरा, पण हा अन्याय झाला असता. आपल्याला थोडा नव्हे जास्त त्रास झाला तरी चालेल पण कोणावर अन्याय करू नये अशी सर्जनशीलतेची शाल पांघरून बायकोला फोन केला. तू अजून एक आठवडा राहिली तरी चालेल, सावकाश ये, घाई करू नको.

दुसऱ्या दिवशी जरा लवकरच उठलो. नेहमी प्रमाणे सर्व काही आटोपून, विस्कटलेले केस मी नीट केलेत आणि घरातल्या सर्व वस्तू जागो जागी व्यवस्थित चेक करून घराच्या बाहेर पडलो. सकाळच्या अचानक तुरळक पावसाच्या सरींमुळे अंगण थोडं ओलं झालं होतं. त्यामुळेच सकाळी हवेत गारवा आला होता. परंतु दुपारचं ऊन कडकच असतं. सोसायटीच्या बाहेरचा रोड, पडून गेलेल्या पावसामुळे निग्रो सारखा भासत होता. घराजवळच रिक्षा स्टॅन्ड असल्यामुळे रिक्षा मिळायला प्रयास पडत नसे. परंतु आज अलंगच काहीतरी जाणवत होतं. कारण रोज, ती मला ऑफिसला जातांना पेन, चष्मा, रेल्वेचा पास पासून लागणाऱ्या सर्व वस्तू हातात देत असे. आज ती नसल्यामुळे असेल कदाचित. एक रिक्षा जाण्याच्या तयारीत होती. रिक्षा मध्ये एक जोडपे बसले होते. लेडीज डाव्या बाजूला तर पुरुष उजव्या बाजूला बसला होता. हवेत गारवा होता तरी त्या व्यक्तीने काळा गॉगल का परिधान केला असावा बरं. माझ्या मनात त्याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह आणि थोडं कुतूहल निर्माण झालं. पण जाऊ दे ! काय संबंध आपला या गोष्टींशी म्हणून आतमध्ये बसण्यासाठी तो मधल्या शीट पर्यंत सरकण्याची वाट मी बघू लागलो. ड्रायव्हरने देखील एव्हाना रिक्षा चालू केली होती. मी अजून रिक्षाच्या बाहेरच ताटकळत बॅग घेऊन उभा होतो.  परंतु गॉगल घातलेला मनुष्य सरकेल तेंव्हा ना. मनातच म्हटलं सरक की जरा, आंधळा आहेस का. मी अजून रिक्षाच्या बाहेरच उभा आहे, हे जेंव्हा त्याच्या बायकोच्या लक्षात आले, तेंव्हा तिने आपल्या नवऱ्याला अदबीने सांगितलं, अहो जरा इकडे सरका, त्यांना बंसू द्या. तिने सांगितल्याप्रमाणे स्वारी लगेच तिच्याकडे सरकली आणि मी आतमध्ये बसलो. रिक्षा विसच्या स्पीडने धावू लागली. पण माझ्या मनात अलगच काहूर माजलं होत. हा पठया सरकायला तयार नव्हता. मनातल्या मनात म्हटलं, आजकालचे पुरुष असेच असतात तिरसट डोक्याचे. म्हनूनच स्रियांच्या मनातून पुरुष का उतरतात ते असल्या लोकांमुळेच. असू दे आजचा दिवस आपल्यासाठी नाही अशी मनाची समजूत घालत असतानाच स्टेशन आले. मी खाली उतरलो आणि त्या पुरुषाकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. अन बघतो तर काय माझा ज्वालामुखीचा पारा एकदम शून्यावर आला. कारणही तसंच होतं. मी त्याच्या बद्दल काय काय वाईट विचार केला होता, माझ्या कुशाग्र बुद्धीची कौलं गळून पडली होती. ती स्त्री रिक्षातून उतरताच त्या गॉगल घातलेल्या पुरुषाशी न बोलताच निघून गेली. तो पुरुष रिक्षातून खाली उतरला, रिक्षा चालकास पैसे दिले आणि काठी टेकत टेकत हळू हळू रस्ता कापू लागला. एक जण पुढे येवून त्या माणसाला रस्ता पार करण्यास त्याने मदत केली.  मी माझ्या शून्यातून माझे मलाच सावरण्याचा प्रयत्न केला. मी ज्याच्या बद्दल अभद्र विचार केला होता ते माझं किती चुकीचं होतं. ती त्याची बायको नव्हती आणि तो मनुष्य खरोखरच अंध होता. जीवन तेच असते, परंतु दृष्टी बद्दलताच सारे काही बदलून जाते. माझ्या स्वतःत अपराधी पणाची भावना निर्माण झाली. नियतीने चांगलीच चपराक मारली होती. रामकृष्ण हरी म्हणण्या शिवाय गत्यंतर नव्हते. पण खूप  काही शिकायला मिळालं होतं.

बायकोच्या विरहित आज ऑफिसला जाण्याचा तिसरा दिवस होता. तरीपण आज उशिरा उठायचे काही कारणच नव्हते. कारण उठवणारं कोणी नव्हतं असं म्हणणं चुकीचे ठरेल. शेवटी सेकंड हाल्फ ला जाण्याचा विचार केला. दुपारी लोकल ट्रेन ला गर्दी असल्यामूळे व्हाया महापे बसने ऑफिसला जाण्याचे ठरविले. महापे पर्यंत पोहचल्यावर तेथून ऑफिस दीड किलोमीटर अंतरावर होते. त्या मार्गाने बस सेवा नसल्याने खाजगी वाहनांच्या प्रतीक्षेत होतो. तेवढ्यात एक सरदारजीचा मालवाहू टेम्पो माझ्यासमोर येवून उभा राहिला. मी सांगितलं रबाले अल्फा लावल जानेका है, मी ड्रायव्हर शीट शेजारी टेम्पोत बसलो. सरदारजी स्वतः ड्रायव्हिंग करत होता. टेम्पो जरी साधा असला तरी ड्रायव्हिंग केबिन मात्र वातानुकूलित होती, याचं मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. टेम्पो ड्रायव्हर ने माझ्या कंपनी बद्दल, प्रोडक्शन, मॅनपॉवर बद्दल चौकशी केली. त्याच्या चौकस बुद्धि बद्दल मला कौतुक वाटलं. अल्फा लावल बस स्टॉप आल्यानंतर मी त्याला भाड्यापोटी पाच रुपये देवू केलेत. त्याने नम्रतेने त्याचा अस्वीकार केला. मी त्याला भाडं न स्वीकारण्याचं कारण विचारलं. तेंव्हा त्याने दिलेलं उत्तर ऐकून मी आश्चर्यचकीत झालो. माझी मलाच लाज वाटू लागली. कारण तो जरी साधा टेम्पो ड्रायव्हर असला, पण तो एक व्हीआयपी मनुष्य होता. रबाले एम आय डी सी मधील दोन फॅक्टरींचा तो मालक होता.  तरी तो किती विनयशील आणि नम्रतेने बोलत होता. त्याची सर्जनशीलता बघून मी अवाक झालो. मानवी जीवन हे असंच विविध पैलूने नटलेलं असतं. या जीवनाला जेवढे उत्तम पैलू पाडाल तेवढे ते अधिक आकर्षक आणि प्रतिभाशील होत जातं. जगात किती चांगली माणसे अस्तित्वात आहेत. मी माझ्या कंपनीत मॅनेजर जरी असलो, माझी जागा कुठे आहे मला कळून चुकले होते. बराच वेळ मी त्या पाठमोऱ्या गाडीकडे सुन्न होऊन बघत होतो. मी सरळ हवेतून जमिनीवर उतरून चालायला लागलो. आपण किती छोटे आहोत आहे याची मला जाणीव झाली होती. नियती सुद्धा कधी कधी परीक्षा घेत असते. याचं आपल्याला भान जरी नसलं तरी योग्यता आपल्यात असलीच पाहिजे. रोज नव नवीन आश्चर्याला सामोरे जाण्याचा योग हा माझं आयुष्य घडवून गेला याची मला जाणीव झाली. सुरुवातीला नमूद केल्या प्रमाणे आपण फसव्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो हा भ्रम पुन्हा एकदा स्पष्ट झाला होता. ते नजरेआड करणं शक्य नव्हतं.

पुढच्या अग्निदिव्याला सामोरे जायचे अगोदर तिची पुन्हा आठवण झाली. संध्याकाळी फोन केला, "मी उद्या पुण्याला तुला घेण्यासाठी येत आहे. तयारीत रहा". कधी कधी नव्हे बऱ्याच वेळा आपल्या आयुष्याच्या वळणावर ती मात्र पुरुषापेक्षा ग्रेट असते. तिच्यामुळे आपलं जीवन अमाप सौंदर्याने बहरून येतं. बाबा आमटे यांचं चरित्र जर आपण वाचलं तर आपल्याला हे प्रखरतेने जाणवते आणि पुरुषी अहंकार गळून पडल्या शिवाय राहत नाही. राष्ट्रपती कडून गौरव स्विकारतांना सरकारी अधिकाऱ्यांनी जेंव्हा त्यांना सांगितलं, भाषणाची सुरुवात राष्ट्रपती महोदयांना संबोधून करण्याचा प्रघात आहे. तेंव्हा बाबांनी बजावले, "हा प्रघात मी मोडेन, अन्यथा मला पारितोषिक नको". बाबांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात साधनाताईंच्या प्रति आदर व्यक्त करीत केली होती. ओंजळीतल्या फुलांना त्यांनी आपल्या प्रतिभाशील विचारांच्या रेशमी वस्रात अश्या प्रकारे सांभाळून ठेवले होते.

मध्य रात्र टळून गेली, खांडेकरांची अमृतवेल कादंबरीची प्रस्तावना अजून कुठे वाचून झाली होती. उद्या सकाळी इंद्रायणीने पुण्याला सौ.ना घ्यायला जायचं होतं, परंतु झोप येत नव्हती. म्हणून गॅलरीत येऊन उभा राहिलो. सोसायटीतील अशोकाची झाडे लख्ख चांदण्यात पानांचा सळसळ आवाज न करता शांत उभी होती. साऱ्या सृष्टीवर मंद चांदणं चरा चरात पसरलं होतं. आकाशातला चंद्र ढगाआड जाण्याचा प्रयत्न करत असतांनाच थबकला जणू. असंख्य चांदण्या त्याच्या झगमगाटात मादक झाल्या होत्या. वातावरण बेहद्द रोमँटिक आणि काव्यमय झालं होतं. कुसुमाग्रजांनी ह्याच चांदण्या रात्रीच्या वेड लावणाऱ्या प्रतिभेला आपल्या कवितेत स्थान देऊन अजरामर केली आहे.

काढ सखे, गळ्यातील
तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

No comments:

Post a Comment