Tuesday, 28 February 2017

एक होतं माळीण

ही एक समीक्षा नसून "एक होतं माळीण" बद्दल दोन शब्द आहेत.


सकाळी सकाळी तृणाच्या पात्यावर पाण्याचे दवबिंदू येतात तरी कुठून आणि कमळाच्या पाकळ्यांवर साचलेले पावसाचे थेंब कधी आपण पाहिले आहेत का, जर ती दृष्टी आपल्याला असती तर आतापर्यंत आपल्या शास्त्रज्ञांनी मोटारीला पावसात लागणारी बिगर वायफारची ग्लास नसती बनविली का.

त्याप्रमाणे एखादी गोष्ट स्वप्नातही घडू शकत नाही, मग ती घटना आपल्या प्रत्यक्ष जीवनातही घडणे अशक्यच, हे निर्विवाद सत्य कुठल्याही न्यायालयात सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. परंतु असं घडलं मात्र "माळीण" गावांत. आपण आपल्या डोळ्यांना सुखावणारे निसर्गाचे चमत्कार मोठया कौतुकाने बघत असतो. पण निसर्गाचा फुत्कार किती महाभयानक असतो याचा विचारही करू शकत नाही. डोंगराच्या उतारावरून प्रचंड वेगाने येणाऱ्या पाण्याच्या महापुरात माळीण गांव कागदावरची शाई पुसावी तसं क्षणार्धात वाहून गेलं. नेहमी प्रमाणे सकाळी एसटी आली खरी, पण एसटी चालकाला गावंच सापडेना !

एका डोंगराच्या कुशीत वसलेलं हे माळीण गावं आदल्या दिवशी मंगळवारी रात्री गाढ झोपी गेलं. आणि कायमचं काळाच्या उदरात गडप झालं.  माळीण गावच्या घटनेवर न्यूज वृत्तपत्रात भरभरून लिहलं गेलं असेल तसेच विचारवंत आणि लेखकांनी सुद्धा याच्यावर भाष्यही केलंही असेल, परंतु एक होतं माळीण या हृदयस्पर्शी विषयाला हात घालून तो निसर्गाचा उद्रेक रंगमंचकावर आणणं एवढे सोपे नक्कीच नव्हते. ह्या चौकटीच्या आत शिरून एक भयानक दाहक घटना  चिमटीने आपल्या लेखणीने पकडून आपल्या उत्कट भावनांचे मिश्रण आणि विचार स्पर्शाच्या अनुभवातून श्रीयुत भरत कांडकेनीं हे नाटक अधिक प्रगल्भ आणि दर्जेदार देण्याचा प्रयत्न केला आहे. एक होतं माळीणचं मूळ घटनेचं प्रतिबिंब अश्या काही पद्धतीने सादर केले आहे की माळीण गांव काळाच्या उदरात गडप झालं होतं खरं.  एखाद्या ग्रंथाची मोर पिसे हळुवारपणे अलगद उलगडत उलगडत जावेत त्याप्रमाणे लेखकाने एक एक धागा कधी सुखाचा तर कधी दुःखाचा असा एक एक पीळ उलगडून नाटकाची उंची नुसती एका विशिष्ट पातळीवर नेऊन सोडली असे नव्हे तर अश्या किती कहाण्या त्या काळाच्या उदरात गडप झाल्या असतील असा विचार सर्वसामान्यांना करायला लावला आहे. आणि शितचंद्रलोकच्या एक छोट्या रंगमंचकावर "एक होतं माळीण" या नाटकाचा जन्म 28 जानेवारी 2017 ला झाला. आणि कलाकार होतें शीत चंद्रलोकचे रहिवासी, आहेना खरी गंमत. कारण ही परंपरा 2003 पासून अखंडपणे चालू आहे.

येथे जुन्या चौकटींची मोडतोड नसून हे एक नाविन्यपूर्ण नाटक आहे. ह्या नाटकाला विविध सुख दुःख, तळमळ आणि जिद्दीचे कंगोरे आहेत. आज समाजात गळेकापू डॉक्टरांचा सुळसुळाट वाढलेला असतांना, डॉक्टर विवेक पंडितांनी गरीब लोकांना उपचारासाठी वण वण भटकू लागू नये म्हणून ग्रामीण भागात वाजवी दरात उपचाराची संधी निर्माण करून देण्यासाठी हॉस्पिटल सुरु करण्याची इच्छा आणि तळमळ त्यांच्यात आहे. जय आणि राजू हे माळीण गावचेच, बऱ्याच अडचणींवर मात करत माळीण गांवचं पुनर्वसन करण्याचं धनुष्य त्यांनी जिद्दीने उचललेलं असतं. त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन धीर देणारी रुपाली आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून नशिबाने वाचलेली परंतु आई वडीलांपासून कायमचे वंचित झालेली ती हर्ष आणि यश ही दोन कोवळी मुले आणि त्यांचं कारुण्य भोवती कथानक गुंफून त्याचं प्रतिबिंब डॉ.विवेक पंडित यांच्या घरात पडलं आहे.  देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठे ठेऊ माथा असा टाहो फोडणारा त्या मुलांचा केविलवाणा सदा मामा आहे. स्मृति गेलेला यश जेंव्हा सदा मामांना काका म्हणून संभोदितो तेंव्हा सदामामांच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील. आणि तोच यश जेंव्हा डॉ.शुभांगीला मम्मी म्हणून हाक मारतो तेंव्हां त्यांच्या ममत्वाला पाझर फुटतो. डॉ. शुभांगी ही घटना विवेक पंडितांच्या कानावर घालतात. शुभांगीच्या आयुष्यात एका विशिष्ट टप्प्यावर उमटलेली मातृत्वाची भावना जागी होते. ती यशला आपलं मातृत्व देवू पाहते हा या नाटकातला सर्वात हळवा क्षण प्रेक्षकांच्या पापण्यांच्या आत सहारा घेतो.  रामदास स्वामींनी खरंच म्हटलं आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.

खरं म्हटलं तर या नाटकाचा खरा सूत्रधार गागाभट्टच आहे कारण त्याच्याविना राज्याभिषेक होणे अशक्यच. बंडू हे लेखकाचं डोक्यातलं कुशाग्र प्रतिभेचं लेणं आहे. याचं रोपण त्यांनी नाटकात अशा ठिकाणी लावलं की नाटकाचा ढाचा न ढळू देता त्याची वेल या नाटकाला संजीवनी देतच राहते. शिवरायांचा गड किल्ला पुणे जिल्हा पुणे जिल्हा. जसा स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. ओढवलेलं संकटा वर मात करण्यासाठी राजांनी मूठभर मावळ्यांच्या संगतीनं  हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेली शपथ. हर हर महादेव !  ह्या घटनेने जय ला आपल्या प्रश्नांची उत्तरे इथेच मिळून जातात ! आणि माळीण गांवच्या पुनर्वसनच्या कामाला स्फुर्ती मिळते.

हिरवे हिरवे गार गालिचे हे शब्द कागदावर लिहिणे सोपे आहे, पण काळाच्या उदरात गडप झालेलं "एक होतं माळीण" ही हृदयस्पर्शी घटना रंगमंचकावर आणण्यासाठी लेखकाने आपली प्रतिभा पणाला लावून साऱ्या समाजाचं लक्ष वेधून घेतलं आहे हे निर्विवाद सत्य आहे.

1 comment:

  1. चव्हाण साहेब नमस्कार,
    जीवन जगण्याच्या ह्या मोठ्या प्रवासात, माणसाने कोणत्या वळणावर कसं आणि कुठं उभं राहावं, याचं मूर्तिमंत उदाहरण आपण स्वतःच्या जीवनात सेवानिवृत्त झाल्यावर प्रस्थापित केलंय. आपला छोटासा संसार नीटनेटके पणाने सांभाळताना त्याच्यामधील सुख दु:खांना समान न्यायाने स्विकारून जीवनात कुठंतरी वेगळेपण असावं म्हणून आपण “रेशीम धागे” या आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून वाचकांसमोर आलात. साहित्याच्या या अथांग सागरात पहूडताना आपण स्वतः बरोबर वाचकांचही मनोरंजन करत आहात. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन.

    पण मी याला मनोरंजन म्हणणार नाही, आपण लिखाणाच्या माध्यमातून साकारलेल्या प्रत्येक पुष्पाचा वाचनाच्या माध्यमातून सुगंध घेताना, तुमच्या त्या गोड शब्दांच्या हिंदोळल्यावर झोके घेताना, मन अगदी वेगळ्याच विश्वात जातं, आणि त्या आनंदात नकळत मन गायला लागतं-
    “जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते....”
    मला इतरांच्या प्रतिक्रिया माहित नाहीत, पण मी माझ्या जीवनात ज्या अनेक गोड गोष्टींची वाट पाहतोय, त्या पैकी एका गोष्टीचा मला पुरेपूर आनंद मिळतोय यात अजिबातही शंका नाही.
    खरं तर प्रतिक्रिया खूप अगोदर देणं गरजेचं होतं, परंतू तुम्ही जाणता की, जानेवारी महिना माझ्यासाठी कसा होता. त्यामुळे व्यस्थ वेळापत्रकामधून ती वेळेत देऊ शकलो नाही म्हणून क्षमस्व.

    काल “एक होतं माळीण” वरील आपल्या ब्लॉग मधील आपलं विचार मंथन वाचलं आणि मग हातांना आवर घालणं अशक्य झालं. तुम्ही स्वतः न बघितलेल्या या नाटकाविषयी केवळ स्क्रिप्ट वाचून आपण जे आपल्या शब्दांत मांडलंय त्याला तोड नाही. आपण किती बारकाइने या विषयाचं आकलन केलंय हे आपल्या लिखाणातून स्पष्ट दिसतंय. “एक होतं माळीण” या विषयाला कलेच्या आणि कलाकारांच्या माध्यमातून मंचावर साकारताना माझी कसोटी लागलीच परंतू आपण माझ्या मनातील खऱ्या भावनांचा ठाव घेतला, इतकंच नव्हे तर माझ्या सर्व कलाकारांच्या पाठीवर कौतुकाचा आणि शाबासकीचा हात फिरवला. खरं सांगतो चव्हाण साहेब मी कृत कृत झालो. आपल्या लेखनाला, विचारशक्तीला आणि शब्द साठ्याला मी काय उपमा देणार. मुळात अनेक रंगीबेरंगी ‘रेशीम धाग्यांनी’ विणलेले वस्र परिधान केल्यानंतर जशी प्रत्येकाची शोभा वाढते, अगदी त्याचप्रमाणे आपण लिहिलेल्या प्रत्येक पोस्ट विषयी मला वाटतंय.

    एखाद्या सुंदर बागेतून विहार करताना, जसे विहार करणारे धन्य होतात, अगदी त्याच प्रमाणे आम्ही सर्व चंद्रलोकवासी नशीबवान आहोत. ज्यांना आपल्या लेखणीतून साकारलेल्या अनेक गोष्टींचा मनमुराद आनंद आणि आस्वाद घेता येतोय. आपल्या लेखणीला दिवसागणिक नवनविन शब्दांचा, उपमांचा आणि कल्पनांचा बहर येवो, आणि त्यामधून तयार झालेल्या रसाळ फळांचा स्वाद घेण्याचा, आनंद घेण्याचा, रस चाखण्याची संधी आमच्या नशिबी येवो, अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. मला तुमच्या लिखाणावर तोडकी मोडकी प्रतिक्रिया देण्याची संधी मिळाली म्हणून भगवंताचे आभार मानतो आणि इथेच थांबतो.
    धन्यवाद !
    आपला शुभचिंतक
    भरत कांडके

    ReplyDelete