शरद ऋतू हा मुळातच समृद्ध असल्यामुळे शरद ऋतुवर कवींनी अनेक काव्य लिहिली आहेत. पावसाळाने आपले आटोपते घेतलेले असते. शेतकरी पिकं आवरण्यात व्यस्त असतो. कधी कधी परतीचा पाऊस शेतकऱ्यांसाठी नुकसानकारकच असतो. दिवसां लख्ख ऊन पडतं आणि याच ऊन्हात कापसाची कच्ची बोण्डं फुटतात अन त्यालाच उमलंणं असं म्हणतात. रात्री शरदाचं चांदणं पसरलेलं असतं. ह्याचं चांदण्यात वसुंधरा मनसोक्त भिजलेली असते. हवेत किंचित गारवा सुटलेला असतो. शेतकरी रात्री कंदीलाची वात मोठी करून शेतात काढलेल्या दाना पाणी सांभाळण्यासाठी पहारा देतात. बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळेची गाज ऐकून शेजारच्या शेतावरच्या जागल्याला आपण आलो आहोत असा इशारा मिळतो. चांदणं चौफेर शेतावर, उभ्या कापसाच्या पिकावर पसरलेलं असतं. कापसाचे उमलले पांढरे शुभ्र बोन्डे अधिकच चांदण्यासारखे चमकत असतात. पावसाळा संपत आला असल्यामुळे बाजूलाच वाहत असलेला झऱ्याचा घोंगावणारा आवाजाचे रूपांतर मंजुळ अश्या चुररर आवाजात झालेलं असतं आणि रातकिडेही त्या आवाजात स्वखुशीने सामील झालेले असतात. त्यांचं असं साग्र संगीत रात्र भर सुरु असतं. सूर्योदयापूर्वी ह्या संगीताचा प्रभाव काही अंशी कमी होतो. शुभ्र चांदण्यात रात्रीच्या प्रहरी आजूबाजूच्या शेतातील शेतकरी एके ठिकाणी जमा होतात. बारीक काटक्या, सुकलेल्या ताटांची धुनी पेटवली जाते. ओल्या भुईमुगाच्या शेंगा भाजल्या जातात. रात्रीच्या दीड दोन वाजेपर्यंत गप्पा मारल्या जातात. त्याच गप्पांच्या ओघात तमाशा बघण्यासाठी जाण्याचा बेतही आखला जातो. लहानपणी शालेय वयात असतांना असे बरेंच आखलेल्या बेतात मी काकांबरोबर सामील झालो होतो. असं ते शरदाचं अनुभवलेलं चांदणं नेहमी ओठावर येवून माझ्या आयुष्यात डोकावण्याचं प्रयत्न करत असतं. तो लहानपणी पाहिलेला, अनुभवलेला शरद ऋतू संपूच नये असे वाटत असते पण निसर्गाचे ऋतू चक्र न थांबता अखंडपणे चालू असते. आता शिशिर चालू झालेला असतो. चांदण्यातलं काव्य संपलेलं असतं. रानातली शेतकऱ्यांची पिके आवरून झालेली असतात. कणसं कापलेली जोंधळ्याची ताटं उभी असतात. शेत उलगू नये म्हणून तुरीची पांभर उभीच असते. गहू कापणीला येवून गव्हाच्या ओंब्या नारळाच्या झाडांसारखे वाकून सरेंडर झालेली असतात. कापूस वेचणीचा शेवटचा हात मारला जात असतो, मग उरतो तो सुकलेल्या पानांच्या त्या बारीक बारीक काटक्यांच्या पैखाट्या, जणू इथे भयाण दुष्काळच पडला होता असा भास होतो. शेतकरी थंड गारव्यातच नांगरणी करण्याची घाई करतो. कारण उन्हाळ्यात बैल जोडीला जास्त त्रास होऊ नये म्हणून शेतकरी काळजी घेतो. यांच्यावरून शेतकरी आपल्या प्रपंचाची, बैल जोडीची तसेच शेतमालाची किती काळजी घेतो हे दिसून येते, तरी सुद्धा शेतकरी दिवाळीला शहाणा होतो ही म्हण कोणी शोधून काढली असेल माहीत नाही परंतु ती तिच्या अर्थाला न्याय देऊ शकत नाही. अभ्यास करूनही परीक्षा झाल्यावर बरीच मुले नापास होतात. मग परीक्षा झाल्यावर विद्यार्थी शहाणे होतात अशी म्हण का नाही प्रचलीत झाली. ह्याच महिन्यात झाडांचीही पानगळ हळू हळू सुरु होते. झाडे निष्पर्ण केविलवाणी बापडी हात जोडून उभी आहेत अशी वाटतात. परंतु जिथे नदी खंडित होते, ती जागा कोसळणाऱ्या धबधब्याने घेतलेली असते. नदीने धबधब्याचं क्रौर्य रूप जरी धारण केलं असलं तरी, ते निसर्गाचेच सुंदर रूप असतं म्हणूनच तर लोक त्याला बघण्यासाठी गर्दी करतातच ना. तसंच शिशिरची पानगळ जरी सुरु झालेली असली तरी ती हवी हवीशी वाटते. एकदाच मिळालेलं जीवन ती पानं भरभरून जगत असतात. झाडांच्या पायथ्याशी पिवळ्या करड्या पानांचा ढीग जमा व्हावयास सुरुवात झालेली असते. उबदार थंडीमध्ये पानांची सळ सळ अगदी मोहक वाटते. परंतु त्या पानगळीकडे कोणाचे लक्षच नसतें. त्यांच्या सळ सळणाऱ्या आवाजाकडे बघून असं वाटतं की ते आपलं लक्ष वेधू इच्छितात आणि त्यांना काही तरी सांगायचं आहे. मधु मागशी माझ्या सख्या परी । मधू घटची रिकामी पडती घरी । आजवरी कमळाच्या द्रोणी मधू पाजीला तुला भरोनी । सेवा ही पूर्वीची स्मरुनी । करी न रोष सख्या दया करी । भा.रा.तांबे यांच्या मृत्यूच्या आधीची ही कविता, अद्वितीय ज्ञान सांगणाऱ्या या कवितेत त्यांची विलक्षण खंत स्पष्ट जाणवते. पानगळ सुद्धा हेच दर्शविते, आतापर्यंत मी उन्हाचे चटके सोसून तुला भरभरून सावली दिली. तू माझ्या सावलीत खेळलास, जेवलास, निजलास. परंतु आता मी जीर्ण होऊन निपचीत खाली पडले आहे, नकोरे माझी अशी अव्हेलना करू. सुकलेलं पान जेंव्हा झाडाला शेवटचा निरोप देतं, तेंव्हा त्याला खरंच वेदना होत असतील का. परंतु, हा निसर्गाचा एक सोहळाच असतो. कोणताही लोभ न ठेवता पानं आपल्या झाडांची निरोप घेतांना दिसतात आणि आनंदाने गिरक्या घेत पायथ्याशी विसावतात. साधारणतः कोणाचं लक्ष जात जरी नसले तरी फुटपाथवर पडलेल्या पानांचा सडा जसा लग्नाच्या वरातीसाठी कोणी पायघड्या अंथरून ठेवल्या सारख्या वाटतात. कोवळ्या पालवी पासून ते हिरव्या देठाच्या पानांपर्यंत त्या झाडाच्या फांदीवर ते लहानचं मोठं होतं. झाड त्याचं आनंदानं पालन पोषण करतं. वाऱ्याने कितीही लगट केली किंवा कितीही वृष्टी आणि वादळ आलं तरी झाड त्या पानाला आपल्या पासून अलग होऊ देत नाही. परंतु शिशिरची चाहूल लागली की लग्न झाल्यानंतर नव्या नवरीने आपला सर्व साज शृंगार उतरवून लॉकर मध्ये ठेवावा त्या प्रमाणे ही झाडे आपल्या अंगावरची सर्व हिरवी विभूषणे गाळून टाकतात आणि त्याला शरण जातात. परंतु हा जीवनाला मिळालेला तो आराम आहे, हे भान त्यांना असतं.जन्म आणि त्याग ही परंपरा ते कसोशीने पाळतात. निसर्गाने मानवाच्या झोळीतही तेच वरदान टाकले असतांना, जेंव्हा त्याच्या आयुष्यात पानगळीसारखी जायची वेळ येते तेंव्हा त्याला मात्र त्याग कारावसा वाटत नाही आणि तो भयभीत होतो. पानगळी सारखा निसर्गाचा बदलाव चा आनंद त्याला घेता येत नाही. पानगळी नंतर सर्वच झाडे आपली निष्पर्ण काया घेऊन हात जोडून प्रार्थना करीत स्तब्ध उभी आहेत असा भास होतो. पक्ष्यांचा किलबिलाट नाही की कोकिळेचा मंजुळ स्वर नाही. सारे कसे शुकशुकाट असते. शिशिरातली पानगळ ही सृष्टीची कुवारपणाची पहिली पायरीच असते कारण ती रंगमंचावर शृंगार करून येण्यासाठी वसंताची आतुरतेने वाट बघत असते. आणि या वसंताच्या रंगमंचकावर येण्यासाठी सर्वच झाडे वड, बाभळी, निंब, पिंपळ, चिंच, आंबा आणि वेली सामील होतात. अगदी बारीक बारीक पालवी फुटून ती काजूच्या गाभ्यासारखी वाटतात. आई आणि मुलगी एकाच वयाच्या दिसाव्यात तशी ही झाडे पावसात डवरतात, फुलतात आणि बहरतात. परंतु शिशिर हा ऋतू नसून ती निसर्गाची वेगळीच अदा आपल्या मनाच्या आत झिरपते.
शिशिर ऋतू येतो नि येतो ।
तोच मी त्याच्या आधीन झाले
गालावरची हिरवी पाने ।
मखमखलेली होती तारुण्याने
हवेतला किंचित गारवा ।
झाली पिवळी सोनेरी राने
शिशिरच्या मिलनाने ।
उन्मत्त झाली रात्र
हिरवा साज उतरवुनी ।
एकेक पान गळाया
उन्हाच्या चांदण्यात ।
पानं पानं गळालीत
चिंच चाफ्याची ।
पळस पिंपळाची
फांद्यातल्या ढोलीतली ।
घरटी उघडी पडली
सोडुनी घरटी पक्षी ।
निवारा शोधिती पसारा
हाथ जोडूनी उभी मी ।
निष्पर्ण माझी काया
वसंताच्या रंगमंचकावर ।
बहरून फुलेल मी पुन्हा
शिशिर ऋतू येतो नि येतो ।
तोच मी त्याच्या आधीन झाले
गालावरची हिरवी पाने ।
मखमखलेली होती तारुण्याने
हवेतला किंचित गारवा ।
झाली पिवळी सोनेरी राने
शिशिरच्या मिलनाने ।
उन्मत्त झाली रात्र
हिरवा साज उतरवुनी ।
एकेक पान गळाया
उन्हाच्या चांदण्यात ।
पानं पानं गळालीत
चिंच चाफ्याची ।
पळस पिंपळाची
फांद्यातल्या ढोलीतली ।
घरटी उघडी पडली
सोडुनी घरटी पक्षी ।
निवारा शोधिती पसारा
हाथ जोडूनी उभी मी ।
निष्पर्ण माझी काया
वसंताच्या रंगमंचकावर ।
बहरून फुलेल मी पुन्हा
No comments:
Post a Comment