Saturday, 18 March 2017

वाळलेली तोरणं

वधूचे नटलेले उठावदार डोळे अधिक  वलयकार  आणि आकर्षक दिसण्यासाठी पापण्यांना जसं मेकअप केलं जातं, त्याप्रमाणे सणांच्या दिवशी वातावरण अधिक मंगलदायक होण्यासाठी निसर्गाने बहाल केलेल्या अनमोल खजानातलं एक रत्न म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरणाने आपल्या घराचे दरवाजे सजविले जातात. आपल्या भारतीय संस्कृतीत जेवढे सण येतात तेवढ्या सणांना आपल्या दाराला  तोरण बांधण्याची पद्धत आहे आणि हे सुसंस्कृत पणाचं लक्षण आहे. प्रामुख्याने शहरी भागात आपापल्या सोसायटीच्या विंगच्या दारवाज्यांना, तसेच कमानी गेटला सुद्धा चेअरमन आणि सेक्रेटरी अगदी हौशेने हे तोरणं बांधत असतात. फ्लॅट मध्ये राहणारे रहिवासी आणि भाडेकरू सुद्धा आपल्या दरवाज्यांच्या बाहेरील बाजूस न विसरता हा कार्यक्रम पार पाडतात.

काही दिवसांनी आपण जर या राहिवासीयांच्या विशेषतः भाडेकरूंच्या दारावर नजर टाकली तर हीच जीर्ण झालेली तोरणे वाळलेले बोंबील उलटया अवस्थेत दरवाज्याला टांगल्या सारखी भासतात. एके दिवशी असाच एकदा रस्ता क्रॉस करतांना गोल्डन पॅलेस सोसायटी कडे सहज लक्ष वेधलं गेलं. नांव गोल्डन पॅलेस परंतु पॅलेसच्या भिंतींना चांगलेच मोठे चरे पडलेले दिसले. कंपाउंड वॉल ढासळलेल्या केविलवाण्या अवस्थेत उभी होती. सोसायटी उदयास आल्यापासून कलर दिलेला नव्हता हे स्पष्ट जाणवत होते. नांव सोनुबाई हाथी कथलाचा वाळा म्हणा थोडक्यात. काही राहिवासींनी तर आपल्या बाल्कनीत दिवाळीला लावलेले आकाश कंदील देखील अजूनपर्यंत तसेच विकलांग अवस्थेत टांगून ठेवलेले होते. आपल्या स्वभावाचं विराट दर्शन या साऱ्या गोष्टीतून परावर्तित होत असतं हे त्यांच्या सारासार लक्षात येत नाही. पण विचारात घेतो कोण, ही लक्षणे वाईट जरी नसली तरी आपण सण त्याच दिवशी साजरे करतो की त्या दिवशी तो तिथींनुसार असतो. मग ती शोभिवंत वस्तू असो वा ते आंब्याच्या पानांचे तोरण त्याच सणाला त्याच दिवशी पुरस्कृत करून त्याचा आनंद उपभोगायचा असतो. तरी सुद्धा काही  माणसे ह्या आळशी संस्कृतीला कवटाळून सुखा समाधानाने जीवन जगत असतात. अशी सुकलेली तोरणे बऱ्याच अंशी आपल्या भिन्न स्वभावची प्रतिनिधीत्व करत असतात.

घराचा उंबरठा ओलांडून नव वधूने घरासमोरच्या सारवलेल्या अंगणात तुळशी वृंदावन जवळ नुकतीच रांगोळी काढली. थोड्याच वेळात पावसाची सर येऊन गेली. तुळशीवृंदावन पावसात ओलचिम्ब झालं. पावसाने सारवलेलं ते सारवण रांगोळीसह वाहून नेलं, ह्या नैसर्किक घटनेबद्दल अंगण सारवणाऱ्या गृहिणीला कधीच दुःख किंवा वाईट वाटत नाही. म्हणूनच योगा योगाने एखादी घटना नैसर्गिकपणे आपल्या डोळ्या समोर घडत असतांना काही जण आनंदाने त्या घटनेचा स्विकार करतात. परंतु नुसती शिंक जरी आली तरी काही लोकांना बरेच नाही ते संकेत मिळतात आणि त्या घटनेचा अनर्थ लावून जुळवाजुळव करतात. मांजर आडवी जाणे, दूध उतू जाणे, आपण नुकतेच जेवायला बसलो अन तेवढ्यातच लाईट गेली, हिला आत्ताच जायला मरण आलं होतं का. वा टिटवी आपल्या घरावरून टिव टिव करत ओरडत जाणे ह्या नैसर्गिक पणे घडलेल्या गोष्टी मानसिकतेने दुबळे असलेल्या लोकांना अपशकुन वाटतात आणि नाही ती दळणं दळून आपल्या कमकुवत बुद्धीच्या अवैचारिक विचारांना कुरवाळत बसतात आणि नकारात्मक अर्थ काढून आपल्या दुबळ्या स्वभावाचं  दर्शन घडवितात. ह्या दुबळ्या संस्कृतीपासून स्वतःचं काही भलं होत नाही, प्रश्न सुद्धा अनुत्तुरीत राहतात आणि नुकसान सुद्धा न भरून येण्यासारखे असते. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात ना असे किती तरी  मानवी स्वभावाचे कंगोरे आपल्या वागणुकीतुन, स्वभावातून,  बोलण्यातून, कृतीतून, आणि आपल्या दैनंदिन जीवनातून आपल्या आयुष्यात डोकावत असतात.

पंचपक्वांन्न नेहमीच्या ताटात वाढण्यापेक्षा केळीच्या पानात वाढले तर तेच अन्न जास्तच रुचकर आणि स्वादिष्ट लागतं म्हणून काय आपण रोज केळीच्या पानावर जेवत नाहीत. मग घरी येणाऱ्या पाहुण्यांना कागदाच्या किंवा काचेच्या ग्लास मध्ये चहा देवून आदरातिथ्य करायचं हा कुठला शिष्टाचार.  निरनिराळे लहान मोठे आकाराचे कप्स शोकेस मध्ये ठेवून त्यांचं जतन करण्यात काय अर्थ आहे. कोणताही स्वगत समारंभ असो. नेत्याचा सत्कार, लग्न समारंभ, बक्षीस वितरण समारंभ किंवा सेवा निवृत्त निरोप समारंभ असो,  आजकाल अश्या प्रत्येक समारंभाला बुके देण्याची चढा ओढ लागलेली असते आणि बुके देणे हे आजच्या घडीला प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते, असा बऱ्याच लोकांचा समज झालेला आहे. त्यापैकी आम्ही सुद्धा आहोतच. मला एका लग्न समारंभात जाण्याचा योग आला. प्रयत्न करून एक फुलवालाच्या दुकानाच्या बाजूला बुके करणारा एक मनुष्य दिसला. माझ्याशी बोलता बोलता त्याचं बुके तयार करण्याचं काम चालूच होतं. हा बुके कसा तयार करतो म्हणून मी निरीक्षण करू लागलो. आणि असे लक्षात आले की तो चक्क खराब ओला चिंब खराटा च्या काड्यांपासून बुके बनवत होता. मी जास्तच बुचकळ्यात पडलो. मग हेच का ते नांव मोठं आणि लक्षण खोटं. एकदा का भिंतीवर पाल दिसली की झाकण झाकलेल्या भांडयातलं दुधाबद्दल सुद्धा शंका यायला लागते. स्मशान भूमीला कुंपण हवेच कशाला, कारण गेलेला तर आतून बाहेर येवू शकत नाही आणि बाहेरच्याला आत जायची इच्छा नाही, याच्यावर सभा घेवून वाद विवाद करण्यात काय अर्थ आहे. परंतु या भूमीतली मोडकळीस आलेली साचलेली बांबूची टोकरं जातात तरी कुठे असा प्रश्न कधी कोणाला पडला नसेल. त्यां बांबूंच रिसायकलिंग होत असेल तर फारच छान, पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. परंतु गल्ली बोळातले, माठातून आईस्क्रीम कुल्फी विकणारे छोटे छोटे विक्रेते त्या बांबूच्या काड्यांचा उपयोग तर  करत नसतील ना !  असं जेंव्हा मी वर्तमानपत्रात वाचलं तेंव्हा माझा एक वेळ विश्वासच बसेना. भारतीय रेल्वेतून विना परवाना धारकांकडून विकले जाणारे खाद्य पदार्थ आणि चहा या विषयावर तर भाष्य न केलेलंच बरं. सामाजिक खाद्य मूल्ये पायदळी तुडविणाऱ्या भटके विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या कितीतरी वस्तू आणि खाद्य पदार्थांबद्दल आपण चौकस असावे किंवा नाही हे प्रत्येकाने आपलेच आपणच ठरवावे.

पूर्वी म्हणजे पुरातन काळापासून देवाला किंवा जेष्ठ प्रतिष्ठित व्यक्तींना पायाला स्पर्श करून नमस्कार करण्याची पद्धत प्रचलित होती. आता शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते घरातल्या आलेल्या नवीन सूनबाईने, जेष्ठांचे आशीर्वाद घायवायचे असतील तर सरळ संबंधित व्यक्तीच्या घुडघ्याला हात लावून नमस्कार केला जातो. पूर्वीची खोचक आणि टोमणे मारण्यासाठी उभ्या देवाला दंडवत ही म्हण प्रचलीत होती. ऐवजी आता उभ्या गुढघ्याला दंडवत केले तरी पुरेसे होते. परंतु ही वेगाने बोकळावत चाललेली अर्धवट संस्कृतीला थांबा कुठेच नाही. उलट अशा संस्कृतीला सिनेमा, सिरियल्स मधून खत पाणी घातले जाते. सध्या तुम्ही सिरीयल चालू असलेलं कोणतंही टीव्ही चॅनेल लावा. चक्क खोटं कसं बोलावं हे आपल्याला शिकायला मिळेल. त्यामुळे कुठंही ट्रेनिंग घ्यायची आवशक्यता नाही. आजचा स्रिवर्ग सुद्धा घरातली कामे अर्धवट ठेवून अगदी चवीने टक लावून या सिरीयल्स बघत असतात. एकमेकांची उणे दुणे काढणे, कानपिचक्या करणे, दुधाच्या पेल्यात जहर टाकणे, काय नाही त्या विचित्र वाईट कर्माच्या गोष्टींचा शोध लावून व्हिलन स्त्रीच्या मुखी घातले जाते. कैकयीच्या नांवाला सर्रास कलंक लावण्याचे सध्या चालणाऱ्या टीव्ही सिरियल्स मध्ये चढाओढ बघायला मिळते. भारतीय स्त्री खरोखर एवढी दुष्ट असते का हो !  नक्कीच नाही. मग हे मराठी आणि विशेषतः  हिंदी चॅनेल्स वर स्त्रीचं आगळं वेगळं रूप दाखविलं जातं, नवीन पिढीवर याचे काय परिणाम होतील किंवा आपण कोणत्या संस्कृतीला हातभार लावत आहोत याचा ही निर्माते मंडळी विचार न करता आपला टीआरपी कसा वाढेल हेच फक्त त्यांचं ध्येय असतं. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं कुठं नवीन पिढीला माहीत आहे. म्हणून असतं तसं न दाखविता, न दिसतं तसं दाखवितात आणि हीच खरी भारतीय संस्कृती आहे असं नवीन पिढी समजून बसली आहे. आणि आता ती मागे फिरणे फार मुश्किल आहे. त्याचाच एक दुसरा नमुना, एका मराठी वाहिनीवर, मराठी रिपोर्टर मुलगी कॉलेजच्या एका चार पाच मुलं मुली असलेल्या ग्रुपचं मुलाखत घेत होती. विषय होता तुम्ही किती प्रकारच्या शिव्या तुमच्या दैनंदिन जीवनात देतात. आता तर हद्दच झाली. अगदी दिल खुलासपणे त्यांच्याकडून त्यांनी त्या शिव्या वदवून घेतल्या. काही प्रमाणात शेलक्या शिव्या आपण समजू शकतो.  पण कॉलेज कट्टा म्हणजे शिव्या निर्मितीची खाण आहे का. याच्यात कोणतं समाज प्रबोधन होणार आहे. ह्या मुलांना कोण समजावून सांगेल. जस बी रुजेल तसं उगवेल असं म्हणतात. मग विचारा यांना, भुईमुगाच्या शेंगा झाडावर लागतात का जमिनीत, यांच्यातही यांची बोंबच आहे.

आजकाल अगदी लहान लहान कच्ची बच्ची बाळेसुद्धा स्टेजवर मराठी लावणीवर नाचायचा ठेका घेतात, संगीत क्षेत्रात एवढी क्रांती झाली की त्यात आपल्या लहान बालकांचा अल्लड मनाचा चेंदामेंदा  होईल असा विचारही आपले पालक सध्या करतांना दिसत नाहीत. एक वेळ अतिप्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीला बांध टाकून अडविले जाईल, परंतु या वाहवत जाणाऱ्या संस्कृतीला बांध घालण्याचे सामर्थ्य सध्यातरी कोणामध्ये दिसत नाही.

खोटं बोलण्याची पण एक नजाकत असते, त्यांच्यातही एखाद्याची प्रेमाची वेल बहरत असेल आणि रोमान्स फुलत असेल तर ती गोष्ट वेगळी, शिवाय काही अपरिहार्य कारणामुळे खोटी बातमी सांगून किंवा लपवून एखाद्याचा जीव वाचत असेल, दुःखाची बातमी सांगतांना किंवा कोणाचं दुःख कमी करण्यासाठी, तसेच कोणाचा विश्वासाला तडा जावू नये म्हणून काही काळापुरतं खोटं बोलावे लागत असेल तर तेवढं सर्जनशीलतेने आपण सौम्य होवून घटनेची त्रिव्रता कमी करू शकतो. परंतु खोटी दुकानदारी करणारे किंवा खोटे बोलणारे हे एकाच माळेचे मणी असतात असे नव्हे तर ते जुळवे भाऊच.  हे सांगण्यासाठी कुठल्या सिद्धांताची गरज नाही. एखाद्या वेळेस वाळूचे कण रगडीता तेलही गळेल ह्या म्हणीवर भरोसा ठेवू शकतो,  परंतु प्रयत्नांती परमेश्वर हे थोडे बाजूला ठेवून खोटं बोलणाऱ्यांची जीभ पकडण्याची आपण कधीही प्रयत्न करू नये. खोटं बोलल्याशिवाय अशा लोकांचा दिवस मार्गी लागत नाही. एक खोटं लपविण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतं आणि दुसरं लपविण्यासाठी तिसरं. त्याबद्दल त्यांची मने एवढी कठोर झालेली असतात की त्यामुळे त्यांना झोपेचे सोंग सहज घेता येते. ज्या कोर्टाच्या पहिल्याच पायरीवर सत्य मेव जयते असे लिहिलेले असते, तेथे तर सर्रास खोट्या साक्षी दिल्या जातात. आपल्याला केस जिंकण्याच्या इर्षेने खोटं बोलण्याचाच आसरा घ्यावाच लागतो त्याशिवाय त्यांची केस कोर्टात तग धरू शकत नाही. एकदा कोर्टात साक्ष देण्याचा मलाही अनुभव आला. ज्यावेळेस न्यायाधीश साहेबानी मला विरुद्ध पक्ष्याच्या अशिलाबाबत माझं मत विचारलं, तेंव्हा मी खरी साक्ष देण्याचा प्रयत्न केला. त्या संबंधित माणसाला अर्धा पाण्याने भरलेला ग्लास दिसतच नाही, नेहमी त्याला ग्लास अर्धा खालीच दिसतो. वाक्याचा अर्थ लागत होता परंतु  कोर्टाला ही साहित्यिक भाषेतली साक्ष मंजूर नव्हती. आणि तो साहित्यिक भाषेतला डॉयलॉग शेवटी कोर्टाने गाळून टाकला. म्हणून मुसळधार पाऊस पडणाऱ्या या जगात ओले कपडे घालून जायचे की कोरडे हे प्रत्येकाने स्वतःच ठरवावे.

मृत व्यक्तीबद्दल शोक प्रगट करण्यासाठी, त्याच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहण्यास सर्वांना सुचविले जाते आणि सर्व जण अगदी गुहेतल्या संन्यासा सारखे डोळे मिटून मृत आत्म्यास शांती मिळण्यासाठी कुठलीही हालचाल न करता मनाचा भार हलका करण्यासाठी स्तब्ध उभे राहतात. आतापर्यंत आपण देखील आयुष्यात दहा ते पंधरा वेळा मृतात्म्यास शांती मिळण्यासाठी स्तब्ध उभे राहीले असणारच.  कोणी किती मिनिटे आत्मीयतेने शांती प्रदान केली हे, गेलेला माणूस हिशेब मागायला येणार नाही हे आपल्याला चांगले ठाऊक असते. म्हणूनच की काय आपली स्तब्धतेची समाधी केवळ वीस सेकंदच्या आत उध्वस्त होते आणि मनुष्य इथेही मृतात्म्यास दोन मिनिटे शांती प्रदान करताना अप्रामाणिक राहून आपल्या वेळेची काटकसर करून घरी परत येतो. मनुष्य असा का वागतो म्हणूनच माणसाच्या मनाचा ठाव अजूनही शास्त्रज्ञानां घेता आलेला नाही.

आपल्या देशात असंतुष्ट आणि असमाधानी प्रवृत्ती असलेल्यांची काही कमी नाही. असमाधानी राहून सारखी कुरकुर करायला त्यांना आवडतं. गुलाबाला काटे असतात हीच पिरपिर त्यांची कायम चालू असते. जे काही आपल्या नशिबी मिळालंय ते खूप मिळालंय अश्या समाधानी वृत्तीने जीवनाकडे पाहण्याचं त्यांचं धाडस होत नाही. एक रेल्वेचा टीसी, स्वतः जवळ बांगला गाडी जमीन जुमला, मुलं चांगल्या ठिकाणी नोकरीला, लक्ष्मी घरात पाणी भरते एवढी सुबत्ता त्याच्या घरात आहे. ह्या महाशयांना सुरत ते जळगांव अशी ड्युटी मिळाली आणि जळगांव ला त्यांचा मुक्काम पडला. रेल्वेचे जावई असल्यामुळे राहण्याची सोय रेल्वेकडून फुकटातच होती, परंतु जेवणाचा, खाण्यापिण्याची हुक्का दारूची सोय आपल्या सहकाऱ्यांनीच करावी अशी साहेबांची नेहमी नियत नजर  असते. शरमेची गोष्ट म्हणजे आपल्या खालच्या सहकाऱ्यांकडून ते ही गरज न शरमता नियमितपणे भागवून घेतात. ही जमात झाडांच्या कुंडयांना कधीच पाणी घालीत नाहीत, त्यांच्या दरवाज्यात लावलेली वेल नेहमी तुम्हाला सुखलेल्या अवस्थेत आढळेल. अशा फुकटची खीर खाणाऱ्यांची आपल्या देशात विपुलता आहे असे खेदाने सांगावे लागते हे आपलं दुर्दैव.

स्त्री ही आपल्या पतीचे घर सजविते,  आपल्या घराचा स्वर्ग बनविते, जन्मो जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून व्रत करते. आयुष्यभर मी मी म्हणून घराचा गाडा ओढणारा, संध्याकाळी जेंव्हा तो थकून भागून आल्यानंतर बायकोच्या हातचं जेवण जेवून रात्री झोपून जातो. ती बिचारी मात्र सर्वांची जेवणे झाल्यावर जे काही उरेल तेवढ्यावरच आपली भूख भागविते. आयुष्यभर त्याच्यासाठी राबराब राबत असते. दिवस उगावल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत ती कामच करीत असते. नवऱ्याचं, मुलाबाळांचं, त्यांची लग्न झाल्यानंतर सुनांचीं मर्जी सांभाळावी लागते. आणि नातवंडांना देखील ती लाडकोडात वाढविते. आयुष्यभर नाती गोती सांभाळता सांभाळता तिला नाके नऊ येतात. बायको आज का जेवली नाही अशी फिकीर न करणारा जेंव्हा तो आपल्या आयुष्याच्या एका टप्प्यावर येवून पोहचतो. आयुष्याचा पलीकडचा किनारा त्याला दिसायला लागतो.  तेंव्हा त्याला आपल्या बायकोची आठवण येते. आपल्या निरोप समारंभाच्या भाषणात हा धूर्त माणूस सुकलेल्या तोरणासारखे निकृष्ट अभिप्राय देवून आपल्या आयुष्याचे सारे श्रेय आपल्या बायकोला देवून तिच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. आज मी जो काही तुमच्यासमोर उभा आहे तो केवळ माझ्या धर्मपत्नीमुळेच. माझी बायको म्हणजे माझी सावली आहे. ह्याच सावलीत मी माझं आयुष्य काढलं आणि ती बिचारी त्याच्यातच धन्यता मानते.हे सर्व काही त्याला शेवटच्या क्षणीच इलेवन्थ हवरला आठवतं ते त्याच्या पुढच्या म्हातारपणाची सोय होण्यासाठी. परंतु त्याने कधी आपल्या आयुष्यात विचार केलेला नसतो  की त्याची सावली कधी उन्हात तर कधी चिखलात तर कधी गटारावर पडली होती. त्यावेळेस कुठे गेला होता सुता तुझा धर्म.

No comments:

Post a Comment