Thursday, 25 May 2017

परी

उमलायच्या अगोदरच कळीचं वेलीवरून गळणं जसं आपल्या ध्यानात येत नाही, तसं बिगर पाण्याची रानातली झाडे  जंगलात जगतात तरी कशी असा स्तुत्य विचार आपल्या मनाला कधी शिवला नसेल. हे सत्य तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवतं. त्याचं कारणही असं आहे की तुम्ही निर्जीव अश्या लाकडी खुर्चीला चिटकलेले असतांत, आणि त्यावेळेस तुम्हाला निसर्गाचं, जगाचं आपल्या मुलांचं भानच नसतं. लहान मुलांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देतांना तुमचा पोपट होतो. उसापासून साखर कशी तयार होते, तुम्ही ऑफिस मध्ये काय करतात लहान मुलांच्या या साध्या प्रश्नांची उत्तरे देण्याचं तुम्ही टाळता. मासा पाण्यात पडल्यावर तो मरत का नाही. जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे अशी उत्तर देण्याची पद्धत तुम्ही अवलंबिता. असे किती तरी प्रश्न आणि त्यांची लहान मोठी रहस्ये आपण आपल्या पोटात दडपून आपणच आपल्या तोंडाला कुलूप लावतो. बरं त्याची किल्ली तुम्ही अश्या ठिकाणी ठेवतात, की कालांतराने ती जागाही तुम्हाला आठवत नाही. बायको बिचारी शोधून शोधून थकून जाते. आणि तिला साहजिकच वाटते की उगीचच एवढी वर्षे आपण वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्यात. आपल्याच बाबतीत हे असं का होतं ह्या विचाराने तुम्ही हैराण होतात. त्याचं कारणही तसंच आहे. एकदा का तुम्ही खुर्ची सोडली तर तेथे तुम्हाला कवडीची ही किंमत राहत नाही अशी तुमची चुकीची समजूत झालेली असते. कारण तुम्ही वयाची साठी ओलांडलेली असते हे क्षणभर तुम्ही विसरता आणि तुमच्या अंगवळणी पडलेल्या हट्टी सवयींची पूर्तता करायला घरात तुमच्या बाजूने कोणीही उभं राहत नाही. हे तुम्हाला हळू हळू समजायला लागतं आणि तिथेच तुमच्या मनाचा तिळपापड होतो. घरातले सर्वच जण आपले वैरी आहेत असे समजून आपल्या जिभेचं रूपांतर तुम्ही ढाल आणि तलवारीत करून टाकतात. आपण किती उन्हाळे पावसाळे खाल्लेत, या घरासाठी आपण काय नाही केलं, याची बेरीज वजाबाकी आपण स्वतःच करत बसतात. ह्या सवयी आपण सोडून दिल्या पाहिजेत अशी सुबुद्धीही त्यावेळी तुम्हाला सुचत नाही. ताकाला जावून भांडं कशाला लपवायचं, हे आपलेच अनुभवाचे पराक्रम आहेत. बरं या अनुभवांचे साईड इफेक्टसही एवढे विचित्र असतील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.  उलटा बनियन परिधान करणे. शर्टाचे खालचे बटण लावावयाचे विसरणे. केस न विंचरताच घराच्या बाहेर पडणे. बाथरूमचा दरवाजा आत उघडतो हे विसरून आपण बाहेर उघडण्याचा वारंवार प्रयत्न करणे. चष्माची शोधाशोध करण्यासाठी सर्व घराला धारेवर धरणे. स्टेशनला उतरल्यावर आपण ईस्टला राहतो हे विसरून वेस्टचा रस्ता पकडणे. बरे हे सर्व अचानक उद्भवलेल्या गोष्टींकडे बायकोचं तंतोतंत लक्ष असतं. आणि ती बिचारी तुमची सतत काळजी घेत असते. परंतु आपण मात्र बायकोला बॅकपेन चा त्रास आहे आणि भविष्यात आपल्याला आता पुरणपोळी मिळणार नाही ह्या विचाराने तुम्ही डोक्यावर केस नसतांनाही कंगव्याची शोधा शोध करतात. अश्या बऱ्याच गोष्टींचा त्रास होऊन आयुष्यात एक प्रकारचे नैराश्य यायला सुरुवात होते. म्हणजे जवळ जवळ आपण आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर येवून पोहचलेलो असतो.


निर्जन रानातून कडक उन्हात आपण एकटेच चालत चालत जात आहोत. पाणी आणि सावली साठी जीव अगदी कासावीस झाला आहे. मृगजळाचा होणारा भास आणि दुपारचा माध्यान्य, पायाखालची गायब झालेली सावली, जीव अगदी मेट्याकुटीला येवून पोहचला आहे. अशातच एखादे डेरेदार झाड आणि त्याच्या बाजूलाच ओढा दृष्टीस पडावा तसं झालं.  फुलाने एकदम हसून फुलावे त्याप्रमाणे एक प्रसन्न चेहरा समोर आला. तिचे डाळिंबा सारखे ओठ आणि गुबगुबीत गोरे गोरे गाल आणि तिच्या केसांना केलेला बॉब कट आणि त्या केसांना अलगद सावरण्यासाठी पांढरी छोटी छोटी फुलं असलेली मोत्यांचं हेअर बँड लावून जणू परीच, ती अचानक माझ्यासमोर आली. बऱ्याच दिवसापासून ताटातूट झालेलं भुकेलं मांजराचं पिल्लू भेटावं आणि टुबकन उडी मारून खांद्यावर बसून रागाच्या भरात माझे केस ओचके बोचके करून टाकावेत त्याप्रमाणे ती माझ्या पाठीमागून खांद्यावर येवून बसली. आले किसून टाकून अंबावलेलं तांदूळ आणि डाळीचं पीठ जसं फेटतात त्याप्रमाणे तिने माझ्या डोक्याचा भूगा करून टाकला. आता "ती" म्हटल्या नंतर तुमच्या डोक्यात वेगळीच ट्यूब पेटली असेल. परंतु ती म्हणजे दुधावरची साय. माझ्या पिलुचं पिलू. तीचं नांव राणी उर्फ ऐश्वर्या. मी वयाने सिनिअर सिटीझन जरी असलो, तरी तिच्या भेटीने मी एकदम फ्रेश आणि ताजा तवाना झालो. मधमाशांनी झाडाच्या फांदीला विळखा घालून पोळं तयार करावं त्याप्रमाणे मानेला विळखा घालून  तिने लगेच माझ्या मागे धोशा लावला, "बाबा विचाराना प्रश्न, बाबा विचाराना प्रश्न".  मग एंवढ्या दिवसांपासून बंद कुलुपाची हरवलेली किल्ली मला लगेच सापडली. मी तिला तिच्या बुद्धीला पेलवेल असा प्रश्न विचारला. 
"राणी, लहान मुलं पायात बूट का घालतात"
एका क्षणाचाही विलंब न लावता राणीने उत्तर दिले. "पायातले पायमोजे खराब होवू नयेत म्हणून" 
हे उत्तर ऐकून मी कमालीचा आश्चर्यचकीत झालो. एवढी लहान वयातली मुलं अशी तांत्रिक दृष्ट्या अचूक उत्तरं कशी देवू शकतात. त्यांना कोण शिकवतं हे सारं. मला कळायला लागल्या पासून ते लग्न होईपर्यंत मी ततं पपं करत होतो. यांचे पुरावे आपल्याला आयुष्याची मागील पाने जेंव्हा आपण चाळतो तेंव्हा सापडतात. मी त्या अनपेक्षित उत्तराने राणीचा फॅनच झालो. दर तीन ते चार महिन्याच्या सुटीत ती डोंबिवलीला माझ्याकडे येते. आणि प्रश्नांचा भडीमार करते. जसजसे दिवसामागून दिवस जात होते, आमचा दोघांचा प्रश्न विचारण्याचा सिलसिला तसाच चालू होता. तिला थोडं थोडं कळायला लागल्यापासून तीची रुची आवड निवड बदलून तिच्या अपेक्षा वाढल्यात हे माझ्या लक्षातच आलं नाही. दुसऱ्या वेळेस आली तेंव्हा  मी तिला प्रश्न केला. 
"बेटा, मुली नखांना नेल पॉलिश का लावतात". तिने लगेच उत्तर दिले "सुंदर दिसण्यासाठी" 
ह्या वेळेचं उत्तर मला जरा जास्तच परिपक्व वाटले. मी ही माझ्या केविलवाण्या गंजलेल्या बुद्धीला ताण देऊन लगेच दुसरा प्रश्नाची गुगली टाकली.
"राणी मला सांग बरं, आंब्यातून रस का निघतो. "रस नाही तर मग काय रक्त निघेल का बाबा"  माझ्या कानात कोणी शिसं ओतल्या सारखा भास झाला. 
"असे काय विचित्र प्रश्न विचारतात हो तुम्ही". मी तुम्हाला विचारते त्याचं उत्तर द्या. मी होकारार्थी मान हलवली. 
"एक ते नऊ मधील तुम्हाला कोणता अंक आवडतो". मी सेवन म्हणजे सात सांगितलं. 
"तुमचा आवडीचा रंग कोणता" 
"रेड". ओके 
"तुम्हाला कोणता प्राणी आवडतो". 
मी सांगितलं जिराफ. 
तिने लगेच मला मूर्खात काढलं. "बाबा तुम्हाला मॅनर्सच नाहीत". 
कसं काय गं. 
"अहो जिराफ कधी लाल रंगाचा आणि त्याला कधी सात पाय असतात का". 
आपल्या कानात आता कोणी तरी खरोखर शिसं ओतलं आहे असं वाटू लागलं.आता ह्या चिमुकलीच्या नादाला लागायचं नाही असं ठरवायच्या अगोदरच तिने मला सांगितलं बाबा आता मला poetry शिकवा. आता स्वारीला गोष्टी आणि poetry आवडू लागल्यात. आता नवीन poetry म्हणजे कविता आणायच्या तरी कोठून हा मोठा यक्ष प्रश्न पडला. आपण एका नामांकित मल्टी नॅशनल कंपनीतून  मॅनेजर च्या पदावरून रिटायर्ड झालो आहोत. एवढीच काय जमेची बाजू गर्वाने सांगण्यासारखी होती. पण इथे तर आपलं कुठलंच हत्यार चालत नाही, म्हणून पेन्सिल शार्प करण्यात काहीच अर्थ नव्हता. शेवटी व्हाट्स ऍप वरून आलेला जोक चा कवितेत रूपांतर करून तिच्या पुढे कथन करून माझी सुटका करून घेतली. 

लोहार दादा

लोहार दादा लोहार दादा
गाजर आहे का

अरे ससोबा राज्या
हे लोहाराचं दुकान आहे
मंडईत जा गाजर घेऊन घरी जा

दुसऱ्या दिवशी ससोबा हजर
लोहार दादा लोहार दादा
गाजर आहे का

लोहार दादा मनातून चिडला
त्याने उपटले सशाचे कान
दाखवतो तुला गाजराचं दुकान
परत आला तर दातच तोडेन
नंतर कधी परत येणारच नाही

तिसऱ्या दिवशी ससोबा हजर
विचारतो कसा गाजर आहे का
लोहार दादाला आला भयंकर राग
त्याने तोडले सशाचे दात

चवथ्या दिवशी
लोहार दादा बसला होता निवांत
ससोबा प्रगट झाला पुढ्यात
लोहार दादा लोहार दादा
गाजराचा ज्युस आहे का

लोहार दादा जुस देईना
ससोबा आपला हट्ट सोडेना

1 comment:


  1. नमस्कार चव्हाण साहेब,

    तुम्ही गावाकडे पडवीत, बंद घरात किंवा झाडावर कोळी हा किटक जाळं बनवताना नक्कीच पाहिलं असणार. एक एक वर्तुळाकार फेरा पूर्ण करून करून मोठं असं जाळं तो तयार करतो. तो जेंव्हा जाळं तयार करत असतो, तेंव्हा समाजातील प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्या मिशनकडे चौकस दृष्टीने बघतेच असे नाही. पण त्याचं मात्र काम सुरूच असतं. अनेक व्यत्यय येतात, कधी कधी तर त्याने खूप मेहनतीने तयार केलेलं ते जाळं काही वेगवेगळ्या कारणांनी मोडलंही जातं. सारी मेहनत फुकट. पण म्हणतात ना,
    “हारकर भी जो जितने की तमन्ना लेकर, अपनी मंजिल की तरफ बढता रहता है, उसे ही बाजीगर कहते है!”

    आणि एक दिवस तो कोळी, आपलं सुंदर जाळं बनवून पूर्ण करतो. तेव्हा तिथे फक्त त्याचंच अधिराज्य असतं. त्या जाळ्यावर मुक्त संचार करून तो आत्मिक आनंद मिळवत असतो. अगदी तसंच असतं पक्षांचं. एक एक काडी जमा करून चिमणी आपल्या सुंदर घरट्याला आकार देते. जेंव्हा या गोष्ठी बनून तयार होतात, तेव्हा त्या इतरांना बघण्यासाठी, आनंद देणाऱ्या असतातच परंतू बणवनाऱ्याच्या मनालाही आत्मिक आनंद देणाऱ्या असतात.

    जानेवारी महिन्याच्या पहिल्याच सप्ताहात आपण ‘ रेशीम धागे ’ या सदराखाली आपल्या सुंदर आणि गोड भाषेत आपल्या साहित्याची मांडणी करायला सरुवात केली. एक एक रेशीम धागा दुसऱ्या धाग्यात गुंफत आपण -
    १) वाटाडेंचे आभार मानायचे राहून गेलेत
    २) लाट
    ३) निखारा
    ४) एका कवितेचा जन्म
    ५) खोडकर वा त्र ट
    ६) झेप १
    ७) झेप २
    ८) विठ्ठलाच्या पायी विट, झाली भाग्यवंत
    ९) आजून येतो वास फुलांचा, या मातीचा गंध वेगळा
    १०) प्राजक्ताचा सडा
    ११) शिशिरची पानगळ
    १२) तु एक ग्रेट
    १३) एक होतं माळीण
    १४) वाळलेली तोरणं
    १५) परी
    असे आजतागायत जवळपास १५ लेख लिहिले. एक एक लेख साकारताना त्यामध्ये वापरलेल्या अलंकारिक भाषा, उदाहरणे, भावनिक शब्दांची जोड, वाक्याची मांडणी, सुरवात मध्य आणि शेवट यामध्ये वापरलेली कल्पकता यामुळे साहित्य / लेख वाचनीय झाले.

    आम्हा वाचकांना त्यामधून आनंद लहरींचा आनंद तर मिळालाच, परंतू आपणासही त्यामधून आत्मिक समाधान मिळाले असणारच यात शंकाच नाही. साहित्य क्षेत्रात, मनातील भावना, लेखणीच्या द्वारे जेंव्हा वाचकांच्या मनाचा ठाव घेतात, तेव्हा ते साहित्य एक दर्जेदार साहित्य म्हणून ओळखलं जातं. आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद आणि अभिमान वाटतोय की आपल्या लेखणीला ती
    धार आहे. सो किप ईट अप. जाता जाता एवढंच म्हणावसं वाटतं –
    “पेरणार ते उगवणार आहे,
    ज्ञान असो की अज्ञान,
    आपल्या लेखणीतून मिळणार आहे,
    आम्हा सर्वांना ज्ञान ज्ञान आणि ज्ञान.”

    धन्यवाद!

    आपला शुभचिंतक
    भरत कांडके

    ReplyDelete