***********
जंगलात वारा नसतांनाही हिरवे उंच गवत अचानक सळ सळ हलायला लागले तर तेथे हिंस्र जनावर चवताळून लपून बसले आहे असे आपण डिस्कवरी चॅनेलवर रोज पाहतो.
परंतु माणसाच्या मनात अशी अमानवी हालचाल सुरु झाली तर तलम वस्रे लगेच फाटली जातात. अश्या अमानवी हालचालीचा वेध घेणारं तंत्रज्ञान अजून तरी विकसित झालेलं नाही.
***********
पूर्वी गाण्यातून, जीवनावश्यक तत्वज्ञान मांडलं जायचं. अतिशय सुंदर काव्य, अर्थवाही शब्द, कर्णमधुर संगीत आणि अतिशय रम्य सादरीकरण ही पुर्वीच्या गाजलेल्या गाण्यांची वैशिष्टे होती. आता मात्र त्याच्या विरुद्ध परिस्थिती आहे. तरुण पिढीला सर्व निरर्थक वाटू लागलं आहे. त्यामुळे निरर्थक गाणी तरुण पिढीच्या ओठावर रुळू लागली आहेत. शाश्वत असं काही निर्माण होत नाही आणि त्याची खंत कुणालाही वाटत नाहीये. त्याचच प्रतिबिंब आज चौफेर उफाळलेल्या गाण्यातून दिसते आहे.
***********
माणसाचा आणि ईश्वराचा संबंध नीट तपासून पाहिला तर ईश्वराने माणसाला निर्माण करण्याऐवजी, माणसानेच वेळोवेळी निरनिराळ्या ईश्वराला जन्म दिला आहे असे आढळून येईल.
आचार्य स.ज. भागवत (संकलक शरद गोगटे यांच्या वेचक विचार या पुस्तकातून)
***********
संताप येणे ही नैसर्गिक देणगी आहे. पण संतापाचा अतिरेक असू नये, नाही तर कधी कधी तुरुंगाची हवा खावी लागते.
***********
उर दाटून आल्यानंतर डोळे अश्रूंना वाट मोकळे करून देतात, न जाणे एवढे पाणी साठविण्यासाठी जागा डोळ्याच्या कोणत्या भागात असते हे एक मानवी निसर्गाचं कोडंच आहे.
***********
या जगाच्या संपूर्ण इतिहासात फक्त एकच गोष्ट अशी आहे की जी भराभर पैसे खर्चून सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. ती गोष्ट म्हणजे तुम्हाला बघून कुत्र्याने आनंदाने हलवलेली शेपटी !
जॉन विलिंग्ज........(शांता ज. शेळके यांच्या मधुसंचय या पुस्तकातून)
***********
लहान मूल जेंव्हा अगदी गाढ झोपी जाते तेंव्हा खरी विश्रांती कोणाला मिळते ठाऊक आहे ? मुलाला नव्हे, मुलाच्या आईला !
............. शांता ज. शेळके यांच्या मधुसंचय या पुस्तकातून
***********
वरुण राजा सकाळपासून शांत झाला होता. दसरा सण मोठा नाही आनंदाचा तोटा म्हणी प्रमाणेच या सणाला आनंदाचं उधाण आलं होतं आणि भरभरून सोनं वाटलं गेलं, सण मोठया उत्साहात साजरा झाला. आकाश निरभ्र झालं होतं. पाच दिवसांनी आलेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यातलं दुधाचं सर्वांनीच प्राशन केलं. 2017 ची दिवाळीही तोंडावर आली. शेतात ज्वारी बाजरीची कणसं टंच भरून ऐन बहारात आली होती. कारण ही तसच होतं. या वर्षाचा पावसाळा समाधानकारक झाला होता, शेतं ही हिरवीगार दिसू लागली होती. विहिरी, तलाव पाण्याने तुडुंब भरून आलीत. रोडच्या पलीकडील घरासमोरील डबके सुद्धा तलावासारखं बऱ्याच दिवस तुडुंब भरलेलं दिसलं. रात्री खिडकी उघडून डोकावून पाहिलं. राहून राहून एकच खंत मनाला बोचत होती. डराव डराव करणाऱ्या बेडूक राज्यांचे आवाज या वर्षी ऐकायला मिळालेच नाहीत. त्यांच्या विना डबकी सुनी सुनी झालीत. ते या वर्षी का रागावलेत, त्यांचं आगमन का झालं नाही. त्याने का पलायन केलं हे मात्र तो सर्वांना कोड्यात सोडून गेला.
***********
तीच घरटी, झोपडया त्या, तीच माती तांबडी
तीच कौलारे उतरती, तीच वळणे वाकडी
लिंब बोराट्या पुढे काय चाफे केवडे
वाट मज ती आवडे
........ग.दि. माडगूळकर ( संकलक शरद गोगटे यांच्या वेचक विचार या पुस्तकातून)
***********
पाकशास्त्रातील अनेक लज्जतदार पदार्थ ही मानवी चुकांचीच निर्मिती आहे.
***********
माणसाला विचारक्षमता, भावनाशीलता, कल्पनाक्षमता, अशा अनेक क्षमता जस्या त्याला लाभल्या आहेत तसेच अविचार, अवास्तव कल्पना, संकुचीत भावना, दुराग्रह असे अनेकानेक सापळेही त्यानंच निर्माण केले आहेत.
***********
मराठी भाषा ही खरच समृद्ध व संपन्न, मधुर व ज्ञानमयी आहे. वाचन, लेखन, श्रवण व संभाषण ही तिची चार कौशल्य आहेत.
***********
खऱ्या खोट्याचा पेच लहान मुलांना नेहमीच पचायला कठीण जातो. सावधान, लहान मुलांसमोर नेहमी सत्यच बोला नाही तर ते "खोटच" हे "खरं" समजून बसतील.
***********
त्यांच्या पिढीच्या दृष्टीने गांधीजी कितीही पूज्य असले, तरी गांधीवादातला हृदयपरिवर्तनाचा सिद्धांत अत्यंत ठिसूळ आशा पायावर उभारलेला आहे. एका गालावर थप्पड मारणाऱ्या मुर्खाच्या पुढे दुसरा गाल पुढे केला तर तोही लाल होण्याचा संभव या जगात अधिक. मारणाऱ्याला पश्चाताप होऊन तो आपला हात मागे घेईल व घडलेल्या आगळिकीबद्दल क्षमा मागेल ही शक्यता त्यामानाने अतिशय कमी ! इतक्या लवकर पश्चाताप होण्याइतके त्याचे मन सुसंस्कृत असते तर पहिली थप्पड लगावणाच्या वेळीच त्याने अधिक विचार केला असता !
वि.स. खांडेकर यांच्या सुखाचा शोध या पुस्तकाच्या .... प्रस्तावनातून... 31.07.1946
***********
चूका करणे ही काळाची गरज आहे, त्याशिवाय नवनिर्मिती होणे अशक्यच !
***********
परमेश्वर सर्वत्र सृष्टीच्या चराचरात, कणाकणात भरलेला आहे. म्हणजे तो मूर्तीतही आहे. म्हणूनच मूर्तीची पूजा करावी.
***********
***********
शब्दांचं कवच हे अगदी मुलायम असतं, ते जिभेने सहज सोलता येते. पण कधी कधी जीभ त्याच्यानेच सोलली जावून अलवार होते. म्हणून शब्दांच्या आज्ञेतच आपण राहिलेलं बरं ! एकदा का शब्दांचा स्पर्श होवून अर्थ कळायला लागला मग तुम्हाला कुठलंही व्यासपीठ शोधण्याची आवश्यकता नाही.
***********
***********
***********
घराची निसर्गाशी जवळीक असावी. नव्या आणि जुन्यांची ती सांगड असावी. स्वयंपाकघर हे अन्नपूर्णेचे मंदिर असावे.
***********
मनाला कितीही धावू द्या, जिभेला मात्र आवर घाला.
***********
इतरांशी आपल्याला काही घेणे देणे नाही, इतरांचा विचार कराल तर फसाल. अशी विचारधारा जेंव्हा बळावते तेंव्हा समाजात विषमता त्रिव्र होवू लागली असे समजावे.
***********
साध्या फुलपाखराच्या पंखाचे वजन तरी किती. पण त्यानें मनांत आणून आपले पंख फडफडवले तर एखाद्या सम्राटाचे साम्राज्य हादरवू शकतो. पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या कांग्रेसी सरकारच्या नाका तोंडात पाणी जाइपर्यंत अण्णा हजारेंनी त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
***********
टी आर पी
हिंदी फिल्म मध्ये व्हिलनचा रोल बहुतेक करून पुरुष आपलं कसब पणाला लावून कसाब चांगलाच रंगवतात. प्रेक्षक आपला हळवेपणा बाजूला ठेवून त्याला दिलेली कठोर शिक्षेची अमलबाजावणी व्हावयाच्या अगोदरच त्याने आपले थिएटर मधले आसन सोडलेले असते. पण टीव्ही सिरिअल मध्ये हा विभाग स्रियांनी चांगलाच कॅपच्यर्ड केलेला आहे. नाके मुरडणे, डोळे तिरपे तारपे करून ओठाचा फुटक्या कवडी सारखा आकार करण्यात मी नाही त्यातली, कडी लावं आतली हे उपजतच नॉलेज त्यांच्यात असल्यामुळे दिग्दर्शकाला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही हे इथपर्यंत सर्व ठीक आहे. परंतु भयानक कट कारस्थान करणे, अन्नात विष कालवणे, ज्यूस भरलेल्या ग्लासात काचेची पावडर टाकणे पर्यंत भयानक अघोरी प्रकार स्त्री पात्राच्या माध्यमातून दाखवून ही माध्यमे कोणता समाज घडवीत आहेत. भारतीय स्त्री खरोखर दुष्ट आहे काय असा प्रश्न नवीन पिढी देखील विचारणार नाही कारण जे दाखविले जाते तीच खरी संस्कृती आहे असा समज रुजलेला असेल. आपला टी आर पी वाढविण्यासाठी आपण कोणत्या संस्कृतीचे पाळेमुळे रुजविण्यात हातभार लावतो आहेत ? आपल्या संस्कृतीच्या पात्राला यांनी बरीच छिद्रे पाडून ठेवली असल्यामुळे कोणत्याही पाणिनीने नवीन जन्म घेतला तरी नवीन पिढीला त्याची ओळख पटणार नाही.
***********
राग आणि द्वेष हा आपल्या चेहऱ्यावर दिसत नाही. पण आपला तीव्र राग पाच मिनिटे टिकला तर आपली दोन तासाची काम करण्याची शक्ती कमी होते व त्याची नकारात्मक रासायनिक प्रतिक्रिया आपल्या शरीरातील सर्व स्नायूंवर बहात्तर तासांपर्यंत टिकते.
***********
वी.स.खांडेकर आपल्या "वायूलहरी" या पुस्तकात लिहिता लिहिता सहज मिश्किल बोलून जातात, पण ते पराकोटीचं सत्य असतं.....
बायकांना दागिन्यांची हौस उपजतच असते. आणि तिच्यात अस्वाभाविक असे काय आहे ? नक्षत्रे रजनीच्या केसातच शोभतात, दिवसाला त्याचा काय उपयोग ? पण त्यांचे नटणे मुरडणे थोडे अधिक होऊ द्या, झालाच समजा लोकांचा गजहब सुरु !!
***********
सुंदर दिसण्यासाठी नुसता आत्मविश्वास, नुसतेच मॅनर्स आणि गोड हसणं असलं तरी ते पुरेसे होत नाही. व्यक्तिमत्व कणाहीन असेल, तर वाटेल ते उपाय योजले तरी चेहरा सुंदर दिसत नाही.
***********
माझ्या कपाटातल्या पुस्तकात निळ्या-तांबड्या पेन्सिलीने केलेल्या अशा खुणा फार नाहीत. पण ज्या आहेत, त्यांचे सौंदर्य कधीही कोमेजत नाही, त्याची गोडी कधीही कमी होत नाही. अशा खुणा केलेल्या सर्व वाक्ये एकत्रित केली, तर पाच पन्नास पानांचे पुस्तक सुद्धा होणार नाही. पण त्या छोटया पुस्तकात साऱ्या विश्वाचे दर्शन कुणालाही निश्चितपणे होईल !
.........वि.स. खांडेकर यांच्या "पहिले पान" या पुस्तकातून
***********
बालपण
बैल गाडीवर बसून बैलांना मारलेली ललकारी, पेहरणीच्या वेळी चिखलात फसणारे पाय, शेतात उभ्या पिकात कोळपणी करण्यासाठी केलेला बाल हट्ट अन त्यावेळेस काकांनी माझे बांधून ठेवलेले हाथ-पाय, पक्षांनी उभ्या कणसातले दाणे खावू नयेत म्हणून गोफणीतून भिरकावलेला दगड, चांदण्या रात्रीत बैल गाडीतून काकांबरोबर केलेला प्रवास, तुडुंब भरलेल्या विहिरीत मारलेली जंप, चिंचेच्या झाडाखाली बसून दुपारची घेतलेली न्याहरी, श्रावण महिन्यात पाऊसाची झडीत शेताच्या बांधावरनं बैलांसाठी कापलेलं हिरवं गवत, कोणी बघत नाही हे हेरून शेजारच्या शेतातून उपटलेले भुईमुगाचे झाड या साऱ्या जगण्यातून माझ्या बालपणाची पुसटशी झालर मला ऑफिस मध्ये अस्वस्थ करते.
***********
हाताची बोटे
जेंव्हा लहान बाळ तुरु तुरु चालत येवून आपल्या बाबांच्या मांडीवर चढून खिशात हात घालतं अन दुसऱ्या हाताने डोळ्यावरील चष्मा ओरबाडून घेते. इथेच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या गोंडस म्हणीचा जन्म होतो. मग "हाताने" काय घोडं मारलं. आपण खूप चांगलं काम केले असेल तर दृष्ट लागू नये म्हणून आई दोन्ही हातांनी आपल्या डोक्याला स्पर्श करुन स्वतःच्या डोक्यावर दोन्ही हातांची बोटे कड कट्ट मोडून आपल्याला संरक्षक कवच निर्माण करून देते. याच्या नेमके उलट जर स्त्रीला कुणी दुखवलं तर ती स्त्री हाताची पाचही बोटे कड कड करत मोडून त्या व्यक्तीला शाप ही द्यायला मागे पुढे पाहत नाही. म्हणूनच काहींच नशीब कसं फळफळतं बघा, कवडीचं कष्ट न करता फायदाच फायदा आणि राजेशाही जीवन उपभोगायला मिळत असेल तर त्याला चारो उंगली घी मे असं ही संबोधलं जातं. पण सर्वात वाईट प्रसंग ओढवला तो शाहिस्तेखानवर, शिवाजी महाराजांनी त्या दुष्टाची चारही बोटे तलवारीने छाटून टाकली होती. घरातली एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली भावंडांची स्वभाव वैशिष्ट्ये ही एक सारखी नसतात. कोणी ऑफिसर होतो तर दुसरा डॉक्टर, तिसरा कदाचित गुन्हेगार प्रवृत्तीचा निपजतो. त्यावेळेस सहज उद्गार तोंडातून बाहेर पडतात की हाताची पाचही बोटे सारखी नसतात. परंतु ह्याच हाताच्या बोटांचे ठसे गुन्हेगाराला फाशीच्या तखत्यापर्यंत देखील पोहचवू शकतात. हाताची बोटे आपल्या कर्तृत्वात कुठेही कसर बाकी ठेवत नाहीत. हीच हाताची बोटे एकत्र आली तर एका सुंदर रांगोळीला ते जन्माला घालतात याच्यापेक्षा सुंदर काय असेल.
***********
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या - गणेशला भावपूर्ण निरोप
उसळणाऱ्या उंच लाटा मध्ये स्पर्धा सुरू होती. समुद्राने संपूर्ण वाळू आपल्या पोटात सामावून घेतली होती. किनाऱ्यावरची माडांची उंच उंच झाडं वाकून वाकून हे सारं आश्चर्य बघून आपापसात कुजबुजत होती. गणेशाच्या पदस्पर्शासाठी लाटाही आतुर झाल्या होत्या.
***********
पाऊस मुंबईचा (29 ऑगस्ट 2017)
कवीची प्रतिभा वसंत ऋतूत फुलते तशी ती पावसाळ्यातही बहरून येते. परंतु 29 ऑगस्टचा पाऊस मुंबईत असा काही कोसळला त्यात कवींची प्रतिभेची शब्दे निष्प्रभ झालीत. पाऊस आणि तोही मुसळधार हे एकच विशेषण लावून त्याचं वर्णन नाही करता येणार. रात्रीच काळ्याकुट्ट ढगांनी दाटी केली होती. त्याने मुंबईचं जीवन अस्ताव्यस्त करून टाकलं. तो असा काही चराचरात बरसला, अनेक परिसर जलमय झालेत. सिमेंटच्या जंगलातली वृक्षे उन्मळून पडलीत. रेल्वेच्या प्लॅटफार्मवरून धरणासारखं पाणी ओसंडून वाहू लागलं. आयुष्यात पहिल्यांदाच लालबागचा राजांचा मंडप ओस पडला. पण निसर्ग जेवढा क्रूर आहे तेवढा तो निर्दय सुद्धा नाही. शिशिरच्या पानगळी नंतर वसंत ऋतूची कोमल पालवी ला तो जन्माला घालतोचनां. आज सकाळची सलामी दिल्यानंतर पाऊस नम्र झाला. लालबागचा राजाच्या मंडपाकडे पाऊले पुन्हा वळू लागलीत.
***********
सर्व ऋतूंचे सार या भाद्रपद महिन्यात येते.
वसंताचे पुष्पवैभव, जेष्ठांचे फलवैभव, श्रावणातला हिरवेपणा, अश्विनातली वातावरणाची खुलावट आणि धनलक्ष्मीच्या मंगलमय पाऊलांची चाहूल, हेमंतातल्या गार वाऱ्यांच्या झुळुका, शिशिरातली थंडीची लहर, सारे काही माफक प्रमाणात या महिन्यात अनुभवायला मिळते.
...........दुर्गा भागवत ( संकलक शरद गोगटे यांच्या वेचक विचार या पुस्तकातून)
***********
"मानव निर्मिती" हा देवाच्या कल्पकतेचा उत्कृष्ट नमुना आहे. जन्म आणि मृत्यू ह्या दोन्ही गोष्टी स्वतःजवळ ठेवून देवाने या मधल्या काळाचा उपयोग आपल्या मर्जीप्रमाणे करण्याचं स्वातंत्र्य माणसाला दिलं आहे. म्हणूनच स्वतः आयुष्य घडविण्याची जबाबदारी ही ज्याची त्याची आहे.
***********
निरंतर फिरणाऱ्या ऋतुचक्रात दिवस आहे तशी रात्र ही आहे. वसंत, शिशिर, ग्रीष्म आणि पावसाळा या पैकी कोणत्याही ऋतूची अवस्था कायम नाही. बदल हा निश्चित आहे. तसंच आरंभ आणि अंत या दोन बिंदूंमध्ये आपलं जीवन विखरलेलं आहे. श्वास किती घ्यायचे हे ही निश्चित ठरलेले आहे. जन्म आणि मरण यामधला अवकाश म्हणजे जीवन. आणि तेही एकदाच मिळतं. म्हणून तर भर भरून जगायचं आहे. आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी.
***********
बोबडे बोल हे परमेश्वराने लहान बालकांना दिलेली एक ईश्वरीय देणगी आहे. ज्याला हे बोबडे बोल ऐकण्याचं भाग्य मिळालं, जे बाल्य त्याच्या अंगावर खेळलं, कुदलं, रुळलं तो पिता भाग्यवानच. नाही तर आपल्या आयुष्यात कितीही कोरडे माठ पाण्याने भरा, त्यातून झिरपलेल्या ओलाव्यावर तृण उगवत नाही.
***********
शांता ज. शेळके आपल्या "मधुसंचय" या पुस्तकात म्हणतात.
आपल्या जीवनात येतांना प्रेम अगदी हळू, पावले देखील न वाजवता येते. जातांना मात्र ते दांडगाईने, दरवाजा धाडकन आवाज करत निघून जाते !
***********
पतंगाचे रंगी बेरंगी कागद
सरकारने कितीही दारूबंदीचा कायदा केला तरी मद्य विक्रेत्यांची संख्या कमी होतांना दिसत नाही. वृक्ष तोडी बद्दल कडक कानून असून सुद्धा लाकडाच्या वखारीत आज लाकडं ठेवायला जागा नाही. निवडणुकीत जनतेने नाकारलेले उमेदवार सरळ राज्यसभेत मागच्या दरवाज्याने खुर्चीवर विराजमान होतात. शेवटी पतंगाचे रंगी बेरंगी कागद व्यावसायिक दृष्ट्या कितीही तकलादू असले तरी मांज्याच्या सहाय्याने ते आकाशात उडतातच.
***********
एका तापट आणि रागाने लालबुंद झालेल्या स्त्रीच वर्णन आणि तिला कसे मानाचे स्थान वि.स.खांडेकर देतात हे त्यांच्या शब्दात वाचायलाच हवं.
अपल्याला मिरच्या विकत घ्यायच्या नाहींत, असे मनाला पावलोपावली बाजावीत मी त्या पाटीकडे पाहत होतो. त्या पाटीतल्या हिरव्यागार मिरच्यांतून एक लालचुटुक मिरची हळूच डोकावून पाहत होती. तरुणीच्या गहिऱ्या कटाक्षाप्रमाणे वाटली ती मला ! मी तिच्याकडे पाहतच राहिलो. क्षणार्धात मी माझे भान विसरलो ! पावशेर मिरच्या माझ्या पिशवीत जाऊन पडल्या ! भाजीवाली ती लाल मिरची काढून घेत होती. पण मी आग्रहाने ती ठेवून घेतली. रागाने नखशिखांत लाल होणारी ही एकुलती एक स्त्री आहे, या भावनेने मी तिच्याकडे पाहत राहिलो.
......................."पहिले पान" या त्यांच्या पुस्तकातून
***********
"आमच्या आईसाहेब तुमच्या इतक्या सुंदर असत्या तर आम्हालाही तुमच्यासारखे रूप प्राप्त झाले असते." शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुस्वरूप सुनेचे शब्दात केलेले वर्णन वाचून कोणत्याही कविला कविता करण्याचा मोह होवू शकेल.
***********
वि.स.खांडेकर आपल्या "पहिले पान या पुस्तकात लिहितात,
"लग्न होईपर्यंत मनुष्य स्वतःसाठी जगत असतो, पण लग्न होताच तो स्वतःप्रमाणेच दुसऱ्यासाठीही जगू लागतो. पती पत्नी एकमेकांचा हात धरून एका नव्या अद्भुत जगात प्रवेश करीत असतात. या जगात एकाच्या दुःखावर दुसरा आपले सुख शिजवू शकत नाही. संसार हा दोन नद्यांचा संगम आहे, जिथे पृथ्वी आणि आकाश यांचे मिलन होते, असे ते क्षितिज आहे."
"पण धुळीने भरलेल्या, धुराने कोंदटलेल्या आणि यंत्रांनी गजबजलेल्या अलीकडच्या शहरातल्या माणसांना ते पटणे कठीण आहे. ज्या बिचाऱ्यांनी बापजन्मात जिथे एक नदी सुद्धा डोळे भरून पाहिलेली नसते, तिथे संगमाच्या भव्य दृश्याची कल्पना त्यांना कुठून येणार."
***********
शेताच्या बांधावर गवताची लागवड करतांना शेतकऱ्याला आपण कधी पाहिलं नसलं तरी शेताच्या बांधावर बैलांसाठी भरभरून गवत उगवंतच.
उभ्या पिकात दाणे खाणाऱ्या पक्षांना घालवून देण्यासाठी गोफणीतून तिरासारखा भिरकावलेला दगडाने कधी पक्षी जखमी झालेला आपण पाहीला नसेल, तरी शेतकऱ्याला धान्याचं पीक कमी अवतरलं असं तो कधीच म्हणत नाही.
परंतु माणसाने कितीही डांबर रस्त्यावर ओतलं तरी रस्त्याच्या कडे कडेने गवत उगवल्या शिवाय राहत नाही, इथेही निसर्ग कमी पडत नाही.
***********
भ्रमर कोणतेही लाकूड पोखरू शकतो. इतकी शक्ती त्याच्यात आहे. पण जेंव्हा तो कमळ पाकळ्यात बंदी होतो ना तेंव्हा त्याला नाजूक पाकळ्या भेदता येत नाहीत.! एक वेळ तो प्राण गमवील, पण त्या कमळ पाकळ्या चिरून मुक्त होणे काही त्याला साधत नाही. कठीणातली कठीण लाकडाची भूगा करणारी त्याची शक्ती त्या नाजूक पाकळ्यात मात्र लयाला जाते. स्नेह पाकळ्यात माणूसही असाच अडकतो.
***********
सरड्याचा रंग क्षणाक्षणाला बदलतो. तो ज्या झाडावर बसेल त्या झाडासारखा त्याचा रंग होतो. तुमच्या जीवनाचा रंग बदलावयाचा असेल, तर तुम्ही तुमचा मिळेल तो क्षण ग्रंथांच्या सहवासात काढा. थोरो एकदा म्हणाला: "जगातील उत्तम पुस्तकं वाचा, अगदी प्रथम वाचा, नाहीतर तुम्हाला ती वाचायची संधीच मिळणार नाही."
.................बाळ सामंत यांच्या ग्रंथायन या पुस्तकातून.
.................बाळ सामंत यांच्या ग्रंथायन या पुस्तकातून.
***********
गीता
चंद्र, सूर्य, नद्या, समुद्र, ग्रहगोल, एकंदरीत विश्वाचं ब्रम्हांड इत्यादिकांचे कार्य निसर्ग नियामाप्रमाणे सातत्याने, अखंडित चालू असते.
"हे अर्जुना, ही सृष्टी मीच तयार केली आहे, मग येथे मला काय मिळवायचे ?"
आपण म्हणतो, माझ्या बागेतली फुलं मी देवाला वाहिली.
अरे अगोदरचा संवाद तू ऐकलास ना .
ती झाडे त्या देवाने निर्मिली आहेत.
त्या झाडाला फुले त्यानेच फुलविली आहेत.
आपण फक्त ती बागेतून त्याच्या पर्यंत पोहचविलेली असतात.
चंद्र, सूर्य, नद्या, समुद्र, ग्रहगोल, एकंदरीत विश्वाचं ब्रम्हांड इत्यादिकांचे कार्य निसर्ग नियामाप्रमाणे सातत्याने, अखंडित चालू असते.
"हे अर्जुना, ही सृष्टी मीच तयार केली आहे, मग येथे मला काय मिळवायचे ?"
आपण म्हणतो, माझ्या बागेतली फुलं मी देवाला वाहिली.
अरे अगोदरचा संवाद तू ऐकलास ना .
ती झाडे त्या देवाने निर्मिली आहेत.
त्या झाडाला फुले त्यानेच फुलविली आहेत.
आपण फक्त ती बागेतून त्याच्या पर्यंत पोहचविलेली असतात.
***********
पृथ्वी वरच्या सगळ्याच माणसांच्या जिभांना कळणारी चव, नाकाला येणारे वास, डोळ्यांना दिसणारे रंग आणि हाताच्या बोटांना होणारे स्पर्श "युनिव्हर्सल" असतात परंतु प्रत्येकाचे स्वभाव मात्र भिन्न असतात.
***********
मानसशास्राचा प्राध्यापक असलेला एक अमेरिकन विद्वान म्हणतो, 'स्रिया आणि पुरुष यांच्या कामाची वाटणी फार प्राचीन काळापासून झाली आहे. तिच्यात बदल होणे शक्य नाही. मर मर करून पैसा मिळविणे, हे जसे पुरुषाचे कर्तव्य , तसा तो झर झर खर्च करणे, हे स्त्रीचे काम आहे.
असल्या कोपरखळ्या आजपर्यंत स्त्रीलाच अधिक मिळत आल्या आहेत. हे खरे आहे.
............वि.स. खांडेकर यांनी 1997 मध्ये लिहिलेल्या "पहिले पान" या पुस्तकातून
गवताची गंजी पेटवायला काही वाजत गाजत मशाली आणाव्या लागत नाहीत. निष्काळजीपणाने विडी ओढणारा मूर्ख मनुष्य एक ठिणगीने ते काम करू शकतो.
वि.स.खांडेकरांनीं 1997 मध्ये लिहिलेल्या "पहिले पान" या पुस्तकातले साधे विचार आज तंतोतंत लागू पडतात. राजकारणात असो वा टीव्ही सिरियल्स मध्ये , किंवा कोणत्याही न्युज चॅनेल लावून बघा, ठीक ठिकाणी अशा गवताच्या गंजी पेटलेल्या आपल्याला दिसतील.
टोळ धाडी मधील टोळ लाखोंच्या संख्येने उडतांना देखील एकमेकांना अजिबात स्पर्श ही न करता उडतात. कमळांच्या पानांवरून पाणी आणि धूळ सहज निघून जाते.
पडून गेलेल्या पावसाच्या थेंबापासून प्रचंड आकाशाला गवसणी घालणारे इंद्रधनुष्य. अशा निसर्गाच्या अनेक कारामतींकडे बारकाईने पहिले तर निसर्ग मानवापेक्षा किती तरी पट अधिक श्रेष्ठ कलाकृती सहजतेने निर्माण करतो.
'विस्मरण' हे मानवाला मिळालेलं एक वरदान आहे ! हे वरदान नसते मिळाले तर आयुष्यभर पूर्वजांचे जाण्याचे दुःख विसरता आले नसते.
*********
मूर्ख माणूस स्त्रीला तिची वट वट बंद करायला सांगतो, पण शहाणा माणूस तीला आर्जवाने म्हणतो, 'तुझे ओठ मिटलेले असतांना, तेंव्हा ते किती सुंदर दिसतात म्हणून सांगू !
......शांता शेळके यांच्या मधुसंचय या पुस्तकातून
आपण जन्म कुठे घ्यावा आणि मृत्यू कधी येईल हे आपल्या हातात नाही. तरीही आपण जगावे कसे हे मात्र आपण ठरवू शकतो.
लाखो लोकांना समजावणे तुमच्या हातात नाही. संपूर्ण जगाला चामड्याने झाकणे तुमच्या अवाक्यातली गोष्ट नाही. परंतु आपल्या पायात जोडे घालून काट्यांपासून वाचणे सोपे आहे.
"तुमच्याकडे हातोडा असेल तर तुम्हाला सर्वत्र खिळेच दिसतील, तेंव्हा ठराविक मतांच्या, विचारांच्या चौकटीत राहू नका"
ठेवलेस जर तू औत तुझे बाजूला
घेतलीस जर का उसंतऔंदा तुला
मग मिळेल जेंव्हा कण कुणा खायला
बसेल चिमटा येईल तेंव्हा सगळ्यांना समजुन
की देशाला तरणोपाय न शेतकऱ्यावाचून
ग. लं. ठोकळ ....(संकलक शरद गोगटे यांच्या वेचक विचार या पुस्तकातून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा