Thursday, 14 September 2017

शाळा माझी कौलारू

फार फार वर्षापूर्वी माझी शाळा अशी कहाणीची सुरुवात करायला नक्कीच आवडलं असतं. परंतु साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी ज्या मराठी प्राथमिक शाळेत मी शिकलो ती शाळा धामणगांव , तालुका चाळीसगांव. जिल्हा जळगांव. या गांवच्या भूमीत माझा जन्म झाला. त्या वेळी म्हणजे माझ्या लहानपणी  गावांत रेशन दुकान काय तर साधं पोष्ट ऑफिस सुद्धा नव्हतं. बाजारहाट साठी सुद्धा शेजारच्या मेहूणबारे या मोठ्या गावांत जावं लागत असे. शाळेत मुलांची संख्या नगण्यच होती. शाळेचे हेड गुरुजी गावांत गल्ली गल्लीत फिरून चालू वर्षी किती नवीन मुलं दाखल होणार याची नोंद ठेवत असत. एकदा हेड गुरुजी आमच्या घरावरून जात असतांना माझ्या आईने त्यांना अडविले आणि विनंती केली की, माझ्या मुलाला सातवं वरीस लागलंय, त्याला बी शाळेत टाकायचं. गुरुजींनी आईला माझं पूर्ण नांव विचारलं. घरात आणि गल्ली बोळातले मला बापू या नांवाने  हाक मारायचे, आईने माझं नांव बापू सांगीतलं. पण गुरुजींनी ते मान्य केलं नाही कारण ते माझं टोपण नांव होतं. आईने माझं खरं नांव ठेवलंच नव्हतं. आईला प्रश्न पडला, की माझं नांव काय ठेवायचं. आईने त्यांना विनंती केली की, तुमचं जे नांव आहे ना गुरुजी तेच लिवा की. हेड शिक्षकांचं नांव आनंदराव होतं. आणि अश्या पद्धतीने माझ्या नावाचं नामकरण झालं. तेंव्हापासून ते आजतागायत कागदोपत्री, ७/१२ वर सुद्धा माझं नांव आनंदराव झालं. शाळेत हातावर छडी मारून किंवा दोन्ही हातांनी कान धरून उठ बस करण्याची शिक्षा मिळायची, म्हणून मी शाळेत जाणे टाळायचो. मला चांगलच आठवतं, लहानपणी माझी आई मला तिच्या कडेवर बसवून शाळेत सोडायला यायची. कारण तिला वाटायचं मी खूप शिकून मोठं व्हावं. आपल्या पोरानेही गांवातील लोकांसारखं मास्तर व्हावं, शहरात जावून नोकरी करावी आणि झालंही तिच्या मनासारखं. आईमुळे मला शाळेची जाण्याची गोडी लागली. ज्या शाळेत मी लहानाचा मोठा झालो, वाढलो, खेळलो, शिकलो आणि ज्या शाळेने माझ्या बाल मनावर संस्कार केलेत, मला जाणता केलं, आणि दुनियेची दारं उघडी करून दिलीत, आज मी त्या माझ्या शाळेचं वर्णन करतांना माझे हाथ थरथरले, डोळे पाणावलेत.


 

चुन्यात बांधलेल्या त्याच, आता जीर्ण दगडी भिंती

तेच तारेचे कंपाउंड, खिळे निखळून पडलेले

खिडक्या अर्धवट सताड उघड्या, जसी बंदिस्त धर्मशाळा

होते वाळूंचं अंगण, शोधिती डोळे चौफेर

इंद्रधनूची शाळा, होती लालबुंद कौलांची

आता नाही रूप साजणे, बिन आधाराने घरंगळलेली

डोळ्याच्या कडा पाणावल्या, पावसात भिजून गेल्या

शाळेच्या आठवणींनी,  हृदयाला पीळ पडला

No comments:

Post a Comment